सामान्य मुलांबरोबरच कर्णबधिर, अंध, बहुविकलांग किंवा मतिमंद अशा मुलांना एकाच छताखाली शिकण्याची व्यवस्था करत, सर्वसमावेशित शाळा शिक्षणाचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या ‘अंकुर विद्या मंदिर’च्या संस्थापिका माधुरी देशपांडे यांचे गेल्या पंचवीस वर्षांतले हे अनुभव त्यांच्याच शब्दांत..
अंकुर विद्यामंदिर स्थापन करून आज पंचवीस वष्रे झालीत. मागे वळून पाहताना अनेक गोड-कडू क्षणांची चित्रफीत डोळ्यांसमोरून सहज जाते आहे. गेल्या पंचवीस वर्षांत काय मिळविले याचा जर लेखाजोखा मांडला तर तो इतका गुंतागुंतीचा ठरेल. त्यापेक्षा हय़ा क्षेत्राकडे वळल्यानंतर मला आलेले अनुभव, अनुभूती यांवर केंद्रित करायला मला आवडेल.
आम्ही सुरुवात केली ते वर्ष होते १९८८. आमच्या शाळेत, ‘अपंग मुले आणि सामान्य मुले एकत्र एकाच वर्गात शिकतात,’ हे वाक्य ऐकून फारच थोडे लोक याचा स्वीकार करायचे. अनेक पालक आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत करण्यासाठी यायचे, ते विचारायचे, ‘माझी मुलगी नॉर्मल आहे, या अपंग मुलांना बघून ती त्यांच्यासारखीच तर वागायला लागणार नाही नं?’ यावर मी त्यांना उत्तर द्यायचे, ‘ तुमची मुलगी नॉर्मल आहे, तिला आपण बोललेले सगळे समजते, तेव्हा ती जर या मुलांचे अनुकरण करायला लागली तर आपण तिच्याशी बोलून, तिला समजावून सांगू शकतो की ही मुले अशी का वागतात? ही मुले अशी का चालतात? हय़ांना व्यवस्थित चालताच येत नाही, तुला किती छान चालता येते. मग तू छानच चाल..’ त्यानंतर अनेक पालकांना अशीही भीती असायची की अपंग मुलांमुळे वर्गातील शिकण्याची गती मंदावते, हे खरेच आहे. अपंग व सामान्य मुलांना एकाच वर्गात शिकविल्यामुळे शिक्षणाची गती मंदावते. परंतु बहुस्तरीय अध्यापनामुळे आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धतींनी शिकविल्यामुळे, शिकविण्याचा प्रभाव मुलांपर्यंत चांगला पोहचतो. म्हणून गती मंदावली तरी शिकवणे व शिकणे ही प्रक्रिया उत्तम प्रकारे होते व मुलांच्या संकल्पना स्पष्ट होतात. सामान्य मुलांच्या पालकांना अशीही भीती असते की माझ्या नॉर्मल मुलांकडे लक्ष दिले जाईल ना? ‘शिक्षकांचे लक्ष नॉर्मल मुलांकडे अधिक जाईल किंवा माझ्या मुलाला फारसे समजत नाही म्हणून शिक्षक त्याच्याकडे लक्षच देणार नाहीत.’ परंतु सर्वसमावेशक शाळांचे असेच धोरण असते की शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यावी व सर्वाकडे समान लक्ष पुरवावे. असे सांगितल्यावर त्या पालकांना हायसे वाटायचे. त्यांचा माझ्यावरचा विश्वास अधिक दृढ होत असे. मी त्यांना अनेक वेळा सांगायचे, ‘तुम्ही एक संपूर्ण दिवस मुलाबरोबर घालवायला शाळेत या, मग शिक्षक मुलांशी कसे वागतात हे तुम्हालाही कळेल.’ अशा अनेकविध मार्गाने पालकांचा विश्वास संपादन करून सर्व समावेशक शाळा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात मला यश मिळत गेले.
जी माणसे एखादा विषय समजावून घेऊन आपला विचार स्वीकारतात, त्यांच्या भरवंशावर आपण एखादी संकल्पना ठामपणे मांडू लागतो. त्याचप्रमाणे मी देखील थोडय़ा मुलांमध्ये ही संकल्पना राबविण्याचे ठरवले. संकल्पना तशी आपल्या देशात नवीनच. कारण कर्णबधिर, अंध, बहुविकलांग किंवा मतिमंद यांच्यासाठी स्वतंत्र सरकारी अनुदानित शाळा आहेत, परंतु सर्वासाठीची एकच शाळा बहुधा ही पहिलीच असावी. त्यामुळे मला अशीच शाळा सुरू करण्यात रस. त्यामध्ये फायदे दोनही गटांचे आहेत. सव्यंग मुलांना त्यांच्या समवयस्कांबरोबर राहण्या-खेळण्या-शिकण्याची संधी उपलब्ध करून देता येते. माझा अनुभव हेच सांगतो की आपल्या देशात सव्यंग मुलांना वेगळ्या शाळा असतात. एखाद्या कुटुंबात जर सव्यंग मूल जन्माला आले तर त्याच्यासाठी वेगळी शाळा, विशेष शाळा शोधण्याशिवाय पालकांना गत्यंतर नसते. परंतु आपल्या मुलाच्या अपंगत्वाची तीव्रता किती आहे, त्याची बौद्धिक क्षमता किती आहे, त्याला शिक्षण घेण्यात खरंच अडचणी येणार आहेत का? त्याला कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अपंगांच्या शाळा शोधण्यात गर्क असतात. मुख्य म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी अपंग आहे म्हणून तिला सामान्य मुलांबरोबर सामान्यांच्या शाळेत जाता येणार नाही, हा विचार त्यांच्या मनामध्ये पक्का झालेला असतो. एकदा माझ्याकडे एक पालक त्यांच्या नॉर्मल मुलाच्या प्रवेशासाठी आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा स्लो लर्नर (गतिमंद) मुलगाही होता. त्यांनी शाळेची चौकशी केली, फी पण विचारली आणि शाळेचा फॉर्मदेखील भरला आणि सोमवारपासून हय़ाला शाळेत पाठवतो असे म्हणाले व निघाले. तेव्हा मी त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल विचारले. तो दुसरा मुलगा त्या वेळी दोन वर्षांचा होतो. तो गतिमंद होता. त्याला सर्व गोष्टी शिकायला वेळ लागत होता. तो दोन वर्षांचा होईपर्यंत चालत नव्हता, अजून बाटलीने दूध पीत होता, आईला सोडून राहत नाही, असे ते पालक सांगू लागले. त्यामुळे त्याला विशेष शाळेत पाठवायचे ठरले आहे. मी त्यांना म्हणाले, ‘अहो, तुम्ही जे सांगता आहात त्यावरून त्याला विशेष शाळेत घालावे असे मला वाटत नाही. तो फक्त दोनच वर्षांचा आहे, त्याला आमच्याच शाळेत घाला व दोन्ही मुलांना एकाच शाळेत येऊ द्या. आईला पहिल्या महिनाभर येऊ द्या. म्हणजे दोन्ही मुलं छान रुळतील.’ हे ऐकल्यावर त्यांच्या कानावर त्यांचा विश्वासच बसेना. सर्व समावेशित शाळा शिक्षणाची हीच तर विशेष बाब आहे. सर्वाना समान संधी देणे. कोण कुठल्या प्रकारे या संधीचे सोने करेल ठाऊक नाही.
म्हणूनच भारत सरकारने विचारांती व आवर्जून याच पद्धतीचा अवलंब करायचे गेले काही वर्षांतच ठरविले आहे. शिक्षण हक्क कायद्यामध्ये ‘इन्क्लुजन’ हा प्रमुख भाग आहे. परंतु सर्वसमावेशित शाळा करणे ही दिसते एवढी सरळ बाब नाही. त्यासाठी मुख्याध्यापकांपासून ते सेवकांपर्यंत सर्वाना या ‘पद्धतीचे’ प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. मला, पहिली काही जर आवश्यकता भासली असेल तर ती ‘शिक्षक प्रशिक्षणाची’. केवळ डी. एड्. किंवा बी. एड्. शिक्षक असून सर्वसमावेशित शिक्षणाची गरज भागत नाही. त्यासाठी विविध अपंगत्वांची माहिती, त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्याची तरतूद व एकूणच मुलांची मानसिकता समजावून घेऊन त्यांना शिकविणे गरजेचे असते. त्यासाठी गेली १५ वष्रे मी सातत्याने शिक्षकांचे प्रशिक्षण एप्रिल महिन्यात घेत असते. यामध्ये शिक्षकांची वृत्ती व मानसिकता बदलणे, सर्व मुलांना समानतेने वागणूक देणे व कृतीही देणे, मुलांना त्यांच्या क्षमता ओळखून, त्यांच्या क्षमतांना कमी न लेखता कृती देणे, कोणत्या मुलाला कशाची गरज आहे, हे ओळखणे हे महत्त्वाचे मुद्दे चíचले जातात. शेवटी शिक्षक हा देखील एक मनुष्यच आहे, हे ओळखून त्याला सर्वसमावेशित शाळेचा बोजा वाटता कामा नये. अशा प्रशिक्षणासाठी अजून सरकार पातळीवर अगदी तोकडय़ा प्रमाणात प्रयत्न सुरू झालेले दिसतात. कालांतराने बी. एड्. अथवा डी. एड्.च्याच अभ्यासक्रमात सर्वसमावेशित शिक्षणाचा समावेश करणे अनिवार्य ठरेल यात शंकाच नाही.
आपल्या देशातील लोकांची मानसिकता इतकी भिन्न आहे की एखाद्या कुटुंबात विशेष गरजा असलेले मूल जन्माला आले तर त्याचा दोषही सर्वस्वी ‘आई’ला देऊन सर्व कुटुंब नामानिराळे होते. औषधोपचारांकरिता पुष्कळ प्रमाणात पसा लागतो. म्हणून आई-वडिलांना जास्त कामे करावी लागतात, जास्त धावपळ करावी लागते. परंतु सर्व भार आईवर टाकून कसे चालेल? अर्थातच त्या ‘विशेष’ मुलाचा स्वीकार खऱ्या अर्थाने होत नाही व त्याचे अपंगत्व दूर करण्यासाठीच सगळे जण प्रयत्न करीत असतात. त्याच्या क्षमतांचा विकास करण्याकडे कोणाचेच लक्ष नसते व अशातच त्याचे बालपण संपून जाते. म्हणूनच ‘अरली इंटरव्हेन्शन’ हे अपंग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते. जितक्या लवकर मूल शाळेत जाईल, सामान्य मुलांबरोबर आंतरक्रिया करेल, तितक्या लवकर त्याला त्याच्यात असलेल्या क्षमतांची जाणीव होईल व तो सामान्य जीवन जगायला सज्ज होईल. यासाठी त्याला शाळेतील इतर मुलांनी, शिक्षकांनी, सेवकांनी त्याच्या अपंगत्वासकट स्वीकारणे गरजेचे आहे.
‘अंकुर विद्यामंदिर’मध्ये शिकत असलेली मुले वेगळीच घडतात, असा माझा अनुभव आहे. अनेक प्रकारची सव्यंग मुले शाळेत असतात त्यामुळे सर्व मुलांच्या समस्या वेगळ्या; हे मुलं बघत असतात. त्यातून काही मुलांच्या समस्या सहजरीत्या सुटतात तर काही मुलांच्या काही समुपदेशनानंतर सुटतात. त्यामुळे कुठल्या समस्या कशा प्रकारे सुटतात हे देखील मुलांना समजते व ते त्याप्रमाणे वागण्याचा देखील प्रयत्न करतात. एकदा एका ‘सेरिब्रल पाल्सी’च्या मुलीला मी असे सांगितले ‘तुला रांगता येते ना, मग तू रांगतच जेवायच्या ठिकाणी येत जा.’ त्याप्रमाणे ती येऊ लागली. परंतु तिला जेवायच्या ठिकाणी यायला फार वेळ लागायचा. ती मुलगी आल्याशिवाय सगळी मुले जेवायची नाहीत. तिच्यासाठी थांबायची. काही दिवसांनी मुलामुलांनीच तिला सर्वाच्या आधी जेवणाच्या ठिकाणी जाण्यास सांगायला सुरुवात केली. म्हणजे मुलांना फार वेळ जेवायला थांबावे लागणार नाही. मला त्या मुलांचे फार कौतुक वाटले व त्याचबरोबर त्या मुलीला भरभर रांगताही येऊ लागले. ‘अंकुर विद्यामंदिर’ मध्ये २७५ मुलांपकी १०० मुले कुठल्या न कुठल्या अपंगत्वाने ग्रासलेली आहेत. परंतु शाळेत आल्यापासून, त्यांचा स्वीकार, उपचार सुरू झाल्यापासून त्यांना आपण कोणी वेगळे आहोत याची जाणीवच झालेली नाही, तशी कोणी करूनही दिलेली नाही. ‘मला ऐकू येत नसले तरी माझ्याशी सगळी मुले बोलतात,’ अशी प्रतिक्रिया एका मुलीने दिली. ‘मला चालता येत नसले तरी मला माझे मित्र ‘व्हीलचेअर’वरून घेऊन जातात, अगदी टेकडीवरसुद्धा.’ ही प्रतिक्रिया एका ‘सेरिब्रल पाल्सी’च्या मुलाने दिली. वर्गामध्ये बहुस्तरीय अध्यापन केल्याने दृष्टिहीन, कर्णबधिर, मतिमंद, गतिमंद अशा सर्व मुलांचा समावेश करता येतो, हेच अंकुरच्या शिक्षकांनी दाखवून दिले आहे. अंकुर विद्यामंदिरमध्ये प्रत्येक शिक्षकाला त्याच्या तासाचे टाचण करणे आवश्यक किंवा अनिवार्य असते. त्या टाचणामध्ये सामान्य मुलांसाठी काय शिकवणार, इतर सव्यंग मुलांना काय शिकवणार हे सगळे लिहिणे अपेक्षित असते. वर्गातील प्रत्येक मुलांपर्यंत अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक पोहचावा, असा माझा मानस आहे. प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवावे म्हणजे सर्वच मुलांना त्याचा फायदा होतो, हे माझ्या लक्षात आले. सर्व शिक्षक बहुस्तरीय अध्यापन करतात. म्हणजे एकाच वर्गात जरी २-३ स्तरांची मुले असली तरी त्यांना अध्ययन करण्यात फारशा अडचणी येताना दिसत नाही. एखाद्या कमी दृष्टी असलेल्या मुलाला जर पाठय़पुस्तकांची एनलार्ज प्रत द्यावी लागली तर तीही देण्यात येते. काही मुलांना चित्रांच्या माध्यमातून शिकवावे लागते. शिक्षकांची भरपूर तयारी असल्याशिवाय हे सर्व शक्य होणार नाही.
शिक्षक उपक्रमशील, प्रयोगशील व वेगवेगळ्या साधनांचा वापर करणारे असणे गरजेचे असते. खरं तर अशी अध्यापन-अध्ययन पद्धती सर्वच शाळांमध्ये राबविली गेली पाहिजे. परंतु केवळ मुलांना अभ्यासक्रमाची ओळख करून घेणे हा उद्देश नाही, तो त्यांना उलगडून सांगणे व समजावणे हा आहे. म्हणजेच सर्व संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. सर्वसमावेशित शिक्षण ही प्रक्रिया आहे, एखाद्या समस्येवरचे उत्तर आहे हे निश्चित. सर्वसमावेशित शाळेचे फायदे जसे अपंग मुलांना होतात, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात सामान्य मुलांना होताना दिसतात. एखाद्या कर्णबधिर मुलाच्या कानात लावायचे यंत्र जर सलपणे बसले तर त्याचा कर्कश आवाज इतरांना येतो. ते आमच्या नॉर्मल मुलांना लगेच समजते व ते कर्णबधिर मुलांचे यंत्र नीट बसवून देतात. एखाद्या पॅराप्लेजिक मुलाला सगळ्यांच्या बरोबर जेवता येत नाही, त्याला भरवावे लागते तर त्याच्या वर्गातील मुले आळीपाळीने डय़ुटी लावून घेऊन त्याला सगळ्यांच्या बरोबर हसत-खेळत जेवणाची मजा घेऊ देतात. एकदा आम्ही मुंबईला जात असताना आमच्या शेजारी एक अंध व्यक्ती बसली होती. कर्जत आल्यावर मी मुलांना वडे घ्यायचे आहेत का विचारले. तेव्हा एका मुलाने त्या अंध व्यक्तीकडे बोट दाखवून खुणेने विचारले, हे काका काय खातील. मी म्हणाले, ‘त्यांना काय कळणार आहे की आपण वडे खातो आहोत?’ त्यावर तो चटकन म्हणाला, ‘त्यांना वास नाही का येणार?’ ही संवेदनशीलता मुलांमध्ये बघून मला खूप आनंद झाला. आजकालच्या जीवनपद्धतीत एकमेकांकडे बघण्यासाठीसुद्धा जिथे वेळ नसतो तिथे सहानुभूती, संवेदनशीलता, अनुकंपा, सहिष्णुता यांसारखी मूल्ये रुजविणे तर कठीणच. परंतु अंकुर विद्यामंदिरसारख्या शाळांमधून हे सहज शक्य होऊ शकते, घडू शकते.
या प्रवासामध्ये अनुकूल असे काहीच नव्हते. सर्वच प्रतिकूल! परंतु आम्ही सर्व शिक्षकांनी गेल्या २५ वर्षांत प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे जाण्याचा ध्यास घेतला. प्रवास खडतर तर होताच, आव्हानात्मकही होता (आत्मविश्वास होता) सहृदयतेने व माणुसकीच्या नात्याने आपण सर्वसमावेशक समाज निर्माण करू शकतो. अंकुर विद्यामंदिर ही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातली पहिलीच शाळा आहे, जिथे ३० टक्के सव्यंग व ७० टक्केमुले अव्यंग आहेत. तरी शासनाला या शाळेला ‘सर्वसमावेशित शिक्षणाची शाळा’ अशी मान्यता द्यावीशी वाटलेली नाही. सरकारदरबारी ‘देर है पर अंधेर नही.’ आम्हाला भरपूर आशा आहे पण शासनमान्यता मिळण्यापेक्षा समाजमान्यता मिळणे केव्हाही श्रेयस्कर असते. ज्या समाजात आपण राहतो त्याच समाजासाठी सर्वसमावेशित शिक्षणाची नितान्त गरज आहे, त्याच्यासाठी काम करण्याचे भाग्य आम्हा सर्वाना लाभेल याचेच समाधान अधिक मोलाचे आहे.
संपर्क -माधुरी देशपांडे
पत्ता-अंकुर विद्यामंदिर, गेट नं. १, दुसरा बंगला, फग्र्युसन महाविद्यालय परिसर, एफ.सी.रोड, शिवाजीनगर, पुणे ०४
दूरध्वनी-०२०-२५६६०५७४ / २५६६२६३६
ईमेल – info@ankurvidyamandir.org
वेबसाइट-http://ankurvidyamandir.org
एकमेकां साहय़ करती सव्यंग-अव्यंग
सामान्य मुलांबरोबरच कर्णबधिर, अंध, बहुविकलांग किंवा मतिमंद अशा मुलांना एकाच छताखाली शिकण्याची व्यवस्था करत
First published on: 19-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankur school founder madhuri deshpande