आरती कदम
समोर बसलेला ५०-६० जणांचा वाद्यवृंद. त्यांच्या मागे रांगेत उभा असलेला गायकवृंद. शिस्तबद्ध. प्रत्येक वादकाच्या हातात वेगवेगळी वाद्यं. साऱ्यांचं लक्ष समोर उभ्या असलेल्या कडक इस्त्रीची एकरंगी नीटस साडी नेसलेल्या, केसांचा घट्ट अंबाडा घातलेल्या, ताठ कण्याच्या संगीत दिग्दर्शिकेच्या हातातील त्या जादूई बॅटनकडे. काही क्षणांची नि:शब्द शांतता.. क्षणात, तो बॅटन घेतलेला हात लयबद्ध इशारा करतो आणि उमटू लागतं एक अनोखं स्वरचित्र..
त्या इशाऱ्याबरहुकूम वाद्यांचे आणि गाण्याचे सूर पुढे-मागे वर-खाली झेपावताहेत.. वातावरणात फक्त आणि फक्त सूर भरून राहिलेले.. स्वरांची ही किमया गेली ५६ वर्ष सलगपणे देश-विदेशात करणाऱ्या या संगीत दिग्दर्शक म्हणजे यंदाच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित कुमी नरीमन वाडिया. कोरल संगीत ‘कंडक्ट’ वा संचलन करणारी पहिली भारतीय स्त्री, असं त्यांचं वर्णन केलं जातं. गेली कित्येक वर्षत्यांचं हेच रूप आणि तेच समर्पण. एका स्त्रीनं असं संगीत संचलन करणं परदेशातही फार विरळा होतं. त्यामुळे त्यांचं हे काम ठळकपणे नोंदवावं असंच.संगीताशी त्याचं नातं जुळलं ते अकस्मातच. अगदी लहान असताना त्यांचे वडील अचानक वारले. त्या दु:खातून सावरायला म्हणून असेल, त्यांच्या वडिलांच्या मित्रानं त्यांना एक सेकन्ड हॅन्ड पियानो भेट दिला. त्या वेळी त्या फक्त९ वर्षांच्या होत्या. तीच त्यांची सुरांशी तशी पहिली ओळख. मग काय, शेजारच्या मुलामुलींना जमवून त्यांना संगीत शिकवणं, संगीताचे कार्यक्रम आयोजित करणं सुरू झालं. त्यात त्या इतक्या पारंगत झाल्या, की १५ व्या वर्षांपासूनच त्यांना शाळा, कॉलेजमधून आमंत्रणं येऊ लागली. आयुष्य संगीतमय झालं. पुढे लग्न झालं, मुलगा (सोराब) झाला. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी पियानोवादनाच्या दोन पदविका पूर्ण केल्या होत्याच. आपल्या या नैपुण्याला अधिक आकार देण्यासाठी त्या व्हिक्टर परनजोती यांनी १९५६ मध्ये स्थापन केलेल्या ‘बॉम्बे अमॅच्युअर लाइट ऑपेरा सभा’ या कोरल ग्रुपमध्ये गायिका म्हणून सहभागी झाल्या. व्हिक्टर यांनी कुमी यांच्यातलं कलानैपुण्य हेरलं.
जेव्हा जेव्हा ते इतर कार्यक्रमांना जात तेव्हा वाद्यवृंद संचलन करण्याचं काम कुमींकडे देत. कुमी यांच्याकडे नेतृत्व असं आपसूक आलं. त्यातच व्हिक्टर यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि ‘परनजोती अकादमी’ क्वायरला नेतृत्व देण्यासाठी सगळय़ांच्याच नजरा कुमी यांच्याकडे वळल्या. दोलायमान मनस्थितीत असताना त्यांच्या पतीनं, नरीमन यांनीही त्यांना समजावून सांगितलं. अर्थात सुरुवातीला काहीजणांनी त्यांना स्वीकारलं नाही. काहीजण क्वायर सोडून गेलेही, पण त्यांनी बॅटन हातात घेतली आणि तिथून ‘कोरल म्युझिक कंडक्टर आणि संगीत दिग्दर्शक’ म्हणून सुरू झालेला त्याचा संगीताचा प्रवास अद्याप सुरूच आहे.
‘परनजोती अकादमी कोरस’ अर्थात ‘पीएसी’चे एकामागोमाग एक कार्यक्रम भारतभर होऊ लागले. सोळाव्या शतकातील संगीतकृतींपासून समकालीन दिग्दर्शकांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपर्यंत. आध्यात्मिक संगीतापासून लोकगीतांपर्यंत, थेट २२ भाषांत आणि तेही वेगवेगळय़ा देशांत. भारतातील एक महत्त्वाचा वाद्यवृंद, गायकवृंद होण्याचा त्यांचा प्रवास असा सुरू झाला आणि सर्वदूर पसरला.
युरोप, अमेरिका, मध्यपूर्व देश, जपान, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया अनेक ठिकाणी त्याच्या पीएसी ग्रुपनं स्पर्धेत जिंकत आपल्या संगीताची छाप उमटवली. अर्थात त्यामागे आहे तो कुमी यांचा कर्तव्यदक्ष स्वभाव. त्या प्रत्येक स्वराविषयी काटेकोर असतात, विशेषत: वेगळय़ा भाषेतल्या गाण्यांबाबत. त्यामुळे कोणीही एकही तालीम चुकवायची नाही अशी सर्वाना ताकीदच दिली जाते. म्हणूनच त्यांना आणि त्यांचा क्वायर आजही नावाजला जातो. त्यांच्यामुळेच मोझार्ट, बिथोवन, बाख यांच्या सिम्फनी इथल्या आसमंतात पुन्हा एकदा दरवळू लागल्या.
कुमी वाडिया यांचे आतापर्यंत १८ देशांत २०० संगीताचे कार्यक्रम झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी अनेक भारतीय संगीतकारांना नवं कोरल संगीत लिहिण्यासाठी आमंत्रण दिलं. जगभरातील कोरल संगीताचा भारताला परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आंतरराष्ट्रीय संगीताद्वारे जगभरात एकतानता आणण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. तसेच भारतीय कोरल संगीताला जागतिक स्तरावर नेण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे.
त्यांच्या हातातली ती छोटीशी नाजूक परंतु जादूई बॅटन आणि तिच्या इशाऱ्यावर उमटत जाणाऱ्या स्वरलहरी मानवी मनाला मोहून टाकणाऱ्या. म्हणूनच ते सूर कायमच आसमंतात दरवळत राहाणार आहेत..