आपल्या संथ, संयत आवाजात नकुल आईला म्हणाला, ‘‘मी इथं राहून शिकणार आहे. परत येणार नाही. आलो तरी पुन्हा पळून जाईन.’’ बस्स. एवढेच शब्द. पण ते इतके परिणामकारक होते की नकुलची आई हलून गेली. रुद्ध कंठानं ती मुलाला म्हणाली, ‘‘शिक, खूप शिक. मोठा हो. फक्त आईला विसरू नकोस.’’ त्याच वेळी ‘‘पोराला वनवासी केलंस.’’ एवढे आजीचे शब्दही सर्वाच्या कानांवर पडले. नकुल शिकला, मोठा झाला, पण अनिकेतच राहिला..

नकुल एक अप्रतिम चित्रकार होता. त्याच्या हातात, निमुळत्या बोटात एक विलक्षण जादू होती. शिवाय तो कमालीचा हसरा होता, अर्थात हसरा म्हणजे खळखळून हसणारा नव्हे. त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून हसू सारखं ओघळत असायचं. गोरापान, घाऱ्या डोळ्यांचा, भावपूर्ण चेहऱ्याचा हा मुलगा त्या हसण्यानं एकदम देखणा दिसायचा.
मुलांच्या शासकीय संस्थेत नकुल चांगली सहा वर्षे राहिला व तिथेच मला भेटला. त्या सहा वर्षांत नकुलनं संस्थेच्या कलाहीन भिंतींचं रूपच बदलून टाकलं. नकुलच्या चित्रांमधल्या चकाकत्या रंगांनी संस्थेच्या भकास भिंती रंगू लागल्या. त्याचा सर्वात चांगला परिणाम झाला इतर मुलांवर. त्यांना आपल्या रंगीबेरंगी खोल्या आवडायला लागल्या. पर्यायानं नकुल आवडायला लागला आणि चित्रं रंगवण्याची एक लाटच संस्थेच्या कानाकोपऱ्यांना व्यापून राहिली.
नकुलची चित्रं कल्पनाप्रधान असायची. मनाशी एखादी कल्पना पक्की झाली की मग ती तो एखाद्या कागदावर, भिंतीवर, जमिनीवर, मातीत, जमेल तिथे रेखाटत असे. चित्र त्याच्या मनाप्रमाणे आकार घेईपर्यंत तो त्या समाधीतून उठलाय, असं अगदी अपवादानेच घडे. पण त्यातही त्याचं एक चित्र अगदी आवडतं होतं. नकुल एका पक्ष्याचं चित्र नेहमी काढायचा, अगदी वारंवार. नकुल काढत असलेला पक्षी आकारानं मोठा, खासकरून पंख पूर्ण ताकदीनिशी पसरलेले असा असायचा. त्याची चोच- किंचित उघडलेली व नजर आकाशाकडे असायची. पक्षी मोठा सुंदर दिसायचा, पण चित्रातल्या त्या पक्ष्याच्या पायात मात्र साखळदंड असायचे. नकुलनं पहिल्यांदा तसा पक्षी काढला आणि रंगवला तेव्हा चित्राचा अर्थ विचारल्यावर नकुल उत्तरला, ‘‘तुम्हाला समजलं नाही ताई? तो पक्षी म्हणजे आम्ही मुलं. आम्हाला आकाशात उडायचंय. झेप घ्यायचीय, पण परिस्थितीचे साखळदंड पायात आहेत ना!’’
बारा-तेराव्या वर्षी परिस्थितीनं अकाली दिलेले साखळदंड वागवत हा मुलगा मोठा होत होता. नकुलचा पूर्वेतिहास वेगळाच होता, अगदीच वेगळा. नकुलच्या आईवडिलांच्या सहजीवनात सुसंवाद तर सोडाच, पण साधा संवादही निर्माण होऊ शकला नाही. लग्नानंतर काही वर्षांतच विसंवादाची तार एवढी ताणली गेली की नकुलच्या वडिलांनी घरादाराला बायको मुलाला रामराम ठोकला तो कायमचाच. नकुल त्यावेळी पाच-सहा वर्षांचा होता. कालांतराने काही वर्षांनी नकुलच्या आईचा परिचय एका परधर्मीय रिक्षाचालकाशी झाला व जवळच्या सर्वाच्या विरोधाला न जुमानता तिनं त्याच्याशी लग्न केलं. धर्मातरही केलं. नाव बदललं, पेहराव बदलला. नवल म्हणजे नकुल या सगळ्या घडामोडीत अस्पर्श राहिला. त्याला नाव, धर्म या कशाचाही आग्रहच धरला गेला नाही. जणू नकुल म्हणजे एक नगण्य अस्तित्व. नकुलला आईच्या नवीन घरात हे असं अस्तित्व स्वीकारणं किती अवघड गेलं असेल याची कल्पनाही नाही करू शकत आपण.
नकुलनं वाटय़ाला आलेलं वास्तव पचवण्याचा प्रयत्न केला. नवीन घराशी जमवून घेऊ पाहिलं. तोपर्यंत एक भाऊ व बहीण यांचं घरात आगमन झालं होतं. त्याचवेळी नकुलच्या वाढत्या वयानं त्याच्या पुढच्या एका वेगळ्या समस्येची जाणीव त्याला करून दिली होती. त्याचं एका धर्माशी नातं सांगणारं नाव आणि घरातील बाकी सर्वाच्या नावाचं नातं दुसऱ्याच धर्माशी. त्याच्या अनुषंगानं येणारं सगळ्या प्रकारचं सांस्कृतिक अंतर आधी निर्माण झालं, मग वाढत गेलं. घरात कुठलाही शारीरिक हिंसाचार नाही, शिव्या नाहीत. मारहाण नाही, पण मानसिक पातळीवरची ही लढाई लढणं नकुलला शक्य झालं नाही. त्यानं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला.
रस्त्यावर भटकत आसऱ्याचा शोध घेणारा नकुल मुलांच्या संस्थेत दाखल झाला. यथावकाश संस्थेकडून त्याचा पत्ता शोधून काढण्यात आला. नकुलची आई आणि आजी (आईची आई) त्याला भेटून गेल्या. आपल्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या घरात परतायचं नाही हे कळल्यावर नकुल एकदम मोकळा झाला. त्याचा मनावरचा ताण कमी झाला. चित्रं काढता, काढता तो शालेय अभ्यासातही रमून गेला.
पुढची तीन, चार र्वष छान गेली. नकुलचं कोणाशी भांडण तर सोडाच, साधा वादही हाते नसे. तो नेहमीच शांत असायचा. शांत आणि धीरगंभीर. एवढी सुंदर चित्रं काढायचा पण त्याविषयी देखील नकुलला फार अभिमान वाटतोय, असं दिसत नसे. संस्थेत पाहुणे आले की नकुलची चित्रं आवर्जून दाखवली जात. त्यावेळीही नकुलला शोधावं लागे, जणू ती चित्रं त्याची नाहीतच.
पण मग हे चित्र एकदा बदललं. नकुल नववीत असताना संस्थेच्या स्नेहसंमेलनाला एक वेगळेच पाहुणे लाभले. मूळचे जर्मन नागरिक असलेल्या डेन या गृहस्थांनी स्वेच्छेनं भारतीय नागरिकत्व पत्करून या देशात राहण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या प्राचीन संस्कृतीविषयी त्यांना अभिमान होता आणि तळागाळातल्या मुलांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती. डेन नकुलची चित्रं बघून एकदम प्रेरित झाले. मोडक्यातोडक्या हिंदीत नकुलशी बोलले. नकुलची शालान्त परीक्षा झाल्यावर चित्रकलेतील त्याच्या पुढील शिक्षणासाठी मदत करायचं आश्वासन त्यांनी दिलं. नकुल अभ्यासाला लागला. चित्रकलेची आराधनाही चालूच होती. शालान्त परीक्षेला ४६ टक्के गुण मिळवून नकुल उत्तीर्ण झाला. डेन यांनी नकुलला जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्ला प्रवेश मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले पण ते शक्य झालं नाही. परंतु बान्द्रा स्कूल ऑफ आर्टस्ला नकुलला प्रवेश मिळाला. हे एवढं सगळं झालं खरं पण नवलाची गोष्ट पुढे घडली. झालं असं की हे सगळं हो पावेतो नकुलची संस्थेत राहण्याची मुदत संपत आली होती. फार तर एखादं वर्षांचा कालावधी वाढवून मिळाला असता त्याला. पण ही अडचण समजताच तेच सद्गृहस्थ पुन्हा मदतीला धावून आले आणि त्यांनी नकुलला आपल्या घरात राहायला बोलावलं.
ही नवलाची बाब अशासाठी म्हणते की संपूर्ण आयुष्य जवळपास एकटय़ानं जगणाऱ्या या स्वतंत्र वृत्तीच्या माणसाला घरातला माणसांचा वावर अपरिचित तर होताच, पण नावडीचाही होता. मात्र नकुलच्या व्यक्तिमत्त्वातला शांतपणा त्यांना असा काही मोहवून गेला (हे त्यांनीच पुढे सांगितलं मला) की नकुलची अडचण त्यांनी जाणली व सोडवलीसुद्धा.
नकुलच्या चित्रकलेतील गतीला अक्षरश: बहर आला. शैक्षणिक प्रगतीची गाडी रुळावर आली, कलेचं शिक्षण घ्यायची संधी मिळाली आणि राहावं कुठे हा प्रश्न सुटला. एवढं सगळं घडल्यावर आम्ही सर्वानीच समाधानाचा नि:श्वास सोडावा हे साहजिकच होतं. पण..त्यातही एक पण आलाच. नकुलच्या संस्थेच्या वास्तव्यातले शेवटचे दिवस होते ते. एके दिवशी मला अधीक्षकांचा फोन आला. त्यांनी लागलीच संस्थेत यायला सांगितलं. त्यांच्या स्वरावरून मामला गंभीर असण्याचा अंदाज आलाच. मी संस्थेत पोचले तेव्हा नकुलला घरी नेऊ इच्छिणारे डेन एका खुर्चीवर बसले होते. त्यांच्याशिवाय दोन स्त्रिया पाठमोऱ्या बसल्या होत्या आणि एका खुर्चीवर बसला होता नकुल खाली मान घालून. माझी चाहूल लागताच त्या दोन्ही स्त्रियांनी मागे वळून पाहिलं. त्यातल्या तरुण स्त्रीकडे बघताक्षणी ती नकुलची आई असणार या विषयी मनात यत्किंचितही शंका राहिली नाही. होय, ती नकुलची आई होती. एवढंच नव्हे तर ती नकुलला घेऊन जायला आली होती. संस्थेच्या नियमानुसार नकुलची मुदत संपताच त्याच्या घरी तसं कळवलं गेलं होतं. नकुलच्या दुसऱ्या पित्याला रिक्षा चालवण्यात मदतीचा हात हवा होता. त्याचवेळी घरी हे पत्र मिळालं आणि नकुलला परत बोलावण्याचा निर्णय झाला. काही वेळ अत्यंत अवघडलेल्या शांततेत गेला. मग सावकाशीनं नकुलनं आईकडं पाहिलं. आपल्या संथ, संयत आवाजात त्यानं तिला परत न येण्याचा त्याचा निश्चय सांगितला. ‘‘मी इथं राहून शिकणार आहे. परत येणार नाही. आलो तरी पुन्हा पळून जाईन.’’ बस्स. एवढेच शब्द. पण ते इतके परिणामकारक होते की नकुलची आई जागेवरून उठली आणि नकुलपाशी आली. नकुलला घरी बोलवायला आली ती कुणाची तरी पत्नी होती, पण त्या क्षणी नकुलच्या शब्दांनी हलून गेली, ती त्याची आई होती. फक्त आई. रुद्ध कंठानं ती मुलाला म्हणाली, ‘‘शिक, खूप शिक. मोठा हो. फक्त आईला विसरू नकोस.’’ त्याचवेळी ‘‘पोराला वनवासी केलंस.’’ एवढे आजीचे शब्दही सर्वाच्या कानांवर पडले.
नकुल शिकला, खूप शिकला. चित्रकलेच्या विविध क्षेत्रात त्याची वाखाणण्याजोगी प्रगती झाली. त्यानं नाव कमावलं, पैसा तर खूपच कमावला. पण पैसा, कीर्ती यांच्या मोहजालात वाहून नाही गेला. आजही नकुल तसाच साधा, शांत, अबोल, संयत आहे. फक्त त्याच्या सहवासात कधी, कधी जाणवतं ते असं की, मानवी नात्यांवर याचा विश्वास नाही की काय? कुठलंही नवं नातं जोडायला नकुल कचरतो. जुन्या नात्यांना, आठवणींना उजाळा नाही देत तो. आपल्या घरी नकुल गेला नाही, जात नाही, कदाचित जाणारदेखील नाही. नवीन घर करण्याची उत्सुकतादेखील दाखवत नाही. असा हा अनिकेत नकुल, त्याला खरंखुरं स्वत:चं घर मिळावं असं वाटतं खरं!
eklavyatrust@yahoo.co.in

Story img Loader