तृप्ती पंतोजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडे भारतात गहू, दुधाचे पदार्थ खाल्ल्यानं त्रास होण्याच्या तक्रारी बऱ्याच प्रमाणात ऐकायला मिळतात. या तक्रारी म्हणजे अंगावर पित्त किंवा पुरळ येणं, घशात खाज सुटणं, जुलाब-उलट्या होण्यापासून ते श्वास घेण्यास त्रास होण्यापर्यंत गंभीर असतात. पाश्चिमात्य देशांत अशा अॅलर्जीचं प्रमाण नक्कीच जास्त आहे, पण भारतातसुद्धा तत्सम तक्रारी दिसतात.

कर्नाटकमध्ये ११,७०० लोकांवर केलेल्या एका अभ्यासात २६.५ टक्के वयस्क आणि १९.१ टक्के मुलांमध्ये ‘फूड सेन्सिटिव्हिटी’ची प्रकरणं आढळली. त्यातून १.२ टक्के वयस्कांना दुधाचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होण्याची प्रकरणं चाचण्या आणि लक्षणांवरून सिद्ध झाली. अॅलर्जीचा पहिला उल्लेख चिनी साहित्यात साधारण इ. पू. २७३५ केलेला आहे असं मानतात. जवळपास २००० वर्षांपूर्वी ग्रीक वैद्याकतज्ज्ञ हिप्पोक्रेटिसच्या लिखाणात दुग्धपदार्थांमुळे होणाऱ्या त्रासांचा उल्लेख आहे. आयुर्वेदातही वात, पित्त आणि कफ असे दोष आणि काही अन्नपदार्थांचं सेवन न करणं सांगितलं आहे. कदाचित त्याची कारणं काही प्रमाणात ज्याला आपण अॅलर्जी किंवा फूड सेन्सिटिव्हिटी म्हणतो, ती असावीत.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : पुरुषी एकटेपण

माझा आणि ‘फूड इन्टॉलरन्स’चा परिचय तसा लहानपणापासूनचा आहे. माझ्या आईला दूध, गहू, मूग सोडून इतर डाळी व काही पदार्थांमुळे त्रास होत असे. त्यामुळे ती ते पदार्थ खाणं जमेल तितकं टाळायची. काही नातेवाईक आणि ओळखीतल्या लोकांना असणारे असे त्रास ऐकून माहीत होतेच. हे त्रास उलट्या, अपचन, आव, अंगावर पित्त उठणं यापर्यंत मर्यादित होते. पण दहा वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या जन्मानंतर मला अॅलर्जी म्हणजे काय ते समजलं. तिचा जन्म इंग्लंडचा. सुरुवातीला तिला ‘एक्झिमा’ (अंगावर पुरळ, खाज) येत असे. सहा महिन्यांची झाल्यावर तिला पहिल्यांदा नाचणी दुधात शिजवून दिली, तेव्हा अंगावर भराभर उठलेला रॅश, उलटी, सुजलेले ओठ हे बघून तातडीनं डॉक्टरकडे नेलं. तिला दुधाची अॅलर्जी असू शकते, त्यामुळे दूध किंवा दुधापासून तयार केलेला कुठलाही पदार्थ देऊ नका, असं डॉक्टरांनी सांगितलं. नवीन पदार्थ देताना तो थोड्याच प्रमाणात देणं आणि त्यानंतर असं काही लक्षण दिसल्यास लगेच थांबवणं हा मार्ग त्यांनी सांगितला. मुलगी खूपच लहान असल्यामुळे चाचण्या करायला नको, असं त्यांचं मत होतं. पुढे तिला ‘ट्री नट्स’- म्हणजे काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड वगैरेंचीही अॅलर्जी असल्याचं कळलं. एक तर नवीन बाळाची जबाबदारी, शिवाय अॅलर्जी या विषयावर एकूणच अज्ञान, हे सगळं मोठं आव्हान होतं. हळूहळू स्वाध्यायानंच या विषयावर आकलन वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता.
इंग्लंडमध्ये अॅलर्जीविषयी बरीच जागरूकता आहे. दूध-दही-तुपाचे विविध पर्याय सहज मिळतात, त्यामुळे अॅलर्जीला तोंड देणं सोपं होतं. शाळेत अॅडमिशन फॉर्म भरतानाच ‘अॅलर्जी इन्फॉर्मेशन’ द्यावी लागते. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानं मुलीची अॅलर्जी चाचणी केली. त्यात तिला असणाऱ्या अॅलर्जींवर शिक्कामोर्तब झालं. ती शाळेत जाऊ लागल्यावर शिक्षकांना समजावून सांगणं, बाहेर जेवायला गेल्यावर काळजीपूर्वक पदार्थाची अॅलर्जी इन्फॉर्मेशन बघणं हा आमचा नित्यक्रम झाला. तिथे शाळा ‘नट फ्री’ असतात- अर्थात शेंगदाणे-सुकामेव्याला बंदी! शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिलं जातं. तरी आम्हाला तिच्या ‘मिल्क अॅलर्जी’मुळे मनाच्या कोपऱ्यात भीती असायचीच.

२०१७ मध्ये आम्ही भारतात परत आलो आणि माझी खरी परीक्षा सुरू झाली. धूळ आणि परागकणांमुळे शिंका येणं आणि नाक वाहणं हे आम्हा उभयतांना नवीन नव्हतं. त्यामुळे धूळ, दूध आणि सुकामेवा हे तिन्ही आमचे शत्रूच! गायीच्या दुधासाठी, तुपासाठी पर्याय शोधण्यापासून सुरुवात होती. लहानग्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला मजा करणं, केक, बर्गर, चॉकलेट, बिस्किटं खाणं, नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणं, सगळंच आमच्या दृष्टीनं अवघड होतं. मला सोया मिल्कशिवाय दुधाचा कुठलाच पर्याय सापडला नाही. इतर काही पर्याय होते, पण ते तितकेसे योग्य वाटत नव्हते. (शिवाय ६-७ वर्षांपूर्वी ‘व्हीगन’ प्रकार आजच्यासारखा बोकाळला नसल्यानं मिल्क अॅलर्जीला चालण्याजोगे त्यातले पदार्थही कमी होते.) सणासुदीला गोड करणं म्हणजे दुधातुपाशिवाय काय करावं हा मोठा प्रश्न असे. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी गोड केलं, तर बाळाला काय द्यावं? लग्न समारंभाला जाणं नको वाटत असे.

हेही वाचा : इतिश्री : दु:खाचा हात सोडायलाच हवा…

दुधातुपाच्या हातानं, भांडी स्वच्छ न धुता वापरल्यानं, दुधाचे पदार्थ केल्यावर ओटा स्वच्छ न पुसण्यानंही ‘क्रॉस कॉन्टॅमिनेशन’ची भीती! सुकामेवा तर घरात चुकूनही नको. घरच्या इतर व्यक्तींना याचा हात त्याला न लावण्याचे माझे हिटलरी नियम. थोडक्यात काय, तर सगळ्यांना कडक सोवळं पाळावं लागत होतं. असे सारे नियम पाळत, लेकराला साध्या साध्या गोष्टींसाठीही ‘नाही’ म्हणताना पोटात कळवळत होतं. त्याच गोष्टी इतर सगळे कसे ‘एन्जॉय’ करतात आणि आपल्याला असं बंधन का, हे त्या कोवळ्या मनाला समजावण्यासाठीही कौशल्य लागतं.

अॅलर्जीची समस्या असलेल्या व्यक्तींची संख्या आपल्याकडे तुलनेनं कमी असली, तरी या विषयावर जागरूकता वाढवण्याची, संशोधन आणि वैद्याकीय प्रशिक्षणावर भर देण्याची गरज आहे. अधिकाधिक ‘अॅलर्जी फ्री’ उत्पादनं, औषधं सहज मिळवून देण्याची, उपलब्ध होण्याची गरज आहे. ‘अॅलर्जी हा काही भारतातला आजार नाही,’ असं म्हणून मनं दुखावण्यापेक्षा लोकांना समजून घेऊन, सहभागी करून घेण्याची गरज आहे.

हेही वाचा : सांधा बदलताना : खुरट(व)लेली रोपं!

अॅलर्जीचं प्रकरण अवघड असतं. त्यासाठी कायम नवीन संशोधनपत्रिका वाचणं, बाजारात येणारे नवनवीन पर्याय ‘ट्रॅक’ करणं, प्रशिक्षणासाठी ‘सर्टिफिकेशन्स’ घेणं आणि जाणकार होणं हाच पर्याय आहे. म्हणून मी युनायटेड किंग्डमच्या ‘फूड स्टँडर्ड्स एजन्सी’चं ‘फूड अॅलर्जी अॅन्ड इन्टॉलरन्स ट्रेनिंग’सुद्धा पूर्ण केलं. ‘अॅलर्जिक रिअॅक्शन’ नेहमीच ठरावीक प्रमाणात येत नाहीत. काही लोकांना खाल्ल्यानं त्रास होतो, तर काहींना केवळ संपर्कात आल्यानं- स्पर्शानं किंवा श्वासानं रिअॅक्शन येतात. रिअॅक्शन्स कधी कधी ‘अॅन्टीहिस्टॅमिन्स’च्या आटोक्यात असणाऱ्या- म्हणजे रॅश येणं, ओठ सुजणं, घशात खाज सुटणं, वगैरे असतात, तर कधी क्षणार्धात डोळे, तोंड सुजून, रक्तदाब कमी होऊन श्वास घेणं अशक्य होण्यापर्यंत गंभीर असू शकतात. अशा रिअॅक्शनला ‘एनाफिलॅक्सिस’ म्हणतात. अशा वेळी त्वरित वैद्याकीय उपचारांची गरज असते. वेळेत हॉस्पिटल गाठणं महत्त्वाचं. एनाफिलॅक्सिससाठी पहिला उपाय ‘एपिनेफेरिन शॉट’. हे इंजेक्शन इंग्लंड, अमेरिका आदी देशांमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरून मिळतं. अॅलर्जी असलेले लोक ते कायम बॅगमध्ये घेऊन फिरतात. शाळेच्या ‘इमर्जन्सी किट’मध्ये एपिनेफेरिन शॉट असावं हा नियम आहे. भारतात मात्र हॉस्पिटलशिवाय हे कुठेच मिळत नाही.

गेल्या एका वर्षात स्वीडनमधील यंत्रणा जाणून घेण्याची संधी मला मिळाली. इथे मिळणारी वैद्याकीय मदत, उत्पादनं आणि जागरूकता आपल्या मायदेशीही मिळावी हीच मनापासून इच्छा!

trupti.pantoji@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allergies from food grains css