आयुष्यभर मेरी मॅकार्थीनं आयुष्यभर बौद्धिक संघर्ष केला, पण लहानपणापासूनच्या पोरकेपणाच्या भावनेवर ती मात करू शकली नाही. लेखनात आपलं वेगळं, वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मेरीनं शेवटी आयुष्याचा जमाखर्च कसा मांडला असेल?

गेल्या महिन्यात २१ मार्चला ‘न्यूयॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ या प्रसिद्ध पाक्षिकाचे संपादक रॉबर्ट सिल्व्हर्स यांचे निधन झाले. आपले गोविंदराव तळवलकर गेले त्याच दिवशी. जिच्या लेखनाला या पाक्षिकाने नेहमीच मानाचे स्थान दिले होते, त्या मेरी मॅकार्थी या लेखिकेच्या अक्षरवाटेवरील प्रवासाबद्दल लिहायची मी तयारी करत असतानाच ही बातमी आली. १९६३ च्या फेब्रुवारीत या पाक्षिकाचा पहिला अंक निघाला होता आणि त्यात मेरीचा लेख होता. तेव्हापासून आपल्या मृत्यूपर्यंत मेरी मॅकार्थी कायमच या पाक्षिकाची लेखिका होती.

‘‘तसा माझा रूढार्थानं दैहिक जन्म जरी १९१२ मध्ये झाला असला तरी माझं मन (म्हणजेच माझी विचारशक्ती) जन्माला आलं ते १९२५ च्या सुमारास. अर्थातच या मधल्या तेरा वर्षांत माझ्या मनात काही विचार आलेच असतील, मेंदूची करय चालू असतील, ठसे उमटले असतील, पण त्यात माझी जाणीवपूर्वकता किती होती कोण जाणे! मात्र अगदी सुरुवातीपासून आपण हुशार, तरतरीत आहोत, प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव जाणून घेण्याची आपल्याला आवड आहे हे माझ्या मनात अगदी स्पष्ट होतं.’’ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मेरी मॅकार्थी या बुद्धिमान, परखड अमेरिकी लेखिकेच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडाची (How I grew) सुरुवातच मुळी या ओळींनी होते. आत्मचरित्रातील ‘मी’ इतक्या नि:संकोचपणे व्यक्त होताना पाहून माझं भारतीय मन काही काळ गडबडलं, पण पुढे तिच्या शैलीची ओळख झाली, त्यातले धक्के कमी झाले. साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी माझी तिच्याशी शब्दमाध्यमातूनच ओळख झाली. तिच्या आत्मचरित्राचे दोन खंड तोवर प्रकाशित झाले होते. (तिच्या मृत्यूनंतर तिसराही भाग आला.) याशिवाय तिच्या कथा, कादंबरी लेखनामुळे व प्रवासवर्णनांमुळेही ती प्रकाशझोतात होती; पण तिचं वैचारिक लेखन आणि सत्याचा शोध घेणं हे अधिक महत्त्वाचं होतं.

तिच्या आठवणी जसजशा वाचत गेले, तसतसं तिचं प्रभावी, मोकळं निवेदन आकर्षून घेतच होतं, पण विशेष लक्षात आलं की, एका कॅथलिक मुलीच्या (म्हणजे स्वत:च्याच) बालपणाबद्दल सांगताना ती एकूणच आपल्या धर्माबद्दल विधानं करते आहे. लहान मुलं धर्माबाबतीत इतका विचार करतात? बहुधा मेरीच्या बालपणी तिला जे काही अनुभव आले त्यामुळे तिचं मन सतत असा विचार करू लागलं असावं. शंभर वर्षांपूर्वी रोमन कॅथलिक, प्रॉटेस्टंट आदी ख्रिश्चन सांप्रदायिकांच्या दैनंदिन जीवनात धार्मिक बाबींचा अधिकच पगडा असे, कर्मकांडं असत, नियमांचं पालन करावं लागे. त्यांची चर्चेसही निरनिराळी असतात. त्यामुळे थोडय़ाशा जाणत्या मुलालाही या धर्मसंघर्षांची जाणीव असे.

मेरीचे वडील मध्यमवर्गीय, रोमन कॅथलिक होते, आई श्रीमंत, प्रॉटेस्टंट कुटुंबातील होती. लग्नानंतर आई कॅथलिक झाली. दोघंही देखणी, हुशार. तिला तीन लहान भाऊ  होते. मेरीच्या वयाच्या ६-७ व्या वर्षीच तिचे आईवडील जागतिक फ्ल्यूच्या साथीत मृत्यू पावले आणि वर्षां-वर्षांचं अंतर असणारी ती चारही मुलं पोरकी झाली. आरंभी मॅकार्थी आजी-आजोबांनी आपल्याकडे मुलांना नेलं, तेथे इतर नातेवाईक व चुलत-आते भावंडं यांच्याशी संबंध आला. अर्थात त्यांचं तिथे स्वागत झालं नाहीच. उलट सुमारे पाच र्वष या भावंडांना उपासमार, शारीरिक छळ, मारहाण अशा प्रकारच्या त्रासाला तोंड द्यावं लागलं. मेरी मोठी असल्याने तिला हे सारं अधिक सोसावं लागलं. आजी-आजोबा हतबलतेनं पाहात होते.

नंतर तिच्या आजोळच्या आजी-आजोबांनी तिला व तिच्या लहान भावाला आपल्याकडे नेलं आणि इतर दोघांना वसतिगृहात ठेवलं. तिथे प्रॉटेस्टंट आचार-विचार. त्यातही तिची ही आजी आधी ज्यू व मग ख्रिश्चन झालेली होती. या तिन्ही धर्माच्या आचारविचारांचा अनुभव घेतल्यावर मेरी पुढे निरीश्वरवादी बनली, कोणताच धर्म तिने मानला नाही. आयुष्यभर मेरी हे कधीच विसरू शकली नाही. खरं म्हणजे आपला धर्म आपल्याला काही तरी चांगलं सांगणार आहे, अशी श्रद्धा प्रत्येक लहान मुलाच्या मनात असते, ती जोपासली जाईल असं वागणारी मंडळी अलीकडे दिसतच नाहीत.

आपण या धर्मपगडय़ाखाली कसे दबून गेलेलो होतो याचं मोठं प्रत्ययकारी वर्णन तिनं केलं आहे. धर्माच्या मुखवटय़ाखाली चालणारी अनैतिकताही ती स्पष्टपणे मांडते. वर्तमानातलं सर्वच धर्माचं जगभर दिसणारं विकृत स्वरूप पाहिल्यावर तिनं काय म्हटलं असतं? तिच्या आठवणींमध्ये तिनं कॅथलिक धर्माबद्दल ही व अशा प्रकारची मतं मांडल्यावर साहजिकच तिचा निषेध, धमक्या यांचा गदारोळ उठला, पण त्याच वेळी काही धर्मगुरूंनी व नन्सनी तिच्या या सत्यकथनाबद्दल तिचं अभिनंदन केलं.

मेरीच्या आठवणींमधील दोन बाबी लक्षणीय आहेत. एक म्हणजे तिच्या शिक्षणाला (आधुनिक अमेरिकेतही) झालेला विरोध. दुसरी लक्षणीय गोष्ट म्हणजे धर्म आणि नैतिकता यांची सांगड निखळत चालल्याची तिची खंत- जी पुढे अधिकाधिक तीव्र होत गेली. केवळ लैंगिक संबंधांपुरती नैतिकता तिला अभिप्रेत नव्हती, तर आपल्या विचार-वर्तनातील नैतिकता, एकसंधपणा तिला अभिप्रेत होता. त्यामुळेच ‘न्यूयॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ने तिला व्हिएतनाम युद्धाच्या वेळी तेथे जाऊन, प्रत्यक्ष परिस्थिती पाहून लिहिण्याची विनंती केली, तेव्हा तिने तेथील अनुभव घेऊन वार्तापत्रं लिहिली. त्या वार्तापत्रांनी इतिहास घडवला. तिनं तत्कालीन सरकारचा दुटप्पीपणा बाहेर आणत, चार गोष्टी सुनवायला कमी केलं नाही. व्हिएतनाम व हॅनोई हे तिचे निबंध त्या वेळी खूपच गाजले. तसंच वॉटरगेट प्रकरणावेळचे तिचे लेख अमेरिकन सरकारच्या अनैतिकतेवर कोरडे ओढणारे होते.

आजोळी गेल्याने ‘वासार’सारख्या उदारमतवादी कॉलेजात तिला शिक्षण घेता आलं आणि तेथील आजोबांनी तिला वाचन, पुस्तकं यांची आवड लावून स्वतंत्रपणे विचार करायला शिकवलं. ‘वासार’ हे आधुनिक दृष्टी देणारं, मुक्त विचारांना पाठिंबा देणारं, स्त्रियांना पदवी देणारं पहिलं कॉलेज. मेरीची मुळातील चौकस, जिज्ञासू वृत्ती तिथे विकसित झाली. साहित्य, भाषा, साम्यवादासारख्या विचारप्रणाली, अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास आणि वाचन याबरोबरच नाटकादी कला यातील अनुभव तिने घेतला. लॅटिनमध्ये पदवी घेऊन बाहेर पडल्यावर ‘द नेशन’, ‘द न्यू रिपब्लिक’, ‘पार्टिझन रिव्ह्य़ू’ यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधे होणारं तिचं अभ्यासू लेखन कौतुकाचा विषय होतं.

तिसाव्या वर्षी तिची पहिली कादंबरी ‘द कंपनी शी कीप्स’ (१९४२) प्रसिद्ध झाली आणि खळबळ उडाली. ती सहा भागांत रचलेली होती. म्हटलं तर एकेक भाग स्वतंत्र व तरीही एकमेकांशी आतून जोडलेला. हा रचनाबंध वाचकांना वेगळा वाटला, पण त्यातील तिची स्त्री-पुरुष नात्यासंबंधी नि:संकोच वर्णनं, तत्कालीन वाचकांना धक्का देणारी ठरली. न्यूयॉर्कच्या तत्कालीन उच्चभ्रू व बुद्धिजीवी समाजातील वातावरणाचं ते चित्र होतं. कुणी तरी उपहासानं म्हटलंसुद्धा की, ‘ही कादंबरी म्हणजे लफडय़ांच्या वर्णनाचं यश आहे.’ मेरी अर्थात अशा अभिप्रायांना भीक घालत नव्हती.

तिच्या नंतरच्या कथा व कादंबऱ्या, या अशाच खुलं निवेदन करणाऱ्या होत्या. स्त्रीजीवनाशी संबंधित लहानसहान गोष्टींची घेतलेली दखल, स्त्रियांचे आर्थिक भान, इतरांशी होणारे वर्तन, सखीभाव, तिच्या सर्व प्रकारच्या दैनंदिन अडचणी हे वास्तव तिनं वाचकांपुढे ठेवलं. त्या सर्वात तिच्या जीवनावर मोठा परिणाम करणारी कादंबरी ठरली ती ‘द ग्रुप’. ‘वासार’ महाविद्यालयामधील आठ मैत्रिणींचा एक ग्रुप म्हणजे कादंबरीतील मुख्य पात्र होतं. त्यांचं एकत्रित जीवन, त्यांच्या भविष्याबद्दलच्या कल्पना, महाविद्यालयीन जीवनातील धमाल आणि एकेकीच्या वैयक्तिक जीवनाची वाटचाल असं स्वरूप असणारी ही कादंबरी. तिचं उद्दिष्ट होतं १९३०-३५ सालातील अमेरिकन तरुणींच्या प्रगतीच्या भ्रामक कल्पना दाखवणं. मेरीने पात्रांची नावं काही प्रमाणात बदलली तरी त्या त्या व्यक्तींना आपलं चित्रण चुकीचं झालंय असं वाटलं. कादंबरीनं इतका गदारोळ उठवला की, वाचकांची नीती बिघडू नये म्हणून ऑस्ट्रेलियात तीवर बंदी घातली गेली. अमेरिकेत इतकी चर्चा झाली तरी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या सर्वाधिक खपाच्या यादीत सतत दोन र्वष ती कादंबरी पहिल्या क्रमांकावर होती. प्रत्येकाने ती चोरून वाचली होती, तरी ती वाचली असं उघडपणे कुणी कबूल करत नव्हतं.

मेरीची दुहेरी निराशा झाली. ‘वासार’च्या ज्या मैत्रिणी तिला जवळच्या वाटत होत्या, त्यांनी तोवर त्यांना मिळालेल्या सामाजिक स्थानामुळे कादंबरीतील वास्तव नाकारलं आणि ज्या बुद्धिजीवी समाजातील प्रतिभेचं ती मनोमन कौतुक करी, त्यांनीही तिला पाठिंबा दिला नाही. माझ्या खासगी भावनांचा, जीवनाचा या कादंबरीनं बळी घेतला असं तिला वाटलं. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीची पुढची आवृत्ती निघायला २००९ हे वर्ष उजाडलं. आज असं वाटतं की, मेरी अनेक बाबतीत काळाच्या पुढे होती का? आपण खरं बोलतो आणि दर वेळी गोत्यात येतो असं तिला वाटे. ती म्हणते, ‘लहानपणापासून (तिच्या पहिल्या धर्मसंस्कारावेळेपासून) मी नेहमीच अशा नैतिक पेचात सापडते. चांगलं, खरं वागायला जाते, पडणारे मोह दूर सारते, इतरांच्या अपेक्षांनुसार वागायचा प्रयत्न करते, तरी मीच शेवटी अपयशाची धनीण का होते?’

व्यक्तींची, स्थळांची नावं तिला फार महत्त्वाची वाटत. पुस्तकांची शीर्षकं ती अशीच निवडी. उदाहरणार्थ ‘On the Contrary’, ‘Occasional Prose’, ‘Groves of Academe’, ‘Stones of Florence’

रूढार्थानं स्त्रीवादी नसणारी मेरी म्हणते, ‘लोकांनी स्त्री म्हणून दुय्यम न लेखता, माझा पुरुषांप्रमाणे गांभीर्यानं विचार करावा, असं मला वाटतं; पण त्यासाठी मी पुरुषांप्रमाणे कपडे घालावेत, तसंच राहावं अशी गरज नाही.’ मुक्त, प्रगत, बुद्धिमान स्त्रीचं सांस्कृतिक व दर्जेदार ‘रोल मॉडेल’ अशी तिची प्रतिमा लोकांसमोर राहिली. तिने अनेक लेखिकांना प्रेरणा दिली. लिंगभेदापलीकडे जाऊन आपल्या बुद्धीचा प्रभाव पाडणारी, प्रवासवर्णनांमधून हळुवार, संवेदनशील शैली वापरणारी, विश्लेषक, अचूक वाक्ययोजना करणारी मेरी अमेरिकी साहित्य जगतातील प्रभावी व्यक्ती होती. महात्मा गांधी, ट्रॉटस्की यांच्या हत्यांसंबंधित भाष्य असो की आपली प्रिय मैत्रीण, तत्त्वचिंतक हॅन्ना आरडन्टवरील मृत्युलेख असो, अप्रतिम, भावयुक्त शब्दयोजना हे तिचं वैशिष्टय़.

मेरीची साहित्यिक कारकीर्द म्हणजे अमेरिकी सामाजिक बदलांचं प्रतिबिंब होतं. १९३०चं दशक लैंगिक स्वातंत्र्याचा आग्रह, १९४०-५० ही दशकं पुरोगामी तत्त्वप्रणालीचा आग्रह, १९६० चं दशक- व्हिएतनाम व इतर सामाजिक उलथापालथी, १९७०चं  दशक- वॉटरगेट व दहशतवादाचा प्रसार. या साऱ्यांचं चित्रण तिच्या वैचारिक व ललित लेखनात दिसतं. आयुष्यभर तिनं ढिसाळपणा, क्षुद्र वृत्ती, वाईट लेखन, स्वत:ची व इतरांची कोणत्याही प्रकारची फसवणूक, व्यक्तित्वातील कमकुवतपणा या गोष्टींविरुद्ध लढा दिला, बौद्धिक संघर्ष केले, पण लहानपणापासूनच्या पोरकेपणाच्या भावनेवर ती मात करू शकली नाही. वैवाहिक जीवनात अपयशी, पण लेखनात आपलं वेगळं, वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मेरीनं शेवटी आयुष्याचा जमाखर्च कसा मांडला असेल?

७७ व्या वर्षी कर्करोगानं मृत्यू आला तेव्हा पूर्ण स्वातंत्र्याची आपली कल्पना आपण प्रत्यक्षात आणू शकलो असं तरी समाधान तिला नक्की झालं असेल?

मेरी मॅकार्थी १९१२-१९८९

 त्रिखंडात्मक आत्मचरित्र, ६ कादंबऱ्या,

४ कथासंग्रह, ३ वैचारिक गद्यसंग्रह, अनेक साहित्य पुरस्कार, चार वेळा प्रतिष्ठित अभ्यासवृत्ती

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com

Story img Loader