डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे anuradha1054@gmail.com

पालक आज मालक होऊन, लेकराला मातीचा गोळा मानत थापटून-थोपटून स्वत:च्या आकांक्षांच्या भट्टीत भाजत, आकारहीन, रूपहीन जगायला निरुपयोगी, अकाली बाद होणारी मडकी घडवीत आहेत. वेळेच्या गणितात बसत नाही म्हणून फास्ट-फूडवर वेळी-अवेळी पोषण (?) होते आहे. त्यामुळे बालपण आहे, पण बाल्य नाही असा अनुभव येतो. मूल ना खेळणे आहे, ना तुमची वैफल्ये बाहेर काढण्यासाठी पंचिंग-बॅग. देवाची अनमोल देणगी आहे. राखायचे, वाढवायचे, फुलवायचे, हसवायचे व्रत ही देणगी मिळाल्यावर घ्यावेच लागते.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”

मोठय़ा कौतुकाने बाळांना जगात आणले जाते, गर्भ राहणे, मूल जन्माला घालणे या निसर्गदत्त देणग्या. मुलाशिवाय घर पुरे होत नाही असे अनेकांना वाटते. ज्यांना नैसर्गिक मूल होत नाही ते त्यासाठी किती सायास करतात! मग हे देणे आपण का अव्हेरत आहोत?

या लेखमालेत मी अशी अनेक उदाहरणे दिली जिथे लेकरांना अमानुष मारहाण केली जाते. चिंटूसारख्या तीन वर्षांच्या मुलाच्या गोबऱ्या गालांवर जेवत नाही म्हणून उदबत्तीचे चटके मिळतात. शिस्तीपोटी बंडय़ाला उलटे टांगून नाजूक जागी डागले जाते. स्वत:ची वैफल्ये काढायला रहमतला कोंडून कमरेच्या पट्टय़ाने मारले जाते. बलात्कार तर नवजातेवरही होतो-वडिलांकडूनही. बबिताला कुटुंब चालावे म्हणून दलालाला विकले जाते, तर सतीशला वेठबिगारीवर दूर देशात कामासाठी पाठविले जाते. मुलगी म्हणून जन्माला आली तर तिला मारण्यासाठी प्रयत्न होतात. जन्मभर हाल केले जातात, तसे कशाला, पोटात मुलीचा गर्भ आहे म्हणून तो खुडायचाही प्रयत्न होतो. माया मिळाली नाही की ती बाहेर शोधली जाते. मुली अशा सहज फूस लावून पळविल्या जातात. वापरून सोडून दिल्या जातात. शारीरिक आघात आहेतच, पण या सगळ्यात होणाऱ्या मानसिक जखमा ना बघणाऱ्याला दिसतात, ना करणाऱ्याला कळतात. मुलांसाठी वेळ नाही म्हणून ती सरभर झाली, गुन्हेगार झाली, उन्मार्गी झाली अशी कारणे सर्व स्तरांतील पालक देतात व वर हे सगळे मुलांच्याच भविष्यासाठी चालले आहे म्हणून सांगतात. जन्माला घातले तर वेळ नाही हे उत्तर असूच शकत नाही. आजच्या कोळपलेल्या बालपणावर कोणते उज्ज्वल भविष्य उभे राहणार आहे? आज पाहिजे तो पाठीवर मायेचा हात मिळाला नाही तर या पालकांना वृद्धाश्रम अटळ आहे. तुम्ही माया केली नाही तर त्याने ती कुठून परत द्यावी?

या लेखमालेत जेव्हा-जेव्हा लैंगिक शोषणाबाबत तसेच मुलांच्या भरकटलेल्या अवस्थेतून व्यसनाधीनता व उन्मार्गी वर्तणुकीकडे प्रवास दाखवला तेव्हा-तेव्हा हे भीषण वास्तव वाचून खूप त्रास झाल्याचे अनेकांनी सांगितले. वाचणाऱ्यांचे कशाला लिहिताना मलासुद्धा कमी क्लेश होत नव्हते.

मोठय़ा मुश्किलीने मिळवलेल्या या लेकरुरूपी देणगीसाठी आपल्याला वेळ देता येत नाही म्हणून त्याच्या हातात स्मार्टफोन/टॅबलेट्स/लॅपटॉप अशी साधने जसे पालक ठेवू लागले, तसे आधीच एकटी-दुकटी असलेल्या मुलांचा एकलकोंडेपणा वाढीस तर लागलाच पण त्यांना मिळालेल्या हात, पाय, डोळे, एकूणच सर्व अवयव, बुद्धी, वाचा या सर्वाचा वापरच सीमित झाला. व्हर्च्युअल जगात जायला लागतात फक्त दोन बोटे आणि डोळे. आज मुलांना खेळता येत नाही, उद्या कदाचित भाषेचे तंत्रच विसरून जातील. उत्क्रांतीत निसर्गाने दिलेली इंद्रिये, निसर्गानेच दिलेले विविध अवयव माणसाच्या प्रगतीमुळे, सर्जनशीलतेमुळे विकसित होत गेले. याला काय अर्थ राहतो!

देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्चित काम आहे पण त्यात समन्वयाचीही आवश्यकता आहे. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी शिकते. खेळता-खेळता हातापायांचा, बोटांचा, आवाजाचा उपयोग त्याच्या लक्षात यायला लागतो आणि अनुभवातून त्याचा वापर करायला ते शिकते. आत्ताच माझ्या शेजारची, नुकतीच बोलायला लागलेली मुलगी आईचे लक्ष वेधू पाहात होती. आधी गोड-हळू आवाजात आई म्हणून हाक मारली. मग आवाज वाढवून, मग खेकसून. तरीही ओ देत नाही म्हटल्यावर तिने धिंगाणा घालायला सुरुवात केली. हे ज्ञान कुठून आले? मुठीत पेन-पेन्सिल धरून रेघोटय़ा मारणारी मुले बोटाच्या चिमटीत व्यवस्थित ते धरून लिहू लागतात. यासाठी डोळे आणि हाताच्या स्नायूंचा विकास आणि समन्वय दोन्हींची आवश्यकता असते. ती येते अनुभवातून आणि त्यासाठी मिळालेल्या संधीतून. प्रत्येकाला आनुवंशिकतेतून मिळालेली देणगीही असते.

ही सगळी देणगी देवाने दिली. मोठय़ांचे काम आपल्या मुलातले गुण ओळखणे व त्याच्या विकासाच्या टप्प्यानुसार संधी उपलब्ध करून देत त्याची सर्जनशीलता फुलविणे. मात्र आम्ही देवापेक्षा मोठे असा गंड पालकांना झाला आहे की काय असे आज मुलांच्या समस्या बघता वाटते. पालक-सभांमधून किंवा चाइल्डलाइनला फोनवरून विचारला जाणारा एक नेहमीचा प्रश्न, ‘‘आमचा बंडय़ा अडीच वर्षांचा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातला पण अजून एबीसीडी लिहीत नाही. शेजारचा त्याच्याच वयाचा मन्या मात्र इंग्रजी कविता म्हणतो. मी त्याला काय शिक्षा करू?’’ त्यांना मी सांगते शिक्षा बंडय़ाला नाही, तुम्हाला करायला हवी आहे. ज्या वयात त्याने फक्त खेळायला हवे, त्या वयात त्याची शारीरिक क्षमताही नसताना त्याला लिहिण्याची, तीही एक परकी भाषा, सक्ती होते हा अत्याचार आहे. मुलाचे साधे खेळ पसारा करणे, फेकाफेक करणे, धडपडणे हे सर्व स्वत:च्या देवदत्त देणग्यांचा वापर तपासून घेण्याच्या क्रिया असतात. धडपडून स्वत:च्या क्षमता तपासल्या जातात. त्यापासून वंचित ठेवत ज्यासाठी बुद्धी, हाताचे व डोळ्यांचे स्नायू तयार नाहीत, अशा लिहिण्याच्या क्रियेची सक्ती केल्यास त्यास अपयश येणारच व अभ्यास नावाच्या प्रकाराची कायमची चीड निर्माण होणार. अलीकडेच सोशल मीडियावर एक सुंदर कार्टून पाहिले. एक मांजर उभे राहू पाहणाऱ्या बाळाला सांगत होते की अजिबात दोन पायांवर उभे राहू नको, नाही तर तुला शाळा नावाच्या तुरुंगात टाकले जाईल. हे मांजराच्या मुखी असावे हे फार महत्त्वाचे आहे कारण पाळलेले मांजरसुद्धा स्वत:च्या मर्जीचे मालक असते. कधीच गुलाम होत नाही.

खूप अनुभव देणे, ते घेण्यासाठी स्वातंत्र्य देणे हे जसे गरजेचे आहे तसे त्या-त्या वयाच्या गरजा ओळखून हे सर्व होणे तितकेच आवश्यक आहे. खूपशा बालभवनांतून मोठय़ा मुलांना छोटय़ांची गाणी शिकवली जातात. अनेक शाळांतून, बालभवनांतून मुलाच्या वयानुरूप असलेला शारीरिक व बौद्धिक विकासाचा टप्पा लक्षात न घेता हस्तकला घेतल्या जातात. गोष्टी सांगितल्या जातात. मुलाची सामाजिक पाश्र्वभूमी अथवा काळ लक्षात न घेता कहाण्या सांगितल्या जातात. उदा. श्यामच्या आईमधील श्यामची आई म्हाताऱ्या महारणीला मदत करण्यासाठी मोळी उचलून दे, असे छोटय़ा श्यामला सांगते

हा प्रसंग पिढय़ान्पिढय़ा जातिभेद निर्मूलक संस्कार करणारा म्हणून सांगितला जातो. परंतु आजचा श्याम विचारतो की छोटय़ा श्यामला सांगण्यापेक्षा आईनेच मोळी का नाही उचलून दिली. तसेच जुन्याच गोष्टींमधील आंगण/परसू असे शब्द समजत नाहीत. झोपडपट्टीतील अथवा भारतीय खेडय़ातील मुलांची गोष्ट सांगताना राजपुत्राने मुका घेऊन राजकन्येला जागे केले असे सांगता येत नाही. अशा संस्कृती, काळ, वय लक्षात न घेता सांगितलेल्या गोष्टी आवडत नाहीत. बोअर होते.

वाढत्या वयाबरोबर मुलांच्यात एक प्रचंड ताकद, रग दिसून येते. पौगंडावस्थेत तर ती शिगेला पोहोचते. याला काही तरी कारण असेल असे वाटत नाही का? या रगीला मदानी खेळासारख्या माध्यमातून वाट मिळाली नाही तर ती रग असामाजिक कृत्यांकडे सहज वळते. बौद्धिक रगीला उतारा म्हणून संधी जसे छंद, वाचन इत्यादी संधी दिल्या नाहीत तर आज दिसते तसे नेट-पॉर्न अ‍ॅडिक्शन व त्यातून होणारे गैरकृत्य वाढीस लागल्यास नवल नाही. देवाने ही जी त्या-त्या वयात दिलेली क्षमता आहे जसे लहान वयात कुतूहल, प्रयोगशीलता, पौगंडावस्थेत प्रचंड शारीरिक ताकद, नव्याची ओढ याला कारण नक्कीच असणार. आपण मात्र हे न ओळखता जी वर्तणूक करतो त्याने बालपण कोळपून देवाच्या देणगीचा विध्वंस होतोच पण मानवी संपत्तीचा नाश होतो.

आजची स्थिती आहे, आहे पण नाहीची.

आईबाबा आहेत, वाणी आहे, पण संवाद नाही.

पोटात माया आहे पण दिसत नाही.

हात आहे पण पाठीवरून फिरत नाही. डोक्यावर ठेवला जात नाही.

मिठी आहे पण मिळते चुकीच्या कारणाने.

बुद्धी आहे पण चिरडली आकांक्षाच्या ओझ्याने.

राग आला तर मारायला, धोपटायला मुले सोपी पडतात.

डागा, पोळा, झोडून काढा, मुकी बिचारी काही बोलत नाहीत.

घरचे छप्पर गळके झाले म्हणून निवाऱ्यात ठेवावीत तर तिथला फुफाटा घरच्या आगीपेक्षाही भीषण! सहन होत नाही. ती पळून जातात. असह्य़ झाले की जगच सोडतात.

शाळा आहे पण व्यवहारज्ञान नाही. शिक्षक आहेत पण गुरू नाहीत. शिक्षण आहे पण ज्ञान नाही.

बालपण आहे पण बाल्य हरवले. मोठय़ांच्या इच्छा-आकांक्षा, स्पर्धा, वैफल्ये यांच्याखाली पार चिरडून, करपून-कोळपून गेलेय. मदाने आहेत-थोडी तरी-पण खेळताच येत नाही. खेळायचे कसे ते माहीत नाही. खेळ नाही म्हणून विकास नाही. देवाने दिलेले शरीर, निसर्गाने दिलेली बुद्धी फुलवायला संधी नाही. स्वत:चा शोध घ्यावा कसा, क्षमता कळाव्यात कशा? सतत समोर मोठय़ांनी दाखवलेला फसवा आरसा आहे. प्रत्यक्ष काहीच नाही. सगळे खोटे आणि व्हर्च्युअल आहे.

पालक आहेत ते मालक होऊन, लेकराला मातीचा गोळा मानत थापटून-थोपटून स्वत:च्या आकांक्षांच्या भट्टीत भाजत, आकारहीन, रूपहीन जगायला निरुपयोगी, अकाली बाद होणारी मडकी घडवीत आहेत. वेळेच्या गणितात बसत नाही म्हणून फास्ट-फूडवर वेळी- अवेळी पोषण (?) होते आहे. स्वत:च्या अहंमच्या लढाईत मुलाला शस्त्रासारखे वापरले जाते आहे. मूल ना खेळणे आहे, ना तुमची वैफल्ये बाहेर काढण्यासाठी पंचिंग-बॅग. देवाची अनमोल देणगी आहे. राखायचे, वाढवायचे, फुलवायचे, हसवायचे व्रत ही देणगी मिळाल्यावर घ्यावेच लागते.

देवाच्या या अनमोल देणगीचे आपण मालक नाही राखणदार आहोत-ही पालकत्वाची भूमिका. मग ते आई-वडील असोत, आप्त, शिक्षक अथवा समाज, ‘आम्ही तुम्हाला इतके देतो..’ असा हिशेब असूच कसा शकतो? हा हिशेब आला, मालकत्वाची भावना आली, की या लेखमालेत उल्लेखित अत्याचारांना सुरुवात होते. या सगळयात ‘मी’च अधिक असतो.

देवाची देणगी आहे, पण तिचा आदर नाही. धूळ बसली-पुसली नाही. शिरावर धरायची, हृदयात जपायची ती हळूहळू मातीत गेली. देवाने दिली पण आम्ही अपमानित करून देवाची अनमोल देणगी अव्हेरली.

ते बाळही एक व्यक्ती आहे, त्याच्या वयानुसार, कुवतीनुसार, आकांक्षांनुसार फुलू दिले तरच आपण देवाच्या देणगीचा आदर केला. असे फुलायला खूप अनुभव, सुरक्षित जग, पोषण-आरोग्य याची यथायोग्य काळजी, गरजेनुसार मार्गदर्शन, पडला झडला तर आधार देणे हेच आपले काम.

मुलांना त्यांचे बालपण उपभोगू द्या, आनंद घेऊ द्या, खरे पालक होऊ या. आपणही त्यांचे फुलणे बघण्याचा अवर्णनीय आनंद घेऊ या. देवाच्या या देणगीचा आदर करू या.

chaturang@expressindia.com