कविराज मंगेश पाडगांवकरांच्या बोलगाणीमध्ये म्हातारपणावरच तरुण गाणं आहे. ते म्हणतात, ‘तरुण असला की तरुण असतं म्हातारपण, रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!’ आपल्या आयुष्याची गती इतकी वाढली आहे की म्हणता म्हणता दिवस सरत असल्याचे ध्यानात येते. आता आत्तापर्यंत आपल्या मुलांना शाळेत सोडणारे आजी-आजोबा आता नातवंडांचे हट्ट पुरविण्यासाठी धडपडतात. हातातली वष्रे वाळूप्रमाणे घसरत गेलेली जाणवतात. गत आयुष्यातील सुख-दु:खाच्या प्रसंगांच्या आठवणी, भविष्याची काळजी यामध्ये वर्तमानाचा आनंद लुटण्याचे क्षण आपण हातातून न गमावणे, अतिशय महत्त्वाचे आहे. ‘आजकाल’च्या पिढीला आजकालच्या गरजांना, प्राधान्यांना, आपल्या स्वतच्या विचाराच्या चौकटीत सामावून न घेतल्याने सतत कुरबुर, आजारपण, कंटाळा, त्रास, थकवा, कटकट, विसंवाद, अस्वास्थ्य या साऱ्याला सामोरे जात असलेले तुम्ही आजी-आजोबा सभोवताली पाहतो. वास्तविक ‘आनंद’ हा प्रत्येकाचा मूळ गाभा आहे. म्हणूनच तर आपण कुठल्याही शारीरिक, मानसिक, भावनिक दु:खापासून दूर पडलेलो असतो. योगसाधना ही ‘निषाद’ योगापासून ‘आनंदयोगा’पर्यंतची यात्रा आहे. या प्रवासात आपण आपल्याला निखळ आनंद पोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची काळजी घेणार आहोत. सर्वात प्रथम शरीर, मग भावना, सभोवतालचे वातावरण, समवयस्कांशी, डॉक्टरांशी हितगुज या साऱ्यांची काळजी कशी घ्यायची हे हळूहळू आपण उलगडत जाणार आहोत. सुखदु:खाची बेरीज-वजाबाकी करण्याऐवजी फक्त आनंदाचे चक्रवाढ व्याज मिळविणार आहोत. कुठल्याही वयात, कुठल्याही व्याधीत माणूस बदलू शकतो; किंबहुना आपल्याला बदलावेच लागेल.
     या ‘आनंदमय’ कोशाच्या यात्रेस मनापासून शुभेच्छा!