पॅनिक अ‍ॅटॅक किंवा तीव्र चिंतेचे झटके का येतात? अनेकदा ते कुठल्याही जाणीवपूर्वक गोष्टींनी किंवा कारणांनी येतात असे नाही. तर कधी कधी सुप्त मनात दडलेल्या तणावांमुळेही अचानक येऊ शकतात. त्यामुळे त्याच्याकडे वेळीच लक्ष देणे आणि उपाय करणे
महत्त्वाचे आहे.
चिंतेचा सर्वसामान्य प्रकारचा मानसिक आजार (जीएडी) हा त्यातल्या शारीरिक व बऱ्याचदा मानसिक लक्षणांमुळे रुग्णाच्या लक्षात येतो.  सततची विनाकारण वाटणारी ही चिंता असते, अनाठायी असते याची जाणीव असूनही रुग्णाला या विकारावर व या विकारामुळे येणाऱ्या अनामिक भीतीवर मात करता येत नाही. आयुष्यच जणू किरकिरे व्हायला लागते. अशावेळी आपण या चिंतेवर मात कशी करू शकतो हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या ज्या कुणाला हा आजार झाला आहे त्या सर्वाना त्यातून आराम मिळणे आवश्यक आहे. वेळीच उपाय करून या आजारातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर हा आजार विक्रमादित्य राजाच्या मानगुटीवर पुन्हा पुन्हा बसलेल्या व त्याची पाठ कधीच न सोडणाऱ्या वेताळासारखा आहे.
यासाठी मनाला आवर घालत हा आजार आपल्याला झाला आहे हे मान्य करायला हवे. ही समस्या आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांशी संबंधित तर नाही ना हेही तपासून पाहावयास हवे. विशेषत: स्त्रियांसाठी घर व काम किंवा करिअर या दोहोंच्यामध्ये कसरत करताना होणाऱ्या समस्या गुदमरून टाकणाऱ्या असतात. घरी तर बऱ्याच जणी दोन-तीन माणसांच्या वाटय़ाचे काम एकटीने करतात. इतर मंडळी ‘काय एनर्जी आहे, काहीही सांगा करून दाखवेलच’ असे वरकरणी प्रशंसोद्गार काढतात. मात्र या आमच्या भगिनी या प्रशंसेच्या िपजऱ्यात अडकतात. त्यामुळे दर्शनी नाकारले तरी अशा अनामिक तणावाने स्त्रियांना चिंतेचा आजार होतो. इतरांच्या दबावाखाली काम करताना जो भावनिक दबाव येतो तो चिंतेच्या आजाराला बऱ्याचदा कारणीभूत ठरतो. माझ्या माहितीतल्या एक भगिनी तिच्या प्रिय मत्रिणीच्या दबावाखाली स्वत:चे अस्तित्वच विसरल्या होत्या. खास करून त्यांच्या हिटलर नवऱ्याशी त्यांनी कसे वागावे याच्या टिप्स स्वत: या हिटलरबाईच करून देत होत्या. या बाईंना काय करावे कळेना. दोन दोन हिटलरांच्या कैचीत त्या सापडल्या. स्वत:चे असे मत नव्हते. मग अचानक चिंतेचा आजार सुरू झाला. अशा प्रकारचे विविध नात्यांमधले तणाव चिंतेच्या आजारात ओळखणे आवश्यक आहे.
काही वेळा तर अशा बाहेरच्या वा जवळच्या नातेवाईकांच्या व मित्रमत्रिणींच्या पेक्षा कित्येक वेळा खूप त्रासदायक ठरतो तो आपला स्वत:चा अभिमान व गर्व. या दोघांना ठेच लागली की सावरता येणं खूप कठीण असते. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत आपली प्रत्येक भूमिका विशेषत: आई व पत्नी या (सक्षम) भूमिकेत आपला इगो घायाळ झाला तर पुन्हा समतोल पातळीवर यायला वेळ लागतो. या क्षणी चिंतेचा आजार आतून बाहेरून पोखरून काढतो. प्रियाताईंचा मुलगा दहावीत नापास झाला आणि त्याच्यातली सक्षम आईच उद्ध्वस्त झाली. ‘ही सगळी आपली अक्षम्य चूक आहे. आता आपल्या मुलाचे पुढे काय होणार (बहुधा सत्यानाशच होणार)’ या विचारांनी त्या उन्मळूनच पडल्या. अशा विचारांची तीव्रता वाढली की लवकरात लवकर मनोरुग्णतज्ज्ञाकडे पोहोचावे व जीएडी आहे का हे तपासून घ्यावे. बऱ्याच वेळा पटकन बरे वाटावे म्हणून चिंतेला काबूत ठेवणारी औषधे आम्ही देतो. पण हे थोडय़ा काळासाठी देतो. जिवाला शांतचित्त वाटले की रुग्णाची पुढच्या दीर्घकालीन उपचारासाठी तयारी करतो. उपचारात पहिली गोष्ट करायची म्हणजे आपल्यावरचा ताण कमी करायचा. तणावजन्य प्रसंग व व्यक्तींपासून स्वत:ला वाचवायचे. स्त्रीची एक वाईट खोड आहे, म्हणजे पूर्ण बुडेपर्यंत आपण पाण्यात आहोत व बुडू शकतो हे स्वीकारायचे नाही. पाण्यात आहोत म्हणजे तरी काय तर आपल्याभोवतीची परिस्थिती विपरीत आहे. आपल्या जवळची माणसे आपल्याला सहकार्य करीत नाहीत. उलट आपले मानसिक शोषण होते आहे याची सारासार जाणीव करून घेणे आवश्यक आहे. यामुळे आपण स्वत:साठी काहीतरी करू शकतो. शिवाय दुसऱ्या कुणाची किंवा डॉक्टरांची मदत घेऊ शकतो. वर सांगितलेल्या मत्रिणीसारखे आपले नातेवाईक आपल्यावर ताबा आणू पाहातात. अशावेळी स्वत:चा आत्मविश्वास ढळू देऊ नका. त्यांना हळूच सुचवा की तुम्हाला तुमचा एकांत हवा आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वत:शी प्रामाणिक राहून समस्येचे निवारण करावे. जे स्वत:ला आतून पटत नाही ते केवळ दुसऱ्याला खूश ठेवण्यासाठी व घाबरून करू नये म्हणजे मनात द्वंद्व उरत नाही. आपल्या विवंचनेबद्दल व समस्येबद्दल शक्य तो विश्वासू व सुहृदांशी बोला. नेमके कुठे आणि कशामुळे मनात आवेग येतो आहे हे व्यक्त केल्यास तणाव कमी होतो.
आपण या समस्येतून बाहेर यायचं आहे, हा सकारात्मक दृष्टिकोन असू द्यावा. आपल्यावर एकावेळी खूप जबाबदाऱ्या आल्या आणि त्याच्या दबावाखाली आपण कोसळतो आहे, हे लक्षात आल्याबरोबर काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांबरोबर वाटून घ्याव्यात. स्वत:लाही विश्रांतीची गरज आहे हे स्त्रियांना खूप उशिरा जाणवते. पण आपण घाण्याला जुंपलेल्या बलासारखे काम करू शकत नाही. आपल्यालाही ताजेतवाने होण्यासाठी विसावा लागतो हे लक्षात असू द्यावे. नुसत्या औषधी गोळ्या घेऊन चिंता जाणवली नाही किंवा कमी झाली म्हणून गोळ्यांच्या आहारी न जाता चिंतेच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधले पाहिजे. याशिवाय उत्तम झोपही या आजारात मोलाची आहे.
आमच्याकडे सुनीताला घेऊन तिची आई आली होती. सुनीताला अचानक घरबसल्या भीती वाटायला लागली. ती खरे तर गेल्या आठवडाभर नोकरीसाठी इंटरव्ह्य़ूची तयारी करीत होती. गेली तीन वष्रे एमबीए केल्यावर तिला मनासारखी नोकरी मिळत नव्हती. यावेळी कंपनी चांगली होती म्हणून तिने कसून तयारी केली होती. अचानक तिच्या शरीरात एक भीतीची लहर उठली. हृदयाचे ठोके वाढायला लागले. हृदयाची धडधड तिला जाणवत होती. छातीच्या िपजऱ्यावर ते जोरजोरात धडकत होते. तिला ते ठोके ऐकू येतात असे वाटू लागले. तिच्याभोवतीची खोली तिच्याभोवती गरगरा फिरू लागली होती. आपल्याला प्रचंड वेगाने उलटी येते आहे असे तिला वाटू लागले. जीभही कोरडी पडायला लागली. तिचे पूर्ण शरीर कापत होते. श्वास कोंडत होता. जीव गुदमरून गेला होता. िभतीला टेकून ती थरथरत उभी होती. हे वादळ कसेबसे शमले पण ती मात्र हादरली होती. सुरुवातीला आपले हृदय फुटून आपण मरणार होतो असेच तिला वाटले. त्यादिवशी ती आपल्या डॉक्टरकडे गेली व त्यांना सर्व लक्षणे सांगितली. त्यांनी आवश्यक त्या तपासण्या केल्या. ईसीजी, रक्तदाब सगळे नॉर्मल होते. तिने तिचा इंटरव्ह्य़ू व्यवस्थित दिला. तिला ती नोकरी मिळणार होती. तेवढय़ात तिला दुसऱ्यांदा पुन्हा तो अ‍ॅटॅक आला. पुन्हा एकदा तो जीवघेणा अनुभव. यावेळी आईही घाबरली. काय झाले ते कळेना. सगळ्या तपासण्यासुद्धा पुन्हा नॉर्मल. आता मात्र सुनीता गोंधळून गेली. घाबरून गेली. तिला तो अ‍ॅटॅक केव्हा येईल, कुठे येईल हे काही सांगता येत नव्हते. पण तो लोकांमध्ये असताना येईल की काय याची भीती वाटायची. साहजिकच ती मित्र-मत्रिणींबरोबर जायचे टाळायची. काम झाले की घरी बसून राहायची. तिने या झटक्याचा प्रचंड धसका घेतला. तिला मरणप्राय वाटणारी सारी लक्षणे जरी शाारीरिक असली, तरीही कुठलाही शारीरिक आजार मात्र तिला नव्हता. खूपच निराशा आणणारा अनुभव होता तो. हा तीव्र चिंतेचा झटका होता. सुनीताला तो येत होता. जीएडीच्या तुलनेने चिंतेच्या झटकेचा अनुभव हा जीवघेणा असतो. दोन झटक्यांच्यामध्ये आयुष्य तसे सर्वसामान्य असते. असे झटके अचानक सुरू होतात. कुठल्या एखाद्या चिंतेच्या कारणाने ते अ‍ॅटॅक येतात असेही नाही. आपण अगदी शांतचित्त असतो वा गाढ झोपलेलो असतो तेव्हासुद्धा हे झटके आगंतूक पाहुण्यासारखे येतात व आयुष्याला मोठा सुरुंग लावून जातात.
पॅनिक अ‍ॅटॅक किंवा तीव्र चिंतेचे झटके का येतात? अनेकदा ते कुठल्याही जाणीवपूर्वक गोष्टींनी किंवा कारणांनी येतात असे नाही. तर कधी कधी सुप्त मनात दडलेल्या तणावांमुळेही तीव्र चिंतेचे झटके अचानक येऊ शकतात. नना या शिक्षिका होत्या. त्यांच्या बहिणीचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे झाला होता. तिच्या मृत्यूनंतर सहा एक महिने त्या व्यवस्थित होत्या. तिच्या घरच्यांना त्यांनी खूप आधार दिला. अचानक त्यांना तीव्र चिंतेचे झटके यायची सुरुवात झाली. हार्ट अ‍ॅटॅक असेल या शंकेने त्यांनी अनेक तपासण्या केल्या. सगळे व्यवस्थित होते. त्या म्हणाल्या की, त्यांना कसलाही ताण जाणवत नव्हता. पण नंतर त्यांनी सांगितले की, स्तनाचा कर्करोग कुटुंबात होता. त्यांची मावशीही या आजाराने अकालीच गेली. तेव्हा त्यांच्याही मनात राहून राहून येत असे की हा रोग आपल्यालाही होईल का? आपल्यालाही त्या मरणप्राय वेदनेतून जावे लागेल का? आपला मृत्यू झाला तर आपल्या लहान मुलाचा सांभाळ कोण करील? या विचारांनी त्या त्रस्त झाल्या होत्या. त्यांना आपली ही भीती कुणाला सांगण्याचे धाडस होत नव्हते. या विचारांमुळे व भीतीमुळे तीव्र चितेंची शारीरिक लक्षणे विशेषत: हृदयातली प्रचंड धडधड, श्वासांचे कोंडणे व हातापायांचा कंप त्यांना खूप त्रासदायक वाटत होती. या शारीरिक लक्षणांमुळे त्यांना सुरुवातीला अस्वस्थ वाटे. नंतर आपल्याला काहीतरी गंभीर झाले आहे ही त्यांची भीती आणखीनच वाढायची. त्यामुळे व्हायचे काय की त्यांची शारीरिक लक्षणे त्यांना जास्त तीव्रपणे जाणवायची. अशा तऱ्हेने तीव्र चिंतेचे झटके येणाऱ्या रुग्णांमध्ये सुरुवातीची शारीरिक लक्षणे त्यांचा भयानक अनुभव, त्यामुळे अवाजवी विचारांचे काहूर व भावनांचा कल्लोळ याचे एक दुष्टचक्रच आपोआप काम करू लागते. त्यात अडकलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने विचार व भावना यांच्या चक्रव्यूहात फसते. बरेच रुग्ण आपले दैनंदिन व्यवहार तसे व्यवस्थित चालू ठेवतात. पण तीव्र चिंतेचे झटके  येण्याला जेवढय़ा लवकर वेसण घालता येईल तेवढय़ा लवकर ती घालावी. यासाठी हे झटके कुठल्या कटू वा भयानक प्रसंगाने उत्पन्न झाले आहेत का हे जाणून उपचार नियोजन करावे लागतात. शास्त्रीयदृष्टय़ा मेंदूतील गाबा व सिरोटोनिन ही रसायने पातळीत नसतात. त्यांचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी आपण औषधे देतो. ही औषधे मेंदूतील सिरोटोनिनचे प्रमाण वाढवितात. गाबावरसुद्धा या गोळ्यांचा परिणाम झाल्याने झटके काबूत येतात. पण चिंतेच्या आजारासारखे येथेही आपण रुग्णाला गोळ्यांच्या आधीन होण्यापासून परावृत्त करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झटक्यांमध्ये जी लक्षणे आपले धाबे दणाणून सोडतात त्या लक्षणांकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. एकंदरीत वैचारिक बदल घडवून आणण्यासाठी खास सायकोथेरपी वापरल्या जातात. ज्याला आपण कोगनिटिव्ह थेरपी म्हणतो. यामध्ये रुग्णाला नकारात्मक किंवा विघातक विचारांवर मात मिळवून सकारात्मक व विधायक विचार कसे करावे हे शिकविले जाते. या झटक्यांनी आपला जीव जाणार नाही. थोडय़ाच वेळात हा झटका निघून जातो व आपण पूर्ण आरोग्यपूर्ण राहतो हे समजल्यावर रुग्ण शांत होतात. त्यांची भीती कमी होऊ लागते. चिंतेच्या सर्व आजारांमध्ये शांत झोप खूप फायद्याची ठरते. याशिवाय श्वसनावर योग्य ताबा ठेवावा. एक सुंदर लयीत संथगतीने श्वास आत घ्यावा व पुन्हा हळूहळू बाहेर सोडावा. त्यामुळे शारीरात शिथिलता/ रिलॅक्सेशन येते.
आपल्याला जाणवणारी लक्षणे हळूहळू सौम्य होत जातात. ‘कूल डाऊन’ परिणाम लगेच दिसतो. याशिवाय चालण्याचा व्यायामही अतिउत्तम. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थरकाप करणाऱ्या विचारांवर मात मिळविणे हे या आजारावर मात मिळविणे आहे. जसा एखादा घोडेस्वार खतरनाक घोडय़ाला लगाम घालून काबूत आणतो तसेच संयमित विचारांचा घोडेस्वार या झटक्यांना काबूत ठेवू शकतो. आपलं मन ताब्यात ठेवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा