परमेश्वर सर्वत्र आहे, मग चेतन-अचेतन भेद राहील कोठे? आत्मा आणि शरीर, दोन्ही ईश्वराचीच रूपे आहेत. चेतन-अचेतनात जो भेद आहे, तो सापेक्ष आहे. आम्ही ज्याला अचेतन म्हणतो त्याचे परिवर्तन चेतनेमध्ये होऊ शकते आणि ज्याला चेतन म्हणतो त्याचे परिवर्तन अचेतनात होऊ शकते. मी तर असे मानतो की जगात सगळे चेतनच आहे. काही आहे निद्रिस्त चेतन आणि काही आहे जागृत चेतन. जसा हा दगड आहे त्यात चेतन आहे, पण ते निद्रिस्त चेतन आहे. मनुष्यात आणि इतर सगळ्या प्राण्यांमध्ये जे चेतन आहे ते जागृत चेतन आहे. या दृष्टीने पाहू तर सगळी सृष्टी जागृत चेतनयुक्त वाटेल.
एक ज्ञानी आहे, गणिताचा ज्ञाता आहे, पण झोपलेला आहे. तर त्याच्या ज्ञानाचा प्रभाव दिसून येणार नाही. म्हणजे निद्रिस्त अवस्थेत चेतन पण जडवत होते. त्या दृष्टीने मी दगडाला पण चेतन मानतो. तो निद्रिस्त चेतन आहे आणि मनुष्य जागृत चेतन आहे. आता दुसऱ्या दृष्टीने विचार करू. आपण जी दगडाची पूजा करतो ती काय आहे? दगडात चेतनभाव आहे, असे कल्पून आपण दगडाची पूजा करतो. मनुष्यात अनेक प्रकारचे विकार असतात. मनुष्य समाधीत जातो तेव्हा निर्विकार असतो. त्या दृष्टीने पाहू तर चेतन जेवढे अप्रकट आहे असे दिसेल, तेवढे ते गहन समाधीत आहे, असे वाटेल.
सृष्टीत श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद केलेले चालणार नाही. इतकेच नाही, ती मुळी निर्विकारच आहे. नदीच्या पाण्यामुळे कुठे पिके चांगली येतात तर कुठे पुरामुळे गावेच्या गावे वाहून जातात. गावे वाहून गेली तर त्याचे पाप नदीला लागणार नाही. पिके चांगली आली तर त्याचे पुण्य नदीला मिळणार नाही. नदी दोन्हीहून वेगळी आहे. परंतु मी मात्र जसे करीन तसे होईल. जसे नदीचे तसेच प्रकाशाचे. सूर्याच्या प्रकाशात तुम्ही वाईट कामे करू शकता आणि चांगली कामेही करू शकता. दोन्ही प्रकारच्या कामात सूर्यप्रकाश तुम्हाला मदत करेल. रात्री घराचा मालक वाचत बसला आहे. दिव्याची त्याला मदत होते. रात्री चोर टॉर्च घेऊन चोरी करायला घरात शिरले, त्या टॉर्चची त्यांना मदत होते. प्रकाशाची मदत दोघांनाही झाली. पण प्रकाश कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार नाही. तसेच परमेश्वर निर्विकार होऊन प्रत्येक वस्तूत राहतो. कोणात जागृत आहे, कोणात निद्रिस्त.
ईश्वर आणि त्याची प्रकृती दोन्ही अनादि आहेत. जेव्हापासून ईश्वर आहे तेव्हापासून प्रकृती पण आहे. प्रकृतीचे असणेच ईश्वराचे ईश्वरत्व आहे. प्रकृतीतून अनेकविध सृष्टी उत्पन्न होते आणि त्यातच ती विलीन होते. अशा अनेक सृष्टय़ा येतात आणि जातात, प्रकृती कायम राहते. सृष्टीनंतर मनुष्य येतो. तो सृष्टीचाच एक भाग आहे आणि स्रष्टय़ाचा एक अंश आहे. सृष्टीमुळे त्याच्या देहाचे धारण होते आणि सृष्टीतूनच त्याच्या हृदयाला पोषण मिळते. मनुष्याकरता अन्नाचे भांडार आणि बोधाचा खजिना, अशा दुहेरी रूपात सृष्टी सजलेली आहे.
सृष्टी आणि मानवामध्ये पडदा नाही. मानव सरळ सृष्टीतून बोध ग्रहण करू शकतो आणि तसे तो सतत करीत आला आहे. तोच बोध वाणीत उतरून वाङ्मयाच्या आणि सरस्वतीच्या कृपेने सारस्वत बनतो.
एकदा एकाने मला एक प्रश्न विचारला- ज्या परमेश्वराच्या नावाने शोषक जमात आपले कार्य चालवीत आहे आणि अन्याय करते आहे, त्याच परमेश्वराचे नाव आम्ही भूदानवाले घेत असतो. जर आम्हीही तेच नाव घेत राहू तर समाजाचे शोषण करण्याची ही पद्धत तशीच चालू नाही राहणार?
या प्रश्नाच्या संदर्भात दोन गोष्टींवर विचार करावा लागेल. एक तर असे की शोषणाचे कार्य करणारे परमेश्वराचे नाव घेत असले तरी त्यांना ते नाव घेण्याचा अधिकार आहे का? शोषण-कार्य आणि परमेश्वराचे नाव यांचा संबंधच काय? आणि जर यांचा काही संबंध नसेल तर ज्यांना शोषण करण्याची इच्छा नाही, त्यांनी त्या नावाला का सोडावे? म्हणून काही लोक जर त्या नावांचा दुरुपयोग करत असतील तर ते नाव त्यांनाच सोपवून द्यायचे का, यावर विचार केला पाहिजे. आणि मग त्या परिस्थितीत आपले नुकसान होईल की लाभ, हेही पाहिले पाहिजे.
सर्पराज तक्षकाची कहाणी सगळ्यांना माहीत आहे. जनमेजयाने नागयज्ञ केला आणि त्यामुळे तक्षकाने इंद्राचे संरक्षण घेतले. तो इंद्राच्या मागे जाऊन लपला. इकडे ऋषींनी आहुति दिली – इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्राच्या संरक्षणामुळे तक्षकाची आहुति होत नव्हती म्हणून इंद्रासकट तक्षकाची आहुति दिली. पण इंद्र तर अमर होता. म्हणून तो तर मेला नाहीच, पण त्याच्यासमोर तक्षक पण अमर झाला. वास्तविक ज्यांच्यामुळे तक्षक इंद्रापासून दूर झाला असता अशी कुठली तरी युक्ती शोधायला हवी होती. तसे केले नाही. त्यामुळे तक्षक अमर झाला. तक्षकाला इंद्रापासून निराळे करण्याऐवजी त्याच्याबरोबर जोडून देऊ तर आम्हाला यश मिळणार नाही.
आपण जर शोषकाबरोबर परमेश्वराला पण संपविण्याचा विचार करू तर ते होऊ शकणार नाही. वस्तुत: हे शस्त्र आमचे आहे. ज्या लोकांना त्याचा उपयोग करता येत नाही आणि जे केवळ त्यांचे ढोंगच करू शकतात, त्यांना जर आम्ही आमचे ते शस्त्र देऊन टाकले तर आम्ही नाहक निरीश्वरवादी, नास्तिक बनतो. आपले शस्त्र सोडून देणे, ही प्रक्रियाच चुकीची आहे. यात आमचेच नुकसान आहे.
दुसरी गोष्ट ही की ज्या ईश्वराच्या नावाचा दुरुपयोग केला गेला आहे किंवा केला जातो तो ईश्वर दुसरा आहे. पश्चिमेच्या भक्तीमार्गी लोकांनी जो स्वर्गात राहणारा दयाळू पिता आहे त्याला ईश्वर म्हटले आहे. आमच्या येथल्या विचारांप्रमाणे ‘ईश्वर घट-घटवासी, सर्वव्यापी, अंत:सूत्री आणि सगळ्यांच्या हृदयात विराजमान आहे.’ आमच्या येथला अनुभव हाच आहे की तो सर्वत्र विराजमान आहे, प्रत्येक शरीरात विद्यमान आहे. इंग्रजी भाषेत सांगायचे झाले तर आमचा ईश्वर ‘ऑब्जेक्टिव्ह ट्रथ’ म्हणजे वास्तविक सत्य आहे. त्याला आपण टाळू शकत नाही. त्याच्या अस्तित्वाला नाकारण्यात आपल्या स्वत:च्याच अस्तित्वाचा अस्वीकार होतो. इतकेच नाही तर आपल्या शक्तीलाच नाकारले जाते.
ज्या ईश्वराचे आम्ही आवाहन केले आहे, तो केवळ जगत्पती नाही, तो रोमरोमव्यापी आहे. आम्ही कैलासवासी, स्वर्गवासी वगैरे शब्दांचा उपयोग करतो पण ते केवळ रूपक असते. तो तर सर्वच ठिकाणी असतो. प्रकट तेथे होतो, जेथे शीतलता असते, परमशांति असते, सामान्य प्रपंचापासून अलिप्तता असते.
‘ईश्वर आमच्यात नाही, आम्ही रिक्त आहोत,’ असे मानणारा मनुष्य आत्मावलंबी होऊ शकणार नाही. तो परावलंबीच असेल. आम्ही ज्याला प्रत्यक्ष मानू, त्याच्या मदतीनेच आम्ही स्वावलंबी बनू शकू आणि निर्भय बनू शकू. मग आणखी कोणाला शरण जावे लागत नाही. पण जेथे पडद्याचा विचार मान्य केला जातो तेथे निष्क्रियता येते आणि अनेक प्रकारची दुर्बलता येते.
वास्तविक ईश्वरावर श्रद्धा असणे, हा मानव-जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. या वस्तूला तर्काच्या परिभाषेत ठेवणे कठीण आहे. हे श्रद्धेवर आणि आत्मप्रत्ययावर निर्भर आहे. तर्काच्या परे आहे. मानवाची मनुष्यमात्राच्या सद्वृत्तीवर अतूट श्रद्धा असायला हवी. ही मानव-निष्ठा ईश्वरनिष्ठेचा श्रीगणेश आहे. मनुष्याच्या सत्प्रवृत्तींच्या विकासावर आणि पुऱ्या मानव-जीवनाला प्रभावित करणाऱ्या शक्तीवर जर कोणाची श्रद्धा असेल तर तो पण ईश्वरनिष्ठेचा पर्याय मानला पाहिजे.
कुराणात याविषयी एक फार सुंदर प्रसंग येतो. महंमद पैगंबरांनी सांगितले होते की ‘तुम्ही जर येथे चांगले काम केले तर मृत्युनंतर परमेश्वराच्या जवळ बसू शकाल.’ लोकांचा यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा पैगंबर म्हणाले की ‘अरे, तुम्ही कसे आहात ? तुम्ही चांगली कामे करालही आणि मृत्युनंतर ईश्वराजवळ पाठवले जाल, ईश्वराला आपल्याजवळ पाहाल आणि तरीही तुमचा संशय जाणार नाही. तुम्ही विचाराल, खरेच का हा ईश्वर आहे ?’ त्यासाठी थोडय़ा फार श्रद्धेची तर गरज असतेच. त्याच्या शिवाय जगात पराक्रमाची कामे होत नाहीत. साध्या पराक्रमाच्या कामातही श्रद्धेची गरज असते.
ईश्वर ‘आहे’ म्हणावे की ‘नाही’ म्हणावे या संदर्भात तुकारामांचे एक चांगले वचन आहे. असे वचन दुसरीकडे कुठे क्वचितच मिळेल. ते म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनीं अनुभवावा.’ वाणीने ईश्वर आहे असे बोलावे ; आणि मनात ईश्वर नाही असे अनुभवावे. कुठले तत्त्वज्ञान ह्य़ाहून जास्त काही सांगू शकेल ?
(परंधाम प्रकाशन, पवनार यांच्या ‘धर्मामृत’ या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)
सर्वव्यापी ईश्वर
परमेश्वर सर्वत्र आहे, मग चेतन-अचेतन भेद राहील कोठे? आत्मा आणि शरीर, दोन्ही ईश्वराचीच रूपे आहेत. चेतन-अचेतनात जो भेद आहे, तो सापेक्ष आहे. आम्ही ज्याला अचेतन म्हणतो त्याचे परिवर्तन चेतनेमध्ये होऊ शकते आणि ज्याला चेतन म्हणतो त्याचे परिवर्तन अचेतनात होऊ शकते.
First published on: 08-12-2012 at 05:35 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All is for god