– प्रियदर्शिनी हिंगे

त्रिकोणी कुटुंब ही संकल्पना आपल्याकडे आता नुसती रुळली नाही तर रुजली आहे. ‘एकुलत्या एक’ मुलांचा सांभाळ कसा करावा या पालकत्वाच्या प्रश्नाला तोंड देता देता ही पिढी मोठी होऊन या ‘एकुलत्या एक’ मुलांनी आपल्या आईवडिलांचं पालकत्व कसं करावं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: या पालकांनी सत्तरी गाठली असेल, त्यांचे आरोग्याचे प्रश्न जटिल झाले असतील, त्यांच्यातल्या एकाचं निधन झालं असेल, त्यांना एकाकीपण आलं असेल तर काय करावं आणि तेही आपला स्वत:चा संसार, नोकरीकरिअर सांभाळून? काय आहे या ‘एकुलत्या एक’ मुलांचं दु:ख आणि काय आहेत त्यावरचे उपाय?

Wayanad, disasters, landslide Wayanad,
पंचतारांकित पर्यटनाचा ‘प्रलय’
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
schizoid personality disorder chaturang article
स्वभाव – विभाग : अलिप्त मी!
Clash between two generations in virtual and real world
सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा
loksatta chaturang
इतिश्री : अडकलेली रेकॉर्ड
grandmother, illness, fear, chemotherapy, school, family, courage, support, childhood,
सांदीत सापडलेले: आजारपण!
menstruation, mental health, women, puberty, stress, dysmenorrhea, PMS, PMDD, hormonal changes, reproductive health, anxiety, depression, menstrual cycle,
मासिक पाळीतील मानसिक आरोग्य
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!

२९ वर्षांच्या सियाने दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी नोकरी सोडली. तिच्या या गर्भारपणात तिच्या आईचे वय ७० आणि वडिलांचे ७५ होते. त्यामुळे तिला आईवडिलांची फारशी मदत होऊ शकली नाही. उलट तिलाच त्याचं करावं लागत होतं. कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. नवऱ्याची तिला मदत होती, आधार होता. पण तोही एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे आई-वडीलही त्यांच्याकडे राहायला आले आहेत. या सगळ्यांचं करता करता सिया एकदम पिचून गेली आहे. सिया आणि तिचा नवरा ‘एकुलते एक’ असल्याने साहजिकच दोघांच्याही आई-वडिलांची, चार वृद्धांची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे.

हेही वाचा – जेंडर बजेटिंग : विनियोगावर ठरणार यशापयश!

सियाच्या आईवडिलांनी तिच्याच सोसायटीत दोन बिल्डिंग सोडून फ्लॅट घेतला आहे. तिथं आईवडिलांना आवश्यक सगळ्या गोष्टींसाठी मदतनीस आहेत, पण सियाला शांतता नाही, उलट तिची चिडचिड वाढत चालली आहे. कारण वास्तव विचित्र आहे. ती सांगत होती, ‘‘एकच गोष्ट ऐकून ऐकून मला आता कंटाळा आला आहे. आई-बाबा सतत सांगतात, ‘तुझ्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आम्ही दुसरं मूल होऊ दिलं नाही. संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी खर्च केलं. भरपूर खर्च करून तुला शिकवलं. आता म्हातारपणात तूच आम्हाला सांभाळलं पाहिजेस.’ काय बोलणार यावर?’’

तिला म्हटलं,‘‘अगं, त्यांचं बरोबरच आहे की.’’ सिया म्हणाली, ‘‘ मी कुठे नाही म्हणतेय. त्यांचं मी करायला हवंच. पण माझाही विचार करायला हवा ना त्यांनी. मी नोकरदार बाई. दिवसातून त्यांचे तीन-चार फोन तरी असतातच. बाईने भाजी केलीय, पण चांगली झाली नाहीए. तू येऊन तुझ्या हाताने कर नाही तर घरून करून आण. टीव्हीचा रिमोट चालत नाहीये, येऊन बघून जा. ‘बाई उशिरा आली’ पासून ‘खिडकी उघडत नाही’पर्यंत काहीही कारणं असतात. इतकंच नाही तर,आज काय करमत नाहीए, कुणी बोलायलाच नाही इथे, असं सांगून सतत चकरा मारायला लावतात. शेवटी सोडायला लागली मला नोकरी. असं वाटतं, नको हा जन्म.

असाच निखिल. जर्मनीला स्थायिक झालेला निखिल तंत्रज्ञानात संशोधन करत होता. तोही एकुलता एक मुलगा. अभ्यास-संशोधनाच्या दृष्टीने तिथेच कायम राहायचा त्याचा विचार होता. मुख्य म्हणजे त्याला ‘लग्न’ संस्थेत अडकायचं नाहीए. तो त्याच्या आयुष्यात रमला असताना त्याला जाणीव झाली की, आपल्या आई-वडिलांचं वय होत चाललं आहे. त्यांचं भारतात काळजी घेणारं कुणी नाही. त्याने दोघांना जर्मनीत राहायला बोलवलं, पण ते दोघांनाही मान्य नाही. शेवटी तिथलं करिअर बाजूला ठेवून तो केवळ आई-बाबांसाठी भारतात परतला. पण आल्यानंतरचं त्यांचं वागणं बघून तो अस्वस्थ झाला आहे. हे तेच पालक आहेत का ज्यांनी आपल्याला सांभाळलं, मोठं केलं, असा प्रश्न त्याला आता पडतो आहे. सतत शिस्तीवरून बोलत राहातात, टोमणे मारत राहातात. त्याची आई तिच्या बहिणींच्या घरी राहायला जाऊन आली की, सतत तिचे भाचे कसे स्थिरस्थावर झाले याचे किस्से याला ऐकवत राहाते. वडील सतत त्यांनं लग्न करावं यासाठी काही ना काही सांगत राहतात. हे सगळं कमी म्हणून की काय लग्न न करता पूर्णवेळ करिअरमध्ये झोकून देण्याचा आपला विचार त्याने सांगितल्याच्या दुसऱ्या दिवशी वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी निखिल ऑफिसमध्ये होता. शेजाऱ्यांच्या मदतीने कसंबसं निभावून गेलं, मात्र वृद्धापकाळाकडे झुकणाऱ्या आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? रात्री-अपरात्री जर कामात व्यग्र राहिलो आणि काही अघटित झालं तर? ही भीती निखिलला सतत सतावते.

आपल्याकडे ‘सिंगल चाइल्ड’ वा एकुलती एक मुलगी किंवा एकुलता एक मुलगा ही संकल्पना नवी नाही. उलट आता ती खोल रुजली आहे. ग्रामीण स्तरावर हे प्रमाण कमी असलं तरी शहरांत ते प्रमाण खूपच वाढलेलं आहे. इतकं की दर तिसऱ्या घरात त्रिकोणी कुटुंब दिसतं. ‘एकच मूल असावं, हा निर्णय गेल्या दोन चार पिढ्यांतील अनेकांनी घेतलेला असल्याने आज या एकुलत्या एक मुलांच्याही पिढ्या तयार झाल्या आहेत. अर्थात अशा एकुलत्या एक मुलांना वाढवताना या पालकांसमोरही अनेक समस्या आल्या. खेळायला, कोणतीही गोष्ट वाटून घ्यायला कुणीही नाही म्हणून एकटेपणा वाढलेल्या मुलांचं पालकत्व त्यांना निभवावं लागलं. तो जसा पालकांचा प्रश्न आहे, तसा या मुलांचाही आहे. एकमात्र खरं की, घरातल्या वस्तू काय किंवा अगदी आई-वडिलांचं प्रेम जे पूर्वी दोन किंवा तीन भावंडांमध्ये विभागलं जायचं ते या एकुलत्या एक मुलांना मिळू लागलं. तसेच या मुलांना शिक्षणाच्या व एकंदरीतच विकासाच्या संधी तुलनेत जास्त मिळाल्या, असं म्हणायलाही हरकत नाही. पण आता वयोवृद्ध झालेल्या पालकांचं पालकत्व या मुलांना अवघड जाऊ लागलं आहे.

यातला आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे जेव्हा हे एकुलतं एक मूल मुलगी असते आणि आई-वडिलांची आर्थिक जबाबदारी तिच्यावर असते तेव्हा. ती लग्न करून सासरी जाते तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो. ती आर्थिकदृष्ट्या सबल आहे का? तिच्या सासरच्या लोकांना तिनं ही जबाबदारी समजून सांगितली आहे का? आणि त्यांना ती पटली आहे का? समजूतदार लोक असले तर निभावतं अन्यथा आई-वडील आणि मुलगी सगळ्यांच्याच वाट्याला कुचंबणा, निराशा येते.

मुंबईत राहणाऱ्या हेमांगीसारखी अगदी कमी मुलं असतात जी यावर विचार करून स्वत:ची सपोर्ट सिस्टीम आधीच तयार करतात. हेमांगीने आपल्या सासरच्या अनेक मंडळींच्या व आईवडिलांच्या सुरुवातीपासूनच गाठीभेटी घडवून आणल्या. लग्न ठरवताना आपल्या जोडीदाराबरोबर याविषयी मोकळेपणाने संवाद साधत आपल्या जबाबदारीची जाणीव सर्वांना करून दिली. आणि सर्वांनी ती स्वीकारलीही. आठवड्याच्या सुट्टीचा प्लॅन करण्यापासून ते दोघांच्या पालकांना अगदी दवाखान्यात जाण्यापर्यंत सर्वच गोष्टीत तिला आधार मिळतो. मात्र आईवडील राहतात त्याच परिसरात आपले मित्र-मैत्रिणी व सासरची मंडळी राहतात म्हणून हे शक्य होतं हेही ती आवर्जून सांगते.

टेक्सास युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्रज्ञ टोनी फाल्बो यांनी ‘ओन्ली चाइल्ड’ या विषयावर केल्या गेलेल्या ५०० संशोधनांचा अभ्यास केला. त्यात ‘एकुलते एक मूल आणि भावंडांसोबत वाढलेले मूल’ यांच्यात तुलनात्मक अभ्यास केल्यावर एकुलती एक मुलं अधिक हळवी, इतरांबरोबर कमी शेअर करणारी आणि समाजात कमी मिसळणारी (socialize) असतात असं त्यांना आढळून आलं. त्याचा परिणाम म्हणजे या मुलांचा तसा स्वभाव बनत जातो. साहजिकच पुढे जेव्हा आई-वडिलांना सांभाळण्याची वेळ येते तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम सर्वांवर होतो. खरं तर ज्या वेगाने एका कुटुंबात एकच मूल आपण समाजाचा भाग म्हणून स्वीकारलं, त्या वेगाने या पालकांचे पालकत्व कसे सांभाळले जाईल? त्यातील अडचणी काय असतील? आणि त्यासाठी या मुलांच्या मदतीला कोण असेल? याचा विचार झालेला दिसत नाही. परदेशातील उदाहरण अनेकदा सांगितलं जातं, तिथे मुलं १८ वर्षांनंतर घराबाहेर पडतात, अर्थार्जन करतात व आपल्या पायावर उभी राहतात. अर्थात, याचे दुष्परिणामही आपल्याला माहीत आहेतच, मात्र तिथे एकटे राहाण्याची ज्येष्ठांची मानसिकता आधीच तयार झालेली असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आर्थिक आणि शारीरिक सशक्तीकरणाकडे ते प्रामुख्याने लक्ष देतात. गरज पडली तरच मुलांची मदत घ्यायची अशी त्यांच्या मनाची तयारी झालेली असते. आपली सामाजिक मानसिकता मात्र ‘मुलांच्या आयुष्याची धन्यता ही पालकांना संभाळण्यातच असते,’ अशीच आहे. अगदी काही तुरळक पालक आहेत जे एकच मूल असलं, तरी ‘जा सिमरन जी ले अपनी जिंदगी’ असं उदार मनाने म्हणतात.

पुण्यातील काही सहकारी सोसायट्यांमध्ये केवळ वृद्ध जोडपी राहतात. मुलं परदेशी असतात आणि ती कधीतरी भारतात येतात. इतर भावंडं इथल्या इथे त्या जोडप्यांकडे सवडीप्रमाणे लक्ष देतात. काय हवं-नको ते बघतात, मात्र एकुलतं एक मूल असलेल्या पालकांची काळजी घ्यायला अनेकदा कुणी नसतं. त्यांच्या मुलाने किंवा मुलीने परदेशातून काळजी घेणं जवळपास अशक्य असतं, अशा वेळी ही जोडपी एकटी पडल्याचे लक्षात येते. वयाच्या किमान सत्तरीपर्यंत त्यांना राहत्या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवता येते, मात्र सत्तरीनंतर हळूहळू जेव्हा शरीराच्या हालचालींवर मर्यादा येतात, तेव्हा मात्र परिस्थिती बिकट होते आणि सुरू होतो जीवघेणा एकटेपणा… अशा वेळी निखिलसारखा एखादा सगळं सोडून आई-वडिलांकडे येऊन राहतो. प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. अशा वेळी रोजच्या रोज व्हिडीओ कॉल करून ख्यालीखुशाली समजून घेणं, घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावणं, मदतनीसांच्या जिवावर त्यांना सोपवणं, जमेल तेव्हा भारतात येऊन इतर सोयी करून जाणं एवढंच त्यांच्या हाती राहातं. स्थिर झालेला त्यांचा तिथला संसार सोडून इथे परत येणं अनेकांना खरंच शक्य नसतं. असहायता, हतबलताही जाणवत राहाते आणि दोन संसार दोन ध्रुवांवर सुरू राहतात.

मदतनीसांची मदत हाही थोडा पेच निर्माण करणारा विषय असतो. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीमध्ये असलेल्या कुटुंबांना किमान मदतनीसांची व्यवस्था करता येते, अर्थात त्या व्यवस्थेतही त्रुटी असतात. अनेकांचा असा समज होतो की, प्रत्येक कामासाठी एखादा माणूस लावला, सोयी-सुविधांची व्यवस्था केली की, हे प्रश्न सुटतात. जसे की, ८-१२-२४ तासांचा ‘केअर टेकर’ लावला की, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची गरज आपल्याला नाही, पण असे होत नाही. कारण ‘केअर टेकर’ किती प्रामाणिक आहे आणि तो रुग्णाच्या छोट्या छोट्या गरजा समजून घेऊ शकतो का, हा प्रश्नच असतो. उदा. शरदरावांना इंजेक्शनची भीती होती. ते औषध गोळी वा सिरपच्या स्वरूपात घ्यायला त्यांची ना नव्हती, पण त्यांना ते डॉक्टरांना सांगता यायचं नाही. त्या वेळी ते फक्त चिडचिड करत राहायचे. जेव्हा त्यांच्या मुलाने ‘केअर टेकर’च्या हे लक्षात आणून दिलं तेव्हा त्यांचा प्रश्न सुटला. आपल्या आई-वडिलांच्या छोट्या-मोठ्या सवयी मुलांनाच माहीत असतात. ते नीट सांगितलं गेलं नाही किंवा केअर टेकरने ते समजून घेतलं नाही तर परिस्थिती अवघड होते. थोडक्यात, माणूस आहे म्हणजे प्रश्न सुटतातच असं नाही.

आणखी एक प्रश्न म्हणजे या मुलांच्या वाढीच्या काळातच अनेकदा विसंवाद किंवा संवादच नसल्याने ती मुलं आणि पालक मनाने एकमेकांपासून दूर गेलेले असतात. त्यामुळे नात्यात येणारा कोरडेपणा हा दोन्ही बाजूंनी अनुभवला जातो. यात ज्येष्ठ नागरिक जोडपं असेल, तर ते दोघंही एकमेकांशी बोलून आपलं मन मोकळं करू शकतात, पण दोघांपैकी एकाचं जरी निधन झालं असेल, आणि मुलगा वा मुलीशी त्यांचं पटत नसेल तर दोनच गोष्टी शक्य असतात. एकतर कुणी तरी नमतं घेणं, मुलांनी सारं विसरून जाऊन आई-वडिलांचं करणं किंवा मुलांनी कोरड्या मनाने कर्तव्यपूर्ती करणं.

आणखी एक मुद्दा आर्थिक प्रश्नांचा. आताच्या महागाईच्या दिवसांत रोजच्या जगण्यासाठी लागणारे पैसे एक वेळ या वृद्ध जोडप्याने गुंतवलेले, साठवलेले असू शकतात परंतु वैद्याकीय खर्च फारच वाढला आहे. पालिकांच्या, शासकीय रुग्णालयातील लांबच लांब रांगा आणि दर्जा यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणं सर्वांनाच परवडत नाहीत. त्यासाठी अनेकदा आरोग्य विमा काढला जातो. मात्र वय वाढत गेले की त्याचे वाढत गेलेले हप्तेही अनेकांना परवडणारे नसतात. अशा वेळी सरकारनेच या प्रश्नी लक्ष घालायला हवे, अशी मागणी केली जात आहे.

एकुलत्या एक मुलांना आपल्या आईवडिलांना पुरेसा वेळ देता येत नसल्याने त्यावर उपाय कोणते याचाही विचार आता व्हायला हवा. सहकारी तत्त्वावर ‘सिनिअर सिटिझन होम्स’ बांधणे आणि चालवणे, वृद्धाश्रमांची जास्तीत जास्त निर्मिती करणे, ही वृद्धापकाळाची नियोजनपूर्वक केलेली तरतूद ठरू शकेल. जिथे वृद्ध व्यक्ती स्वतंत्रपणे राहू शकतील, एकमेकांना सामाजिक, भावनिक आणि मानसिक आधार देऊ शकतील. आपल्या गरजा, आवडीनिवडी जोपासू शकतील. शासकीय वृद्धाश्रमांची स्थिती, संख्या पाहता येत्या काळात खासगी क्षेत्राने ही घरे-वस्त्या-गृहनिर्माण प्रकल्प साकारत असताना वयोवृद्धांची आणि खासकरून अशा पालकांसाठी विशेष उपाययोजना करायला पाहिजेत.

वयोवृद्धांसाठीच्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी कार्यक्रम राबवणे, मानसिक व भावनिक आधार देण्यासाठी मानसोपचार- तज्ज्ञांची फळी उभारणे, मानसिकदृष्ट्या ते गुंतून राहतील असे सहज सोपे रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. भारत जसा तरुणाईचा देश आहे, तसाच तो वृद्धांचाही देश असणार आहे, त्याची तयारी आतापासूनच करायला हवी.

हेही वाचा – सेंद्रिय तांदळाचा शाश्वत सुगंध!

एका अहवालानुसार, भारतातील वयोवृद्धांचे प्रमाण सध्या १०.१ टक्क्यांच्या आसपास आहे. हेच प्रमाण २०३६ मध्ये १५ टक्के आणि २०५० मध्ये २०.८ टक्के असणार आहे. म्हणजेच २०५० पर्यंत वयोवृद्धांची संख्या दुपटीने वाढणार आहे. या शतकाच्या अखेरीस भारतात ३६ टक्के लोकसंख्या वयोवृद्धांची असणार आहे. हे एक निश्चितच मोठे आव्हान आहे. यातील एकुलतं एक मूल असलेल्या पालकांची निश्चित संख्या सध्या सांगता येत नसली, तरी आगामी काळात यावर शासन-प्रशासनाला निश्चितच वेगळं काम करावं लागेल.

एकाकी पालकांसाठी मानसिक व भावनिक आधार देण्यासोबतच आता तंत्रज्ञानाचीही जोड द्यावी लागणार आहे. त्यांच्या सोयीचे, वापरायला सहजसोपे तंत्रज्ञान आणून त्यांचं आयुष्य सुकर केले पाहिजे. त्यासाठी अशा पालकांना प्रशिक्षण देणंही गरजेचं असणार आहे. ज्यामुळे त्यांचे अवलंबित्व कमी होऊ शकेल.

हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत जाणार आहे, मात्र या सर्व प्रश्नांत पालकांना वा मुलांना खलनायक ठरवता येणार नाही. हे चूक वा हे बरोबर अशी आखणी करून चालणार नाही. सुखी आणि आनंदी आयुष्य हवं असेल तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही सगळ्यांनी तरुणपणापासूनच सशक्त होत राहण्याची गरज आहे.

priya.dhole@gmail.com