शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं या सगळ्यांचा भाजीत वापर करतात. या झाडाला ‘पॉवर हाऊस ऑफ मिनरल्स’ म्हणतात. कारण याच्या शेंगा, पानं, फुलं ही अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं यांनी समृद्ध आहेत. पानांमध्ये बी ६, फॉलेट, थायमिन असून त्यात अ, क आणि के जीवनसत्त्वं आहेत. शिवाय कॅल्शियम, लोह, कॉपर आणि मँगेनीज आहे. शेंगांमध्ये चोथा तर आहेच शिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगेनीज आहे. आफ्रिका आणि आशियात शेवग्याच्या पानांची पावडर आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी करतात. स्तन्यपान देणाऱ्या मातांसाठीही पानं आणि शेंगा उपयोगी आहेत. शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं पिठलं किंवा आमटी किंवा सांबार फारच चविष्ट लागतं.
शेवग्याच्या शेंगांचं सार
साहित्य : ८-१० शेवग्याच्या शेंगा, ४ वाटय़ा नारळाचं दूध, १ मोठा चमचा तूप, १ चमचा जिरं, १ हिरवी मिरची, १ मोठा चमचा चिंचेचा कोळ, चवीला मीठ आणि गूळ.
कृती : शेवग्याच्या शेंगांचे बोटाएवढे तुकडे करून वाफवावे. तूप तापवून त्यात जिरं तडतडवावं, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतून त्यात नारळाचं दूध घालावं, त्यात मीठ, गूळ, चिंच आणि शिजलेल्या शेंगा घालून एक उकळी द्यावी.
vgparvate@yahoo.com