सुनीलला परिस्थितीनं केलेला  ‘अन्याय’ सहन होणं शक्यच नव्हतं. त्यानं परिस्थिती हातात घेतली. पहाटे चारला उठून तो भाजी आणून ती भल्या पहाटे विकायला जायचा  ‘हेही दिवस जातील’ हे ब्रीदवाक्य उराशी धरून सुनीलनं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला.. आणि अन्यायाला न्यायात बदललं.

‘श्रीमंत सुनील’ आठवणीतून शब्दांत उतरल्याबरोबर ‘न्याय सुनील’ची आठवण न येणं कसं शक्य होतं? एकाच संस्थेत, एकाच वेळी (साधारणपणे) राहणारी ही दोन समवयस्क मुलं; पण दोघांची तोंडं दोन दिशेला असायची. न्याय-अन्याय, चूक-भूल या कशाचाही विधिनिषेध न बाळगता केवळ आणि केवळ श्रीमंत होण्याचा ध्यास घेणारा सुनील एकीकडे आणि काहीही झालं तरी चालेल, कुणावरही अन्याय होता कामा नये, अशी न्याय्य भूमिका लहानपणापासून घेऊन उभा ठाकलेला सुनील यांचं परस्परांशी पटणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं.

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा

संस्थेच्या आवारात शिरलं, की एक दृश्य (एखाददुसरा अपवाद वगळता) नेहमी दिसायचं. न्याय सुनील (त्याचं हेच नाव आमच्यात रूढ झालं होतं) कुणाला तरी काही तरी पटवत असायचा. खास करून मोठी मुलं, लहान मुलांशी वागताना जी अरेरावी करायची, त्याविषयी ‘समुपदेशन’ चालू असायचं. त्या वेळचा सुनीलचा चेहरा मोठा बघण्याजोगा असे. गोरटेल्या, उभट अशा त्याच्या चेहऱ्यावर लढवय्याचा लालसरपणा दाटून आलेला असे. गळ्याकडच्या शिरा ताणलेल्या असत. डोळे भावनावश झालेले असत. अशा वेळी ‘नेताजी नमस्ते’ अशी हाक मारली, की त्याचा आवेश ओसरून तो एकदम हसायचा. त्याचं ते प्रांजळ हसणं हृदयाला भिडायचं; पण अशा हसण्याच्या वेळा तशा क्वचित. बहुतेक वेळा अन्याय निवारणाचं कार्य चालू असल्यानं मुद्रा गंभीर असायची.

सुनीलच्या या तळमळीच्या पाठी काही तरी इतिहास (किती तरी कोवळ्या वयातल्या मुलांच्या वाटय़ाला जरड इतिहास येतात) असणार हे उघड होतं. टप्प्याटप्प्यानं संभाषणाच्या दरम्यान मला तो सुनीलकडून कळत गेला. अन्यायविरोधी मोहिमेचं रहस्य किंचित उमगलं. सुनीलच्या आईवडिलांचा प्रेमविवाह. जातीच्या खानदानी कल्पनांमुळे दोन्ही घरांतून या आंतरजातीय प्रेमप्रकरणाची चाहूल लागल्यावर जोरदार विरोध झाला. त्यातून सुनीलची आई अल्पवयीन. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि दोन्ही घरच्या मंडळींनी आपापल्या मुलांची नावं टाकली.

या दोन लहान मुलांनी संसाराचा डाव मांडला खरा, पण तो निभावून नेणं किती कठीण आहे, याची प्रचीती दोघांनाही हरघडी येऊ लागली. दोघांचंही अपुरं शिक्षण, ऐषोरामाची पूर्वीची सवय आणि निराधार अवस्था यातून येणाऱ्या अपरिहार्य वैफल्याने दोघांनाही ग्रासलं. आधी नवऱ्यानं व नंतर बायकोनं दारूच्या व्यसनाला आपलंसं केलं. या उद्ध्वस्त संसाराच्या यात्रेच्या दरम्यान तीन मुली व एक मुलगा (सुनील) यांनी जन्म घेतला होता. व्यसनानं वडिलांचा घास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर सुनीलची आई कामं करून संसाराचा गाडा रेटत राहिली. सुनीलनं हे मला टप्प्याटप्प्यानं सांगितलं. आई हा सुनीलचा मानबिंदू होता. गाडी, बंगला असणाऱ्या सुनीलच्या आजोबांनी पतीच्या मृत्यूनंतर ‘मुलांना अनाथाश्रमात ठेवून परत ये’ असा मुलीला सल्ला दिला. त्यावर तिनं ‘बाणेदारपणाने’ नाही म्हणून सांगितलं, असं सुनील नेहमी सांगायचा. हे सांगताना आईविषयीच्या अभिमानाने त्याची मुद्रा उजळून निघत असे.

पण दारिद्रय़ बाणेदारपणाचा बीमोड करते. इथंही काही वेगळं घडलं नाही. हळूहळू मुलांची शाळा सुटली. पोटातली भूक स्वस्थ बसू देईना. काहीही काम करावं, प्रसंगी दिसेल ते उचलावं आणि भूक शांत करावी असा क्रम सुरू झाला. सुनीलनं आपल्या बहिणींनी घरात राहावं, दुसऱ्यांच्या दारात जाऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यातूनच हातून जे काही घडलं त्यातून तो पोलिसांच्या हाती लागला व त्याची रवानगी संस्थेत झाली.

घरापासून दूर आल्यावर, थोडं स्वास्थ्य लाभल्यावर आणि खास करून भुकेचा सतत भेडसावणारा प्रश्न सुटल्यावर सुनील थोडा शांत झाला. घरातल्या भीषण परिस्थितीत व्यग्र झालेलं त्याचं मन आसपासच्या वास्तवाचा वेध घेऊ लागलं. तो संस्थेतल्या शाळेत जाऊ लागला. संस्थेत आला तेव्हा जेमतेम अक्षरओळख राहिली होती त्याच्याजवळ; पण मग नेट लावून वाचायला लागला. आम्ही सांगितलेल्या गोष्टी कानात प्राण आणून ऐकायला लागला

मला आठवतंय, लोकमान्य टिळक त्याचे आदर्श होते. लोकमान्य टिळकांविषयी ऐकताना तो खुलायचा. आपल्या हक्कांची जाणीव असणारे, ती जाणीव परखडपणे परकीय राजसत्तेपर्यंत पोहोचवणारे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असे विचारणारे टिळक त्याला आपलेसे वाटत. एकदा आम्ही दोघं गोविंदराव तळवळकरांनी लिहिलेल्या टिळकांच्या आठवणी वाचत होतो. त्यात असं लिहिलं होतं की, कधी नव्हे ते एकदा लोकमान्य चित्रपट पाहायला गेले. चित्रपट सुरू होण्यापूर्वी काँग्रेसची काही झलक दाखवण्यात आली. अनेक नेत्यांच्या छबी त्यात दाखवण्यात आल्या. मात्र टिळकांची छबी दाखवल्यावर प्रेक्षागृहात आधी झाला नव्हता इतका टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकमान्यांसोबत आलेल्या त्यांच्या स्नेहय़ाने टिळकांचे लक्ष वेधल्यावर टिळक एवढंच म्हणाले, ‘‘टाळ्यांच्या कडकडाटाला भुलणारा मी नव्हे. टाळ्या वाजवणारे हात कामाला लागतील तेव्हा खरे.’’
हा प्रसंग वाचताना सुनीलची कळी एकदम खुलली. तो म्हणाला, ‘‘मीसुद्धा हेच म्हणतो. अन्याय झालेला पाहिला, की प्रतिकार केला पाहिजे. नुसत्या शब्दांनी काही होत नाही.’’

सुनील त्या वेळी चौदाएक वर्षांचा असेल; पण ज्या प्रकारे तो विचार करत होता, चर्चा करत होता, त्यातून एक नेता उदयाला येत होता. हळूहळू त्यानं संस्थेतील मुलांशी बोलायला सुरुवात केली. संस्थेतील मुलं कशी तरी आणि कुठून तरी विडय़ा मिळवत. चोरूनमारून विडय़ा ओढत. सुनीलच्या नेतृत्वाखाली, त्याला येऊन मिळालेल्या अनेक मुलांनी सभा घ्यायला सुरुवात केली. रोज सायंकाळी मुलांची मीटिंग व्हायची. सुनील वाईट सवयींवर बोलायचा. आपली कहाणी सांगायचा. विडी सोडण्याविषयी कळकळीनं विनंती करायचा. मुलांच्या मनावर याचा खोल परिणाम व्हायचा. किती तरी मुलं, काहीही न बोलता, खिशात लपवलेल्या विडय़ा गोलाच्या मध्यभागी आणून ठेवत. सुनील संस्थेत राहिला तोपर्यंत हा प्रयोग अतिशय उत्तम रीतीने चालला. पुढं सुनील गेल्यावर मात्र तितक्याच ताकदीनं तो चालू शकला नाही. लोकचळवळीला असलेली खंबीर नेतृत्वाची गरजच यातून अधोरेखित झाली का?

विडय़ा ओढणं हा एक प्रश्न झाला; पण संस्थेत आणखीही प्रश्न होतेच. त्यात सर्वात महत्त्वाचा होता, लहान मुलांचा मोठय़ा मुलांकडून होणारा छळ. कुणाचंही लक्ष नसताना लहान आणि नवीन मुलांचा खाऊ हिसकावून घेण्यापासून याची सुरुवात व्हायची. मोठय़ा संस्थेत बराच काळ राहिलेल्या मुलांची टोळीच असायची. एक प्रकारचं रॅगिंग चालायचं या टोळीकडून. एका छोटय़ा गोष्टीतून ते प्रस्थापित केलं जायचं. नवीन मुलगा संस्थेत आला व तो आंघोळीला गेला आणि त्यानं साबण लावला, की आंघोळीचा तांब्या पळवला जायचा. बादली खेचून घेतली जायची. नवीन मुलाची फजिती व्हायची. तो रडकुंडीला तर यायचाच, पण त्याला आधारहीन, एकाकी वाटायचं. पुन्हा घरादाराचा, आईबापाचा आधार नसलेली ही मुलं! दु:ख सांगणार तरी कुणाला आणि कसं?

सुनीलने याही अन्यायाला अंशत: तरी थांबवलं. गैरप्रकार, अन्याय, हिंसाचार, व्यसनं यातली कुठलीच गोष्ट त्याला सहन होत नसे. कदाचित लहानपणी त्यानं या सर्वाचा अतिरेक बघितला. त्याची ती प्रतिक्रिया होती का? मात्र तशी ती असली तर त्याचे परिणाम फार चांगले झाले. संस्थेतील लहान मुलं सुनीलकडे भक्तिभावानं बघत, रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेत. एकदा तर गंमतच झाली. मुलं आणि कर्मचारी एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. परतायला उशीर झाला. सर्वानाच भुका लागल्या होत्या. प्रथमच कर्मचारीदेखील मुलांसोबत जेवायला बसले. त्यात एक कर्मचारी मुलांना खाण्यावरून नेहमी डिवचत असत. सुनील त्यांना ऐकू येईलसं म्हणाला, ‘‘चला, आज तरी भूक कळली.’’

सुनीलनं अठरा वर्षांचा होऊन संस्थेतून बाहेर पाऊल टाकलं तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती भीषण होती. ज्या बहिणींनी काम करू नये यासाठी त्याचं हृदय तळमळत होतं, त्या बहिणी त्याच्या गैरहजेरीत घरोघर जाऊन काम करत होत्या. आईचं व्यसन प्रमाणाबाहेर वाढलं होतं आणि तब्येत कमालीची ढासळली होती. सुनीलला परिस्थितीनं केलेला हा ‘अन्याय’ सहन होणं शक्यच नव्हतं. घरी गेल्या गेल्या त्यानं परिस्थिती हातात घेतली. कुठे, कुठे नोकऱ्या केल्या, त्या आता माझ्या स्मरणातून गेल्या आहेत. पण नोकऱ्या करता करता पहाटे चारला उठून तो भाजी आणून ती भल्या पहाटे विकायला जायचा हे मात्र मला नक्की आठवतं. ‘हेही दिवस जातील’ हे ब्रीदवाक्य उराशी धरून सुनीलनं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला.

आज सुनील ट्रक आणि टेम्पो स्वत:जवळ बाळगून आहे. भाजीच्या गाळ्यांचा मालक आहे. बहिणींची लग्नं झाली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनीलनं आईला कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्रात दाखल न करता तिचं व्यसन सोडवलं आहे. त्याच्या मते सगळ्या ‘अन्यायाचं’ ते मूळ आहे.
मधे एकदा सुनील भेटला. दोन मुलांचा पिता झालाय. बाकी सगळं चांगलं आहे; पण मुलं त्याला टरकून असतात. कारण त्यानं ‘अन्याय’ करायचा नाही असं त्यांना ठणकावून सांगितलंय. काय करणार बिचारी? सारखी न्याय-अन्याय यातला फरक शोधत असतात. तरी बरं, सुनीलनं त्यांची नावं न्याय व अन्याय अशी ठेवली नाहीत.

– रेणू गावस्कर