२०१५ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेती लेखिका स्वेतलाना अलेक्झिएविच ही बेलारुसमधील पहिली नोबेल विजेती आणि पहिली शोध-पत्रकार. स्वेतलानाची पुस्तकं वास्तव सांगतात, पण ती वाचताना मनाला खूप त्रास होतो. डोकं सुन्न होतं. आपण अंतर्मुख होतो. स्वेतलानाने उघड केलेल्या अनेक गोष्टींमुळे तिलाही राजकीय रोषाला तोंड द्यावं लागलं. दहा-एक वर्ष वनवास पत्करावा लागला. पण तिनं सत्याचं दस्तावेजीकरण करत ते लोकांपुढे मांडणं सोडलं नाही.
‘‘ती रात्र, खरं म्हणजे काळरात्रच!
२६ एप्रिल १९८६ च्या त्या रात्रीच्या अवकाशात, काही क्षणांत आमच्या तोवरच्या आयुष्याचा काळ इतिहासजमा झाला. एका नव्या वास्तवात आम्ही एकदम उडी मारली. पण त्या वास्तवाची माहिती आम्हाला नव्हती आणि कधी आम्ही तशा वास्तवाची कल्पनाही केली नव्हती. काळाचा सांधाच मुळी निखळला. भूतकाळ एकदम वांझ झाला. त्याचा-आमचा संबंधच संपला जणू. आमची आयुष्यं म्हणजे सगळ्याला वेढून राहिलेलं, जुनंपुराणं, धूळ भरलं सरकारी दप्तर झालं आणि ते दप्तर उघडण्याची किल्ली सापडेना. शब्दही हरवले. बोलायसाठी ते सापडेनात.. ते महासंकट आलं तो क्षण आणि तोंडून शब्द फुटेपर्यंतचा काळ म्हणजे एक खूप मोठा पॉझ होता. सगळ्यांची दातखीळ बसली होती. आज तीस वर्षांनंतरही त्या घटनेची आठवण अंगावर काटा आणते.’’
२०१५ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेती लेखिका स्वेतलाना अलेक्झिएविच (१९४८) हिने २६ एप्रिलच्या रात्री चेनरेबिल येथील अणुभट्टीत झालेल्या प्रचंड स्फोटाबद्दल लिहिलेल्या ‘चेर्नोबिल प्रेयर’ या विलक्षण पुस्तकाच्या मनोगतातील या काही ओळी. हे पुस्तक म्हणजे अनेक व्यक्तींच्या स्वगतांचा एक कोलाज आहे. स्वेतलाना ही बेलारुसमधील पहिली नोबेल विजेती आणि पहिली शोध-पत्रकार. शोध-पत्रकारिता करताना अनेकांचे मुखवटे फाडून काढावे लागतात किंवा ते गळून पडतात. त्यामुळे साहजिकच सरकार व नेतेमंडळी यांचा रोष सहन करावा लागतो. नुकतंच झालेलं लिऊ शियाओबो या नोबेल विजेत्या चिनी लेखकाचं उदाहरण डोळ्यांसमोर आहेच. स्वेतलानाने उघड केलेल्या अनेक गोष्टींमुळे तिलाही अशा रोषाला तोंड द्यावं लागलं. दहा-एक वर्ष वनवास पत्करावा लागला. पण तिनं सत्याचं दस्तावेजीकरण करत ते लोकांपुढे मांडणं सोडलं नाही. तिच्या या धैर्याची नोंद घेताना नोबेल समितीनं म्हटलं, ‘‘स्वेतलानाचं लेखन बहुमुखी आहे. आपल्या लेखनातून तिनं आमच्या काळातील असीम धैर्य आणि अतीव वेदना यांचं जणू स्मारकच उभं केलं आहे.’’
साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे रशियन लेखक – सोल्झेनित्सिन, पास्तरनाक, ब्रॉडस्की किंवा बुनीन यांना हा पुरस्कार मिळाला तरी स्वदेशात त्यांच्यावर टीका झाली व सरकारचा रोष सहन करावा लागला. सरकारविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना पुरस्कार नाकारावा लागला किंवा हद्दपार व्हावं लागलं. स्वेतलानाही त्याच परंपरेची कडी ठरली.
स्वेतलाना म्हणते, ‘‘विसावं शतक इतिहासात कशा-कशासाठी नोंदलं जाईल? तर अतिसंहारक जागतिक महायुद्धं, भिन्न-भिन्न विचारप्रणालींचा आग्रह धरून, परिवर्तन घडवू पाहण्यासाठी, देशा-देशांत झालेल्या लहानमोठय़ा क्रांती, या साऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना आहेत आणि त्या नोंदल्या जातीलच. पण सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे ज्यामुळे काही क्षणांत सर्वात भीषण संहार झाला अशी घटना. २६ एप्रिल १९८६ च्या रात्री चेनरेबिल येथील अणुभट्टीत झालेला प्रचंड स्फोट! मी त्याची साक्षीदार आहे. मी तिथेच राहिले आहे. आज इतक्या वर्षांनंतर विचार करताना वाटतं, मी खरंच कशाची साक्षीदार होते? भूतकाळातील घटनेची की भविष्याची? पण त्या घटनेनं विचारक्षम लोकांच्या डोळ्यांत अंजन घातलं होतं, भयानक भविष्याची जाणीव करून दिली होती. त्या घटनेनं आपल्या स्वत:बद्दलच्या आणि जगाबद्दलच्या जुन्या कल्पनांनाच आव्हान दिलं होतं. एका नव्या इतिहासाची सुरुवात चेनरेबिलनं केली होती.’’
चेर्नोबिल. त्याकाळी रशियाचा भाग असणाऱ्या युक्रेन व बेलारुस या दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील गाव. पहाटे दोनच्या सुमारास चेर्नोबिल अणुभट्टीत काही चाचण्या चालू असताना स्फोट झाला आणि न भूतो अशी आग लागून प्लॅन्ट-परिसर भस्मसात झाला. जीवितहानी, वित्तहानी खूप झाली. किरणोत्साराने आजूबाजूचा ४०-५० कि.मी.चा प्रदेश इतका दूषित झाला की त्या परिसरातील सर्व नागरिकांना ताबडतोब गाव सोडून जाण्याविषयी सांगण्यात आलं. मात्र त्या किरणोत्सर्गाचा परिणाम इतका तीव्र होता की, अजूनही तिथे माणसांना वस्ती करणं अशक्य आहे. अधिकृत चौकशी झाली, अहवाल आले. मानवी चुकीने, इमारतीच्या सदोष बांधकामामुळे, अपुऱ्या सुरक्षायंत्रणेमुळे अपघात घडला हे सिद्ध झालं. ज्या प्रमाणात लोकांची हानी झाली, त्या मानाने संबंधितांना सौम्य शिक्षा झाल्या. त्यावेळी सोव्हिएट रशिया एकत्र होता. साम्यवादी सरकार होतं. गोर्बाचेव्ह यांचा उदय होत होता. नवीन आर्थिक धोरणाची चाहूल लागत होती. पण सरकारने अनेक गोष्टी दडपल्या होत्या.
स्वेतलाना म्हणते, ‘‘मी चेनरेबिलची घटना कशी, का घडली हे सांगण्यासाठी हे लिहिलं नाही. त्यावर अनेक पुस्तकं आली आहेत. माझी ही बखर भविष्यासाठी आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या आया, बहिणी, बायका, वडील, भाऊ अशा शेकडो लोकांच्या मुलाखती मी घेतल्या. बटण दाबून दिवा बंद करावा, अंधार व्हावा, तितक्या क्षणभरात यांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली. आपलं सगळं तिथेच सोडून घाईघाईने बाहेर पडताना, आपण घरी येऊ शकणार नाही ही कल्पना त्यांना आलीच नाही. सरकारने खरी परिस्थिती त्यांना सांगितली नाही. आजही तिथे काळवंडलेली, ओस पडलेली घरं आहेत. माणसं नाहीत. त्यांच्या भावभावना काय होत्या त्या मी जाणून घेत त्यांच्या नोंदी करत गेले. त्यात सामान्य, तरुण माणसं होती, तशीच उच्चशिक्षित, निवृत्त होती. नवीन लग्न झालेली, वयस्कर, मुलं-बाळं होती. त्यांनी या घटनेकडे कसं पाहिलं ते त्यांच्याशी बोलत मी समजून घेत गेले.’’
धाडसी व कणखर स्वेतलानाचा जन्म युक्रेनमध्ये झाला. आई युक्रेनियन आणि वडील बेलारुशियन. मध्यमवर्गीय परिस्थिती. आई-वडील शिक्षक. घरात सुसंस्कृत वातावरण. आजोळी युक्रेनमध्ये व बेलारुसमध्ये तिचं बालपण गेलं. लहानपणापासून इतर रशियन मुलांप्रमाणेच कोणत्यातरी युद्धाची चर्चा व साम्यवादप्रणीत कडक शिस्त, परंपरा यांचं दडपण मनावर असे. दुसरं महायुद्ध संपलं तरी त्याचे पडसाद सर्वत्र भरलेले होतेच.
शालेय शिक्षण संपताच तिनं वृत्तपत्रातून लिहायला आरंभ केला होता. वयाच्या पाचव्या वर्षांपासून तिला लेखकच व्हायचं होतं. ती बेलारुशियन विद्यापीठातून पदवीधर झाली. कविता, नाटकं, पटकथा लिहिल्या, वृत्तपत्रात काम केलं, पण स्वतंत्र निर्मिती करायची आस होती. लेनिनग्राडच्या लढय़ाविषयीचा मौखिक इतिहास लिहिणाऱ्या ऑलेस अडामॉविच यांच्या लेखनातून तिला प्रेरणा मिळाली आणि आपण दस्तावेजीकरणातून मौखिक इतिहास उभा करायचा निश्चय तिने केला.
इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या, विविध राजवटी आणि राजकीय डावपेच? ज्यावेळी एखादी महत्त्वाची घटना घडते, तेव्हा केवळ अधिकारी, राजे, सरदार त्यात सामील नसतात, तर त्यांच्याबरोबर कितीतरी सामान्य माणसे वेगवेगळ्या कारणांनी त्यात गुंतलेली असतात. त्यांचे अनुभव वेगळे, त्यांचा दृष्टिकोन वेगळा! त्यांचा विचार कोणी इतिहास-लेखक करतो का? पुन्हा त्यात पुरुषांचाच विचार होतो, युद्धातील यश नेहमी पुरुष हिसकावून घेतात. स्त्रियांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग असतो हे सोयीस्करपणे विसरलं जातं. इतिहास-लेखनात वर्गीय, लिंगाधारित प्रेरणा प्रबळ ठरतात का? इतिहास-लेखकाचा आवाज महत्त्वाचा ठरतो का? असे प्रश्न तिला पडत असत. आपण या गोष्टी टाळायच्या असं तिनं ठरवलं. ती लोकांपर्यंत पोचून त्यांना बोलतं करू लागली. त्यांच्या प्रेरणा जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागली. एखादं ऐतिहासिक तथ्य जितकं अचूकपणे माहीत असावं तितकंच त्या काळातलं समाजमनही माहीत असावं या भावनेतून तिनं मौखिक इतिहास लिहिण्यासाठी, मुलाखती घेणं व इतर माहितीची जुळवाजुळव सुरू केली आणि काय आश्चर्य! अनेक, अनपेक्षित, पण महत्त्वाच्या गोष्टी तिच्या हाती लागत गेल्या. तिची शोध-पत्रकारिता यशस्वी झाली.
रशियातील अनेक प्रकारची बंधनं, सारखं गप्प राहण्याचे आदेश आणि लोकांपर्यंत खरं काही पोचू नये यासाठी केली जाणारी धडपड यामुळे बहुसंख्य जनता घोर अज्ञानात असे. स्वेतलानाने आपल्या पुस्तकांमधून कितीतरी अज्ञात बाबींचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात रशियन स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर सामील झाल्या होत्या. पण युद्धविषयक साहित्यात त्यांचा उल्लेख नाही, म्हणून तिनं त्यांच्यावरच लिहिलं.
तिचं पहिलं पुस्तक होतं, ‘वॉरस् अन्वुमनली फेस’ (१९८५) रशियनमधील हे पुस्तक इंग्रजीत आलंय ते ‘द अन्वुमनली फेस ऑफ द वॉर’ या नावानं. दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या स्त्रियांची मनोगतं तिनं यात त्यांच्याच शब्दात दिली आहेत. यासाठी प्रत्यक्ष सीमेवर लढलेल्या, मागच्या फळीत असणाऱ्या, सैन्यातच वेगवेगळी कामं करणाऱ्या अशा शेकडो स्त्रियांच्या मुलाखती तिनं घेतल्या आणि त्या त्यांच्या स्वगतरूपात दिल्या. या वेगळ्या आकृतिबंधात त्यांचे साधे शब्द, मनातील नाजूक भावनाभिव्यक्ती यामुळे ही स्वगतं वाचनीय झाली आहेत. दुसऱ्या महायुद्धातल्या मित्र-राष्ट्रांच्या विजयाची आणि एकूण प्रत्येक युद्धाची रशियाने एक आख्यायिकाच केली व सोव्हिएट प्रचारात त्याचा उपयोग केला. स्वेतलानाच्या पुस्तकाने ही आख्यायिका खोटी ठरवली. खरं रूप दाखवलं. तिला वाटे, स्त्रिया भावनेनं जगतात. स्वत:च, स्वत:च्या आयमुष्याचं निरीक्षण करतात. लढताना किती सैनिक मारले, कसे मारले यापेक्षा सीमेवर लढताना काय वाटलं हे ऐकावं. त्याकाळात गोर्बाचेव्ह यांनी देखील तिच्या या पुस्तकाच्या शीर्षकाचा आपल्या भाषणात उल्लेख केला. पण पुस्तकाला सेन्सॉरशिपचा तडाखा बसला होताच. १९९१मध्ये रशियात वाङ्मयीन, बौद्धिक स्वातंत्र्याचा काळ आला तेव्हाच सेन्सॉरशिप नसणारी आवृत्ती आली. या पुस्तकाने स्वेतलाना घराघरात पोचली. तिला मोठा नागरी पुरस्कार मिळाला.
रशिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चाललेल्या युद्धाची माहिती सरकारने रशियन जनतेपासून मोठय़ा शिताफीने दडवली होती. स्वेतलानाला योगायोगाने या युद्धावर गेलेले आणि त्या दीर्घकालीन युद्धाचा मानसिक दुष्परिणाम झालेले तरुण भेटले. तिला मोठाच धक्का बसला आणि तिने यामागील सत्य शोधायचा निर्णय घेतला. ती काबूलला गेली, प्रत्यक्ष युद्धाच्या ठिकाणी गेली, तेव्हा हादरून गेली. एक भयंकर सत्य पुढे आलं. कितीतरी रशियन कोवळी मुलं तिथे पाठवली गेली होती. ती युद्धावर जाताहेत का, कुठे जाताहेत याची कल्पना घरातल्यांना नव्हती. त्यातले कितीजण मारले गेले हे त्यांची प्रेतं आणणाऱ्या शवपेटिका येत तेव्हाच कळे. त्या जस्ताच्या शवपेटिका म्हणजे गावागावातील तारुण्याचा शेवट होता. त्यांच्याशी संबंधित लोकांच्या मनोगतांवर आधारित पुस्तकाला तिनं अतिशय भेदक नाव दिलंय, ‘द बॉइज इन झिंक (झिंकी बॉइज)’ दरवर्षी एक लाख सैनिक पाठवले जात. मृतांचा अधिकृत आकडा मात्र केवळ ५०,००० आहे. हे सगळं बाहेर आल्यावर बॉम्ब पडल्यासारखंच झालं. सैन्याधिकारी व साम्यवादी वृत्तपत्रं यांनी तिच्यावर झोड उठवली आणि न्यायालयात तिच्यावर खटला भरून पुस्तकावर बंदी आणली. यावेळी लोकशाही मानणारे लोक तिच्या पुस्तकाच्या बाजूनं उभे राहिले. त्यांनी तो खटला मागे घ्यायला लावला.
१९९१ मध्ये सोव्हिएट रशियाची शकलं झाल्यावर, अनेक जुन्या लोकांना भिरभिरल्यासारखं झालं. आपण काय करायचं हेच कळेना. स्वतंत्रपणे विचार करणं, साम्यवादाशिवाय इतर काही स्वीकारणं, आदेश न येता जगणं त्यांना जमेना. त्यांच्यातील अनेकांनी आत्महत्या केल्या. आपलं जुनं आयुष्य किती चांगलं होतं असं त्यांना वाटू लागलं. विशेष म्हणजे त्यांच्यातील अनेकांचा साहित्याशी संबंध तुटला. एकजण आपल्या मनोगतात म्हणतो, ‘‘हे कसलं जग? इथले कानून वेगळे. इथे सगळं पैशात मोजलं जातं. तुम्ही सगळा हेगेल कोळून प्यायला असलात तरी पैसा नसेल तर तुम्ही नगण्य! मानव्यशास्त्रं म्हणजे यांना विकृती वाटते.’’ दुसरी एक प्रौढ स्त्री म्हणते, ‘‘आता सगळी बौद्धिक परंपराच संपली. एका हातात मृत्युपंथाला लागलेली माझी मुलगी आणि दुसऱ्या हातात सोल्झेनित्सिन धरणारी मी! पुस्तकं हा तेव्हा जगण्याला पर्याय झाला होता. पुस्तकं म्हणजे आमचं विश्व होतं.’’ नव्या जगाशी, भांडवलशाही जीवनशैलीशी जुळवून घेणं त्यांना जमेना. विलक्षण नैराश्यापोटी हे आयुष्य नकोसं वाटलं. (सेकंड-हँड टाइम-२०१३)
स्वेतलानाची पुस्तकं वास्तव सांगतात, पण ती वाचताना मनाला खूप त्रास होतो. डोकं सुन्न होतं. आपण अंतर्मुख होतो. ती म्हणते, ‘‘आपल्याभोवतीचं वातावरण क्षुल्लकाला महत्त्व देतंय. याच्याशी कसं जुळवायचं? ही क्षुद्रता, क्षुल्लकपणा टाकायचा असेल तर माणसाच्या अंतर्मनातील गोष्टींचाच शोध घ्यायला हवा.’’ तो तिने घेतला खरा पण आताच्या दडपशाहीच्या, मुखवटय़ांच्या, हिंसक, वातावरणात तिनं शोधलेला हा सर्वसामान्यांचा आवाज त्या सर्वसामान्यांना तरी ऐकावसा वाटतोय का? त्यासाठी काही कृती करावी असं तरी वाटतंय का? असा खरा प्रश्न पडतोय.
डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com