डॉ. अंजली जोशी
बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षांच्या ‘कट थ्रोट’ स्पर्धेत टिकून राहणं प्रत्येक विद्यार्थ्यांला जमेलच असं नाही. विषयांचं न होणारं आकलन, आपण निवडलेला करिअरचा रस्ता चुकला की काय ही धाकधूक आणि पालकांच्या आपल्याबद्दलच्या स्वप्नांचं ओझं.. प्रचंड घुसमट. मात्र शालेय निकालांमध्ये पाल्याचे चांगले गुण पाहिलेल्या पालकांना ही घुसमट समजणं अवघड जातं. ‘अपेक्षा आणि वास्तव’ या कात्रीत सापडलेल्या अशा विद्यार्थ्यांचं भावविश्व समजून घ्यायला हवं. मुलांना जाणवणारं स्वत:चं अस्वस्थपण न घाबरता सांगता येईल असा आश्वासक अवकाश पालकांनीच निर्माण करून द्यायला हवा..
पुस्तकातला प्रश्नसंच समोर उघडा पडला होता. सुरुवातीच्या प्रश्नांना दोन मिनिटं लागली. म्हणजे एक मिनिट जास्त! पुढच्या काही प्रश्नांना चार मिनिटं, म्हणजे दोन मिनिटं जास्त! नंतरचा प्रश्न जमलाच नाही.. त्यापुढचाही जमला नाही.. नंतरचाही नाही. उत्तरं न आलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरं आलेल्या प्रश्नांपेक्षा जास्त होऊ लागली. उत्तरं आलेल्या प्रश्नांनाही वेळ जास्त लागतोय. असं झालं तर या वर्षीही?.. माझ्या कपाळावर घाम डवरून आला. पोटात खड्डा पडला. छातीत धडधड सुरू झाली.
माझी ७ मेला ‘नीट’ची (NEET) परीक्षा आहे. मागच्या वर्षी क्लिअर झाली नाही म्हणून ड्रॉप घेतला. आईबाबा म्हणाले, ‘‘आदित्य, एक वर्ष ड्रॉप घेतला तरी काही बिघडत नाही! संपूर्ण आयुष्याच्या मानानं एक वर्ष तर फार छोटा कालावधी आहे. इतर मुलं तर केवळ वरचा रँक मिळण्यासाठीही ड्रॉप घेतात. काही तरी मिळवायचं असेल तर काही तरी गमवावं लागतं!’’
तेव्हापासून सराव करतोय. दहा-दहा तास अभ्यास करतोय; पण प्रगती होत नाही, ती नाहीच! ही संधी शेवटची आहे. इथे अपयश येणं चालणार नाही; पण या खेपेलाही असं झालं तर? पोटात ढवळायला लागलं. हातापायांना होणारा कंप जाणवायला लागला. घशाला कोरड पडली. मी उठून जगमधलं पाणी घटाघटा प्यायलो. परत ड्रॉप घेतला तर पुढच्या खेपेला गुण वाढतील, याची काय शाश्वती? म्हणजे परीक्षा देण्याशिवाय पर्यायच नाही. समोरचे प्रश्न दिसेनासे झाले. डोळय़ांसमोर नुसती अक्षरं नाचत राहिली. त्यांचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचेना.
खालून मुलांचा कोलाहल ऐकू आला. मी खिडकीतून खाली पाहिलं. शाळेतल्या मुलांना सुट्टय़ा लागल्या होत्या. त्यांच्या ओरडण्याचे आवाज इथपर्यंत पोहोचत होते. किती मजेत खेळत होती. काही वर्ष गेली की कळेल, की त्यांच्यापुढे कसलं ताट वाढून ठेवलंय ते! मीही असाच मनमुराद खेळायचो; पण नववीत गेलो आणि मजेला ओहोटी लागली. सहामाहीत कमी गुण मिळाले, तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘आता खेळणं बंद. त्यामुळे लक्ष विचलित होतं. अर्जुनाला बघ बाण मारताना कसा माशाचा एकच डोळा दिसत होता, तसं आता एकच ध्येय समोर ठेवायचं. ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे!’’ आई म्हणाली, ‘‘आदित्य, आपण मध्यमवर्गीय आहोत. आपल्याकडे काही वडिलोपार्जित इस्टेट नाही. शिक्षण चांगलं असेल तरच या जगात तुझा निभाव लागू शकेल.’’
तेव्हापासून शाळा, क्लास आणि अभ्यास एके अभ्यास! हळूहळू गुण सुधारायला लागले. आईबाबा पाठ थोपटत म्हणाले, ‘‘आता कसे छान मार्क्स मिळताहेत! दहावीलाही असेच मिळाले पाहिजेत.’’ आणि खरंच तसं झालं. दहावीत ९३ टक्के गुण मिळाले. आईबाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बाबा म्हणाले, ‘‘बघ, प्रयत्न केलास की हवं ते साध्य करता येतं. आमच्या आयुष्यात आम्ही ९० टक्क्यांच्या जवळपासही कधी गेलो नाही. तू मात्र आमचं नाव काढणार!’’
मला इतका हुरूप आला! गगनाला गवसणी घातल्यासारखं वाटू लागलं. आत्मविश्वास ओसंडून वाहू लागला. आपण हुशार मुलांच्या यादीत आहोत याचं समाधान वाटायला लागलं. बाबा म्हणाले, ‘‘तू आता मेडिकलला जाऊ शकशील. आइनस्टाइन काय म्हणाला माहीत आहे ना? गुणवत्ता म्हणजे एक टक्के प्रतिभा आणि ९९ टक्के मेहनत! प्रयत्न केलास तर तूही सहज डॉक्टर होशील. आपल्या नातेवाईकांत अजून कुणीच डॉक्टर नाही. तूच आपल्या घराण्यातला पहिला डॉक्टर!’’ मग आईबाबांनी NEET च्या परीक्षेची तयारी करून घेणारा कॉलेज आणि क्लास एकत्रित असणारा प्रसिद्ध कोचिंग क्लास शोधून काढला. आई म्हणाली, ‘‘आदित्य, आम्ही आपले साधे ‘बी.ए.’ आणि ‘बी.कॉम.’ झालो. आमच्या वेळी पालकांमध्ये शिक्षणाबाबत एवढी जागरूकता नव्हती आणि मोठी फी भरण्याची ऐपतही नव्हती. त्यामुळे सरधोपट मार्गानं आम्ही चालत गेलो. तुझं तसं होऊ द्यायचं नाही. तुला डॉक्टर झालेलं पाहण्यासाठी आम्ही लागेल ते करू.’’ आईबाबांनी मग घरातल्या बाल्कनीची वेगळी खोली बनवली. ‘‘तुला आता शांतपणे अभ्यास करता येईल. आम्ही तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही.’’
‘‘आदित्य, जेवायला ये.’’आईची हाक ऐकू आली. मी टेबलापाशी गेलो. आईनं माझ्या आवडीचा स्वयंपाक केला होता; पण माझी भूकच मरून गेली होती. ‘‘काय रे असा चिवडत बसला आहेस? परीक्षेचं एवढं कसलं टेन्शन? मागच्या वर्षी कमी मार्क्स मिळाले म्हणून या वर्षीही तसं होईल असं नाही! नववीत नाही का कमी मार्क्स मिळाले होते? तरी प्रयत्नांच्या बळावर दहावीत काढलेसच ना ९० च्या वर? ते लक्षात ठेव. आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.’’ आई बोलतच होती. मी पानावरून उठलो तेव्हा माझ्या पोटातला खड्डा अजूनच वाढला होता.
खोलीत येऊन परत पुस्तक समोर धरलं. बायोलॉजी ठीक आहे, पण फिजिक्स डोक्यावरून जातं. थोडं वाचलं की चेक करावंसं वाटतं, की आतापर्यंत केलेला अभ्यास पुरेसा आहे का? तो नसला की धडधड वाढते. मी नापास झालोय याची भयानक चित्रं डोळय़ांसमोर दिसायला लागतात. शाळेमध्ये सायन्स शिकताना फार अडचण यायची नाही. पाठ केलं की काम भागायचं. क्लास सुरू झाल्यावर कळलं की यातला एकेक विषय म्हणजे नुसता महासागर आहे. कितीही बुडय़ा मारल्या तरी तळ गाठता येत नाही. किती आणि कसं पाठ करणार? अहोरात्र केला तरी अभ्यास सदैव ‘आ’ वासून उभाच असतो. अजस्र पुस्तकं, अगणित प्रश्न, थकवून टाकणाऱ्या, क्लासच्या एकामागून एक होणाऱ्या परीक्षा! माझा श्वास कोंडला जातो. नाकातोंडात पाणी गेल्यासारखं होतं. हातपाय मारत राहतोय; पण पैलतीर दिसतच नाही.
मागच्या वर्षीचे क्लासमधले दिवस समोर फेर धरताहेत. फिजिक्सचे सर काय शिकवायचे ते समजायचं नाही. ते भराभर पुढचे टॉपिक्स घेत राहायचे. कितीही अभ्यास केला तरी त्यांच्या वेगाशी जुळवून घेताना दमछाक व्हायची. आधीचा टॉपिक कळला नाही, तर पुढचाही कळायचा नाही. स्वत:हून समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी जमायचं नाही. एकदा धीर करून त्यांना काही शंका विचारल्या तर ते माझ्यावरच डाफरले, ‘‘तुला अभ्यास करायला नको! रेडीमेड मिळणार का सगळं? बाकीची मुलं मग कशी उत्तर देतात?’’
वर्गातली हाताच्या बोटावर मोजण्याएवढी मुलं फटाफट उत्तरं द्यायची. सर त्यांचा दाखला सतत देत राहायचे. या मुलांना क्लासमध्ये अतिबुद्धिमान मुलं म्हणून संबोधलं जायचं. त्यांच्यावर क्लासच्या प्रमुखांची विशेष मर्जी होती. वरच्या रँकमध्ये येऊन ती क्लासचं भवितव्य उज्ज्वल करणार होती. वेगळी सेशन्स, वेगळं कोचिंग, उत्तम शिक्षक, असा विशेष थाट त्यांच्या दिमतीला होता. मनात असूनही त्यांच्याशी बोलण्याची कधी हिंमत झाली नाही. कारण त्यांच्या डोळय़ांत तुच्छतेचा भाव सदैव तरळत राहायचा. सगळे त्यांच्याशी अंतर ठेवून वागायचे. वर्गातले काही जण त्यांच्याएवढे नसले तरी बऱ्यापैकी गुण मिळवायचे आणि माझ्यासारखे काही असेही होते, जे पिछाडीला गेले होते.
क्लासच्या पहिल्या परीक्षेची मेरिट लिस्ट लागली, तेव्हा माझा रँक शेवटच्या रांगेत आला होता. माझा आत्मविश्वास दाणकन खाली आदळला. त्या रात्री आणि नंतर कित्येक रात्री झोप लागली नाही. परत कशीबशी उभारी धरून अभ्यास केला; पण एकदा खाली गेलेला मेरिट लिस्टमधला रँक परत वर सरकलाच नाही. शिकवलेलं कळायचं नाही त्याचं टेन्शन, अभ्यास जमायचा नाही त्याचं टेन्शन, आईबाबांनी इतके पैसे भरून क्लासमध्ये नाव घातल्याचं टेन्शन, त्यांच्या अपेक्षांचा आपण चुराडा करतोय याचं टेन्शन आणि धड कुणाला हे सांगता येत नाही, त्याचंही टेन्शन! ही घुसमट अजूनही संपत नाही.
क्लासमध्ये पराकोटीचं स्पर्धात्मक वातावरण होतं. आपण करत असलेला अभ्यास कुणी दुसऱ्याला सांगत नसत. सगळं गुप्त ठेवायचं. एखादा अधिक शब्द आपल्या तोंडून जाईल म्हणून सगळे सावध असत. क्लासमधल्या मुलांशी मैत्रीचे बंध त्यामुळे जुळलेच नाहीत. खालचा रँक आल्यामुळे ते हसतील का, चिडवतील का, अशी भीती वाटायची. त्यातले अनेक जण ‘आयसीएसई’ नाही तर ‘सीबीएससी’ बोर्डाचे होते. त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त झाला असणार, या विचारानं आधीच घसरलेला आत्मविश्वास घरंगळत पार खाली जायचा. त्यांचं ‘शेक्सपिअरचं इंग्लिश’ आपण बोलू शकणार नाही असं वाटून तर तो पार तळच गाठायचा. गेलं वर्षभर घरीच अभ्यास करतोय; पण आत्मविश्वासाला टेकू अजून मिळाला नाही..
अभ्यासाच्या टेबलसमोर भिंतीवर चिकटवलेली कविता दिसली आणि परत स्मृती उसळून आल्या. गतवर्षीची मार्काची घसरण शेवटी आईबाबांना सांगावीच लागली होती. क्लासमध्ये रँकनुसार विद्यार्थ्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा तीन वर्गात विभागणी झाली. मी अर्थातच ‘क’ वर्गात गेलो. आईबाबा बोलले नाहीत, पण त्यांचा अपेक्षाभंग मला जाणवत होता. रडू फुटेलसं वाटत होतं. बाबा पाठीवरून हात फिरवत म्हणाले, ‘‘खालचा रँक आला तरी निराश होऊ नकोस. तुला ती प्रसिद्ध कविता माहीत आहे ना? ‘कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती!’ माझी खात्री आहे, की तू जोमानं प्रयत्न केलेस तर ‘क’मधून ‘अ’मध्ये जाशील.’’ मी ती कविता लगेच भिंतीवर लावून टाकली. समोर दिसत राहते सतत ती! ‘नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती हैं। चढम्ती दीवारों पर, सौ बार फिसलती हैं।’’ बाबा हेच उदाहरण देतात; पण पडली-धडपडली तरी मुंगीला तो दाणा तरी पेलवतोय ना? कसं सांगू की मला हा दाणाच पेलवत नाहीये ते?..
आता वाटतं, की दहावीला मला ९० टक्क्यांपेक्षा कमीच गुण मिळायला पाहिजे होते. मग कुठल्या तरी साध्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असता. आईबाबांच्या अपेक्षाही वाढल्या नसत्या. ९० टक्क्यांच्या या सापळय़ात मी पुरता अडकलोय. त्यात आत जाणं सोपं, पण बाहेर येणं महाकठीण! कितीदा तरी वाटलं, की या सापळय़ातून सुटावं; पण परतीचे दोर कापल्यासारखे वाटताहेत. नवीन अभ्यासक्रम निवडावा तर परत पहिल्यापासून सुरुवात. त्यातही यश मिळेल याची काय शाश्वती?.. कॅलेंडरमधलं ७ मेच्या तारखेचं पान परत परत फडफडतंय. सारखं हेच चित्र दिसतं- पेपर हातात पडलाय. न येणाऱ्या उत्तरांची संख्या वाढत चाललीय. छातीतली धडधड वाढतेय. हातपाय गारठलेत. अक्षरं पुसट होत जाताहेत. डोळय़ांसमोर अंधेरी आलीय. मी ब्लँक झालोय..