खारीक ही खजुराची बहीण असली तरी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधात तिचं स्थान विशेष आहे. स्त्रियांच्या सर्व तक्रारींवर विशेषत: प्रसूतीनंतर खारीक आहारात असायला हवी असं सांगतात. वाईट कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी, शरीराला लोहाचा पुरवठा करण्यासाठी खारकेचा उपयोग होतो. खारकेत भरपूर फायबर, जीवनसत्त्व बी १, बी २, बी ३,बी ५ असून पोटॅशियमही आहे. योग्य प्रकारे वजन वाढण्यासाठी खारकेचा वापर करावा, लहान मुलांना उगाळून द्यावी, मोठय़ाने भिजवून किंवा पावडर करून खावी. खारकेची पूड दुधात शिजवून घेतली तर नक्कीच फायदा होतो.
बदाम-खारीक वडय़ा
साहित्य : १ वाटी खारकेची बारीक पूड, १/२ वाटी बदामाची पावडर, १ वाटी दुधाची पावडर, १ चमचा सुंठ पावडर, १ मोठा चमचा कोको पावडर, १/२ चमचा जायफळ पावडर, दीड वाटी साखर, १ वाटी दूध.
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून शिजवावं. मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरडय़ा दिसायला लागल्या की तुपाचा हात लावलेल्या थाळीत मिश्रण थापावं आणि थोडय़ा वेळाने वडय़ा कापाव्यात. या वडय़ा पटकन होतात.
वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com