हेमलता ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, जे मनाविरुद्ध काही गोष्टी स्वीकारायला लावणारे असतात. निराश मनानं आपण ते स्वीकारतोही, पण मन कटूच राहातं. मग अशा वेळी  ‘कभी कभी अँगल बदल के भी देखना चाहिए!’ असा एखाद्याचा सल्ला आपला त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलवून टाकतो. ‘डेड एन्ड’, ‘यू-टर्न’, ‘ढगळ शर्ट’, ‘पावसानं घट्ट बसलेलं दार’, ‘हात सोडल्याशिवाय मुलं सायकल शिकणारच नाहीत’’, हे शब्द, ही वाक्यं आयुष्य बदलवून टाकणारी ठरू शकतात.. कशी?

येरझाऱ्या घालणाऱ्या दिनेशला पाहून मेधासुद्धा अस्वस्थ होत होती. ‘‘किती विचार कराल, झोपा आता. उद्या बोलू पुन्हा भार्गवीशी आपण,’’ असं म्हणत मेधा बेडरूमकडे वळली.  दिनेशही मान हलवत तिच्या मागे जाण्यास निघाला. इतक्यात मोबाइल वाजला. रात्री १० वाजता राजीवचा फोन का आला असेल, असा विचार करत दिनेशनं फोन घेतला.

‘‘दिनेश सर, सॉरी मी इतक्या उशिरा कॉल करतोय, पण मला उद्या तातडीनं पुण्याला जावं लागतंय, आपली मीटिंग सकाळी ठेवूया का? म्हणजे मी लंच टाइमपर्यंत निघू शकीन.’’ राजीवच्या आवाजात काळजी होती. राजीवचे कुटुंबीय पुण्याला असतात हे माहीत असल्यानं दिनेशनं, ‘सगळं ठीक आहे ना रे?’ असं म्हणत त्याची चौकशी केली.

‘‘सर, बहिणीनं तातडीनं बोलावलं आहे, नक्की कारण माहीत नाही. पण महत्त्वाचं काहीतरी असावं.’’

 ‘‘ठीक आहे.’’ म्हणत दिनेशनं फोन ठेवला

संध्याकाळी ऑफिसमधून घरी पोचल्या- पोचल्याच राजीवला त्याच्या स्वातीताईचा फोन आला होता. मेडिकलच्या पहिल्या वर्षांला असणारा त्याचा भाचा तेजस हॉस्टेलमधून चार दिवसांपूर्वी घरी आला होता. ‘‘आल्यापासून चकार शब्दही बोलला नाहीये तो आमच्याशी. कुठेतरी शून्यात बघत नुसता सुन्न बसून असतो. धड खातही नाही. आज संध्याकाळी मात्र कहर झाला. तुला तर यांचा आततायी स्वभाव माहीत आहे. तेजसला बोलतं करण्याच्या नादात ते खूप चिडले त्याच्यावर. त्यांना कसंबसं समजावून सांगून मी बाहेर आणलं आणि तेजसच्या रूममध्ये गेले, तर त्याच्या हातात ब्लेड होतं. काळजाचा ठोका चुकला माझ्या आणि ठरवलं तुझ्याशी बोलावं.’’ स्वातीताईच्या आवाजातला कंप अस्वस्थ करणारा होता. तेजसचं राजीवशी असलेलं नातं मामा-भाच्यापेक्षा मैत्रीचं होतं. त्यामुळे लगोलग तिला दुसऱ्या दिवशी येण्याचं त्यानं कबूल केलं.

आज सकाळपासूनच पावसानं जोर धरला होता. दिनेश ऑफिसला पोचल्यावर त्याची वाट पाहात बसलेल्या राजीवला त्यानं आत बोलावलं. प्रोजेक्टसंदर्भात बोलणं सुरू असताना त्यांचा टीममेट सागरही आला. रेखा मात्र उशिरा येणार होती. मीटिंग संपवून राजीव निघाला.  ‘‘सांभाळून जा रे.. आणि काही लागलं तर सांग.’’ दिनेशनं वडीलकीच्या नात्यानं राजीवला सांगितलं.

  ‘‘दिनेश सर, काय प्रॉब्लेम झाला राजीवचा?’’ सागरनं विचारलं.  मलाही नेमकं माहीत नाही. पण भाच्याचा काहीतरी प्रॉब्लेम असावा त्याच्या. हल्ली मुलांबद्दलच्या चिंता खूप वाढल्यात. आमच्याही घरात तेच चालू आहे. लेकीला, भार्गवीला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला याचा आनंद मानायचा, की दुसऱ्या शहरात तिचा कसा निभाव लागेल याची चिंता करत बसायचं तेच कळत नाही. जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, तर तिला हवं असलेलं स्पेशलायझेशन इथे नाही. काय करावं?’’ दिनेश स्वत:च्या विचारात गुरफटला.  ‘‘काय दिनेश सर, हा काय प्रॉब्लेम आहे का? मला तर माझ्या आवडीचा विषयसुद्धा शिकायला मिळाला नाही. ना चांगलं कॉलेज. तुम्हाला तर माहीत आहे, की ज्या कामात रस नाही त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. काहीच मनासारखं होत नाहीए.’’ सागर स्वत:च्या नशिबाला दोष देत नेहमीसारखाच कुत्सितपणे हसला.

   सागरचं बोलणं चालू असतानाच रेखा मीटिंग रूममध्ये आली. तिच्याशी जुजबी हसून तो पटकन जायला निघाला. तर, ‘‘तुला वाटतं तेवढा तू जाड मुळीच नाहीस!’’ रेखाच्या या बोलण्यावर सागर थांबला.  ‘‘अरे गैरसमज करून घेऊ नकोस, पण मी नेहमीच पाहिलंय, की तू ‘ओव्हरसाइज्ड’- ढगळ शर्ट घालतोस. कपडे आणि विचार दोन्ही आपल्याला सूट होतील असेच वापरावेत. अर्थात हे माझं मत आहे, पण बघ ट्राय कर कधीतरी. बरे-वाईट विचार आपल्या मनात सतत चालू राहणारच, पण आपला नकारात्मक विचार ओळखून त्या विचारप्रमाणे वागायचं, की आपल्याला शोभेल असा सकारात्मक बदल त्यात करायचा हे नियमित सरावानं जमेलच की..’’    

रेखाचा सल्ला मनात घोळवत सागर तिथून निघाला, वॉशरूममधल्या आरशात स्वत:ला पाहताना अंगातल्या ढगळ शर्टकडे त्यानं निरखून पाहिलं. तेव्हा रेखाचं वाक्य ढगळ शर्टाविषयी होतंच, पण त्याहीपेक्षा माझ्या कामाच्या स्वीकाराविषयी होतं, हे त्याच्या लक्षात आलं. स्वत:शी काहीतरी ठरवत तो बाहेर पडला.

  पाऊस कोसळतच होता. राजीवची इंटरसिटी कॅब यायला त्यामुळे उशीर झाला होता. शिवाय बुकिंग करताना त्याने ‘शेअर्ड’ घेतल्यानं वाटेत एका प्रवाशासाठी थांबावं लागणार होतंच. गाडी आली तो बसला. पुढच्या गल्लीत ‘तिच्या’साठी गाडी थांबली.. तिनं गाडीचा दरवाजा उघडला. तिच्या एकंदर आविर्भावाकडे पाहून भर पावसातही राजीव उतरून ड्रायव्हर शेजारी बसला. तिला पाठीमागे बसायला जागा करून दिली. ‘‘साब, मस्त बारिश हो रही हैं ना!’’ ड्रायव्हरनं खुशीत येऊन राजीवशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राजीवचं लक्ष नव्हतंच, पण ड्रायव्हर दिलखुलासपणे ‘मीत ना मिला रे मन का’ गाणं गुणगुणत गाडी चालवत होता.

‘‘ गाना बंद करो और ठीकसे गाडी चलाओ!’’ तिनं त्याला जवळजवळ दमच दिला. इतक्या सुंदर गाण्यावर ती का चिडली हे राजीवलाही कळलं नाही. पण तिची एकंदरीत चाललेली चिडचिड तिच्या देहबोलीतून राजीवला प्रकर्षांनं जाणवत होती.

 ती अशांतच होती. गाडीनं वेग घेतला आणि तिच्या विचारांनीसुद्धा..

‘अमित- सीमा, मस्त जोडी होती. अमित नाव असलं तरी माझा ‘मीत’ होता तो. काय काय केलं नाही त्याच्यासाठी. आईशी भांडून लग्नासाठी संमती मिळवली. त्याला बरं वाटावं म्हणून नोकरी सोडून घरी राहिले. मूल नको इतक्यात तेही ऐकलं. सगळं सगळं केलं. आणि लग्नाच्या तिसऱ्याच वर्षी हा म्हणतो की त्याला कुणी दुसरी आवडते.’ तिची मनातल्या मनात धुसफुस सुरूच होती. सीमाचा घटस्फोट होऊन सहा-सात महिने झाले होते. ती मुंबईतच भाडय़ानं राहात होती, पण एकटीला घर खायला उठतं, म्हणून मग शनिवार-रविवारी आईकडे जाणं ओघाने आलंच. ‘‘वीट आलाय मला या अशा मुंबई-पुणे वाऱ्या करून!’’ सीमा अजूनही पुटपुटत होती.  ड्रायव्हरनं अचानक ब्रेक मारला तसे राजीव आणि ती पुढच्या बाजूला फेकले गेले.

‘‘लक्ष नाहीये का गाडी चालवण्याकडे? सगळेच बेभरवशाचे! कुठे चाललोय आपण नक्की? हा डेड एन्ड आहे!’’ पुढे रस्ताच दिसत नसल्यानं तिची चिडचिड वाढली.

 ‘‘सॉरी सॉरी, ये बारिश की वजहसे गलत आ गया!’’ ड्रायव्हर स्वत:ची बाजू सावरत म्हणाला.  ‘‘तो फिर मॅप देखो ना, अब क्या करेंगे हम? अटक गये ना तुम्हारे कारन!’’ सीमाची चडफड तिच्या आवाजातून जाणवत होती.  ‘‘मॅपभी बंद हो रहा हैं मॅडम, पर आप टेंशन मत लो. जब सभी रास्ते बंद हो जाते है, तो ये देखो ऐसे ‘यू-टर्न’ ले लो,’’ म्हणत त्यानं गाडी मागे घेत खरंच ‘यू-टर्न’ घेतला. ‘‘कोई ना कोई रास्ता मिल ही जायेगा, देखो, ये मिल गया हमे भी!’’ थोडा लेट होगा लेकीन पहुंच जरुर जायेंगे!’’ म्हणत ड्रायव्हरनं पुन्हा गुणगुणायला सुरुवात केली..  सीमानं खोल श्वास घेत मागे मान टेकली. ‘यू-टर्न’.. नवा रस्ता दाखवणारा शब्द तिला मिळाला होता.. सीमा बऱ्यापैकी शांत झाल्याचं नंतर राजीवला जाणवलं.

   इकडे ऑफिसमध्ये वीकेंड आणि पाऊस या दोन्ही कारणांमुळे सगळय़ांची थोडी लवकरच घरी निघण्याची तयारी सुरू होती.  ‘‘अरे, तू जाणार कसा घरी? मी सोडतो गाडीनं हवं तर. रेखाही सोबत आहे.’’ खुर्चीत निवांत बसलेल्या सागरला दिनेशनं विचारलं.‘‘सर, बाइक आणलीय. पाऊस जरा कमी झाला की निघतो.’’ सागर म्हणाला.

 ‘‘गुड!’’ म्हणत दिनेशनं त्याचा निरोप घेतला आणि तो रेखाच्या डेस्ककडे वळला. ती लॅपटॉपवर काही करत होती.  ‘‘घरी नाही जायचं का?’’ दिनेशनं विचारलं.  ‘‘झालं झालं, निघतेच आहे.’’  रेखाच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर सायकल दिसत होती. ‘‘मुलीला गिअरवाली सायकल हवी आहे. गेले दोन महिने टाळाटाळ करतेय, पण आता घेईन म्हणते. तशी ती फार समजूतदार आहे. माझ्या अगदी उलट. मी फार चोखंदळ असते गोष्टींबद्दल आणि ही मात्र नेहमीच तडजोड करायला तयार. कधीच हट्ट नाही, पण गिअरवाल्या सायकलपाशी मन रेंगाळतंय तिचं. जरा महाग आहे, पण जमवीन मी. उद्या शनिवार असल्यानं दोघींकडेही वेळच वेळ आहे. कशी आहे ही?’’ रेखानं स्क्रीनकडे पाहत विचारलं.  ‘‘इतक्या लहान वयात गिअरची सायकल, तुला भीती नाही वाटत?’’ रेखाची मुलगी दहा वर्षांची आहे हे दिनेशला माहीत होतं. दिनेशची काळजी रेखाला जाणवली.  ‘‘खरं सांगू, भीती वाटते, सिंगल मदर म्हणून तर जबाबदारी आणि काळजी दुप्पट आहे. अजून आठवतं, तिला लहानपणी सायकल चालवायला शिकवली तेव्हा आधार म्हणून मी मागची सीट पकडायचे. पण आधाराचा हात काढल्याशिवाय मुलं सायकल कधीच शिकणार नाही. मग एके दिवशी दिला हात सोडून. तेव्हा ती पडली, थोडी चिडलीही माझ्यावर, पण शिकली. अगदी उत्तम सायकल चालवते आता. शेवटी तिच्या आयुष्यातले अनुभव तिचे तिलाच घ्यायचेत, चांगले-वाईट सगळेच आणि काही लागलं तर मी आहेच की खंबीरपणे मागे उभी!’’ रेखा खळखळून हसली. दिनेशनं रेखाला तिच्या सोसायटीपाशी सोडलं, मात्र ‘सायकलचा हात सोडल्याशिवाय मुलं सायकल चालवायला शिकणार नाहीत,’ हे तिचं वाक्य त्याच्या मनात रुंजी घालू लागलं.

 राजीवच्या गाडीला पुण्यात पोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यानं मागे वळून पाहिलं, तर सीमा डोळे मिटून होती. तिच्या चेहऱ्यावर ओझरतं हसू असल्याचं राजीवला भासलं. सीमा आपल्याच विचारात होती, ‘‘खरंच सगळे रस्ते बंद झालेत, की आपणच अडकून पडलोय एका डेड-एन्डपाशी. काय हरकत आहे पुन्हा सुरूवात करायला? सर्वात आधी तर डान्स क्लास सुरू करू. म्हणजे शनिवार-रविवार या फेऱ्या माराव्या नाही लागणार. शिवाय बँकेची परीक्षा देऊ या का? अभ्यास करावा लागेल पुन्हा!’’ बऱ्याच गोष्टी सीमासमोर खुल्या होऊ लागल्या..

 तिला तिचा ‘यू-टर्न’ सापडला होता! रो-हाऊसपाशी गाडी थांबली तसा राजीव उतरला. त्याला पाहताच स्वातीला भरून आलं. विजयराव तिथेच उभे होते. जराही वेळ न दवडता तो तेजसच्या रूमकडे वळला. तेजसची क्षीण अवस्था पाहून राजीवला गलबलून आलं. तेजसनं त्याला कडकडून मिठी मारली. जोरजोरात रडणाऱ्या तेजसला राजीवनं घट्ट जवळ घेतलं. त्याला थोडं शांत करत खाली बसवून राजीव त्याला थोपटत राहिला. ‘‘आपण थोडं थोडं खाऊन घेऊ आणि आराम करू, उद्या सकाळी बोलू, मी आहेच तुझ्यासोबत,’’ म्हणत राजीवनं तेजसचे डोळे पुसले. तेजसनं राजीवचा हात दाबत होकार दिला.

   बाहेर चांगलाच पाऊस-वारा सुटला होता. स्वातीताईनं दिलेलं ब्लँकेट हातात घेत असताना वीजही गेली. स्वातीताई आणि विजयरावांनी मघाशीच घराची दारं-खिडक्या बंद केल्यानं अधिकच अंधार भासू लागला. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात राजीव तेजसच्या रूममध्ये गेला आणि तेजसपाशीच झोपला. सकाळी जाग आली तेव्हा तेजस अगदी लहान मुलासारखा अंगभर ब्लँकेट लपेटून झोपला होता. पाऊस थांबला होता. सावकाश उठत रूमचा दरवाजा लावून घेत राजीव बाहेर आला. तर विजयराव आणि स्वातीताई पावसांमुळे फुगून घट्ट लागलेलं आतलं दार उघडण्याच्या खटपटीत होते.  राजीवला पाहताच स्वातीताई पुढे झाली. ‘‘काही बोलला का रे?’’

 राजीवची नकारार्थी मान पाहून विजयरावांचा पारा चढला. मात्र काही न बोलता ते दारावर जोर देत दार उघडण्याचा प्रयत्न करू लागले.  ‘‘दार किती घट्ट लागलंय यावरून बाहेरचं वादळ किती प्रचंड असेल याची कल्पना येऊ शकते ना!’’ राजीव त्यांच्याकडे पाहत म्हणाला.  विजयरावांनी चमकून राजीवकडे पाहिलं. ‘‘म्हणूनच थोडं संयमानं, विश्वासानं आणि एकमेकांच्या सोबतीनं ते उघडायचा प्रयत्न केला पाहिजे,’’ म्हणत राजीवने दाराजवळ जात त्यांच्यासोबत दाराला जोर दिला आणि दार उघडलं.  बाहेर व्हरांडय़ात पाहतो तर बरीच पडझड झाली होती. पण वातावरण निवळलं होतं. तेजस रूमचा दरवाजा उघडत हळूहळू बाहेर येत होता. त्याला पाहून सगळय़ांचेच चेहरे उजळले.

  दिनेशनं मेधाला नाश्त्यासाठी शिरा बनवायला सांगितला. अगदी भार्गवीला आवडतो तसा. तिघंही खायला बसले.

‘‘बेटा, मी काय म्हणतो..’’

 ‘‘बाबा प्लीज, मला माहितीय तुम्ही काय बोलणार ते. गेले आठ दिवस आपण तेच बोलतोय. पण बंगळूरुला जाण्याचा माझा निर्णय बदलणार नाही.’’ दिनेशचं बोलणं अर्धवट थांबवत भार्गवी म्हणाली. ‘‘तेच तर म्हणतोय मी, की तू बंगळूरुला गेल्यावर तुझी ती गिअरची सायकल पडून राहील तशीच. माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी आहे माझी. तिच्या मुलीला देऊ या वापरायला? तुला चालेल का?’’  दिनेशच्या बोलण्यानं अवाक् होत लेकीनं त्याला घट्ट मिठी मारली.  मेधाच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्हं वाचत दिनेशने ‘सांगतो नंतर’ अशा अर्थानं हसून मान हलवली. 

    दिनेशच्या फोननंतर रेखाही निवांत झाली होती. त्यानं पाठवलेला निळय़ा रंगाच्या सायकलचा फोटो तिनं मुलीला दाखविला. तिच्या मुलीनं ‘सेकंडहॅण्ड सायकल’ म्हणून तक्रार केली नव्हती. तिला मुलीचं फार कौतुक वाटलं. दोघीही आज हॉटेलमध्ये ब्रंच करू, म्हणत घराबाहेर पडल्या. रेखानं स्कूटी काढली.

      सागरचा फोन आला तेव्हा दिनेशला आठवलं, की मघाशी रेखाला फोन करताना चुकून याचा नंबर आधी लागला होता. त्याच अंदाजानं दिनेशने फोन घेतला.

‘‘अरे, काही नाही, चुकून लागला होता! सॉरी तुला डिस्टर्ब केलं!’’ दिनेश म्हणाला.

‘‘ओके, मला वाटलं की काही काम होतं, कारण मी शॉपिंगला आलोय!’’ सागर उत्साहानं म्हणाला.  दिनेशला आश्चर्य वाटलं. एरवी नशिबाला सतत दोष देणाऱ्या सागरच्या आवाजातला हा बदल त्याच्यासाठी नवीन होता. पण त्याच्या उत्साहात व्यत्यय न आणता, ‘‘ कॅरी ऑन!’’ म्हणत दिनेशनं फोन ठेवला.

 ‘‘सर, तुमची साइझ नसेल बहुतेक या पॅटर्नमध्ये.’’ 

‘‘अरे शोधून तर बघ, आधीच नकारघंटा कशाला वाजवतोस.’’ सागर दुकानातल्या त्या मुलाला म्हणाला.

‘‘सर, लकी यू, हा बघा मिळाला, परफेक्ट तुमच्या साइझचा!’’ दुकानातल्या मुलानं समोर ठेवलेला शर्ट पाहून सागरचा उत्साह दुणावला. दुकानातल्या आरशासमोर फिट बसलेल्या त्या शर्टमुळे त्याचा बदललेला लुक त्यालाच चकित करून गेला.

 रेखानं त्यांच्या आवडत्या हॉटेलपाशी स्कूटी थांबवली, पण पार्किंगला जागा दिसेना. तिच्या मुलीनं तिला त्या आवारातल्या एका कोपऱ्यात असलेली जागा दाखवली. रेखा त्या कोपऱ्यात स्कूटी लावण्याचा प्रयत्न करत होती.  पाच-सात मिनिटं मागे-पुढे करूनही स्कूटी ‘पार्क’ होईना तेव्हा रेखा थांबली. ही अ‍ॅडजस्टमेंट नव्हतीच जमत तिला.

 ‘‘अगं नाही राहाणार स्कूटी इथे, फारच अडचण आहे!’’ मुलीला म्हणत तिनं पलीकडे नजर वळवली.  तिथे थांबलेला रिक्षावाला रेखाची ही कसरत पाहात उभा होता. ‘‘लग जायेगा, मॅडम,’’  म्हणत त्यानं तिला हातानं खूण करत स्कूटी विरुद्ध दिशेनं लावण्याचा सल्ला दिला. त्यानं सांगितल्यानुसार स्कूटी वळवून लावल्यानं ती मस्त ‘पार्क’ झाली.  ‘‘देखा ना? मॅडम थोडा अँगल बदला तो काम बन गया!’’  ‘‘सही हैं! कभी कभी अँगल बदल के भी देखना चाहिए!’’ रेखा खळखळून हसत मुलीबरोबर हॉटेलमध्ये शिरली..

hemalees@gmail.com

 (लेखिका मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आहेत.)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angle in life angle change must see attitude itself chaturang article ysh
Show comments