बेसिल ही वनस्पती तुळशीच्या कुटुंबातली असून तिलाही ताजा सुगंध असतो. आपण तुळस पवित्र आणि औषधी मानतो, पण तिचा स्वयंपाकात फारसा उपयोग करीत नाही. पण बेसिलमध्ये औषधी गुणधर्म तर आहेतच, शिवाय ती फार मोठय़ा प्रमाणावर खाद्यपदार्थात वापरली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेसिलमध्ये रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक आहेत, शिवाय त्यातली अ आणि क जीवनसत्त्वं उल्लेखनीय आहेत. तुळशीप्रमाणे बेसिलमध्येही अ‍ॅन्टी बॅक्टिरिअल गुणधर्म असून श्वसनसंस्थेच्या सर्व रोगांवर बेसिल गुणकारी आहे. बेसिलच्या अर्कात युजेनॉल असून त्याचा उपयोग मधुमेह आणि हृदयरोगाच्या औषधात केला जातो.
सॅलड, पास्ता अशा अनेक पदार्थात बेसिल वापरली जाते. पेस्टो करण्यासाठी तर बेसिल हवीच.
पेस्टो पास्ता
साहित्य : ४ कप पेनी पास्ता, २ लिटर पाणी, २ कप बेसिलची पानं, ४ लसूण पाकळ्या, १/२ कप अक्रोड, २/३ कप ऑलिव्ह ऑईल, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीसाठी मीठ.
कृती : पाणी उकळून त्यात पास्ता घालावा, १/२ चमचा मीठ आणि १ चमचा तेल घालावं, पास्ता बोटचेपा झाला की चाळणीत निथळावा. बेसिलची पानं, लसूण, अकोड प्रोसेसरमध्ये घालून फिरवावं. त्यात ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि मिरपूड घालून पेस्ट करावी. गरम पास्त्यावर पेस्टो घालून खावं.

वसुंधरा पर्वते –
vgparvate@yahoo.com

मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Besil tree