‘‘..आता दोघांचेही मार्ग वेगवेगळे. तिनं तिची वाट निवडली. पण तसं तरी कसं म्हणावं? तिला तर पर्यायच नव्हता, तिच्या जिवघेण्या आजारापुढे. तिने जिवंतपणी भोगलेल्या मरणयातना मला तरी कधी कळल्या का? सारे पाश सुटत-तुटत जातात, तेव्हा होणारी मनाची विकल अवस्था, कशी कुणाला सांगायची?.. पण एक खंत राहिलीच, ‘जयहिंद’, म्हणायचं राहूनच गेलं!..’’
खेळ संपला, तीन दिवसांपूर्वीच.
तसा तो दहा दिवसांपूर्वीच संपला होता.. सुमा कोमात गेली तेव्हाच.
‘बट द गेम इज नॉट ओव्हर, टिल द लास्ट बॉल इज बोल्ड’ हे या खेळातलं देखील सत्य. ‘त्या इंडिकेटरमधले बुडबुडे थांबले की..’ डॉक्टरांनी सूचित केलं, तेव्हाच कल्पना आली, आता खेळ फक्त श्वासाचा! या श्वासाचं अस्तित्व एरवी आपण गृहीत धरतो. तो अडकून जीव कासावीस होतो तेव्हा ते जाणवतं की, आपल्याच श्वासावरदेखील आपलं नियंत्रण नसतं..
सरासरी सत्तर वर्षांचं आयुष्य झाल्याचं हल्ली म्हटलं जातं. कुणी नव्वदीपार जातं, तेव्हा कुणी पन्नाशी आतच गेलेलं असतं, एवढाच त्या सरासरीचा अर्थ. तसं ‘साठी’ पार पडताना, ‘आपकी चारों लाइफलाइन्स चली गयी है, बहुत सोच विचार करके हर प्रश्न का जवाब दिजिएगा,’ हे अमिताभचं वाक्य आठवतंच. प्रत्येक बॉलला सामोरं जायचं. विकेट कुठल्याही बॉलवर जाऊ शकते.. मनाशीच हसलो. चपापलो. किती भरकटलो आपण.. दोर कापलेल्या पतंगासारखे! असं का होतंय? सावलीसारखी साथ देणारी सुमा आता नसल्यामुळे? की सावली मागं सोडून तीच निघून गेल्यामुळे? मन थाऱ्यावर राहिलं पाहिजे. भेटायला आलेले सगेसोयरे, जीवाभावाचे सर्व पांगले, तरी उशिरा कळलेले कुणी येतंच असतात. प्रेमापोटी. जनरित सांभाळण्यासाठी. आपणदेखील एरवी तेच करतो. त्यात फारसं तथ्य नसतं हे अशा वेळेस कळतं. सांत्वनाला येणाऱ्यांना तोच घटनाक्रम पुन:पुन्हा सांगायचा. मग कुणी तरी म्हणायचं, ‘शेवटी शांतपणे गेल्या, त्रास नाही झाला! वगैरे.’
कोमात जाणं म्हणजे वेदनांच्या पलीकडे जाणं.
भान असताना सुमानं प्रश्न विचारला होता,
‘आयुष्याकडनं आपण काय शिकतो, माधव?’
‘आयुष्य सहन करायला शिकतो.. अगदी शेवटपर्यंत. सध्या जे तू सहन करत आहेस ते काय आहे, सुमा?’
‘तरी जगायची दुर्दम्य इच्छा आहे.. राहुलसाठी. प्रसादच्या लेकरासाठी. वाटतं तिथं गेल्यावर प्रसाद विचारेल, राहुल-प्रतिमाला तुझ्यावर सोपून आलो होतो ना मी, आई? अशी कशी निघून आलीस? काय उत्तर देणार आहे मी त्याला?..’ तिला बोलवेना.
माझ्याकडे उत्तर नव्हतं. थोडय़ा वेळानं तीच म्हणाली, ‘सगळं तत्त्वज्ञान फोल वाटतं, या गुंतून राहण्यापुढे.’
‘पण गुंतून राहणं स्वाभाविक नाही का सुमा? गुंतून न राहता संसार करावा, असं विरक्तांनी म्हणावं, त्यावर प्रवचनं करावीत. संसार मांडू नये. संसार थाटून विरक्त राहणं हा स्वार्थ झाला. आसक्ती असेल तरच संसार होतो. या आसक्तीवर आपला हक्क नसतो.. त्यासाठी वेदनेची योजना असावी. वेदनेचा कडेलोट झाला की सारं संपतं!’
‘मग लहान-तरुण वयात आयुष्य संपणाऱ्यांचं काय? प्रसादचं काय?’
तिनं डोळे मिटून घेतले, तरी ते पाझरतच राहिले.
भान कमी होत गेलं, तसे प्रश्नदेखील कमी झाले. ग्लानीतून दचकून बाहेर यावं, तसं एकदा तिनं विचारलं, ‘एक मागणं आहे, द्याल?’ मी डोळ्यानंच हो म्हटलं.
‘सुख-दु:खात आपण एकमेकांना सांभाळलं. मी नसेन तेव्हा सांभाळाल.. स्वत:ला?’
‘प्रयत्न करीन, वचन नाही देत.’
‘आजवर कधी आपण वचनं दिली की शपथ घातल्या? समजून घेणं असलं की शब्द निर्थक असतात, असं तुम्हीच म्हणता ना?’
माझ्या डोळ्यांनी दगा दिलाच. फक्त तिच्या हातावर हात ठेवला. तिच्या जाणिवेतला तो शेवटचा स्पर्श! पण तेव्हा तशी कल्पना नव्हती.. ‘जयहिंद’, म्हणायचं राहूनच गेलं! ‘जयहिंद’ आमच्यातला परवलीचा शब्द. लग्नाच्या दिवशीचा. ६५ साली लग्न ठरलं, अन् पाकिस्तानशी युद्ध सुरू झालं. साहजिकच लग्न लांबणीवर टाकलं. २२ सप्टेंबरला ताश्कंदला शस्त्रसंधी करार होऊन तिथेच शास्त्रीजींचं निधन झालं. सारा देश हळहळला. नंतर सुमा भेटली तेव्हा फारच हळवी झाली होती. लग्न अतिशय साधेपणानं झालं. लग्नात आग्रहामुळे तिनं घेतलेला उखाणा अजून आठवतोय-
‘भारताची शान, जय जवान जय किसान,
माधवरावांबरोबर सहजीवन हाच माझा सन्मान!’
‘रिटर्न घास’ देताना मी पुटपुटलो, ‘जयहिंद’! तेव्हा तिला ठसका लागून डोळ्यात पाणी. इतरांचे ‘जयहिंदचे नारे!’ तेव्हापासून सत्तेचाळीस वर्षांच्या सहजीवनात ‘जयहिंद’ हा शस्त्रसंधीचा-परवलीचा शब्द होता. काय घडलं नाही एवढय़ा काळात? सुख-दु:खाचे प्रसंग, वादांची वादळे, नाव कलंडली तरी तोल सांभाळत पुढं जायचं. अहंकार हा जुना शब्द. हा ‘इगो’ किती ताणायचा, तर ‘तुटेपर्यंत नाही.’ कारण अहम्शिवाय माणूस नाही. फार ताणलं जातंय असं एखाद्याला वाटलं, की दुसऱ्याला म्हणायचं, ‘जयहिंद’! अर्थात वाद संपायचा. शस्त्रसंधी व्हायची. मार्ग निघायचा.
आता दोघांचेही मार्ग वेगवेगळे.
तिनं तिची वाट निवडली. पण तसं तरी कसं म्हणावं? तिला तर पर्यायच नव्हता, तिच्या जिवघेण्या आजारापुढे. तिने जिवंतपणी भोगलेल्या मरणयातना मला तरी कधी कळल्या का? सारे पाश सुटत-तुटत जातात, तेव्हा होणारी मनाची विकल अवस्था, कशी कुणाला सांगायची? तिच्यासाठी तरी मी होतो.. पण प्रसादचं काय? आमचा एकुलता एक प्रसाद.. त्याचा ११ जुलै २००६ च्या दहशतवाद्यांनी केलेल्या लोकलच्या बाँबस्फोटात प्राण गेला, तेव्हा प्रसादच्या जवळ कोण होतं? राहुल-प्रतिमेत त्याचा जीव अडकला नसेल? छिन्नविच्छिन्न झालेल्या, रक्तानं माखलेल्या प्रसादला तर ओखळणंदेखील कठीण होतं.. रक्त.. १९७१ च्या बांगलादेश युद्धात आम्ही प्रथम रक्तदान केलं. नंतर दरवर्षी लग्नाच्या वाढदिवशी करायचो. पण एकदा हॉस्पिटलमधनं तिला सांगितलं, ‘तुमचा ब्लडग्रुप दुर्मीळ आहे. तुम्ही असं दान नका करू. आम्हाला आवश्यकता असेल तेव्हा आम्ही बोलावून घेऊ तुम्हाला..’
शेवटच्या जीवघेण्या आजारात डॉक्टरच हताश झाले. ‘आता यांना हॉस्पिटलमध्ये नका आणू. घरीच शांतपणे जाऊ द्यात..’
गेली शांतपणे. शुद्ध हरपत.
प्रसाद गेल्याचं दु:ख तिनं सहन केलं. पचवलं, ते अकरा-साडेअकरा वर्षांच्या राहुलकडे पाहून. त्याच्या आईकडे पाहून. प्रतिमाच्या मागे ती ठाम उभी राहिली. राहुल तर पार हरवूूनच गेला होता. वयाच्या मानानं त्याला हा धक्का भयंकर होता. त्याला पुन्हा सावरलं पाहिजे. त्याची शाळा-कॉलेज, अभ्यास-क्रिकेटचं वेड.. त्याला आयुष्यात उभं करायचंय, त्याच्यासाठी प्रसादने पाहिलेली स्वप्नं.. स्वत:चं दु:ख मनाच्या तळघरात ठेवून सुमा सावरली, राहुल-प्रतिमासाठी. अन् फॉलोऑन मिळाल्यासारखा आमचा डाव पुन्हा नव्यानं सुरू झाला.. हारण्या-जिंकण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त क्रिजवर टिकून राहायला हवं..
‘आजोबा, आम्ही जिंकलो सेमीफायनल!’
मॅच संपवून नुकताच घरी आलेला राहुल शेजारी बसत दबक्या आवाजात म्हणाला. मी भानावर आलो..
‘अरे वा! कॉन्ग्रॅच्युलेशन्स.. कोण खेळलं एवढं?’
‘सगळ्यांचं कॉन्ट्रीब्यूशन होतं, आजोबा!’
‘व्हेरी गुड. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्यूशन नेहमीच महत्त्वाचं.. पण कायरे, अंपायरचं कॉन्ट्रीब्यूशन नव्हतं ना तुमच्या विजयात?’ मी डोळा मारून विचारलं.
राहुल मनापासून हसला! किती तरी दिवसांनी. आजी गेल्यापासून तर पार सुकून गेला होता. इंटर कॉलेजिएटची महत्त्वाची सेमी फायनल खेळणार नव्हता.
‘आजीला आवडेल? बाबाला आवडेल? त्याला विचारलं.’
मानेनंच ‘नाही’ म्हणत तो उठला. त्याला पिटाळलाच.
बेटा जिंकून आला. कुठं तरी ‘जीत’ असतेच!
‘आता फायनल पण जिंकणार ना? राहुलचे डोळे चमकले.
दारात आलेली प्रतिमा हे सर्व पाहात होती कौतुकाने. तिनंच विचारलं, ‘बाबा काय म्हणायचा, आठवतंय?’
‘ट्र स्पीरिटमध्ये खेळ खेळायचा, टिल द लास्ट बॉल इज बोल्ड..! हार-जीत तर कुणाची होणारच.. करेक्ट?’ प्रतिमेच्या डोळ्यात मायेचा ओलावा.
मी सुमाच्या हार घातलेल्या फोटोकडे पाहिलं. ती किंचित हसल्याचा भास झाला.
मी पुटपुटलो.. ‘जयहिंद!’
‘आजोबा, कुणाला जयहिंद म्हणालात, आज्जीला?’
‘मी हसलो. दोघांचे चेहरे प्रश्नार्थक.’
‘बसा, बसा, सांगतो तुम्हाला’ ‘जयहिंद’चा किस्सा..’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा