अंदमानच्या भेटीतला तो  विलक्षण अनुभव.. अनुराधा गाइडचं तिथल्या पशू-प्राण्याशी असलेलं नातं.. त्यांच्यातले संवाद ऐकले आणि भारावलोच ..
महाकवी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’मधील कण्व मुनींच्या आश्रमातील हरिणांशी असलेल्या शकुंतलेच्या भावबंधाविषयी वाचलं होतं. मात्र माणसापासून चारहात लांबच राहणारी, पण प्राण्यांबरोबर तेच प्रेमाचे बंध आजही कोणीतरी ठेवून आहे. याचा विलक्षण अनुभव यायला अंदमानातील रॉस आयलंडवर पाऊल ठेवावं लागलं.
हिरव्या-निळ्या नितळ समुद्रानं वेढलेलं हे हिरवंगार बेट खरं तर प्रसिद्ध आहे तिथल्या ब्रिटिशकालीन इमारतींच्या भग्नावशेषांसाठी. चर्च आणि इतर अनेक इमारतींचे आज फक्त सांगाडे उरलेत. त्यात आजूबाजूची झाडं घुसून एक विलक्षण गूढ वातावरण तयार झालंय.
हरीण, बदके, खार, बुलबुल, मोर सर्वचजण गुण्यागोविंदाने तिथे नांदताना पाहिले आणि पाहिलं त्यांच्यावर प्रेमाची हुकमत गाजविणारी लहान चणीची दाक्षिणात्य स्त्री अनुराधा गाइड! ही गाइड आपल्याला तिथल्या इतिहासाची इत्थंभूत माहिती तर देतेच, पण तिच्या सहवासात आपण सामोरे जातो एका विलक्षण अनुभवाला.
समोरच्या झाडावर बुलबुलचे दर्शन होताच माझ्या पक्षीप्रेमी नवऱ्याने कॅमेरा सरसावला. त्यावर ‘बुलबुल की फोटो चाहिये? रुकिये.’ म्हणून विशिष्ट आवाजात हाका मारीत तिने अनेक बुलबुल जमविले. ‘और किसे बुलाऊँ?’ म्हणत पुन्हा वेगळा आवाज काढला आणि क्षणात झाडावरून तुरुतुरू उतरणाऱ्या खारी हजर! त्यांना ‘यहाँ नहीं, उपर जाकर बैठों,’ असा आदेश दिल्याबरोबर त्यातील एक तुरुतुरू चढत वरच्या फांदीवर अगदी कॅमेऱ्याकडे टुकुटुकु बघत बसली.
आमचा वासलेला ‘आ’ बंद व्हायच्या आतच ‘बाबा, इधर आ जाओ,’ म्हणून तिने हाक मारली आणि चक्क एक पूर्ण वाढलेलं हरीण कुठून तरी येऊन उभं राहिलं. डोळ्याने अधू असलेल्या हरणाची ती विशेष काळजी घेत होती, असं दिसलं. त्याला खाऊ घालायला आमच्या हातात ब्रेडचे तुकडे दिले आणि ते हरीण प्रत्येकाच्या हातातील ब्रेड अलगद तोंडात घेऊ लागलं. तोपर्यंत तिने त्याच्या आणखी सात-आठ भावंडांना गोळा केलं होतं. एव्हाना आमची भीड चेपून आम्ही सगळ्यांना भरवायला सुरुवात केली. त्यांच्यावर प्रेम करणारी अनुराधा एखाद्याने आगाऊपणा केला तर ‘ऐसे नहीं, पीछे हटो,’ म्हणून त्याला दमही देत होती.
ती सांगत असलेली माहिती ऐकत थोडं पुढे गेल्यावर चक्क एक मोर सामोरा आला. ‘अकेले क्यों आयें? और सब कहाँ हैं?’ असं तिने म्हटल्याबरोबर क्षणात चारपाच लांडोरी आणि तीनचार मोर आमच्याबरोबर चालू लागले. तिच्या हातातून ब्रेड खाणाऱ्या पक्ष्यांना आम्ही मात्र घाबरून खाली तुकडे टाकत होतो.
पण खरी गंमत अजून आम्हाला दिसायचीच होती. चालता चालता एका छोटय़ा जलाशयाकाठी पोहोचलो आणि आई दिसल्यावर मुलं धावत यावी तशी चारपाच पांढरी बदकं धावली. ‘ऐंसे जमीन पर सें नहीं, पानी में से आओ,’ असा प्रेमाचा दम मिळताक्षणी त्या आतंकू नावाच्या टोळीने पाण्यात उडय़ा टाकल्या आणि भराभर पोहत येऊ लागली, पण एक लहान काळं बदक मागे राहिलं होतं. बदकांच्या या आईला त्यांचा आगाऊपणा आवडला नाही आणि तिने आदेश दिला, ‘वापस जाओं, तुरंत और उसें लेकर आओं. जाओं.’ आणि काय आश्चर्य! ती बदकं ताबडतोब मागे फिरली आणि त्या काळ्याला मध्ये घालून घेऊन आली. त्यांच्या या शहाणपणाच्या बदल्यात त्यांना खाऊ मिळाला, हे सांगायला नकोच.
या सर्व प्रकाराने भारावून गेलेले आम्ही दिङ्मूढ होऊन पाहात राहिलो. माणसाने मुक्या ठरविलेल्या या मंडळींबरोबर वेळ घालवून आदल्या दिवशी सेल्युलर जेलमधील छळाच्या कहाण्या ऐकून आणि वीर सावरकरांची कोठडी पाहून आलेलं नैराश्य काही प्रमाणात कमी झालंच. पण एक विलक्षण अनुभव आमच्या गाठीशी बांधला गेला तो कायमचाच.. 

Story img Loader