समाजातील काही मंडळींनीदेखील कुसुमच्या शिक्षण घेण्यावर आपला निषेध नोंदवला. पण यावेळी आईच नव्हे तर खुद्द कुसुमच खंबीरपणे उभी रहिली. तिनं वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. कुसुम कॉलेजला जायला निघाली. अशी चार वर्षे गेली. कुसुम पदवीधर होण्यासाठी केवळ एकच वर्ष राहिलं होतं. आम्हीही सारेजण बिनघोर होतो. पण..
कुलसुमला सगळे कुसुमच म्हणत. कुलसुम (तिला कुसुम म्हणेन मी यानंतर) आमच्या शाळेत आली तेव्हा तिनं सातवीची परीक्षा पास केली होती. नुसती पास नव्हती केली, उत्तम मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती ती.
कुसुम सातवी पास झाली तेव्हा तिच्या वडिलांनी सर्वात आधी ‘झालं तेवढं पुरे, अब सगाई कर देंगे उसकी!’ असा प्रस्ताव मांडला. त्यांचं म्हणणं, त्यांच्या सगळ्या खानदानात एकही मुलगी पहिल्या दोनतीन इयत्तांच्या पलीकडे गेली नव्हती. स्वत: कुसुमच्या मोठय़ा बहिणीची अमीनाची शादी होऊन तिनेक र्वष झाली होती आणि तिचं वय आजमितीला सतराच्या आसपास असावं.
अशा परिस्थितीत कुसुमची शादी रोखणं (अगदी सगाईदेखील) आणि ती शिकावी असा आग्रह धरणं, यातील अडचणी किती असतील, याची कल्पनाच केलेली बरी. पण यावेळी मदतीला धावून आली ती साक्षात कुसुमची माता. कुसुमच्या आईला माता या संबोधनानंच पुकारावं असं वाटतं. कारण या मातेनं आपल्या कमालीच्या ओढग्रस्तीच्या संसारात भयंकर संतापी नवऱ्याचा राग ओढवून घेत. कुसुमच्या पुढच्या शिक्षणाला आपला सक्रिय पाठिंबा दिला आणि पुढची दहा वर्षे तो निभावला. त्यासाठी या बाईंनी गवंडी काम केलं, विटा वाहिल्या आणि कुसुम व तिच्या पाठीवरच्या तीन भावांची शाहीद, राणा आणि अब्दुल यांची शिक्षणं केली. कुसुमच्या वडिलांचा सुरुवातीचा विरोध हळूहळू मावळत गेला. कुसुमची शिक्षणातील प्रगती, त्यांच्या कानांवर पडत होतीच, पण त्याहीपेक्षा एका वेगळ्या कारणाने ते खऱ्या अर्थानं नमले.
कुसुमच्या मोठय़ा बहिणीचा तिच्या सासरी खूप छळ होऊ लागला होता. हुंडय़ावरून, आणलेल्या वस्तूंवरून सारखे टोमणे, भांडणं ही नित्याचीच बाब होऊन बसली होती. त्यातच जावयाला सासऱ्याकडून मोटारसायकल यावी असं वाटायला लागलं आणि मामला पार बिघडला. कुसुमची बहीण घरी परतली. शिक्षण नाही, कुठलंही कौशल्य नाही. केवळ लग्न हाच एक परवलीचा शब्द. त्यामुळे मुलीचं अपरिमित नुकसान झालं हे कुसुमच्या आईला समजलं आणि त्या सुज्ञ स्त्रीनं ते आपल्या नवऱ्याच्या गळी उतरवलं. कुसुमच्या शिक्षणाची गाडी सुरू झाली. कुसुम उत्तम अभ्यास करायची. छान वागायची. आनंदी असायची. तिच्यासाठी शिक्षणाची दारं उघडली गेली होती. तिचे दोनही भाऊ तिच्या मानानं अभ्यासात काय किंवा एकंदरीतच काय, खूप मागे होते.
पण.. सहा डिसेंबर उजाडला. देशभर मंदिर-मस्जीद वादावरून दंगली उसळल्या. धार्मिक तणावाचं वातावरण विलक्षण तापलं. दुकानं फोडण्याच्या, माणसं मरण्याच्या बातम्यांखेरीज वर्तमानपत्रात काहीच उरलं नाही. कुसुमच्या घरी वर्तमानपत्र येत नव्हतं. पण ११ वाजता शाळेत आली की घाईघाईनं कुसुम ते ओढून घ्यायची आणि तेवढय़ाच घाईघाईनं बातम्यांवरून डोळे फिरवायची. त्यापूर्वी कधी तरी वर्तमानपत्र वाचताना मी तिला बघितलं होतं. पण यावेळची देहबोली काही वेगळीच होती. मी तिच्याकडे बघत आहे, याची तिला कल्पना नसायची, की भान नसायचं? कधी ती भेदरलेली दिसे तर कधी आक्रमक वाटे. हे लक्षात आल्यावर आम्ही शाळेत एका परिसंवादाचं आयोजन केलं. पाहुणे मुलांशी ‘दंगल’ या विषयावर संवाद साधणार होते. त्यांना साधकबाधक विचार करायला प्रवृत्त करणार होते. हा परिसंवाद आठवी, नववी व दहावीच्या मुलामुलींसाठी होता व कुसुम त्यावेळी नवव्या इयत्तेत शिकत होती.
मला ती सायंकाळ पक्की आठवतेय. परिसंवाद सुरू झाला. पाहुणे त्यांच्या विषयातले तज्ज्ञ होतेच, पण मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणारे होते. परिसंवाद करतानाच बालसंवादही सुरू झाला. माझं कुसुमकडे लक्ष होतं. सुरुवातीला ती शांत होती. श्रोता या नात्यानं ऐकत होती. पण काही वेळाने ती अस्वस्थ झाली. तिला जणू काहीतरी सांगायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं. अखेर तिची ही चुळबुळ एवढी वाढली की पाहुण्यांचं लक्ष कुसुमकडे वेधलं गेलं. त्यांनी तिला खूण करून काही बोलायचं आहे का असं विचारलं मात्र..
कुसुम आपल्या जागेवरून उठली आणि बोलायला लागली. बोलताना ती रडत होती, हात वेडेवाकडे हालवत होती. म्हणत होती, ‘‘तुम्ही आम्हाला एकटं टाकलंय. आम्ही कशातच नाही तरी तुम्ही आमच्याकडे संशयानं बघता, आम्हाला देशद्रोही म्हणता. या देशातून निघून जा म्हणता. कुठं जायचं आम्ही? काय करायचं आम्ही?’’ एवढं बोलताना कुसुमला धाप लागली. ती क्षणभर थांबली. तिनं दीर्घ श्वास घेतला आणि ती परत बोलायला लागली. म्हणाली,‘‘आम्ही पाकिस्ताननं क्रिकेटची मॅच जिंकली की कधीच फटाके वाजवत नाहीत तरी आम्हाला लोक तसंच म्हणतात. आम्ही भारत जिंकला की नाचतो ते लोकांना दिसत नाही.’’
एवढं सगळं एका दमात ती चौदा वर्षांची मुलगी बोलली आणि ‘‘मला हल्ली भीती वाटते. खूप, खूप भीती वाटते’’ असं रडत रडत म्हणतच खाली बसली. ऐकणारे सारे अवाक् झाले, पाहुणे स्तब्ध झाले. मुलं गोरीमोरी झाली. टाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता त्या सभागृहात पसरली. क्षण दोन क्षण कुसुमचे हुंदके वातावरणात रेंगाळत राहिले आणि मग तेही थांबले.
तो प्रसंग झाला आणि कुसुमच्या आणि माझ्या संवादाचा मार्ग मोकळा झाला. जो विषय तिच्या काळजाला स्पर्श करीत होता, त्याला वाचा फुटली. जणू एखादं गळू असावं, त्याला किंचितही धक्का सहन होऊ नये पण शस्त्रक्रियेनंतर मात्र एकदम निचरा होऊन हायसं वाटावं, तसं काहीसं झालं. त्यानंतर एकदा कुसुमची आई देखील येऊन गेली.
कुसुम त्यानंतर पुष्कळ मोकळी झाली. मुख्य म्हणजे ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण शिकलं पाहिजे, असं तिनं पक्कं ठरवलं. कुसुम शालांत परीक्षा उत्तम मार्कानी पास झाली. पुन्हा एकदा तिच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला या वेळपावेतो कुसुमची बहीण अमीना तिच्या सासरी परत गेली होती. सुनेची बहीण लग्नाची झाली तरी तिचा निकाह न होता तिला पुढचं शिक्षण देण्याचे बेत केले जात आहेत, हे त्या मंडळींना अजिबात रुचलं नाही. समाजातील काही मंडळींनीदेखील आपला निषेध नोंदवला. पण यावेळी आईच नव्हे तर खुद्द कुसुमच खंबीरपणे उभी रहिली. तिनं वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. कुसुम कॉलेजला जायला निघाली.
अशी चार वर्ष गेली. कुसुम पदवीधर होण्यासाठी केवळ एकच वर्ष राहिलं होतं. आम्हीही सारेजण बिनघोर झालो होतो. पण आयुष्य तेवढं सरळ साधं नसतं. एके दिवशी कुसुमची आई अचानक दुपारीच शाळेत आली. तिचा चेहरा नेहमीसारखा हसतमुख नव्हता. तिच्याकडे बघताना वाटलं, गेल्या दहा वर्षांत परिस्थितीशी वेगवेगळ्या स्तरावर झगडताना किती थकून गेली ही स्त्री! स्वत: कधी शाळेत गेली नाही. पुस्तक कशाशी खातात हे तिला माहीत नाही. परंपरा, रुढी, बुरखा हे सांभाळण्यातच आयुष्याची उमेदीची र्वष खर्च झाली; पण मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खंबीरपणे उभी राहिली.
माझ्या मनात हे विचार येऊन जातात न जातात, तोपर्यंत कुसुमची आई समोरच्या खुर्चीवर बसली. वेळ न दवडता तिनं बोलायला सुरुवात केली. म्हणाली, ‘‘या वर्षी कुसुमची शादी करायलाच हवी. त्याला विलाज नाही. एकदा ग्रॅज्वेट झाली की संपलं. ग्रॅज्वेट मुलीशी कमी शिकलेला मुलगा नाय शादी करणार. आम्ही तिच्या आतेभावाशी तिची शादी तय केलीय.’’
या बेतापासून कुसुमची आई टस का मस हलली नाही. कुसुमला ‘पदवीधर’ असा टिळा लागण्याआधी तिची शादी करणं किती गरजेचं होतं हे तिच्याशिवाय चांगलं कोण जाणत होतं? जणू तो तिच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला होता. समाजाकडून किती दडपण येत असेल, याची जाणीव सर्वानाच होती. विशेष म्हणजे कुसुमनंही त्यावेळी कोणताही विरोध दाखवला नाही. ती मुकाटपणे शादीला तयार झाली.
कुसुमचं लग्न झालं. तिला मूलही झालं. या सगळ्या गडबडीत पदवीधर होण्याचं मात्र राहून गेलं. नंतर कळलं, कुसुमला एका परिचित अकाउंटंटकडे छोटी नोकरीही मिळाली. कुसुमचा संसार मार्गी लागला. कुसुम आम्हाला भेटते. आम्ही अभ्यासाचा आग्रह केला की फिक्कट हसते आणि आपल्या मुलांकडे बघते. (होय, कुसुमला दुसरी मुलगी झाली) तिच्या मौनात अनेक उत्तरं तर आहेतच, पण प्रश्नही आहेत. हे प्रश्नच तिच्या सारख्या अनेक मुलींना शिक्षणाची नवी वाट दाखवण्यासाठी उद्युक्त करतील.
मात्र कुसुमचा विषय निघाला की मला आठवतो तो अनेक वर्षांपूर्वीचा घडलेला परिसंवाद. त्या परिसंवादाच्या शेवटी उरी फुटून रडणारी आणि ‘मला भीती वाटते. खूप भीती वाटते.’ असं म्हणणारी कुसुम.
सहा डिसेंबरचा काळाकुट्ट दिवस. धार्मिक दंगली. हत्या, जाळपोळ, हिंसा! प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात असे दिवस येतच असतात. पण त्यात कितीकदा इमरान आणि कुलसुमसारखी निष्पाप मुलं होरपळून निघतात. राष्ट्राच्या, समाजाच्या उभारणीत मुलांच्या निकोप वाढीला सर्वाधिक महत्त्व असतं, हेच या साऱ्या गडबडीत आपण मोठी माणसं विसरून जातो.
रेणू गावस्कर
eklavyatrust@yahoo.co.in