क्रोधाचे अवलोकन करणे म्हणजे त्यासंबंधी अवधान ठेवणे, त्याचे भान असणे होय. क्रोधाचे जेव्हा अवलोकन केले जाते तेव्हा क्रोध या संपूर्ण मानसशास्त्रीय प्रक्रियेच्या आपण संपर्कात असतो. हा संपर्क इतका घनिष्ठ असतो की, खरेतर एका वेगळ्या व्यक्तीच्या स्वरूपात आपण तेथे नसतोच, तेथे फक्त क्रोधच असतो.
मानवी जीवनाचा बोध हा त्या जीवनापासून दूर कोणत्या तरी जंगलात अथवा गुहेत नसून तो त्याच्या रोजच्या जीवनाच्या आकलनातूनच होत असतो. कारण मानवी जीवन हे रोज घडणाऱ्या घटना व त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया यातून आकार घेत असते. हे जीवन समजावून घ्यायचे असेल तर त्याचे अवलोकन करणे आवश्यक आहे. आणि हे अवलोकन मानवी नातेसंबंधांच्या आरशातच होऊ शकते. कारण आपण कसे आहोत हे आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांतूनच स्पष्टपणे व्यक्त होत असते. आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांपकी एक सर्वसाधारण प्रतिक्रिया म्हणजे क्रोध होय. क्रोध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे का? निसर्गाने मानवाला एक क्रोधित होणारा जीव या स्वरूपातच बनवले आहे का? तसे असेल तर मानवाला क्रोधापासून कधीही मुक्त होता येणार नाही. मग क्रोधाचे व्यवस्थापन एवढेच आपल्या हातात असेल. हाच प्रश्न अधिक व्यापक स्वरूपात विचारायचा झाला तर निसर्गाने मानवाला एक विशिष्ट स्वभावाचा जीव या स्वरूपातच घडवले आहे का? म्हणजेच मानवी स्वभाव जसा आहे तसाच तो असणे अटळ आहे का, की तो बदलता येणे शक्य आहे? या प्रश्नांची उत्तरे केवळ होय किंवा नाही या स्वरूपात देऊन उपयोग नसतो तर त्यांचा उलगडा हा आपल्या दैनंदिन जीवनातून प्रत्यक्षपणे व्हावा लागतो.
मनुष्य आतापर्यंत क्रोधासंबंधी अधिकाधिक ज्ञान मिळवून त्याचे व्यवस्थापन करीत आला आहे. परंतु त्यातून तो स्वत:ला क्रोधापासून पूर्णपणे मुक्त करू शकला नाहीये. क्रोधासंबंधीचे ज्ञान हे त्यापासून मुक्त होण्यास निरुपयोगी असते. आपल्याला राग का येतो, कसा येतो, केव्हा येतो, त्याचे स्वरूप काय असते, त्या वेळी मला काय करावयास हवे, इत्यादी सर्व ज्ञान जरी आपण गोळा केले तरी त्यामुळे आपल्याला राग येण्याचे थांबत नाही. म्हणून क्रोधासंबंधी शिकणे म्हणजे त्याचे ज्ञान मिळविणे नव्हे. आपण एखाद्या गोष्टीसंबंधी शिकतो तेव्हा आपण त्या गोष्टीचे जास्तीतजास्त ज्ञान मिळवितो व त्या ज्ञानाच्या आधारे ती गोष्ट आपल्याला हव्या त्या प्रकारे हाताळतो. परंतु क्रोध, भय, द्वेष, दु:ख यांसारख्या मानसशास्त्रीय प्रतिक्रियांसंबंधी शिकण्यास व त्यापासून मुक्त होण्यास ही पद्धत निरुपयोगी ठरते. उलट, बऱ्याच वेळा या प्रतिक्रियांसंबंधी मिळविलेले ज्ञान त्यांना अधिकच दृढ करते. म्हणूनच या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की, कोणत्याही प्रकारचे ज्ञान गोळा न करता एखाद्या गोष्टीसंबंधी शिकता येणे शक्य आहे का? असे शिकणे म्हणजे नेमके काय?
जेव्हा कोणत्याही आधाराशिवाय, कोणत्याही मदतीशिवाय स्वत:लाच एखाद्या गोष्टीसंबंधी शिकायचे असते तेव्हा त्या गोष्टीचे अवलोकन करणे हा एकच पर्याय शिल्लक उरतो. क्रोधाचे अवलोकन करणे म्हणजे त्यासंबंधी अवधान ठेवणे, त्याचे भान असणे होय. आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ज्या वेळी क्रोधाची भावना जागृत होते, त्या त्या वेळी तिचे अवलोकन करणे शक्य आहे का? प्रत्यक्षात असे अवलोकन करणे आणि आपण अवलोकन करीत आहोत असा विचार करणे या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आपण जेव्हा अवलोकन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बव्हंशी आपण विचार करत असतो की, आपण अवलोकन करीत आहोत. पण विचाराने केलेले अवलोकन म्हणजे अवलोकन नव्हेच. विचाराच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अवलोकन करणे म्हणजे आपण ज्या गोष्टीचे अवलोकन करीत आहोत त्या गोष्टीच्या संपर्कात असणे, त्यासमवेत जगणे. क्रोधाचे जेव्हा अवलोकन केले जाते तेव्हा क्रोध या संपूर्ण मानसशास्त्रीय प्रक्रियेच्या आपण संपर्कात असतो. हा संपर्क इतका घनिष्ठ असतो की, खरेतर एका वेगळ्या व्यक्तीच्या स्वरूपात आपण तेथे नसतोच, तेथे फक्त क्रोधच असतो. अशा प्रकारे क्रोधाच्या संपर्कात राहिल्याने क्रोधाचे संपूर्ण स्वरूप उघड होते व क्रोध ही प्रतिक्रिया शांत होते. परंतु ती पुन्हा केव्हातरी वेगळ्या संदर्भात वेगळ्या प्रकारे येऊ शकते. याचाच अर्थ क्रोधापासून आपण अजून पूर्णपणे मुक्त झालेलो नसतो.
आपणास राग येतो आहे याची जाणीव आपणास केव्हा होते? जेव्हा ही रागाची भावना आपल्या आत जागृत होऊ लागते तेव्हा. परंतु ही भावना आपल्या आत जागृत का होते? त्याला फक्त बाह्य़ घटना/वस्तूच जबाबदार असते की त्यात आपल्या आतील परिस्थितीचा पण सहभाग असतो. आपल्या आतील पृष्ठभूमी ही आपल्या आतापर्यंतच्या जगण्यातून तयार झालेली असते. ती म्हणजे आपल्या सर्व क्रिया-प्रतिक्रियांचे भांडारच असते. बाह्य़ परिस्थितीला प्रतिसाद म्हणून आपल्या आत जेव्हा क्रोधाची भावना जागृत होते तेव्हा तिला आवश्यक असणारे सर्व घटक आपल्या आतील पृष्ठभूमीत अगोदरच तयार असतात. हे घटकच राग येण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत असतात. रागाची जागृत झालेली भावना हे जर रागाचे व्यक्त स्वरूप मानले तर त्यास आवश्यक असणारे हे आपल्या आतील घटक म्हणजे रागाचे अव्यक्त स्वरूपच मानावे लागेल. आताच्या क्षणी जरी आपण रागावलेलो नसलो म्हणजे आता रागाची भावना व्यक्त स्वरूपात नसली तरी अव्यक्त स्वरूपातील राग सततच आपल्या आत दडून बसलेला असतो. रागापासून पूर्ण सुटका म्हणजे रागाच्या व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही स्वरूपांपासून सुटका होय. व्यक्त स्वरूपातील राग अवलोकनाद्वारे शांत झाल्यानंतरच अव्यक्त स्वरूपातील रागाचे अवलोकन शक्य होते. काय स्वरूप आहे या अव्यक्त रागाचे? आपल्या आतील कोणते घटक त्याला कारणीभूत आहेत?
आपल्या अंतरंगात आपण अनेक मानसशास्त्रीय प्रतिमा साठवून ठेवलेल्या असतात. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांनी त्या उत्तेजित होतात व रागाच्या भावनेत व्यक्त होतात. कोणत्या घटनांनी अथवा वस्तूंनी कोणत्या प्रतिमा उत्तेजित होतील हे स्थलकालानुरूप बदलत असते. उदाहरणार्थ, एकच बाह्य़ घटना अनेक लोक एकाच वेळी अनुभवत असूनसुद्धा त्यातील काहींनाच त्यामुळे राग आलेला दिसतो. याचे कारण, कोणत्या प्रतिमा उत्तेजित झाल्याने कोणत्या व्यक्तीला राग येईल हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या बाबतीत वेगवेगळे असते. तसेच एकाच व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळ्या वेळी या प्रतिमा वेगवेगळ्या असतात. म्हणूनच पूर्वी आपल्याला ज्या गोष्टींमुळे राग येत असे, त्यांचा आपल्याला आता राग येत नाही; तसेच आता आपल्याला ज्या गोष्टींचा राग येतो त्यांचा आपल्याला भविष्यात कदाचित राग येणार नाही. म्हणजेच राग आणणारे घटक व्यक्तिनुरूप व कालानुरूप बदलत असतात. आपले रोजचे जीवन जगत असताना आपण सातत्याने अशा प्रतिमा बनवत असतो व आपल्या स्मृतीत साठवत असतो. याचाच अर्थ रागाची पृष्ठभूमी आपण सातत्याने घडवीत असतो. ही प्रक्रिया जाणीवपूर्वक व अजाणतेपणी अशा दोन्ही प्रकारे चालू असते. म्हणून मग राग येणे अपरिहार्य होते. कोणत्याही प्रकारची मानसशास्त्रीय प्रतिमा न बनवता आपण आपले जीवन जगू शकतो का?
राग आल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करीत बसण्यापेक्षा रागाची भावनाच जागृत होणार नाही अशा प्रकारे आपण जगू शकलो तर तसे जगणे म्हणजेच क्रोधमुक्त जीवन होय. अशा प्रकारे जगण्यासाठी आपल्याला आपण सातत्याने घडवीत असलेल्या मानसशास्त्रीय प्रतिमांचे भान ठेवणे आवश्यक आहे. आपले दैनंदिन जीवन अवधानपूर्वक जगणे शक्य आहे का? अनवधानाने जगणे म्हणजे जवळजवळ निद्रावस्थेत वावरण्यासारखेच आहे. असे जीवन हे स्वयंचलित नसून परिस्थितीने ठरवून दिल्याप्रमाणे असते. माणूस एका आज्ञाबद्ध (प्रोग्रॅम्ड) यंत्रमानवाप्रमाणे जगत असतो. परंतु अवधानपूर्वक जगणे म्हणजे प्रत्येक गोष्ट पूर्ण लक्ष देऊन करणे, मग ती गोष्ट कितीही क्षुल्लक का असेना. कारण अशा जगण्यात आपण काय करतो याला फारसे महत्त्व न राहता आपण ते कसे करतो यासंबंधीच्या अवधानालाच महत्त्व असते. अशा अवधानपूर्वक जगण्याने आपल्याला आपल्या अंतरंगातील पृष्ठभूमीची ओळख होऊ लागते. तसेच नव्या मानसशास्त्रीय प्रतिमा तर तयार होतच नाहीत, परंतु आपण स्मृतिरूपाने साठवून ठेवलेल्या जुन्या मानसशास्त्रीय प्रतिमांचादेखील निचरा होऊ लागतो. त्यामुळे राग येण्याची प्रक्रिया क्षीण होऊ लागते. या प्रतिमांचा जेव्हा पूर्ण निचरा होतो, तेव्हा आपल्या अंतरंगात एक वेगळेच दालन उद्घाटित होते. ते विचाराच्या व त्याने निर्माण केलेल्या क्रिया-प्रतिक्रियात्मक प्रतिमांच्या पलीकडे असते. तेथे जगणे म्हणजे व्यवस्थापन नसते, तर सातत्याने घडणारे सर्जन असते. तेथे कोणत्याही प्रकारच्या नियंत्रणाची गरजच नसते; कारण जे काही घडते ते वैश्विक सुव्यवस्थेचाच भाग असते. विचाराने निर्माण केलेले र्दुव्‍यवस्था व संघर्ष पदा करणारे घटक तेथे पूर्णपणे अनुपस्थित असतात. कारण विचार हा गरजेपुरताच कार्य करतो, अन्यथा तो शांत असतो. तेथे परस्परविरोधी भावनांचा गोंधळ नसतो. तेथे सर्व गोष्टींसंबंधी एक अनुकंपा असते, जी जीवनासंबंधी प्रेम निर्माण करते.
kkishor19@gmail.com