शिल्पा कांबळे
‘तुमचा जन्म ज्या जातवर्णवर्गामध्ये झालेला असतो त्या सामाजिक पर्यावरणातून तुम्हाला एक प्रकारची भीतीही वारसाहक्काने मिळते आणि मग तो स्वभावच बनून जातो. दुष्काळी प्रदेशात जन्माला आल्यावर तर सतत पाणी, अन्न, कसला ना कसला अभावच आयुष्यावर पसरलेला. तरीही निर्भय बनायचे, निर्वैर जगायचे हा ठाम निर्धार केला की भयावर मात करता येईलच…’
माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत भय या भावनेने ग्रासलेले असते. भीतीचा हा निरंतर प्रवास आयुष्यभर चाललेला असतो. मृत्यूच्या मूलभूत भीतीबरोबर अनेक प्रकारच्या भीतीदायक भावनांना माणूस सामोरा जातच असतो. वैयक्तिक स्वभावानुसार या भीतीचे वर्गीकरण करता येते. कुणाला उंच जागेची भीती वाटते तर कुणाला बंद खोलीची भीती वाटते, कुणाला पालीची भीती वाटते तर कुणाला सापाची, कुणाला मुक्या प्राण्यांची भीती असते तर कुणाला माणसांतील विकृतीची भीती वाटते. अशा अनेक भीतींनी जणू पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांचा पिच्छा पुरवलेला असतो. तमाम माणूसजातीला वाटते तशीच मलादेखील भीती वाटतेच. दहावीत असताना परीक्षेला बसलेय आणि वाचलेले काहीच आठवत नाहीये, अशी मला स्वप्ने पडायची. माझ्या आईचे माझ्यावर फार प्रेम आहे. ती लहानपणी मला फार जपायची. मी खेळायला गेले तरी ती माझ्या मागे मागे यायची. मला लागेल, मी पडेन, मुले मला मारतील अशी भीती तिला सतत वाटत राहायची. तर दुसरीकडे अष्टोप्रहर वॉचमनसारखी माझ्यामागे असलेल्या आईचीच मला फार भीती वाटायची. मोठी झाल्यावरसुद्धा मी घरी उशिरा आलेले तिला चालायचे नाही. सहाला परत यायचे कबूल केले की मी सहालाच यायचे. सहा वाजून चार पाच मिनिटे झाली तरी ती आरडाओरडा करायची.
आईला पुरुषांचीही भीती वाटायची. वडिलांपासून ती वेगळी राहात असल्याने ते असेल. अनेकदा माझी आजी, तिची आई तिला दुसरे लग्न कर, म्हणून मागे लागायची, पण आईच्या मनात रुतून बसले होते की सावत्र बाप मुलीला ‘खराब’ करतो. या भीतीपोटी तिने दुसरे लग्न केले नाही. माहेरी राहणाऱ्या आईची कधी कधी आपल्याच माणसांशी भांडणे व्हायची. मग ती मला घेऊन घराबाहेर पडायची. जायला कुठे जागा नसली की आम्ही रस्त्यावरच झोपायचो. अशा काही भीतीदायक रात्री मला आजही आठवतात. कितीही झोप आली तरी आई टक्क जागीच राहायची. मलाही सांगायची, ‘सावध झोप गं…’(सावधपणे झोपायचे म्हणजे नेमके काय ते अद्याप मला समजलेले नाही.) रस्त्यावरचा कुणी तरी पुरुष येईल नि आम्हाला त्रास देईल अशी भीती तिला वाटत राहायची. आम्ही घर घेऊन वेगळे राहायला लागल्यावर तर ती दाराला आतून कुलूप लावून आणि ट्यूबलाइट चालू ठेवूनच झोपायची. घरात आम्ही बायकाच असल्याने कुणी पुरुष घरात घुसेल असे तिला वाटत राहायचे. याची मला इतकी सवय झालीय ना, की आजही मी कुठे बाहेर गेले की दरवाजा नीट बंद झालाय ना, दाराचे लॉक नीट लागलेय ना, याची भीती वाटत राहते.
हेही वाचा : सांधा बदलताना : नव्यातले जुने…
मला वाटते, की तुमचा जन्म ज्या जात-वर्ण-वर्गामध्ये झालेला असतो त्या सामाजिक पर्यावरणातून तुम्हाला एक प्रकारची भीतीही वारसाहक्काने मिळते. माझी आई, माझे वडील हे दोघेही महाराष्ट्रातील दुष्काळी भागातले. आई बीडची तर वडील कर्जतचे. सगळे नातेवाईकही तिकडचेच. त्यामुळे घरातील सगळ्यांना पाणी संपण्याची फार भीती वाटायची. आजी नळाला कितीही पाणी असले तरी भांड्यावर भांडे ठेवून पाणी साठवून ठेवायची. माझी आई तशीच करायची आणि तीच सवय मलाही लागली आहे. आमचे हे अतार्किक वागणे पाहून मला प्रश्न पडतो की, सामाजिक अस्पृश्यतेमुळे, पाणी सहज मिळत नसल्याने आमची ‘एपिजेनेटिक मेमरी’ आम्हाला असे वागण्यास भाग पाडते की काय कुणास ठाऊक.
‘विंचवाचे तेल’ या पुस्तकाच्या लेखिका सुनीता भोसले (सहलेखक- प्रशांत रुपवते) यांनी या पुस्तकात पारधी कुटुंबांना पोलिसांची किती भयंकर धास्ती वाटते ते अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘गुन्हेगारी जमात’ असा शिक्का बसलेल्या पारधी स्त्री-पुरुषांना पोलीस कुठल्याही पुराव्याशिवाय कधीही, कुठेही पकडू शकतात, त्यांच्यावर चार्जशीट दाखल करू शकतात, याचा इतका मोठा धसका यांनी घेतलाय की पारधी बायका नवीन साडी नेसायलाही घाबरतात. कारण त्यांना भीती वाटते, की पोलिसांना हे चोरीचे कपडे वाटून आपल्याला तुरुंगात टाकतील. तर सांगायचा मुद्दा हा की, भारतासारख्या अठरापगड जातिधर्मात विखुरलेल्या देशात भीतीची प्रतवारीही सगळ्यांसाठी एकसारखी नाही.
हेही वाचा : ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेल्या मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई या दोन जमातींमध्ये हिंसक दंगली सुरू झाल्या, तिथल्या स्त्रियांवर सामूहिक बलात्कार झाले तेव्हा तेथील बायकांना वाटणारी भीती भयंकर होती. काश्मीरमध्ये नवरा बेपत्ता झाला तर कधी कधी वर्षानुवर्षे तो घरी येत नाही. त्या वेळी घरातील स्त्रीला माहीत नसते की त्याचे नेमके काय झालेय ते. तो जिवंत आहे की मेला आहे याची काहीच माहिती कित्येक दिवस त्यांना मिळत नाही. नवरे असूनही विधवेचे जीवन जगणाऱ्या स्त्रियांना ‘हाफ विडो’ म्हणतात. अनेक स्त्रियांच्या वाट्याला असे भयभीत आयुष्य येते. आपल्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या बायकांना तर आपला नवरा कर्जाला कंटाळून आत्महत्या तर करणार नाही ना, अशी भीती वाटत असेल ना… ‘ग्राभीचा पाऊस’ या सतीश मन्वर दिग्दर्शित चित्रपटात सोनाली कुलकर्णीने नवऱ्याच्या आत्महत्येच्या भीतीने ग्रासलेल्या एका ग्रामीण स्त्रीची घालमेल फारच बारकाईने दाखवली आहे. तर या सगळ्या स्त्रियांच्या भीतीची मोजपट्टी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रीच्या भीतीच्या मोजपट्टीपेक्षा तीव्र स्वरूपाची आहे.
काळीज पोखरणाऱ्या भीतीच्या भावनेवर ताबा मिळवणे सोपे नसते. ती अगदी रोजच्या जगण्यात साध्या साध्या गोष्टीतही वाटू शकते. मी खूप घाबरट आहे याची जाणीव मला काही वर्षांपूर्वीच झाली. नुकतीच मी पोहणे शिकायला सुरुवात केली होती. प्रवेश घेताना आपण सहजपणे इंग्लडची खाडी वगैरे पोहून येऊ शकतो, असे मला वाटले होते. पण पाण्यात शिरले आणि माझा थरकाप उडाला. पोटाला फ्लोटर बांधलेला असताना, ट्रेनर हातभर अंतरावर असताना आणि पोहण्याच्या तलावाची खोली साडेपाच फूट असतानाही आपण बुडून मरून जाऊ, असे मला वाटू लागले. त्यातच माझ्याबरोबर शिकायला सुरुवात केलेला माझा मुलगा थोड्या दिवसातच एक्सपर्ट होऊन स्वतंत्रपणे पोहू लागला होता. तो मला ‘घाबरट मम्मी’ म्हणून चिडवूही लागला होता. शेवटी मी या भीतीवर मात करायची ठरवले. अगदी छोटे छोटे अंतर पार करत राहिले, जिद्दीने पुढे जातच राहिले. रात्री झोपताना डोळ्यासमोर चित्र आणू लागले, की मी पोहण्यात तरबेज झाले आहे. अखेर मला स्ट्रोक्स जमू लागले. निळ्या पाण्यावरचा माझा विश्वास वाढू लागला. माझ्या पोहण्यात सफाई आली. काही दिवसांपूर्वी मी हृषीकेशला गेले होते. गंगेच्या जोरदार प्रवाहात बोटीत बसताना मनात थोडीशी धाकधूक होती, पण तरीही ‘जय जय गंगे’ करत मी पाण्यात शिरले आणि पुढे पोहण्याचे छोटेसे साहस धीराने पूर्ण केले.
आणखी एक भीती मला वाटते ती हायवेवर सायकल चालवण्याची. खरे तर लहानपणी मी चिक्कार सायकल चालवली आहे. पण आता खूप वर्षांनंतर जेव्हा सायकल हातात घेतली तेव्हा ती चालवता येत होती, पण हायवेवर जाण्याचा धीर होत नव्हता. शेवटी एके दिवशी मन घट्ट केले. सायकल हायवेवर नेली. भरधाव पळणाऱ्या गाड्या धडधड आवाज करत येत होत्या, पण मी डोके शांत ठेवले. आणि पुढे जात राहिले. हायवे संपल्यावर एके ठिकाणी थांबून मस्त चहा प्यायले. त्या वेळी मनात एव्हरेस्ट सर केल्याची भावना होती.
हेही वाचा : ‘एका’ मनात होती : काळिमा!
अनावश्यक भीतीवर प्रयत्नांनी मात करता येते हे मी शिकले. त्यासाठी आपल्याला ही समस्या आहे हे मात्र कळायला हवे. कारण खूपदा आपण ते स्वीकारतच नाही आणि घाबरतच राहतो. वैयक्तिक कारणांमुळे तयार होणाऱ्या भीतीचे उत्तर त्या माणसाच्या वर्तनातील बदलात दडले आहे, पण सामाजिक, आर्थिक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या भीतीचे काय करायचे? प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून मलाही आजूबाजूच्या परिस्थितीची भीती वाटते अनेकदा. असे दिसते, की समाज दिवसेंदिवस हिंसक होत चालला आहे. आपण बौद्ध असल्याने आपल्या मुलाला पुढे काही त्रास होईन का, रोहित वेमुलाच्या बाबतीत जे घडले तसे तर त्याच्याबरोबर घडेल का? असेही प्रश्न मनात येत असतात. देशातील धर्मांधता वाढताना दिसते आहे, त्या वेळी अशी भीती वाटणे अनाठायी नाही, पण या अस्थिरतेच्या कालखंडात वारंवार मनाला हे बजावणे गरजेचे आहे, की माझ्यासारखेच संसदीय लोकशाहीवर विश्वास असणारे अनेक लोक आजूबाजूला आहेत. भारताचे नागरिक म्हणून संविधानाने जे हक्क मला दिलेत ते हक्क अबाधित राहण्यासाठी निर्भय बनण्याची गरज आहे.
हेही वाचा : स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
जो डर गया समझो मर गया… हे गब्बरसिंग सांगून गेलाय. आपल्या सगळ्यांना गब्बर नाही व्हायचं, पण दुसऱ्यांना बागुलबुवा दाखवून जर कुणी गब्बर व्हायचा प्रयत्न करत असेल तर समाजातील त्या गब्बरसिंगला रोखायचे आहे. निर्भय बनायचे आहे, निर्वैर जगायचे आहे.
shilpasahirpravin@gmail.com