वैदिक काळापासून तीळ आणि तिळाचे तेल यांचे महत्त्व सर्वानी मान्य केलेले आहे. तांबे आणि मँगनीजने समृद्ध असलेले तीळ संधिवातातील दुखण्यासाठी उपयुक्त ठरतात. तिळातील झिंक हाडे बळकट करतात, तसेच मॅग्नेशियम श्वसनसंस्थेच्या व्याधीसाठी परिणामकारक ठरते. काळे तीळ तर जास्त गुणकारी.
तिळाच्या तेलात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. तसंच तोंडातील रोग बरे करण्यासाठी आणि मसाज करण्यासाठी तिळाचे तेल वापरले जाते. आतडय़ाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठीही तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. संक्रांतीला केलेला तिळगूळ, तीळ लावून केलेली भाकरी प्रसिद्ध आहे. भाजलेले तीळ तिखट-गोड पदार्थात पेरण्याची सवय ठेवल्यास ते सहज पोटात जातील.
तिळाचे मॅक्रुन्स
साहित्य : तीळ, आयसिंग शुगर आणि बारीक साखर प्रत्येकी अर्धी वाटी , एका अंडय़ातील पांढरा भाग, पाव चमचा जायफळ किंवा चिमूटभर केशर.
कृती : तीळ भाजून आयसिंग शुगरबरोबर पूड करावी. अंडय़ातील फक्त पांढरा भाग आणि साखर मिश्रण घट्ट होईपर्यंत फेसावी. फेसताना त्यात जायफळ, केशर घालावे. त्यात तिळाची पावडर हलक्या हाताने मिसळावी. तुपाचा हात लावलेल्या ट्रेवर एक एक चमचा मिश्रण घालून १६० सें.वर तापलेल्या ओव्हनमध्ये १० ते १५ मिनिटे मक्रुन्स भाजावे.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा