अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या मातांना ते उपयुक्त आहेच शिवाय मासिक पाळी नियमित करण्यासाठीही अळिवाचा उपयोग होतो. मात्र गर्भवती स्त्रियांनी अळीव खाऊ नये. अळिवाला कीड लागत नाही.
याशिवाय अळिवाच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते, आव पडणे आणि मलावरोध दोन्हींसाठी याचा उपयोग होतो. अळीवाच्या नाजुक पानात जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ आहे. ही पानं कच्ची सॅलडमध्ये घालून खाल्ली त री चालतात.
-अळीव पराठा-
साहित्य: प्रत्येकी अर्धी वाटी अळीव, ओलं खोबरं आणि बारीक रवा, दीड वाटी दूध, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, दोन चमचे तूप, चवीला मीठ, अर्धा चमचा जायफळ पावडर, दीड वाटी कणीक, तेल
कृती:
एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं.
कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

vgparvate@yahoo.com

मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aliv