लग्न झाल्यानंतर माहेरचा एक मायेचा शब्दही ऐकायला स्त्रियांचे कान आतुरतात. पण ‘माहेरानं परकं केलं अन् सासरानं उपरं मानलं,’ अशी अवस्था झाल्यास ती एकटी पडते. ‘आपण आता कोणाचेच नाही’ ही भावना घालवायला पुष्कळदा फार कशाची गरजही नसते. जिव्हाळ्यानं केलेली विचारपूस, कौतुकानं खास तिच्यासाठी केलेली एखादी गोष्टही ‘तू एकटी नाहीस,’ ही उभारी तिला देते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लहानपणी नवरात्रीच्या भोंडल्यात सासर-माहेरची गाणी म्हणताना खूप मजा यायची. ‘सासरच्या वाटे कुचूकुचू काटे, माहेरच्या वाटे नारळ फुटे..’ यात सासरच्या ओळी म्हणताना तोंड वेडावत म्हणायचं आणि माहेरच्या ओळी प्रेमानं हसत म्हणायच्या असत. असं करताना काय आनंद मिळायचा कुणास ठाऊक! कारण त्या वयात सासरचा अनुभवच नव्हता, तर माहेरचा आनंद कुठला समजायला?.. पण मोठ्या मुलींचं बघून असंच करायचं असतं, एवढंच कळत होतं.
माहेर हा शब्द अनुभूतीसह इथे ओळखीचा झाला. खरंतर लग्न होईपर्यंत किंवा ठरेपर्यंत बहुतेकदा मुलींना आया कामं सांगतात, ‘नीट वाग’, ‘हे शीक- ते शीक’ म्हणून मागे लागतात. ते खूप मुलींना खटकतच असतं. त्याचा रागही येत असतो. पण ज्या क्षणी लग्न ठरतं, त्या क्षणी ‘माहेर’ हा हळवा करणारा शब्द मुलींच्या आयुष्यात एन्ट्री करतो! लग्न होऊन कितीही वर्ष होऊ दे, तो हळवेपणा यित्कचितही कमी होत नाही. या ना त्या कारणानं ज्यांच्या आयुष्यात हे माहेर नसतं, त्यांना नेहमीच त्यांच्या त्या हळव्या, पण रिकाम्या कोपऱ्याकडे पाहून उदास आणि एकाकी वाटत राहतं.
हेही वाचा – खाऊ या ‘त्यांच्या’साठीही!
कविता पाचवीत असताना तिच्या आईबाबांचं अपघातात निधन झालं. त्यांच्या माघारी आजी-आजोबांनी तिला खूप जीव लावला, चांगलं शिकवलं. दोघांचंही वय झाल्यामुळे त्यांना कविताचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं होतं. स्थळ बघे-बघेपर्यंत आजोबांचं निधन झालं. आजीनं तिची जबाबदारी पूर्ण केली आणि तिच्या लग्नानंतर सहा महिन्यांतच आजीही गेली. सासरचे लोक चांगले होते. नवरा खूप जीव लावायचा. पण कवितावर लग्नानंतर खूप जबाबदाऱ्या पडल्या. त्यात पुढच्या दोन महिन्यांत ती गरोदर राहिली. सगळ्यांना आनंद झाला, तसा तिलाही झाला. पण वय लहान असल्यामुळे तिला बातमी कळल्यावर खूप दडपण आलं. रडू कोसळलं. मात्र हे सगळं व्यक्त करायला तिच्याकडे कोणीच नव्हतं. तिनं एकदा सासूबाईंना बोलून दाखवलं, पण त्या उलट म्हणाल्या, ‘‘या वयात मला तर दोन दोन मुलं झाली होती. तेव्हा तर सगळी कामं घरातच करायला लागायची. आम्ही कसं केलं असेल विचार कर.’’ कविताची बोलती बंद. तिला आजीची आठवण येऊन खूप रडू कोसळलं. तिच्या मनात आलं, की आई-आजी असत्या, तर त्यांना बातमी कळल्यावर तिची काळजी वाटली असती. मग तिलाही आपली भीती बोलून दाखवता आली असती. आता ती कोणाकडे तिची भीती बोलून दाखवेल? इथे तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.. म्हणजे तिच्या सासूचीच कशाला, जगात अशी करोडो बाळंतपणं झाली असतील. पण कविताची पहिलीच वेळ होती आणि तिला दिलाशाच्या दोन शब्दांपेक्षा जास्त कशाचीच गरज नव्हती. नऊ महिने तर तिचे तिलाच पार पाडायचे होते. अशा वेळी मुलींना लहान मानून, अननुभवी मानून माहेरचे लोक तिला काळजीनं सारखं विचारत राहतात. खरं तर अनेक सासवासुद्धा पहिले सहा-सात महिने मनापासून सुनांची काळजी घेतात. पण ते दोन दिलाशाचे शब्द न मिळाल्यास मुलींना माहेरची ओढ वाटत राहते.
मुळातच गरोदरपणात आणि बाळंतपणात स्त्रिया खूप हळव्या झालेल्या असतात. नवीन बदलांना सामोऱ्या जात असतात. बाळंतपणातून लवकरात लवकर उठून कामाला लागून दाखवणं, या आव्हानापेक्षा पुष्कळदा त्यांना माहेरी मिळणाऱ्या आरामाची गरज असते. कवितासारख्या स्त्रियांना या आव्हानाला तोंड देताना खूप तणाव येतो. बऱ्याच प्रकरणांत आई-वडिलांच्या माघारी ज्या नातेवाईकांनी मुलींना मोठं केलेलं असतं, त्यांना तिच्या लग्नापर्यंतच आपली जबाबदारी आहे असं वाटत असतं. त्यामुळे अशा मुली माहेरच्या प्रेमाला कायमच्या पारख्या होतात आणि आयुष्यभर स्वत:ला एकाकी समजत राहतात. २२ ते २५ वयातल्या मुली मुलांच्या बरोबरीनंच (गुणवत्ता याद्या तर त्या थोड्या पुढेच असल्याचं दाखवतात!) अभ्यास करतात. मुलगा-मुलगी असा भेदभाव हल्ली कमी झाला आहे. पण लग्नाचं वय जवळ आलं, की पारंपरिक समाजातच राहायचं असल्यानं पालकांना- विशेषत: आईला जास्त टेन्शन येतं. कारण करिअरवर लक्ष देताना मुलीला खास अशी गृहिणीची कामं येतच नसतात. लग्न झाल्यावर पुष्कळ घरांत सासू नेमक्या त्याच पारंपरिक अपेक्षा करते. कितीही प्रयत्न केले, तरी त्या अपेक्षांवर ती १०० टक्के उतरू शकत नाही. प्रचंड दडपण असतं. अशा वेळी हक्काचं माहेर असलेल्या मुलीसुद्धा घरी काही सांगत नाहीत. आई-वडिलांना काळजीत कशाला टाकायचं म्हणून. दरवेळेस काही त्या मुलीला अगदी घरगुती हिंसेचाच सामना करावा लागत असतो, असं नाही. पण आपलं म्हणणं कोणीतरी प्रेमानं ऐकलं, काळजीचे, मायेचे दोन शब्द बोलले, की मुलींना उद्याला सामोरं जायचं बळ येतं. पण खूपदा सासरचे म्हणतात, ‘आमच्याकडे असं नसतं..’ आणि माहेरचे म्हणतात, ‘आमच्याकडेही अशी पद्धत नाही’. दोन्ही बाजूंचे लोक ‘आमच्याकडे’ म्हणतात तेव्हा आपण नेमके कोणाचे, हा संभ्रम मुलींना पडतो. एक वेळेस माहेर नसलं, तरी मनाची समजूत काढता येते. पण इथे तर माहेर असून परकं होऊन जातं.
प्राजक्ताचं लग्न धूमधडाक्यात झालं. ती पुण्याहून नागपूरला गेली. सासरी अजूनही तिला तिचं सामान ठेवायला स्वतंत्र जागा मिळाली नव्हती. असे २ महिने गेल्यावर जेव्हा एकदा ती माहेरी आली, तेव्हा तिचं कपाट रिकामं करून तिथे दादाच्या ऑफिसच्या फाइल्सना जागा करून देण्यात आली होती. केवळ दोन महिन्यांतच जणू तिचं घरातलं स्थान गेलं होतं. कपाट हे केवळ प्रतीक आहे. पण मुलींना अशा वेळी आपण कोणाचेच नाही, ही जाणीव मनात घर करून जाते. त्यातून एकटेपणा वाढत जातो. कपाट उघडून बघितल्यावर प्राजक्ताच्या मनात झालेली खळबळ आईनं अचूक हेरली होती. प्राजक्ता बाहेर गेल्यानंतर आईनं दादाच्या फाइल्स कपाटातून काढल्या. प्राजक्ताचं सगळं सामान कपाटात नीट लावून ठेवलं. प्राजक्ता आल्यावर आपलं सामान शोधू लागली. शोधाशोधीत कपाट उघडून बघितल्याबरोबर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तेव्हा आईनं तिला जवळ घेतलं. सांगितलं, की ‘‘हे घर जेवढं दादाचं आहे, तेवढंच तुझं आहे. तुझ्यावर काहीही वाईट प्रसंग ओढवला तर नेहमी लक्षात ठेव.. आम्ही सदैव कोणत्याही अटींशिवाय तुझ्या पाठीशी उभे राहू.’’ दादा मागे उभा राहून हे सगळं ऐकत होता. तो तिच्या डोक्यावर थापटून हसून म्हणाला, ‘‘मी तर प्राजूच्या मागे आतासुद्धा उभा आहे!’’ दादाच्या या बोलांमुळे प्राजूच्या मनातली एकाकीपणाची भावना कुठल्याकुठे पळाली. आई-बाबाच नाही, तर दादासुद्धा प्रसंगी माझ्यासाठी उभा राहू शकतो, ही जाणीव तिला सुखावून गेली.
आपल्या प्रेमाला प्राधान्य देत, आई-वडिलांचा विरोध न जुमानता कित्येक मुली प्रेमविवाह करतात. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते ती आपलं माहेर दुरावून. सौम्या आणि मनोजनं पळून जाऊन लग्न केलं होतं. मनोजच्या घरच्यांनी सौम्याला स्वीकारलं, पण सौम्याच्या घरच्यांनी मात्र शेवटपर्यंत हे लग्न मान्य केलं नाही. दोघांनी भरपूर मेहनत करून स्वत:चा ‘टू बीएचके’ फ्लॅट घेतला. सासू-सासरे फ्लॅट बघायला आले होते. त्यांनी जवळच्या नातेवाईकांना फोनवर सांगितलं, की ‘मनोजनं छान फ्लॅट घेतलाय’. त्यात कुठे सौम्याचं नावच नव्हतं. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप नव्हती. तिचे आई-बाबा असते, तर त्यांनी भरभरून कौतुक केलं असतं. पण ते हयात असतानाही केवळ लग्नाच्या निर्णयामुळे सौम्याला ती थाप मिळवता येत नव्हती. तिच्या मनात येऊन गेलं, की इथले लोक शेवटी रक्तानं बांधलेले आहेत. ती एकटीच वेगळी होती! सगळ्या जगानं कितीही कौतुक केलं, तरी आपल्या माणसांनी कौतुकानं दिलेली थाप नेहमीच पारड्यात जड माप टाकते.
हेही वाचा – मुलांना हवेत आई आणि बाबा!
वर्षभर सतत जबाबदाऱ्या पार पाडल्यावर, विंदांच्या भाषेत बोलायचं, तर ‘कर कर करा, मर मर मरा’ असं आयुष्य जगल्यावर चार दिवस पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. काही न करता नुसतं लोळत पडावंसं वाटतं. कोणी आवडीचे पदार्थ आठवणीनं करून खाऊ घालावेतसं वाटतं. लहान होऊन आईच्या कुशीत शिरावंसं वाटतं. घड्याळाचे काटे न बघता मनाला येईल तसं वागावंसं वाटतं. हेच तर असतं माहेर. लाड-कोड-कौतुक, आठवणी, शाबासकी, विनाशर्त प्रेम, काळजी, दिलासा, या सगळ्यांनी भरभरून असलेलं माहेर. सगळ्या जगानं नाकारल्यावर, आपल्याला एकटं टाकल्यावर, पटकन मदतीचा हात देणारं माहेर ही खरंतर एक संकल्पना आहे. ‘माय म्हणजे माहेर’ हे कोणी बदलू शकणार नाही, पण ज्यांना असं माहेर नाहीये, त्यांना या सगळ्या गोष्टी देणारं अजून एखादं नातं असूं शकतं. जे कदाचित आईची जागा भरून नाही काढणार, पण आईची कमतरता तरी जाणवू देणार नाही. एखादी मैत्रीण, एखादी बहीण, असं माहेर नक्कीच होऊ शकते. आपण आपलं मन मोठं करून कोणासाठी तिचं माहेर होऊ शकलो, तर आपल्यासाठीही एक माहेर नक्कीच तयार होईल.
बहिणाबाई चौधरी आपल्या ‘माहेर’ या कवितेत म्हणतात, ‘नीट जाय मायबाई नको करू धडपड, तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरचा दगड,’ जर माहेरच्या वाटेवर येणारा एक दगड इतका जीव लावू शकतो, तर का नाही एक बाई एका बाईला तिचं माहेर होऊन एकटेपणा दूर करेल?.. आदर्श परिस्थितीत सासूही आपल्या सुनेला जीव लावून तिचं माहेर होऊ शकेल. सगळा प्रश्न माणसांमधल्या एकटेपणाचा आहे. ‘ती’च्या मनातली ही पोखरणारी ही भावना पालटायला माहेरच्या आपुलकीचे दोन शब्द पुरेसे ठरतील!
trupti.kulshreshtha@gmail.com