नव्वदीच्या घरातील नाईक आजींनी कळवळून मला सुचविले, ‘तुझ्या त्या लेखांमधे या विषयावर नक्की लिही. माझा विचार तुला सांगते, ‘वासनेने लंगिक अत्याचार करणाऱ्यांना जन्मठेप किंवा फाशी देऊन काय होणार? त्यांना अवयवदान करणे भाग पाडले पाहिजे, म्हणजे नेत्र, मूत्रिपड विकारांनी ग्रासलेल्या अनेकांना मदत होईल आणि अपराध करणाऱ्यांना जन्मभराची शिक्षा होईल.’ आजींचा सात्त्विक संताप खदखदत होता.
योगशास्त्रात ‘वासना’ हा शब्द ‘लंगिक’ या अर्थाने मर्यादित न राहता इच्छा/ आकांक्षा या दृष्टीने वापरला जातो. किंबहुना मोक्षप्राप्तीसाठी ‘वासनाक्षय’ केल्याने संचित कर्माची शिल्लक कमी करायला मदत होते, असे संत मंडळी सांगतात. ‘मना वासना चुकवी येरझारा/ मना कामना सांडी रे द्रव्यदारा’ असे समर्थ म्हणतात. ‘वासना’ चुकविली तर येरझारा चुकणार आहेत. व्यावहारिक जगातल्या सगळ्या कटकटी, अभिलाषा, राग, लोभ, हव्यास कमी करण्याचा मनापासून प्रयत्न करू या. अलिप्तता, निल्रेपता वरून लादून जमणार नाही. त्यासाठी विवेक व वैराग्याची बीजे अंत:करणातूनच रुजली गेली पाहिजे.
आज आपण ध्यानात्मक गटातील सर्वात सोपे आसन ‘सुखासन’ घालून थोडे विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू या.
बठक स्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. पाय लांबच ठेवा. आता सावकाश उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजवे पाऊल डाव्या मांडीच्या आतील भागाला लावून ठेवा. आता डावा पाय गुडघ्यात दुमडून डावी टाच उजव्या पायाच्या पुढे ठेवा. आता दोन्ही हातांचे तळवे गुडघ्यांवर द्रोणमुद्रा अथवा ज्ञानमुद्रेमध्ये ठेवा.
अगदी सहज शक्य झाले तर नेहमीप्रमाणे मांडी घालून बसा. डोके, मान, पाठ एका सरळ रेषेत, कुठेही अनावश्यक ताण येऊ न देता शिथिल ठेवा. संपूर्ण शरीर शिथिल ठेवा. हात, कोपर यांतही अनावश्यक ताण काढून टाका. लक्ष श्वासावर एकाग्र करा. गुडघे जमिनीला टेकलेले असावेत नाही तर बठकीचा आधार घ्या.
आनंदाची निवृत्ती
‘मोडी छंद’
‘निवृत्ती’ या शब्दाभोवती उगाचच एक प्रकारची पोकळी निर्माण करून त्याला वृद्धत्वाचं, रिकामपणाचं, काळजीचं ठिगळ लावलं गेलं आहे. पण माझ्या मते, ‘रिटायर्ड’चा अर्थ ‘रिचार्ज..’ ‘नो टायर्ड.! ’ असा घेतला पाहिजे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपले राहून गेलेले छंद जोपासण्याची सुवर्णसंधी निवृत्तीनंतरच्या काळात मिळते. मीसुद्धा ‘टाटा मोटर्स’मधून ४३ वर्षे नोकरी करून निवृत्त झालो तेव्हा लहानपणापासूनच मोडी लिपी शिकण्याचं मनात होतं, तेच स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला.
माझे बरेचसे बालपण बनेश्वरजवळच्या ‘िवझर’ गावी गेले. तेव्हा माझ्या आजोबांच्या कपाटात, पत्र्याच्या पेटीत ‘मोडी लिपी’तील बरीच कागदपत्रं असायची. मला त्या मोडी लिपीच्या अक्षरांची फार मजा वाटायची. आजोबा ती कागदपत्रं वाचायचे तेव्हा मी तिथे सारखा घुटमळायचो. आपण कधी तरी ही लिपी शिकायचीच असे मी लहानपणीच ठरवले होते. मात्र मध्ये बरीच वर्षे गेली. तीन शिफ्टमधील नोकरी आणि संसारात गुरफटल्यामुळे मोडी लिपी शिकायला वेळ देता आला नाही. पण जेव्हा निवृत्तीची चाहूल लागली तेव्हा परत मी मोडी लिपी शिकण्याचा ध्यास घेतला आणि निवृत्त व्हायच्या एक महिना आधीच मी मोडीतज्ज्ञ मंदार लवाटे यांच्याकडे रीतसर ‘मोडी लिपी’ चा क्लास लावला.
खरं तर मला आणि माझा मित्र कोपरकरला प्रवेश मिळत नव्हता कारण ‘क्लास फूल’ झाला होता. तरीसुद्धा ‘आमची क्लासमध्ये खाली फरशीवर बसून शिकण्याचीही तयारी आहे’ असं सरांना सांगितलं. तेव्हा आमची मोडी शिकायची दांडगी इच्छा बघून असेल कदाचित आम्हाला क्लासमध्ये प्रवेश मिळाला. एका महिन्यात मोडी लिपीची चांगली ओळख झाली. मोडी लिहिता-वाचता येऊ लागल्यावर त्यातील गोडी अधिकच वाढली. आता क्लासला जायची आवश्यकता नव्हती. घरीच सराव सुरू केला.
‘इच्छा तेथे मार्ग’ याचा प्रत्यय मला लवकरच आला. एके दिवशी सहज आमच्या इमारतीमधील वय वर्षे ९० असणाऱ्या िशदे आजोबांना मी मोडी लिपीचा सराव करत असल्याचे बोलून गेलो. त्यांना आनंद झाला, ते म्हणाले ‘‘मला चांगली येते मोडी. काही अडले तर माझ्याकडे येत जा.’’ तेव्हापासून त्यांच्याकडे मी रोज मोडीच्या सरावासाठी जायला लागलो. त्यांच्याकडे रोज एक तास क्लास सुरू झाला. ते मला रोज मोडीचे एक पान लिहून द्यायचे व वाचायला लावायचे. दुसऱ्या दिवशी मराठीतील एक पान लिहून द्यायचे व ते मोडीत लिहायला सांगायचे. त्यामुळे माझी मोडी वाचायचा आणि लिहिण्याचा चांगलाच सराव झाला. काही दिवस झाल्यावर ते मोडीतून रोज एक पान आमच्या ‘लेटर बॉक्स’मध्ये टाकू लागले. मी ते घेऊन यायचो व ते वाचून त्यांना त्याचे भाषांतर लिहून दाखवायचो. अशा रीतीने मला बऱ्यापकी मोडी लिहिता-वाचता येऊ लागली. आता माझा वेळ मोडीमधून पत्र लिहिण्यात, मोडी कागदपत्रे वाचन करण्यात छान जातो.
रोज पहाटे उठून मी मोडीच्या सरावासाठी ‘गजानन विजय’ हा ग्रंथ मोडीत लिहायला सुरवात केली आहे. मोडी प्रॅक्टिससाठी अनेक जणांना मोडीतूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतो. पत्रलेखन करतो ‘इतिहास संशोधन, पुणे’ या संस्थेत ऐतिहासिक माहितीसंबंधित हजारो पत्रे जतन केलेली आहेत. ती वाचण्याकरिता मोडी येणाऱ्यांची आवश्यकता असते, तिथे अधूनमधून जातोही. तसेच जमीन जुमला, इस्टेटीसंबंधीची मोडीतील कागदपत्रे अनेक जणांकडे असतात, त्यांनाही मोडी जाणकारांची गरज असते. अशी पत्रेही वाचून दाखवण्याचा विचार आहे. घरी मोडीचे क्लास सुरू करणार आहे. अनेकांनी मला त्याविषयी विचारणा केली आहे. मोडी शिकण्याची इच्छा असणारे अनेक जण मला भेटले याचाही मला खूप आनंद झाला. अशा या ‘मोडीप्रेम’ छंदामुळे माझा वेळ खूप छान जातो आणि जे शिकायची लहानपणापासून इच्छा होती ते निवृत्तीनंतर तरी शिकलो यातच मी आनंदी आहे.
विलास जोगदेव
खा आनंदाने!
मैं जिंदगी का साथ..
काल संध्याकाळी नवीन ठिकाणी चालायला जायचं म्हणून एका उद्यानामध्ये गेले होते. खूप लहान मुलं हुंदडत होती आणि त्यांचे आई-बाबा मुलांच्याच वयाप्रमाणे त्यांच्या मागे धावत होते! एकीकडे तरुण मंडळी मोबाइलवर गाणी ऐकत जॉगिंग करत होती आणि एका कोपऱ्यामध्ये एक ‘भुले बिसरे गीत’चा कार्यक्रम चालू होता. एक आजोबा गात होते, ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. आणि त्यांच्याभोवती रिंगण करून बसलेले होते त्यांचेच समवयस्क ‘मित्र-मैत्रिणी’! अमोघ पटकन म्हणाले, ‘गाणं म्हणता येतं किंवा नाही त्यापेक्षा आपल्याला कोणीतरी ऐकतंय ही भावना त्यांना सुखावणारी आहे.’
वयपरत्वे शारीरिक व्याधींना कुरवाळत बसण्यापेक्षा मानसिक आनंद कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला मिळू शकतो हे शोधलं, ते गवसलं आणि आचरणात आणलं तर आयुष्य नक्कीच सुखकर होईल. मी काही मानसोपचारतज्ज्ञ नाही, पण शरीराचे आरोग्य अबाधित राहण्यामागे मानसिक शांती आणि समाधान जरुरी असते हे एक आहारतज्ज्ञ म्हणून मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते. म्हणूनच मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहार-विहार कसा असावा ते पाहायला हवं.
थाइरॉइड ग्रंथी, पिटय़ूटरी ग्रंथी, हृदय, मेंदू यांचे आरोग्य जर राखले तर मानसिक आरोग्यसुद्धा बऱ्याच अंशी राखता येते. पुढील काही लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही आरोग्यविषयक समस्यांबद्दल जसे की मधुमेह, रक्तदाब, अल्झायमर, संधिवात, हृदयरोग, डोळे किंवा त्वचेचे विकार वगैरे.
आज थोडंसं मानसिक शांतीसाठी :
पुढील काही व्हिटॅमिन्स/ मिनरल्सची कमतरता आजी-आजोबांना परवडणारी नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाजातही त्यांना अडचण येऊ शकते.
B 1 , B 5 – एकाग्रता अभाव
B 3 – नैराश्य, तणाव
B 6 – सेलेनियम – नैराश्य, चिडचिड
B 12 – विस्मृती, गोंधळ
फॉलिक अॅसिड – चिंता, नैराश्य
मॅग्नेशियम – चिंता, नैराश्य, चिडचिड, तणाव, निद्रानाश
व्हिटॅमिन सी – नैराश्य
जस्त- भूक मंदी, गोंधळ, डिप्रेशन
ओमेगा 3 – नैराश्य, विस्मृती
ट्रीप्टोफेन – डिप्रेशन
आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खालील पदार्थाचा आहारात अवश्य समावेश करा-
हातसडीचा तांदूळ, लापशी, ओट्स
(B 1 , B 3 , B 5, B 6, सेलेनियम)
अक्रोड, काजू (मॅग्नेशियम , ओमेगा ३, जस्त) सूर्यफूल, भोपळा बिया (मॅग्नेशियम, ओमेगा ३, जस्त), लसूण (सेलेनियम) अंबाडी / तंतू देणाऱ्या पालेभाज्या (ओमेगा 3, 6 आणि 9)
सोयाबीन आणि डाळी, पालक (फॉलिक अॅसिड) काकडी, टोमॅटो, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त भाज्या.
केळी (B 6, अमायनो आम्ल) संत्र, स्ट्रॉबेरी, आवळा (व्हिटॅमिन सी) डेअरी – दही, ताक, दूध, चीज, चॉकलेट (B 12)
बिनधास्त राहा, आनंदाने जगा!
वैदेही अमोघ नवाथे
आहारतज्ज्ञ
ज्येष्ठांसाठी उपयुक्त वस्तू
आजी-आजोबांसाठी स्वच्छतेच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या काही वस्तूंची ही माहिती
* इनफ्लेटेबल श्ॉम्पू बेसिन-
वृद्धांचे केस धुणे तसं अवघड काम. त्यांच्यासाठी इनफ्लेटेबल श्ॉम्पू बेसिन हा उत्तम पर्याय आहे. या बेसिनचे वैशिष्टय़ म्हणजे वृद्धांची मान अगदी सहज या बेसिनच्या कडेवर ठेवून आरामात त्यांचे केस धुता येतात. त्यामुळे कानात किंवा चेहऱ्यावर पाणी न येता केस धुतले जातात. या बेसिनला पाण्याचा निचरा होण्याचीही व्यवस्था केलेली आहे. १६ १/४’’ ७ ११ ३/४’’ या आकारमानात हे बेसिन उपलब्ध असून याची किंमत साधारणत: एक ते दोन हजार रुपयांच्या आसपास आहे.
*टॉयलेट सीट रायझर – कमोडच्या कमी उंचीमुळे अनेकदा वृद्धांना कमोड वापरताना गुडघ्याचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये याकरता कमोडची उंची सुमारे १३ ते १५ सेंमीपर्यंत वाढविणारे टॉयलेट सीट रायझर बाजारात आले आहेत. याचे वैशिष्टय़ म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा हे सीट रायझर कमोडवर ठेवायचे वापरून झाल्यावर काढायचे. ज्यांना आधाराची गरज असते अशांकरिता हँडलची व्यवस्था असलेले रायझरही उपलब्ध आहेत. या टॉयलेट सीट रायझरची किंमतही अंदाजे १४०० रुपयांपासून पुढे आहे.
*शॉवर चेअर –
अनेकदा वृद्ध व्यक्तींना आंघोळ करताना उभे राहणे किंवा आंघोळीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या छोटय़ा टेबलवर बसून आंघोळ करणे शक्य होत नाही. म्हणून खास शॉवर चेअर बाजारात आलेल्या आहेत. या चेअरची रचना ही सर्वसाधारण खुर्चीसारखीच आहे. परंतु वृद्ध व्यक्ती आरामात या खुर्चीवर बसून आंघोळ करू शकतात. या खुर्चीच्या पायांना रबर स्टॉिपगचा आधार दिलेला असल्यामुळे खुर्ची सरकण्याचाही धोका नसतो. तसेच फायबर वापरून ही खुर्ची तयार केलेली असल्यामुळे गंज चढण्याचीही शक्यता नसते. तसेच ही खुर्ची फोल्डेबल असल्यामुळे जास्त जागाही व्यापत नाही. या खुर्चीची किंमतही १२०० रुपयांपासून पुढे आहे.
संकलन- गीतांजली राणे
कायदेकानू
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रारीचा अधिकार
पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेऊन गेलेल्या अनेकांना बरेचदा तक्रार नोंदवून न घेताच बोळवण केली जाते. पोलिसांनीच तक्रार घेतली नाही तर काय करायचे, अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. परंतु पोलिसांनी तक्रार घेतली नाही अथवा चुकीच्या स्वरूपात घेतली तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल करता येते.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल करताना आपली तक्रार शक्यतो लेखी स्वरूपात करावी. सदर तक्रार अर्जास रक्कम ५ रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावाला. प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार सादर केल्यानंतर ती दोन प्रकारे हाताळता येते.
१) न्यायदंडाधिकारी सदर तक्रारीचे स्वरूप आणि प्रथमदर्शनी पुरावा लक्षात घेऊन भारतीय फौजदारी संहिता कलम १५६(३) प्रमाणे पोलिसांना चौकशीचे आदेश देऊ शकतात, अथवा
२) न्यायदंडाधिकारी तक्रारदारास शपथेवर तपासून तसेच तक्रारअर्जात नमूद साक्षीदार हजर असतील तर त्यांस शपथेवर तपासून पुढील कार्यवाही करू शकतात.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमारे तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकास आहे. तक्रार दाखल करताना गुन्हा ज्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या हद्दीत घडला आहे त्यांच्यासमोरच तक्रार अर्ज / फिर्याद सादर करावी. अशा तक्रारअर्जावर/ फिर्यादीवर आरोपी हजर झाल्यानंतर पुरावा नोंदवून व आरोपींचे जबाब नोंदवून निकाल दिला जातो.
अॅड. प्रीतेश देशपांडे
pritesh388@gmail.com