आजचा दिवस पूर्णपणे तिचा. नाहीतर मग कुठलाच तिचा नसतो. बऱ्याचदा ती माझ्या आयुष्यात सगळ्यात शेवटी असल्यासारखी वागवते मी तिला. कारण तिलाच फक्त मी तसं वागवू शकते. सगळ्यात जास्त तिलाच गृहीत धरलं आहे मी, सगळ्यात जास्त तिलाच दुखवलं असेल. फार कमी वेळा मी तिच्यापाशी थांबून तिचा विचार करण्याची ‘सवलत’ तिला देऊ शकले आहे. कधीकधी एखादं माणूस इतकं तुमचं होऊन जातं की त्या माणसाचा वेगळा विचारच येत नाही मनात. पण हे काही खरं नव्हे. कुणालाही जर संपूर्ण पहायचं असेल तर बाहेरून, योग्य त्या अंतरावरून त्या माणसाकडे पहाण्याचं सजगपणे ठरवायला हवं असं वाटतं आहे. आज स्त्रीदिनाचं अत्यंत औपचारिक निमित्त साधून तिला जराशी दुरून पहायचा मी सजग निर्णय घेते आहे.
तिला तिच्या आतमधून पाहिलेली मी या जगातली एकमेव स्त्री आहे. तिनेसुद्धा तिच्या आतलं जे पाहिलं नसेल ते मी पाहिलेलं आहे. निसर्गानं ते मला पहायला लावलेलं आहे. अणूच्या का कसल्या रूपात एक जीव म्हणून मी या जगात अवतरले ती तिच्या आत. मग तो जीव वाढता वाढता जरी त्याचे डोळे बंद असतील, तरी तिच्या आतलं काहीसं जे तिच्यापासूनही दूर होतं, ते त्या ‘जीवाच्या’ म्हणजे माझ्याजवळ होतं. तिच्या आतून मी तिच्या हृदयाची धडपड ऐकली असेल. तिच्या आणि माझ्या कळत नकळत त्या काळात आम्ही एकमेकींचं काय काय अनुभवलं असेल. मला ते सांगता येत नसलं तरी ते माझ्या आत आहे. माझ्या मेंदूच्या कुठल्याशा भागाला ते माहीत आहे. तिचा आणि माझा खोलवर संवाद असणारं असं वाटायला भरपूर जागा आहे! तिची आणि माझ्या बाबांची एक फार जीवाभावाची मैत्रीण होती. मी जन्मल्यावर काहीच वर्षांनी ती मैत्रीण गेली. मी तिला फारशी भेटलेही नाही. मात्र, माझं दिसणं, माझे हावभाव हे खूप त्या मैत्रिणीसारखे आहेत असं सगळ्यांनाच वाटतं. मला वाटतं मी जीव रूपात तिच्या पोटात असताना तिच्या संपूर्ण ‘असण्याशीच’ माझं जे नातं होतं. त्यातून, मी जन्माला येण्याआधीच तिची ती मैत्रीण कुठल्याशा रूपात माझ्यात आली असणार. नाहीतर ती मैत्रीण आणि मी यांच्यात साम्य असण्याचं दुसरं सूत्रं कोणतं?
मी तिच्या आतून बाहेर येण्याची प्रक्रिया आम्हा दोघींसाठी फार सहज नसणार असं वाटतं. तिचं सिझेरिअन झालं आणि तिला नंतर थोडा त्रासही झाला असं मी मोठं झाल्यावर ऐकलं. त्याबद्दल मला तेव्हा थोडं अपराधीही वाटलं. मला तिच्यातून बाहेर यायचंच नव्हतं का.. न कळे! माझ्यातल्या कुणालाही अजूनही तिच्याबाहेर यायचं नाही आहे, अजूनही तिच्याशी इतकं बुडल्यासारखं वाटतं की नंतर मोठं होत असतानाही तिच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग मला माझ्याच आयुष्यात घडल्यासारखे वाटतात. त्या त्या वेळी तिला काय वाटलं असेल ते मलाच कळलं आहे असं वाटतं. किंवा काही वेळा आता मला काय वाटतं आहे हे फक्त तिलाच कळेल असंही वाटतं. पुढे मोठं होता होता माझ्यातला बराचसा भाग माझा माझा वेगळाही बनला, पण काही भाग अजूनही तंतोतंत ‘ती’ आहे.
तिनं मला आयुष्यभर पुरून उरतील अशा अनेक भेटी दिल्या. मला बोलायला शिकवता शिकवताच ती एक गाणं शिकवायची ‘चिऊताई चिऊताई येऊ का घरात’ हे ते गाणं. मी या जगात उच्चारलेला पहिला शब्द म्हणजे हे गाणं होतं. ‘चिऊताई चिऊताई’ च्या चालीवर मी ‘म् आ म आ’ म्हणाले होते असं ती सांगते. ही आमच्यातल्या वाणीसंवादाची सुरुवात होती. गाणं. ही सुरुवात, हे गाणं नेहमीच आमच्या दोघींमधली घट्ट जोडसाखळी राहिली आहे. गाण्याबरोबरच आम्हा दोघींच्या संवादात भांडण्याचं मुक्त स्वातंत्र्यही तिने आणि मीही अगदी आधीपासूनच घेतेललं आहे. माझा भाऊ कधी कधी गमतीनं म्हणतो की आम्हा दोघींचं म्हणणं कधीकधी एकच असतं तरीही आम्ही भांडत असतो. ती आम्हा दोघींची आवडती गोष्ट आहे. मी अडीच तीन वर्षांची असताना माझे बाबा हे माझे वडील आहेत असं कळलंच नाही, ते मला तिचा आणि माझा कुणी कॉमन मित्र आहेत असं वाटायचं. ती त्यांना ‘सुभाष’ अशी हाक मारायची म्हणून मीही त्यांना त्याच सुरात ‘बुबाब!’ म्हणून हाक मारल्याची आठवण ती सांगते. त्या काळात बाबांना खूप काम असायचं. त्यामुळे ते सतत बाहेरच असायचे किंवा बाहेरगावी नसतील तर ऑफिसमध्ये काम करत असायचे. त्यांचं ऑफिस घरापासून काही पावलांवर होतं. ते भेटत नसल्याने मला सारखंच त्यांना भेटावंसं वाटायचं. मी सारखी तिचा डोळा चुकवून ऑफिसमध्ये पळायला बघायची. पण मी तिथे पोचायच्या आत तिचं माझ्याकडे लक्ष जायचंच आणि अध्र्या रस्त्यातूनच ती झपकन् उचलून मला घरी आणायची. त्या काळात ती माझी सगळ्यात मोठी शत्रू वाटायची मला. एके दिवशी मात्र मी तिला फसवण्यात यशस्वी झाले. तिचा डोळा चुकवून बाबांच्या ऑफिसमध्ये पोचले! छोटीशी मी कशीबशी ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना घराच्या दिशेने पाहिलं, तो तिच्या लक्षात आलं होतं. ती ऑफिसच्या दिशेनं पळत सुटली होती. पळता पळता तिचे काळेभोर दाट केस पाठीवर मोकळे सुटले होते. पण लहान मला कळत होतं. तिला उशीर झाला आहे. आता ती मला आणि बाबांना भेटण्यापासून थांबवू शकत नाही. मी दुडुदुडु पळत ऑफिसच्या खोलीपर्यंत पोचले आणि विजयी मुद्रेनं बाबांकडे पाहिलं. पण बाबा तर कामात होते. त्यांच्यासाठी माझ्या या छोटय़ा विषयापेक्षा खूप काही धकाधकीच्या मोठय़ा गोष्टी समोर ‘आ’ वासून उभ्या होत्या. मला बघताच काम न थांबवता ते ऑफिसबॉयला म्हणाले ‘अरेच्चा! अरे हिला घरी सोडून ये रे!’ तोच ती पोचली आणि तिने हसत हसत मला कडेवर घेतलं. मला बाबांचा राग आला. मी भोकाड पसरलं आणि तिला मारायला सुरुवात केली. ती मी तिला गृहीत धरण्याची सुरुवात होती का, असं आता वाटतं आहे. त्यानंतर आजतागायत रागवता न आलेले कित्येक राग मी तिच्यावर काढत असल्याचं मला दिसत आहे. बाहेरच्या कुणाला तरी दुखवावंसं वाटलेसं आहे आणि ते न जमल्यानं तेव्हा मी सहज तिला दुखवून घेतलेलं आहे. आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी याची नोंद घेते. त्यामुळे मी आई म्हणून तिला गृहीत न धरता माणूस म्हणून तिच्याकडे संपूर्ण पाहिल्याची सुरुवात होईल. त्यानं आमच्या एकमेकींच्या देण्याघेण्यात बऱ्याच गोष्टी अजून मोकळ्याढाकळ्या होतील असं वाटतं आहे.
सध्याच्या घडीला ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. सगळ्यात मोठी शत्रू ते सगळ्यात जवळची मैत्रीण यामध्ये खूप काही वर्ष आहेत. या वर्षांमधली सुरुवातीची वर्ष ही फक्त तिची आणि माझी आहेत. मग नंतरची वर्ष ती अनेक गोष्टींमध्ये वाटली जाण्याची आहेत. मी थोडी मोठी झाल्यावर तिने पुन्हा नाटकात काम करायला सुरुवात करायची आहेत. त्या नाटकातल्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ती पहिल्यांदाच घराबाहेर पडायला लागली. त्या वर्षांमध्ये तिला माझे बाबा सोडून कुणीच समजून घेणारं नव्हतं असं वाटतं. आम्ही मुलंही नाही. ती आमच्यापासून दूर जाते म्हणून आम्हीही सुरुवातीला त्या नाटकाचा रागच केला आहे. त्या काळात तिनं मला आणि माझ्या भावाला एक पत्रं लिहिलं होतं. त्यातला नक्की मजकूर आठवत नाही पण आमचा राग मान्य करूनही तिला जे करायचं आहे ते आम्हाला समजावण्याची धडपड तिने केली होती. आसपासच्या खूप कमी जणांना जेव्हा आपल्याला नक्की काय वाटतं ते कळत असतं तेव्हा त्यांना समजावण्याची धडपड करत आपल्याला हवं ते करत रहाणं थकवणारं असतं. पण तरी ती ते करत राहिली. मी खरं तर नाटकासाठी म्हणून नाटकाच्या रस्त्यावर आलेच नाही, असं आता वाटतं. मी तिला शोधत निघाले आणि वाटेत नाटक लागलं. ते मी करायला घेतलं कारण ती ते का करते. तिला नेमकं काय वाटतं ते मला जाणून घ्यायचं होतं. नाटकाने मला ‘ती’ कळते आहे. हळूहळू नाटक करता करता तिच्याबरोबरच मला मी ही सापडायला लागले. तिच्या शोधातच माझं सापडणं मला मिळत जात आहे. या नाटकाच्या रस्त्यावर गेल्या काही वर्षांत आम्हा दोघींचं एक छान पटांगण बनलं आहे. ‘जर-तर’ चं पटांगण. ‘जर मी अमूक असेल तर मी कशी असेन’चं पटांगण. वेगवेगळ्या ‘जर-तर’ची वेगवेगळ्या भूमिका खेळायचं पटांगण. त्या पटांगणात ती माझी खूप काय काय झाली आहे, एका लघुचित्रपटात तर माझी आजीसुद्धा झाली आहे. एकाच वेळी एकाच मुलीची आई आणि आजीसुद्धा होऊ शकणारी ती माझ्या माहितीतही एकमेव आई आहे!
प्रत्येकच माणसाच्या आयुष्यात बेसावध दु:ख येतात. तशीच तिच्याही आली. मी त्यांच्या तपशिलात जाणार नाही. कारण ती सगळी दु:खं तिनं फार स्वाभिमानानं भोगलीत. मला त्या स्वाभिमानाचा फार आदर आहे. मी आता त्या सगळ्या चढउतारानंतरच्या तिच्याकडे पहाते आहे आणि काही गोष्टी मला स्पष्ट दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांनी आम्हाला एकमेकींपासून अचूक अंतरावर असायला शिकवलं आहे. योग्य तेवढं लांब आणि जवळ.. ती स्वत: एक उत्तम विद्यार्थिनी आहे आणि मी ही ते तिच्याकडूनच घेतलं आहे. त्यामुळे आम्ही फार छान शिकतो आहोत. एकमेकींना आणि आयुष्यालाही.. मला दिसतं आहे. इतक्या सगळ्या चढउतारानंतरही आज ती कशी आहे. ती तिच्या आवडीचं ब्लॅक चॉकलेट मन लावून खाऊ शकते. तिच्या आवडीचा संता सिंग नावाच्या सरदारजीचा तोच तो विनोद सांगता सांगताच रोज नव्यानं सांगितल्यासारखा खुदखुद अनावर हसत सुटते. इतकी की तिला तो विनोद सांगणंही पूर्ण करता येत नाही. तिच्या जावयाच्या वाढदिवसाला स्वत: बनवलेलं मसालेदार चिकन त्याच्या मित्र-मैत्रिणींना खाऊ घालत त्यांच्याबरोबर चिअर्स करू शकते. नव्या नव्या दिग्दर्शकांच्या अनेक चित्रपट नाटकांमध्ये इतकी व्यस्त आहे, की मी आणि माझा भाऊ गमतीत म्हणतो, ‘आपण कामधंदे सोडू या! हीच या वयातही आपलं घर चालवेल!’
तिला दुसऱ्याचा एकटेपणा न सांगता फार आतून सहज कळतो. त्यामुळे तिचे कितीतरी सखेसोबती अनेक बाबतीत तिच्यावर विसंबून आहेत. तिला तिच्या अश्रूंची लाज वाटत नाही. तिला टचकन भरून येतं. ती ते स्वत:ला येऊ देते. आमच्या ओळखीतली एक तरुण मुलगी अचानक एका आजारानं देवाघरी गेली. आई घाईघाईनं बाहेर निघालेली असताना मी तिला ती बातमी सांगितली. तिचे भरलेले डोळे बघून म्हटलं. ‘आत्ता उगीच सांगितलं हे तुला!’ तर डोळे पुसत म्हणाली. ‘असं काही नाही गं, हल्ली मला या सगळ्याबद्दल काय वाटतं सांगू का, दु:ख सुद्धा चालेल, पण अळणी दिवस नको..’ असं म्हणून दार ओढून तिच्या कामाला निघून गेली.
आत्ता मी तिनं सजवलेल्या तिच्या घरात एकटीच आहे. माझ्यासमोर एक काळीशार पानाच्या आकाराची दगडी कातळ ताटली दिसते आहे. शोभेची. तिच्यात आईनं पिस्त्याच्या फोलपटांपासून एक सुंदर झाड तयार केलेलं दिसत आहे. खोडातून कारंज्यासारख्या अनेक फांद्या फुटून थुईथुई उडणारं झाड. आजच्या या दिवशी आईकडे संपूर्ण नीट बघताना ती मला या काळ्याभोर कातीव ताटलीतल्या थुईथुई कारंजी झाडासारखी दिसते आहे आणि आजच्या या दिवसाचं निमित्त असलं तरी ते झाड मला इथून पुढचे सगळे दिवस माझ्या आत ठेवायचं आहे, कायमचं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा