लाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे. कमी कॅलरीज, कोलेस्टोरॉल नाही आणि भरपूर चोथा, शिवाय आकर्षक रंग तरीही आपल्याकडे भोपळ्याच्या भाजीला कनिष्ठच समजलं जातं. याउलट परदेशात हॅलोविनला लाल भोपळ्याचे अनेक पदार्थ आवर्जून केले जातात. लाल भोपळ्यात अ, क आणि ई जीवनसत्त्व असून बी कॉम्प्लेक्स आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय त्यात कॉपर, पोटॅशियम आणि कॅल्शियमही आहे. लाल भोपळ्याच्या सेवनाने डोळ्याचं आरोग्य चांगलं राहातं. भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. लाल भोपळ्याच्या फुलात क जीवनसत्त्व तसंच फॉलिक अॅसिड असून कॅल्शियम आणि फॉस्फरसही मोठय़ा प्रमाणावर आहे. या फुलांचीही भाजी केली जाते तरीही एकंदरीत थोडीशी दुर्लक्षित असलेली ही भाजी आहे.
लाल भोपळा खांडवी
साहित्य : १ वाटी बासमती तांदळाचा रवा, २ मोठे चमचे तूप, १ संत्रं, २ वाटय़ा लाल भोपळ्याचा कीस, २ वाटय़ा नारळाचं दूध, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, १ चमचा भाजलेली खसखस, चवीला मीठ.
कृती : तुपावर रवा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावा. त्यात भोपळ्याचा कीस घालून परतावा. मग नारळाचं दूध, मीठ आणि लागेल तसं पाणी घालून रवा शिजवावा. नंतर त्यात गूळ, संत्र्याचा रस, २ चमचे संत्र्याची किसलेली सालं मिसळून एक-दोन वाफा द्याव्या. गूळ विरघळून शिरा मोकळा झाला की तूप लावलेल्या थाळीत थापावा, वर खसखस पेरावी आणि गार झाल्यावर वडय़ा कापाव्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com

मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on red pumpkin