आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत. आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे, देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा. आंदाळची भक्तीची वाट आत्यंतिक प्रेमाची आहे. ते आहे एखाद्या कुमारिकेचं पहिलं निष्कलंक प्रेम. तिला तामिळ भूमीनं श्रीरंगाची प्रिया-रंगनायकी म्हणून गौरवलं आहे.
श्री वेलीपुत्तूर हे तामिळनाडूमधलं एक लहानसं गाव आहे. तिथे रंगनाथाचं एक प्राचीन मंदिर आहे. या रंगनाथाची रोज सकाळची पहिली पूजा इतर देवस्थानांतल्या पूजांपेक्षा अगदी वेगळी केली जाते. जवळच्या आंदाळच्या (आंदळ ही तामिळनाडूची प्रसिद्ध संत-कवयित्री) मंदिरात तिची पूजा आधी केली जाते आणि तिच्या गळय़ातून उतरवलेला हार वाजतगाजत विधीपूर्वक रंगनाथाच्या मंदिरात आणून तो देवाला अर्पण केला जातो. देवाला अर्पण करण्यासाठी जे जे म्हणून असेल ते शुद्ध, ताजं, पवित्र असावं, मानवी उपभोगानंतर ते देवाला वाहू नये, असं भक्त-भाविकांनी आजवर मनोमन मानलं असताना, मोठय़ा श्रद्धेनं हा आंदाळनं आदल्या दिवशी गळय़ात रुळवलेला हार देवाला कसा अर्पण केला जातो, याचं नवल वाटणं साहजिक आहे.
यामागे आंदाळच्या प्रेममय भक्तीची कहाणी आहे. चौदाव्या-पंधराव्या शतकांमध्ये रचल्या गेलेल्या दोन प्राचीन तमिळ काव्यकृतींमधून आंदाळच्या चरित्राचे पहिलेवहिले तपशील मिळतात. आंदाळ बहुधा नवव्या शतकात होऊन गेली असावी. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत तामिळ भूमीवर नयनार आणि आळवार या संतसमूहांचा उदय झाला. शिवभक्त अशा त्रेसष्ट नयनारांचा आणि विष्णुभक्त अशा बारा आळवारांचा प्रभाव पुढच्या कित्येक शतकांच्या तिथल्या धर्मजीवनावर आणि साहित्यावरही गाजत राहिला.
आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत. तामिळ विष्णू मंदिरांमधून आळवार संतांच्या मूर्तीना विशेष स्थान आहे. त्यांची पूजा होते. त्यांच्या जयंत्या तिथे आवर्जून साजऱ्या होतात. ते प्रत्यक्ष विष्णूचे अंश समजले जातात.
आंदाळ भूदेवीची अंश मानली जाते. ती विष्णुपत्नी आहे, देवप्रिया आहे. देवी म्हणून तिची प्रतिष्ठा आहे. आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा. ती विष्णुचित्त नावाच्या विष्णुभक्ताला तुळशीच्या बागेत सापडली. एवढीशी तान्ही मुलगी. त्यानं तिला आपली मुलगी म्हणूनच सांभाळलं, वाढवलं. ती वयात आली तोवर विष्णुचित्ताच्या नित्यपूजेतला रंगनाथ तिच्या देह-मनाचा स्वामी होऊन गेला होता. देवपूजेकरिता रोज गुंफलेला हार ती आधी स्वत:च्या गळय़ात घालून पाही. आपण देवाला आवडत्या रूपात दिसत असू का, हे ती आधी आरशात न्याहाळून बघे आणि मग तो हार पूजेच्या तबकात ठेवत असे.
एक दिवस विष्णुचित्ताला अकस्मातच ही गोष्ट कळून आली आणि तो लेकीवर संतापला. तिनं वापरलेला हार इतके दिवस आपण देवाला वाहत होतो या जाणिवेनं तो शरमलाही. रात्री त्याच्या स्वप्नात श्रीरंग आला आणि त्यानं मात्र विष्णुचित्ताची चिंता दूर केली. ‘मला तोच आंदाळनं गळा घातलेला हार आवडतो,’ असं त्यानं सांगितलं. ‘आंदाळ माझी प्रिया आहे,’ असंही सांगितलं.
मग मात्र सगळं चित्र निराळं झालं. आंदाळ संपूर्णपणे देवाची झाली. एक दिवस लग्नासाठी वाजतगाजत ती देवाच्या गाभाऱ्यात आली आणि त्याच्याशी कायमची एकरूप झाली.
तिच्या आयुष्यकहाणीतला स्वप्नदृष्टान्ताचा आणि अखेर देवमूर्तीत विलीन होण्याच्या चमत्काराचा भाग बाजूला ठेवू. तसे चमत्कार नंतर अकमहादेवीबाबत, लल्लेश्वरीबाबत आणि मीरेबाबत घडलेले सांगतातच की; पण या चौघींमध्ये आद्य आहे आंदाळ आणि देवाला सर्वस्व अर्पण करणारी ती चौघींमधली एकटीच कुमारिका आहे.
तिच्या पदरचना तामिळ साहित्यात फार विख्यात आहेत. ‘तिरुप्पावै’ आणि ‘नच्चियार तिरुमोल्ली’ ही तिची दोन काव्यं. ‘तिरुप्पावै’ म्हणजे श्रीव्रत. मार्गशीर्षांतल्या पहाटे महिनाभर नदीवर स्नान करण्याचं आणि नंतर श्रीरंगाची पूजा करण्याचं व्रत. या व्रताची गाणी आंदाळनं रचली आहेत. तिच्या प्रेमसाधनेचा तो पहिला टप्पा. ईश्वराच्या निकट जाण्यासाठी निघालेल्या जिवाच्या प्रवासाची ती सुरुवात आहे. भीती नाही, उत्कंठा नाही, दु:ख तर नाहीच नाही. आनंदानं आपल्या तरुण मैत्रिणींबरोबर कृष्णाला शोधत ती निघाली आहे. तो सापडणार आहे याच्या खात्रीनं निघाली आहे. ‘नच्चियार तिरुमोल्ली’ हा त्या प्रवासातला थोडा पुढचा मुक्काम आहे. ईश्वराची भेट एकदा झाली आहे, साक्षात्कार झाला आहे; पण कायमचा तो सापडलेला नाही. म्हणून विरह आहे, दु:ख आहे, तगमग आहे, तरुण देहाच्या वासनांची सळसळही आहे.
आंदाळचं दुसरं नाव आहे कोदै. कोदै म्हणजे मोहनवेल. तिच्या रचनांमधून या मोहनवेलीचा फुलोरा दिसतो. सगळय़ा मानवी भावनावासनांचा फुलोरा. तोच तिनं अतीव उत्कटतेनं श्रीरंगाला वाहिला आहे.
मला द्या ना ती त्याची पवित्र तुळस
शीतल, तेजस्वी, निळीजांभळी
माझ्या चमकत्या केसांत द्या तिला खोवून!
मला तो त्याच्या बासरीच्या मुखातून पाझरणारा
शीतल मध द्या ना आणून
द्या माझ्या चेहऱ्यावर लावून,
मला पुनर्जन्म मिळेल त्यातून !
मला आणून द्या त्या निष्ठुराची पायधूळ
द्या ती माझ्या देहाला माखून
मी जिवंत राहू शकावी म्हणून!
आंदाळची पदं अशी उत्कट आहेत. कमालीची उत्कट आणि आर्त. ती पक्ष्यांशी बोलते; ती पावसाशी, पावसाळी मेघांशी बोलते; ती समुद्राशी, समुद्राच्या लाटांशी बोलते. तिच्या प्रेममय विश्वात सृष्टी विलक्षण जिवंत होऊन उठते.
आंदाळची भक्तीची वाट आत्यंतिक प्रेमाची आहे. ते आहे एखाद्या कुमारिकेनं केलेलं पहिलं निष्कलंक प्रेम. सर्वस्व ओंजळीत घेऊन केलेली ती मीलनासाठीची साधना आहे. आंदाळ दुसरं काही बोलत नाही. ती उपदेश करत नाही, की योगसाधनेसारख्या अवघड मार्गावर चालू पाहात नाही. तिला फक्त प्रेम समजतं. ती अंतर्बाहय़ प्रेमानंच भरून राहिली आहे. जगाचा संपूर्ण विसर पाडणारं नव्हे, लौकिकाचा संपूर्ण विलय करून टाकणारं प्रेम. अशा निरातिशय प्रेमातूनच तिला ईश्वर मिळाला आहे.
म्हणून आंदाळ प्रेम गाणारी, प्रेम समजावणारी, प्रेम जगणारी संत आहे. तिला तामिळ भूमीनं श्रीरंगाची प्रिया-रंगनायकी म्हणून गौरवलं आहे ते उगाच नव्हे!
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा