गायत्री कशेळकर gkashelkar@gmail.com

महाविद्यालयात जाणाऱ्या मुली, नोकरदार यांना घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे वावरावे लागते. बऱ्याचदा सकाळचा नाश्ता चुकतो, बाहेरचे मसालेदार चमचमीत खाणे होते, आहाराच्या चुकीच्या वेळा, सततचे चहा, कॉफीचे अतिसेवनयामुळे अ‍ॅसिडिटी, अपचन होते. हे जर असेच वारंवार चालू राहिले तर पुढे जाऊन त्याचे रूपांतर पोटाचा अल्सर, तोंड येणे यामध्ये होते.

त्या दिवशी शेजारची सईची आई सांगत आली, ‘‘अगं, सई आजकाल खूप लवकर दमून जाते. कॉलेजमधून घरी आल्यावर झोपूनच राहते. काही कामंही लक्षात राहत नाहीत.’’ जेव्हा तिची हिमोग्लोबिनची तपासणी केली तेव्हा असे दिसले की, सईचे हिमोग्लोबिन ९ आहे. म्हणजे ही अ‍ॅनिमियाची लक्षणे.

सध्या सर्वेक्षणात असे दिसून येते की, जवळपास ८०-८५ टक्के लोकांमध्ये अ‍ॅनिमिया दिसतोच. अगदी लहान मुलं, वयात येणाऱ्या मुली ते प्रौढ वर्ग कोणाहीमध्ये तो असू शकतो.

अ‍ॅनिमिया म्हणजे नेमके काय? आणि तो का होतो? याचा विचार करता जेव्हा रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी ११ पेक्षा कमी होते (हिमोग्लोबिन = हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटिन) बऱ्याचदा चुकीचा आहार केल्यास, आहारात लोहयुक्त पदार्थाची कमतरता असल्यास अ‍ॅनिमिया होऊ शकतो. अ‍ॅनिमियाची लक्षणे म्हणजे आपण बघितले हिमोग्लोबिनची पातळी कमी असणे याचबरोबर अशक्तपणा, त्वचा निस्तेज होणे, सतत केस गळणे, चक्कर येणे, डोळ्याखाली फिकट गुलाबी होणे, नखे वारंवार तुटणे, गळून गेल्यासारखे होणे, अभ्यासात किंवा कामात लक्ष न लागणे, चिडचिडेपणा. साधारण वयात येणाऱ्या मुलींमध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात. अशातच मासिक स्रावाबरोबरच शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि जर त्याची म्हणजेच लोहाची कमतरता तुमच्या आहारात असल्यास त्याचा परिणाम तुमच्या हिमोग्लोबिनवर होतो. पुढे गर्भधारणेच्या वेळी हिमोग्लोबिनकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम होणाऱ्या गर्भावर होतो. कारण आईच्या पोटात वाढणारा गर्भ हा पूर्णत: ९ महिने आईवर अवलंबून असतो. तो त्याच्या पोषणाकरिता आईच्या शरीरातील लोह शोषून घेत असतो आणि त्यातच जर आईच्या शरीरात लोहाची कमतरता असल्यास त्याचा आईला तीव्र स्वरूपाचा अ‍ॅनिमिया होऊ शकतो. त्याचबरोबर बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो, बाळाच्या शरीरात रक्तपेशींची कमतरता होऊ शकते, प्रसूती दरम्यान गुंतागुंत होऊ शकते, बाळ दगावण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या काळामध्ये लोह अत्यंत जरुरी आहे.

महाविद्यालयात जाणाऱ्या मुली, ऑफिसला जाणारा वर्ग, गृहिणी यांना घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे वावरावे लागते. बऱ्याचदा सकाळचा नाश्ता चुकतो, बाहेरचे मसालेदार चमचमीत खाणे होते, आहाराच्या चुकीच्या वेळा, सततचे चहा, कॉफीचे अतिसेवनयामुळे अ‍ॅसिडिटी, अपचन होते हे जर असेच वारंवार चालू राहिले तर पुढे जाऊन त्याचे रूपांतर अल्सर (पोटाचा अल्सर), तोंड येणे यामध्ये होतो. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. तसेच आहारात फळे, भाज्या योग्य प्रमाणात न घेतल्याने तंतुमय पदार्थाची कमतरता होऊन बद्धकोष्टताही होते. पुढे जाऊन मुळव्याधीचा त्रास होतो. जो अ‍ॅनिमियाला कारणीभूत ठरतो.

लोह कशातून मिळते? ज्यांना तीव्र स्वरूपाचा अ‍ॅनिमिया असतो त्यांना डॉक्टर लोहयुक्त गोळ्या किंवा सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात. बऱ्याचदा या गोळ्या किंवा सप्लिमेंट अन्न सेवनानंतर म्हणजेच ब्रेकफास्ट किंवा जेवणानंतर घ्याव्यात. रिकाम्यापोटी घेतल्यास मळमळ, अ‍ॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्टता, जुलाब होण्याची शक्यता असते.

मांसाहारी पदार्थातून मिळणारे लोह हे शाकाहारी पदार्थातून मिळणाऱ्या लोहापेक्षा जास्त गुणकारी असते. मांसाहारी पदार्थामध्ये चिकन, लिव्हर, मटण, मासे यांचा समावेश असतो. शाकाहारी पदार्थामध्ये अळीव, तीळ, काळे खजूर, अळू, गूळ, काकवी, कडधान्ये इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये पोह्य़ांबरोबर लिंबू दिले जाते त्याने लोहाची गुणवत्ता सुधारते. आहारात व्हिटामिन ‘सी’युक्त पदार्थाचा जरूर समावेश करावा. उदाहरणार्थ – संत्री, मोसंबी, डाळिंब, आवळा, पेरू, हे शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करतात. याउलट जर आहारात अतिरिक्त प्रमाणात चहा, कॉफी, चॉकलेट असल्यास ते लोह शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. आहारात लोहयुक्त पदार्थाबरोबर फायबर जास्त प्रमाणात घेऊ नये. त्यानेदेखील अडथळा होऊ शकतो.

लोहयुक्त पदार्थाबरोबरच आहारात फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटामिन बी-१२, प्रोटिनयुक्त पदार्थाचा समावेश जरुरी आहे. आपणास फॉलिक अ‍ॅसिड गडद हिरव्या रंगाच्या भाज्या, सुकामेवा, कडधान्ये यातून मिळते. व्हिटामिन बी-१२ आपणांस मांसाहारी पदार्थातून मिळते तसेच त्याची गुणवत्ता शरीरात चांगली राहण्यासाठी दही, दूध, ताक (स्र्१्रुं३्रू२) यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

आजकाल नॉनस्टिक भांडी स्वयंपाकघरात सर्रास वापरली जातात. त्याऐवजी लोखंडी कढई किंवा तवा वापरल्यास त्यातून मिळणारे लोह हे तितकेच नक्की उपयोगी येईल. परंतु लोखंडी भांडय़ांचा उपयोग फक्त शिजवण्यापुरता करावा. त्यात दीर्घकाळ पदार्थ ठेवू नये. अन्यथा पदार्थ काळे होण्याचे शक्यता असते आणि बऱ्याचदा शरीरात अतिलोह जाऊन त्याचा परिणाम यकृतावर होऊ शकतो. जेवणात नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरी यांचा जरूर समावेश करावा. भाज्या फळांमध्ये हिरव्या, लाल, केशरी, पिवळ्या रंगाचा समावेश जरूर करावा. यांचा उपयोग अ‍ॅनिमियावर मात करण्यासाठी होतोच.

पदार्थ/अन्नघटक  लोहाचे प्रमाण

(प्रति १००          ग्रॅम प्रमाणे)

राजगिरा            ८ मि. ग्रॅ.

कडधान्ये            ६-७ मि. ग्रॅ

सोयाबीन            ८ मि. ग्रॅ

बदाम                  ४.५ मि. ग्रॅ

काजू                   ५.९ मि. ग्रॅ

अळीव                 १७ मि. ग्रॅ

गूळ                      ४.६ मि. ग्रॅ

तीळ                      १३ मि. ग्रॅ

चिकन लिव्हर        ९.९ मि. ग्रॅ

मटण                     ४ – ६ मि. ग्रॅ.

chaturang@expressindia.com

Story img Loader