डॉ. शमिका सरवणकर

सौंदर्यशास्त्राचा इतिहास इसवी सन पूर्व ३००० वर्ष इतका मागे जातो. जगाच्या इतिहासात सौंदर्यप्रसाधनशास्त्राचं जनकत्व भारत आणि इजिप्त या देशांकडे जातं. मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत सौंदर्य खुलवण्याचे प्रयत्न मानवानं केल्याचं उघड आहे; मग ती स्त्री असो वा पुरुष. यात कुणीही मागे नव्हतं. उलट काळाच्या ओघात स्त्रियांनी सौंदर्य जपण्याची आपली कला अधिक जागृत ठेवली आहे. अश्मयुगापासून जगभरातील वेगवेगळय़ा भागांत स्त्री-पुरुष दोघांनीही हाडांपासून अथवा दगडांपासून तयार केलेल्या अलंकारांचा वापर केला होता. इतकंच नव्हे, तर मृत्यूनंतरही सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या संकल्पना भारतीय आदिम संस्कृतींमध्ये अस्तित्वात होत्या. आता काळानुसार सौंदर्यप्रसाधनांमध्ये भर पडली असली तरी त्यामागची सौंदर्य खुलवण्याचीच भावना आजही कायम आहे. ‘जागतिक वारसा दिना’च्या (१८ एप्रिल) निमित्तानं..

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके

‘नाकामध्ये बुलाख सुरती चांदणी वरती, चमकती परति हिच्यापुढे फार।

किनकाप अंगिचा लाल हिजपुढे नको धनमाल। सुंदरा मनामध्ये भरली..’

 शाहीर राम जोशींच्या लेखणीतून अवतरलेल्या या ओळी आजही अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवतात. एखादी सुंदरा मनामध्ये भरल्यानंतर मनाच्या हिंदूोळय़ात निर्माण होणाऱ्या लहरी या गाण्यात अचूक टिपल्या आहेत. परंतु हे तिचं सौंदर्य टिपताना शाहिरानं तिच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अलंकारांना तितकाच मान दिलेला आहे. जिच्या नाकात चांदण्याप्रमाणे चमचमणारी सुरती बुलाख आहे. जिनं अंगावर लाल रंग परिधान केला आहे, अशा सौंदर्यवतीच्या समोर धन-माल हादेखील शाहिराला फिका वाटत आहे. या सौंदर्यवतीवर अनेकांच्या नजरा खिळल्या असून तिनं परिधान केलेल्या अलंकारांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

सौंदर्य जोपासण्याचं उपजत कौशल्य स्त्रियांमध्ये असतं. कधी अलंकारांच्या, तर कधी विविध सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून आपलं रूप उजळवण्याचा प्रयत्न स्त्रीवर्ग नेहमी करत असतो. या सौंदर्यसाधनेचा मोह खुद्द जगदंबेलादेखील आवरता आला नाही! एकदा शिव-शंकरांनी ‘काली’ (काळी) म्हणून चिडवल्यावर पार्वतीनं तपोबलाच्या सामर्थ्यांवर गौर रंग प्राप्त केला, अशी दंतकथा सांगितली जाते. याच कथेशी साधम्र्य असणाऱ्या एका दुसऱ्या कथेत पार्वतीनं शिवाला प्राप्त करण्याकरिता जे तप केलं होतं, त्या वेळी उन्हामुळे तिचा रंग सावळा झाला, असा संदर्भ आहे. आपली सावळी झालेली कांती कालीनं दुर्वाच्या मदतीनं गौर केली आणि त्यानंतर ती स्वत: गौरी म्हणून प्रसिद्ध झाली, असा त्याचा आशय. इथे रंग हा दुय्यम मुद्दा आहे. कथा कुठलीही असो, पार्वतीनं तिचं रूप उजळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कथा महत्त्वाची ठरते. इथे कुणी आक्षेप घेईल, की दंतकथेतून निष्कर्ष काढणार का! त्यासाठी आपल्याला नवपुरातत्त्व (पोस्ट प्रोसेस्युअर आर्किऑलॉजी) हा विषय समजून घ्यावा लागेल. दंतकथेच्या अभ्यासकांच्या असं लक्षात आलं, की अशा कथांच्या मुळाशी एक शतांश का होईना, पण सत्याचा अंश असतो. याचा अर्थ कालीच्या गोष्टीपुरता घ्यायचा झाल्यास उन्हामुळे रंग सावळा होतो आणि रंगरुप पुन्हा उजळता येतं याचं ज्ञान तत्कालीन लोकांना होतं.  सौंदर्य जपण्याचा किंवा खुलवण्याचा प्रयत्न स्त्रिया वेगवेगळय़ा माध्यमातून करतात. कधी घरगुती वस्तूंच्या माध्यमातून, कधी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आपण आपलं सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. स्त्री कुठल्याही वर्गातील असो, आपल्या यती-मतीप्रमाणे ती आपलं सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करते.

आज बाजारात त्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. अगदी स्थानिक ते परदेशातील कंपन्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रात सक्रिय आहेत. वेगवेगळय़ा रंगांचं काजळ, आयलायनर, आयश्ॉडो, लिप व चीक टिंट, लिपस्टिक, नेल पॉलिश अशी विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधनं आज उपलब्ध आहेत. यामुळे आपल्याला कपडय़ांच्या रंगानुसार हवा तो आणि हवा तसा मेकअप परवडेल त्या किमतीत करता येतो. पण ही ओढ आजची नाही.  मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेच्या विविध टप्प्यात सौंदर्य खुलवण्याचे प्रयत्न मानवानं केल्याचं उघड आहे; मग ती स्त्री असो वा पुरुष. यात कुणीही मागे नव्हतं. उलट काळाच्या ओघात स्त्रियांनी सौंदर्य जपण्याची आपली कला अधिक जागृत ठेवली आहे. अश्मयुगापासून जगभरातील वेगवेगळय़ा भागांत स्त्री-पुरुष दोघांनीही हाडांपासून अथवा दगडांपासून तयार केलेल्या अलंकारांचा वापर केला होता. इतकंच नव्हे, तर तत्कालीन मानवानं गेरू किंवा तत्सम नैसर्गिक रंगांचा वापर शरीरसौंदर्य वाढवण्यासाठी  केल्याचे पुरावे जगभरात विविध संस्कृतीत सापडतात. झाम्बिया इथल्या पुरातत्वीय स्थळावर चार लाख वर्ष जुने शरीरावर वापरण्यात येणाऱ्या रंगांचे पुरावे सापडले आहेत. तपकिरी, लाल, निळा, गुलाबी हे रंग अंगावर लावण्याचा एक विधी त्या वेळेस अस्तित्वात होता, असा संशोधकांचा कयास आहे. हे रंग खनिजांपासून तयार करण्यात येत होते. केवळ शरीर रंगवण्यासाठी नाही, तर तत्कालीन गुंफांच्या भिंतीवर जी चित्रं आहेत, त्या चित्रांमध्येही हेच रंग वापरात येत होते. भारतात अशा अश्मयुगीन भित्तीचित्रं असलेल्या गुहा आपण मध्यप्रदेश इथल्या भीमबेटकासारख्या ठिकाणी पाहू शकतो. किंबहुना मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराला रंगाच्या व अलंकारांच्या माध्यमातून सुशोभित करण्याची परंपरा आदिम काळापासून अस्तित्वात होती. मृताच्या शरीराला लाल गेरूचा रंग लावण्यात येत होता. याचे पुरावे भारतात गुजरातमधील लांघनाजसारख्या मध्याश्मयुगीन पुरातत्वीय स्थळावर सापडले आहेत. तर दक्षिण भारतात लोहयुगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाश्मयुगीन संस्कृतीतील दफनांमध्ये मृतांच्या अंगावर वेगवेगळय़ा प्रकारच्या अलंकाराचा समावेश आहे. म्हणजेच मृत्यूनंतरही सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या संकल्पना भारतीय आदिम संस्कृतींमध्ये अस्तित्वात होत्या.

सौंदर्यशास्त्राचा इतिहास इसवी सन पूर्व ३००० वर्ष इतका मागे जातो. जगाच्या इतिहासात सौंदर्यप्रसाधनशास्त्राचं जनकत्व भारत आणि इजिप्त या देशांकडे जाते. इजिप्त आणि भारतातली सिंधू संस्कृती या तत्कालीन चार आद्य संस्कृतींमधील दोन मुख्य संस्कृती आहेत. प्राचीन भारत आणि इजिप्तमध्ये स्त्री-पुरुष दोघांसाठीही सौंदर्यप्रसाधनं उपलब्ध होती. सौंदर्यप्रसाधनांचा वापर प्राचीन भारतात मात्र ऋतुबदलावर ठरत असे. आजच्या आधुनिक जगात आपल्याकडे ब्युटीशियन किंवा मेकअप आर्टिस्ट आहेत, ते आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करतात. अशाच स्वरूपाचे मेकअप आर्टिस्ट प्राचीन भारत व इजिप्तमध्येही अस्तित्वात होते. या स्वरूपाचा प्रसिद्ध उल्लेख आपल्याला महाभारताच्या कथेत मिळतो. एका वर्षांच्या अज्ञातवासात पांडवांनी मत्स्यदेशाच्या विराट राजाच्या दरबारात रूप बदलून आश्रय घेतला होता. त्या वेळी द्रौपदी ही विराट राजाच्या राणीच्या म्हणजेच सुदेष्णेच्या महालात ‘सैरंध्री’ म्हणून वावरली होती. प्राचीन भारतात वेणीफणी, वस्त्रालंकारादी रचना इत्यादि कामं करण्यासाठीं असलेल्या स्त्रीला सैरंध्री संबोधत असत. या काळात द्रौपदी ‘प्रसाधनपेटिका’ (मेकअप बॉक्स) बाळगत असल्याचे उल्लेख मिळतात. सौंदर्यप्रसाधनांचा व्यापक अर्थ हा शरीराची स्वच्छता, त्वचेची काळजी, शरीराचं व त्वचेचं (रंग, अलंकार इत्यादी वापरून) सुशोभीकरण करणं असा आहे.

भारतीय संस्कृतीत वेगवेगळय़ा ग्रंथांत विविध प्रकारचे लेप ऋतूबदलानुसार सांगितलेले आहेत. या लेपांमध्ये वापरण्यात येणारे घटक हे ऋतूनुसार शरीराला व त्वचेला साजेसे होते. ‘अष्टांगहृदय’ ग्रंथात सहा ऋतूंसाठी वेगवेगळय़ा लेपांचा संदर्भ सापडतो. याच ग्रंथात त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळय़ा प्रकारच्या तेलांचा व घृताचा संदर्भदेखील देण्यात आला आहे. याशिवाय प्राचीन भारतात केसांची काळजी योग्य पद्धतीनं कशी घ्यावी यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत होते. केस धुण्याच्या वेगवेगळय़ा पद्धती, केस वाढीसाठी आणि गळतीवर करण्यात येणारे वेगवेगळे उपाय, केस पांढरे होण्यापासून रोखण्याचे उपाय, केसांसाठी वापरण्यात येणारा रंग, यांविषयी माहिती वेगवेगळय़ा प्राचीन ग्रंथामध्ये नमूद करण्यात आली आहे. 

ऋग्वेदात स्त्रियांच्या विविध केशभूषा दिल्या आहेत. यानुसार स्तुक्ला, कुरिरा, कुंबा, ओपासा आणि कुपर्डा या वेगवेगळय़ा आकारांत वैदिक काळात केस बांधण्यात येत होते हे समजतं. लेणी, तसंच मंदिर शिल्पांच्या आधारे प्राचीन भारतातल्या केशरचनेविषयी समजण्यास मदत मिळते. याशिवाय आंघोळीसाठी सुवासिक लेप, सुगंधित अत्तरं, तोंडाच्या व दातांच्या स्वच्छतेसाठी वापरात येणारी चरूण, तोंडासाठी वापरात येणारं दरुगधीनाशक आणि ओठांचे रंग याविषयी माहितीदेखील विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. याचाच अर्थ आज आपण आधुनिक जगात जे काही कॉस्मेटिक्सचे प्रकार वापरतो, त्याच स्वरूपाचे कॉस्मेटिक प्रकार प्राचीन भारतीयांना माहीत होते हे सिद्ध होतं. किंबहुना भारत आणि इजिप्त या देशांनी कॉस्मेटिक्स प्रकारांची जगाला दिलेली देणगी आहे. त्याचं उत्तम उदाहरण शाम्पू हे आहे. केसांच्या स्वच्छतेसाठी वापरात येणारे नैसर्गिक पदार्थ हे भारतानं जगाला दिले. किंबहुना आधुनिक जगात वापरात येणारा शाम्पू हादेखील प्रथम भारतातच- बंगाल इथे तयार करण्यात आला होता. शाम्पू हा शब्द डोक्यावर करण्यात येणाऱ्या ‘चंपी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि त्याचा शब्दकोषातही संदर्भासह उल्लेख करण्यात आला आहे.  

प्राचीन सिंधू संस्कृतीत काजळ लावण्याची पद्धत होती हे पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे सिद्ध होतं. सिंधू संस्कृतीकालीन अनेक पुरातत्वीय स्थळांवर antimony rod सापडले आहेत. या (antimony rod) शलाकांचा वापर काजळ किंवा अंजन लावण्याकरिता होत होता. प्राचीन भारतीय मंदिरांच्या भिंतींवर जी सूरसुंदरीची शिल्पं आहेत, त्यात याच antimony rod च्या मदतीनं काजळ लावणाऱ्या सुंदरींचा समावेश आहे. अंजनाचा संदर्भ अथर्ववेदामध्येदेखील सापडतो, तर यजुर्वेदामध्ये ‘अंजनकारी’ असा संदर्भ आलेला आहे. अंजन तयार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या स्त्रीला प्राचीन भारतात अंजनकारी म्हटलं जात होतं. केवळ भारतातच नाही, तर इजिप्तमध्येही रंगांचा वापर करून डोळे सुशोभित करण्याची परंपरा होती. पहिल्या शतकात होऊन गेलेली इजिप्तची क्लिओपात्रा राणी आपले डोळे काळय़ा, हिरव्या गडद रंगांनी सुशोभित करत होती याचे संदर्भ सापडतात.

    वात्सायनानं ‘कामसूत्रा’मध्ये सौंदर्यप्रसाधनांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. कामशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळय़ा प्रकारचं अनुलेपन (ointment), सिक्त करंडक (हार-गजऱ्यांची टोपली), सौगन्धिका पुटिका (scent box), मातुलुंग त्वचा (skin of the Citrus medica fruit – संत्रंवर्गीय फळांची साल) आणि विडय़ाचं पान यांचा शरीराच्या रोजच्या स्वच्छतेसाठी वापर प्राचीन भारतात केला जात असे. वात्स्यायनाचं ‘कामसूत्र’ हे प्राचीन भारतीय प्रसाधनशास्त्राच्या इतिहासाविषयी माहिती पुरवणारं महत्त्वाचं साधन आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याचं सविस्तर वर्णन वात्सायन ‘कामशास्त्रा’त करतो. वात्सायनानं नमूद केल्याप्रमाणे- सकाळी प्रात:विधीनंतर दात स्वच्छ करावेत, आंघोळ करून शरीरावर चंदन किंवा इतर सुगंधित लेप लावावा. सुगंधित धूप दाखवलेले स्वच्छ कपडे परिधान करावेत, पुष्पमाला परिधान करावी, डोळय़ांत काजळ व ओठांवर रंग लावून आरशात पाहावं. आपल्याकडे पाहून आपल्यालाच समाधान वाटत असेल, तरच प्रसन्न मनानं कामासाठी बाहेर पडावं. याशिवाय एक दिवसाआड केसांना मसाज (चंपी) करावा आणि त्यानंतर शाम्पू आदीने आंघोळ करावी. दर तीन दिवसांनी साबणासारख्या घटकानं शरीर स्वच्छ करावं. दर चार दिवसांच्या अंतरानं पुरुषांनी नियमित दाढी करावी, असं वात्सायन नमूद करतो. हळद, केसर, काजळ, सिंदूर यांचा वापर शरीर सुशोभनासाठी करावा आणि दररोज अलंकार परिधान करण्याचा सल्ला वात्सायन स्त्रियांना देतो. वात्सायनानं सौंदर्य चिरतरुण ठेवण्यास मदत करणाऱ्या योगासनांचा संदर्भही दिला आहे. वात्सायनानं नमूद केलेल्या ६४ कलांमध्ये रंगांच्या सहाय्यानं शरीर सुशोभानाची, कपडे व दात सुशोभानाची, अत्तर बनवण्याची, हस्तिदंत-शंखांपासून तयार केलेल्या कानातल्यांनी कान सुशोभन करण्याची, अशा अनेक कलांचा समावेश होतो. प्राचीन भारतात अंगराग (अंगाला लावायची राख/ पावडर)  सौंदर्य वाढवण्यासाठी वापरत होते, याचा प्रसिद्ध संदर्भ रामायणात मिळतो. अत्री ऋषींच्या पत्नी अनुसूयादेवींनी सीतेला दागिन्यांबरोबर अंगराग दिल्याचा संदर्भ आहे. अर्थशास्त्रातदेखील वेगवेगळय़ा सुगंधित द्रव्यांचा उल्लेख आढळतो. चंदनाचा वापर अनुलेपनासाठी करण्यात येत होता असं अर्थशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. बौद्ध साहित्यात भिक्षू संघासाठी जे नियम देण्यात आले आहेत, त्यात फुलांच्या माळा, सुगंधित अत्तर, दागिने, महाग, उंची कपडे वापरू नयेत, असं नमूद केलं आहे. यावरून प्राचीन भारतात शरीरसौंदर्य अबाधित राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना विशेष प्राधान्य देण्यात आलं होतं हे लक्षात येतं. आज सौंदर्यप्रसाधनांचं रूप खूपच पालटलं आहे. मेकअपचा जागतिक बाजार तर प्रचंड मोठा झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे प्राचीन काळात तत्कालीन रूढ मान्यतांनुसार सुंदर दिसण्यासाठी जितके कष्ट घ्यावे लागायचे, त्याच्या तुलनेत सौंदर्यप्राप्ती आता सोपी झाली आहे असंच म्हणावं लागेल. तरीही पूर्वीच्या काळी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचे उल्लेख मनाचं रंजन करतात. स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही आपलं सौंदर्य खुलावं, ही बाळगलेली मनीषाच त्यात दिसते.

Story img Loader