… हा रस्ता नवीन आहे मला. गाण्यासारखेच अभिनयाचे, दिग्दर्शनाचे सगळे ओळखीचे रस्ते बाजूला ठेवून अजून खोल खोल उतरायला लावणाऱ्या नव्या रस्त्यावर गिंको बिलोबा झाड आणि त्यांच्या मधून जाणारा हा सुंदर रस्ता, जपान्यांनी खास बांधलेला. ‘बिलोबा’ हे किती  गोड नाव आहे. टोकियोतल्या त्या रस्त्यावरच्या, ‘गिंको बिलोबाच्या’ पिवळ्याधमक पानांना मनभर पसरू देताना मला स्वत:शीच ठरवायचं आहे, ‘मी स्वत:ला मोडू द्यायला तयार आहे..
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातल्या पहिल्याच दिवशी अनुराधा कपूर नावाच्या एका उत्कृष्ट शिक्षीकेनं आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला होता, ‘स्वत:ला पूर्ण मोडू देण्याची ताकद तुमच्यात आहे? तरंच तुम्ही पुन:पुन्हा नव्याने घडू शकाल. तरंच तुम्हाला नवनवे रस्ते दिसू शकतील..’ त्या वेळी त्यांचा तो प्रश्न एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिला होता. कारण तो नवनवं शिकण्याचा काळ होता. त्यामुळे समोरचे सगळेच रस्ते नवीन होते. फक्त घडण्याचंच वय होतं, ‘मोडण्याचं’ महत्त्व कळण्याचं नव्हतं. फुटेल त्या रस्त्यांनी झोकून देऊन पळत सुटायचं वय होतं. त्या वयातही मी स्वत: माझ्या एका मुख्य रस्त्याची निवड सजगतेनं केली. कला आणि शास्त्र असे दोन रस्ते दिसत असताना मी कला नावाचा रस्ता निवडला. तोपर्यंत सगळं बरोबर वाटतं आहे. या मुख्य रस्त्याला नंतर गाणं, नाच आणि अभिनय या तीन उपवाटा दिसल्या. आईने अभिनयाची वाट निवडलेली दिसत होती. मीही तीच निवडली. तिथून पुढे काहीच फसलं नाही किंवा वाईटही नाही झालं. वाटेला वाटा फुटत गेल्या. पुणं, सत्यदेव दुबे नावाचा थोर नाटय़गुरू, दिल्लीचं नाटय़ विद्यालय, मग मुंबई, मग नाटकं.. टेलिव्हिजन.. मग सिनेमे.. माध्यमांमध्ये सरावत जाणं.. खूप काही शिकवणारे उत्तम कलाकार आसपास. पैसे आणि इतर.
गेल्या काही महिन्यांत एक गोष्ट माझ्या आयुष्यात वारंवार घडते आहे. कुठलंही नवीन काम येतं, त्या सेटवर जाते मी, पहिल्यांदाच, तिथे गेल्यावर लक्षात येतं, अरेच्या, आसपासचे सगळे ओळखीचेच आहेत! युनिटचा मेकपमन समोर येतो- आणि माझे डोळे विस्फारतात, ‘अरे! तू आहेस होय!’ असं होतं. तो आधी जिथे भेटला असेल तिथले संदर्भ द्यायला लागतो. स्पॉटबॉयसुद्धा ओळखीचाच निघतो. न सांगता आपोआप सगळ्या गोष्टी हव्या तशाच घडत जातात. त्या सगळ्यांच्या गप्पात रमल्यावर तो नवा सेट कधीच ‘आधीचाच’ झालेला असतो. ओळखीचा. आश्वस्त. हे सगळं खूप छान आहे, प्रेमळ आहे, सुरक्षित आहे.
मी पोहायला शिकायला सुरुवात केली तेव्हा आधी चार फुटात हात-पाय मारायला शिकवलं सरांनी. सुरुवातीला तिथेही धडपडायला होत होतं. पण बुडते आहे असं वाटतं की पटकन् उभं राहून पाय जमिनीला टेकवता येत होतं. तिथे, चार फुटात जेव्हा पहिल्यांदा पाय एकदाही न टेकवता एक संपूर्ण फेरी मी हात-पाय मारू शकले तेव्हा खूप आनंद झाला. मनातल्या मनात खूप टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या. मलाच माझ्यासाठी.. पण मग नंतर अशा फेऱ्या मारणं सहज यायला लागलं, न थांबता, तेव्हा त्या फेऱ्यांसाठी मनात वाजणाऱ्या टाळ्याही साहजिकच कमी कमी होत मग पूर्ण थांबल्या. पण तरी आठ फुटात पाय न टेकण्याची इतकी प्रचंड भीती वाटत होती की मी चार फुटातच मजा आहे असं मानून घेतलं, पण मजा ‘मानण्यात’ काय मजा..? एके दिवशी अचानक सरांनी मी गयावया करून ‘नको नको’ म्हणत असताना मला निर्दयपणे आठ फुटात ढकललं.
आज, पुन्हा एकदा मीच मला कुठे तरी अजून खोल ढकलून द्यायची वेळ आली आहे असं वाटत आहे. पण पुन्हा एकदा तशीच भीतीही वाटते आहे. ‘पाय नाही टेकले तर’ ची भीती. आज, इतक्या वर्षांपूर्वी बिनमहत्त्वाचा वाटून सोडून दिलेला अनुराधा मॅडमनी विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा मनापासून स्वत:लाच विचारावासा वाटतो आहे, ‘एका प्रकारे काहीसं घडल्यानंतर, मी चालत असलेल्या या रस्त्याच्या या आश्वस्त सुरक्षित टप्प्यावर, स्वत:ला पूर्ण मोडू देण्याची ताकद माझ्यात आहे?’
हा प्रश्न मला आता खूप महत्त्वाचा वाटतो आहे. कारण आसपासच्या खूप गोष्टी बदलताहेत. त्या उघडय़ा डोळ्यांनी पाहिल्या तर रस्ते बदलू द्यावे लागतील, या भीतीनं त्या दिसतच नाहीत, असं मानणं हा सोयीस्कर आंधळेपणा काही खरा नव्हे. आधीच्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली तेव्हा पैसा, प्रसिद्धी, यश यांचे पत्ते शोधत निघाले होते. कारण तेव्हा खरोखर वाटत होतं, इथेच पोचायचं आहे, हेच पत्ते आहेत. पण आता चालता-चालता थोडं पुढे आल्यावर वाटत आहे, हे पत्ते नसून या ‘गाडय़ा’ आहेत. त्याही हव्याच आहेत, पण गाडय़ा या बदलत राहणार. आजची नवी कोरी गाडी उद्या जुनी वाटायला लागते. शेजारचं कुणीसं त्याहून मोठ्ठी गाडी घेतं आणि मग जीव काढून मेहनतीनं घेतलेली आपली गाडी काहीच नाही, असं वाटायला लागतं. आज कुठल्याशा भूमिकेला बक्षीस मिळतं ते उद्या विसरायला होतं. दुसरीकडे कुठे बक्षीस मिळत नाही, त्याचं नव्यानं दु:ख होतं. आधीच्या मिळालेल्या बक्षिसाचा आनंद या न मिळालेल्या बक्षिसाच्या दु:खाच्या मदतीला येत नाही. आजचं यश, आजचा पैसा उद्या जुना होतो आहे. म्हणजे हे सगळं नको आहे का, तर नक्कीच तसं नाही. बक्षिसं हवीत, यश हवं, प्रसिद्धी हवी, पैसा हवा. हे सगळं मिळतं तेव्हा त्याचा आनंद हवा, न मिळतं तेव्हाचं दु:खही हवं पण आता वाटतं आहे, त्या पलीकडचंही काही हवं, इतक्या पटकन जुनं न होणारं खूप काळ टिकणारं. या खूप काळ टिकणाऱ्या नव्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा काही नवे रस्ते निवडायची वेळ आली आहे.
आधी कुणीतरी म्हटलेलं गाणं त्याबरहुकूम तयार करून गायचं या रस्त्याची थोडी सवय आहे, पण कुठल्याशा रागाशी मैत्री करून, त्याची सुरावट मनात घोळवत घोळवत, तानपुऱ्याच्या आवाजात, एक विशिष्ट ताल तबल्यावर वाजत असताना, मनात घोळणाऱ्या रागाच्या सगळ्याच्या सगळ्या सूरचित्रामधून, माझे माझे रंग निवडून माझा एखादा आलाप गायचा आणि तो गाता गाता, आडय़ातिडय़ा तालातही ‘समेचं’ सहज भान राखायचं. हा रस्ता पूर्ण नवीन आहे मला. गाण्यासारखेच अभिनयाचे, दिग्दर्शनाचे सगळे ओळखीचे रस्ते बाजूला ठेवून अजून खोल खोल उतरायला लावणाऱ्या नव्या रस्त्यावर गिंको बिलोबा झाड आणि त्यांच्या मधून जाणारा हा सुंदर रस्ता, जपान्यांनी खास बांधलेला. त्या रस्त्याचं चित्र इंटरनेटवर पाहिलं. त्या झाडांची गोष्ट वाचली. त्या चित्राखाली आणि माझ्यातल्या भीतीच्या गाठी सुटल्यासारख्या वाटायला लागल्या. जपान्यांनी युद्धानंतर नव्याने केलेली प्रगती पुन्हा नव्या प्रकाशात दिसल्यासारखी झाली. सगळ्या मोडतोडीनंतर जिवंत राहून पुन्हा स्वत:ला नव्याने घडवणं- हे जपान्यांना या गिंको बिलोबानंच शिकवलं असेल का? ‘बिलोबा’.. हे किती गोड नाव आहे. आपल्याकडच्या भैरोबा, म्हसोबा या देवांसारखंच वाटतं. टोकियोतल्या त्या सुंदर रस्त्यावरच्या, ‘गिंको बिलोबाच्या’ पिवळ्याधमक पानांना मनभर पसरू देताना मला स्वत:शीच ठरवायचं आहे, ‘मी स्वत:ला मोडू द्यायला तयार आहे. मी नव्या रस्त्यांसाठी तयार आहे!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा