‘पणती तेवत ठेवा’ या अनुराधा गोरे यांच्या ( ९ नोव्हेंबर) लेखात बालगोपाळांच्या गंभीर समस्या समाजासमोर आणल्या आहेत. पालकांची बेजबाबदारी बेपर्वाई, व्यसने कारणीभूत आहेत. संबंधित पालकांना मार्गदर्शन, परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई आवश्यक आहे. आज जिल्हा परिषद, महानगरपालिकेतील शाळांमध्ये येणारे विद्यार्थी अशा प्रवर्गातील असतात. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या, शैक्षणिक गरजा पुरवणे, दत्तक विद्यार्थीनी योजना, समाजसंपर्कातून, स्वयंसेवी संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक वर्ग मदत घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात.
डॉ. सामक यांनी लैंगिक शिक्षणाची गरज, महत्त्व चांगल्या प्रकारे पटवून दिले आहे. प्रत्यक्षात शाळेत येणारे बाल विद्यार्थी प्रसारमाध्यमाद्वारे नको तेवढे चार पावले पुढेच गेले आहेत, जात आहेत. आजच्या तरुण पिढीला वयाचे, संस्काराचे भान-मर्यादा राहिल्या नाहीत हेच खरे.
‘पॅकेज’ या मंगला गोडबोले यांच्या लेखातून प्रगल्भ विचार स्पष्ट होतात. पण बालमनावर दडपण, वेळेचे नियोजन, विश्रांतीची गरज, बौद्धिक-शारीरिक कुवत लक्षात घेणे त्याचप्रमाणे श्रीमंतीचा देखावा, चुरस, ईर्षां घात करतात. शेवटी अति तिथे माती अशी वेळ येते. मोकळा श्वास विद्यार्थ्यांना घेण्याची संधी पालक घेऊ देत नाहीत. मानसिक ताण येत जातो. आपल्या बालवयात आपण गांभीर्याने भविष्याचा किती विचार केला होता? करिअरचा विचार करताना बौद्धिक, शारीरिक ताण सहन केला होता? मग पालक या नात्याने बालमनाला ताणतणावाखाली ठेवण्याचा अधिकार गाजवणे योग्य वाटत नाही. पाल्याच्या कलेने, आवडीने, बुद्धय़ांकाप्रमाणे मार्गदर्शनाची संधी मिळवून देणे योग्य ठरेल, भविष्य उज्ज्वल होईल.

लेख आजी-आजोबांसाठीच!
 ‘बाळाची ओळख आणि मैत्री’ हा २३ नोव्हेंबर च्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांनी कोवळय़ा आई-बाबांसाठी लिहिलेला लेख वाचनीय आहे. खरे तर हा लेख आम्हा आजी-आजोबांसाठी आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण मुलगा व सून एवढी बिझी असतात की नात आमच्याच अंगाखांद्यावर मोठी होत आहे. आमच्या घरात जवळजवळ २८ वर्षांनंतर लहान मूल (नात) आल्यामुळे लेखात लिहिलेली बाळाची जडणघडण, वाढ, प्रगती हे सर्व आम्हाला मार्गदर्शक ठरेल. आमची लहान मुलं कशी वाढली, मोठी झाली हे आम्हाला आठवतच नाही आणि दुसरे म्हणजे आत्ता आम्ही नातवंडात जेवढे रममाण झालो आहोत तेवढे मुलांच्यात नव्हतो.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई-२८.

 अशाही लष्कराच्या भाकऱ्या
‘ब्लॉग माझा’ या सदरातील मधुसुदन फाटक यांचा ‘लष्कराच्या भाकऱ्या’ हा  लेख आवडला. फाटक यांनी आपल्या मित्राला जे सांगितले की, लष्कराच्या भाकऱ्या निरपेक्षपणे भाजल्या तर कोठेतरी त्याची नोंद होते. या फाटक यांच्या वक्तव्याचा मलाही अनुभव आला आहे. डिसेंबर १९२३ साली कोषागार कार्यालय ठाणे येथून सेवानिवृत्त झाल्यावर आता निवृत्तीनंतरचा काळ कसा घालावायचा हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला. मग मी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद झालो. कोषागार कार्यालयातून निवृत्त झालो असल्याने मला खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. ज्येष्ठ नागरिक संघाचे काम मनापासून व तळमळीने केल्यामुळे मला फेस्कॉम कोकण प्रादेशिक मंडळ यांच्याकडून उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून ‘गौरव स्मृती’ चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
माझे एक स्नेही श्री. चिथडे हे हिंगणे संस्थेसाठी भाऊबीज निधी गोळा करतात. त्यांच्याकडून पावती पुस्तके घेऊन मीही गेली १०/१२ वर्षे हे काम करीत आहे. त्याचे मूळ म्हणून संस्थेकडून स्वयंसेवक-सन्मानचिन्ह मिळाले आहे.
गेली १२/१३ वर्षे मी ‘सेवानिवृत्तिवेतनधारकांचा सेवा संघ अंबरनाथ’ या संस्थेचे बदलापूर विभागाचे काम पाहतो. कोषागार कार्यालयांतून निवृत्तिवेतन कक्षातून निवृत्त झाल्याने अनेक निवृत्तिवेतनधारकांचे काम केले. मी या संस्थेच्या बदलापूर विभागाच्या उपाध्यक्षपदाची धुराही ६ वर्षे सांभाळली, कुटुंब निवृत्तिवेतन मिळवून देणे, १५ वर्षे निवृत्तिवेतन घेतल्यानंतर अंशराशीकरणाची रक्कम मिळवून देणे, थकबाकी मिळवून देणे अशी बऱ्याच प्रकरणांचा पाठपुरावा करून संबंधितांना त्यांची हक्काची रक्कम मिळवून दिली आहे व ते काम आजही चालू आहे.
२०१२ साली शिवप्रतिष्ठान संस्थेकडून प्रतिष्ठित नागरिक सन्मानचिन्ह मिळाले आहे आणि या माझ्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन यावर्षीचा (२०१३) ब्लासम २०१३ सन्मान दि. २० मे २०१३ रोजी मिळाला. जर २० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यावर काहीही न करता घरी बसलो असतो किंवा कुठेतरी मित्रांमध्ये निर्थक गप्पागोष्टींत वेळ दवडला असता तर या आनंदास मुकलो असतो आणि म्हणूनच फाटक यांचे ‘लष्करच्या भाकऱ्या’ निरपेक्षपणे भाजल्या तर कोठेतरी नोंद होते. या त्यांच्या अनुभवाच्या बोलाची नोंद घेऊन मी माझा अनुभव कळवीत आहे.
– वासुदेव अनंत महाजन, कुळगांव-बदलापूर.

व्हेंटिलेटर चिंतनीय
 ‘ब्लॉग माझा’ या सदरातील व्हेंटिलेटर (२३ नोव्हेंबर) या लेखाच्या निमित्ताने हे थोडेसे. सध्या वैद्यकीय शास्त्र अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे चालते. हे नाकारण्यात काही अर्थ नाही. हे सत्य स्वीकारूनच विचार करायला हवा. आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले ही डॉक्टरांची आणि नातलगांची भूमिका असते, तिचा फेरविचार व्हायला हवा. ही भूमिका स्वीकारल्यास लाइफ सपोर्टिग सिस्टीम व्हेंटिलेटर वगैरे ओघानेच येते. ही भूमिका वैद्यकीय संस्थांच्या फायद्याची असते. एकूणच प्रकार खर्चीक असल्याने ते संस्थेच्या उत्पन्नाचे साधन असते. रुग्ण आणि नातलग यांनीच त्याचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. एका विशिष्ट वयानंतर सगळय़ांनीच अगोदर विचार करून आपल्या बाबतीत काय केले जावे हे लिहून ठेवणे आणि ते जवळच्यांना सांगून ठेवणे गरजेचे आहे. तसे होत नाही हे दुर्दैव.
दुसरे असे की, असेही आणि काहीही करून मृत्युशय्येवरील रुग्णाला केवळ जिवंत ठेवणे हेच वैद्यकीय शास्त्राचे तसेच डॉक्टरांचे ध्येय आहे असे समजले जाते. त्याचाही पुनर्विचार व्हावा. वेदनारहित मृत्यू हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असे मानणे आवश्यक आहे. विशेषत: डॉक्टरांना याबाबतीत अधिक संवेदनक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक वैद्यकीय पद्धतीने मृत्यू रुग्णालयातच झाला पाहिजे असे जवळ जवळ बंधनकारक केलेले आहे. मृत्यू घरी किंवा रुग्णालयाच्या वाटेवर झाल्यास मृत्यूचा दाखला मिळणे दुरापास्त करून ठेवले आहे. पुढील दुस्तर कर्म आणि विद्रुपता टाळायची असल्यास दाखल्यासाठी पैसे मोजणे हा एकच मार्ग शिल्लक ठेवलेला आहे. यातनारहित मृत्यू आणि आपल्याच घरी मरण्याचे स्वातंत्र्य या दोहोंवरील माणसाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे त्यासाठी योग्य ती उपाययोजना केली गेली पाहिजे ही काळाची गरज आहे.
– डॉ. रघुनाथ बोराडकर, कोथरूड पुणे.

‘धन्य ते गायनी कळा’
१६ नोव्हेंबरच्या अंकातील चतुरंग मैफलमधील   पं. शंकर महादेवन यांच्या सांगितिक वाटचालीविषयीचा लेख न थांबता सलग वाचला. १६ आणे अप्रतिम. खुद्द शंकर व महादेव यांचे नाव घेऊन भूतलावर अवतरलेल्या या महान, कंठ संगीत व वाद्य संगीतावरील निष्ठा, प्रेम, कष्ट व निगर्वी आणि रसिकांना देव मानण्याची दुर्मीळ स्वाभाविक जाणीव असे अनेकानेक गुण व रूप यांचा त्रिवेणी संगम लाभलेल्या या कलाकारांचे हे पृष्ठ ६ एकही दुमड न पडता जसेच्या तसे काचेच्या फोटो फ्रेममध्ये बंदिस्त करावे असे आहे. त्यांचा लेख इतका परिणामकारक होण्यामध्ये शब्दकार नितीन आरेकर यांच्या सार्थ सहकाराबद्दल अभिनंदन.
– वा.ना. देवधर, जोगेश्वरी.

Story img Loader