पहिली भारतीय महिला वकील  कॉन्रेलिया सोराबजी हिचं साहित्य भांडार खूप मोठं आहे. हे सारं लेखन म्हणजे केवळ कथा किंवा कोर्टाच्या खटल्यांची माहिती नव्हे. त्यातून तिने नकळतणे केवढा तरी मोठा भारतीय सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज निर्माण केला आहे.

नुकतीच वाचलेली एक बातमी- ‘मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून इंदिरा बॅनर्जी यांची नेमणूक. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल. बॉम्बे हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर. कलकत्ता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती निशिता निर्मल म्हात्रे. आपल्या देशातील, चार मुख्य हायकोर्टात मुख्य न्यायमूर्तीपदी सध्या या चार स्त्रिया विराजमान  आहेत’.

मनात आलं, पहिली भारतीय महिला वकील कॉन्रेलिया सोराबजी (१८६६-१९५४) हिची यंदा १५० वी जयंती साजरी होत असण्याच्या पाश्र्वभूमीवर ही घटना निश्चितच आनंदाची आहे, पण तिने जिवापाड केलेल्या कष्टांना, धडपडीला गोमटी फळं येण्यासाठी जवळजवळ सव्वाशे वष्रे मध्ये जावी लागली, याचा विषादही आहे. अत्यंत बुद्धिमान, देखणी, महत्त्वाकांक्षी पण संवेदनशील अशी कॉन्रेलिया ही खरसेटजी व फ्रान्सिना सोराबजी या पारशी दाम्पत्याच्या सात मुलींपकी पाचवी मुलगी. तिला एक लहान भाऊही होता. खरसेटजी यांनी वयाच्या अठराव्या वर्षीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आई हिंदू होती, पण तीदेखील फोर्ड नावाच्या ब्रिटिश, कॅथलिक ख्रिश्चन दाम्पत्याने दत्तक घेतल्याने ख्रिश्चन झाली होती. त्यामुळे लहानपणापासूनच झोरास्ट्रीयन,व ख्रिश्चन धर्माचे संस्कार तिच्या अंगवळणी पडले होते. कॉन्रेलियाचा जन्म नाशिकमधील. नाशिक हे तीर्थक्षेत्र. तेथे परिसरातील पारंपरिक, कर्मठ हिंदू व मुसलमान आणि त्यांची धार्मिक कर्मकांडं, श्रद्धा, रीतिरिवाज यांचा त्या साऱ्या कुटुंबाला अनुभव होता. कॉन्रेलियाच्या जन्मानंतर काही काळातच त्या कुटुंबाने आधी बेळगाव येथे व नंतर पुण्यास स्थलांतर केले.

कॉन्रेलिया व भावंडे पारशी, ख्रिश्चन म्हणूनच वाढली. आपण पारशी असल्याचा तिला अभिमान होता. तिने शेवटपर्यंत पारशी पेहराव सोडला नाही. पण घरातील दैनंदिन व्यवहार, बोलणं-चालणं ‘साहेबी’ थाटाचं होतं. जेवण दोन्ही पद्धतीचं असे. आई-वडिलांना संमिश्र संस्कृतीचं, बहुभाषिकत्वाचं प्रेम होतं. त्यांनी शाळा चालू केल्या. आईने खास मुलींसाठी मराठी, उर्दू माध्यमाच्या शाळा विनामूल्य चालवल्या. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी, सल्ला मागायला आईकडे येणाऱ्या सर्वधर्मीय स्त्रिया पाहून कॉन्रेलियाच्या मनावर खूपच परिणाम झाला, आणि पडदानशीन स्त्रियांसाठी आपण आयुष्य खर्ची घालावं, असा निर्णय तिनं वयाच्या नवव्या वर्षीच घेतला. आईचं व तिचं ते गुपित होतं.

तो काळ होता १८७०-८० मधला. स्त्रियांना शिकण्याची बंदी होती. कॉन्रेलियाच्या मोठय़ा बहिणींना, (मुलींना शिक्षणाची परवानगी नसल्याने) मॅट्रिक्युलेशनची परीक्षा देता आली नव्हती. कॉन्रेलियाच्या वडिलांनी सतत खटपट करून, विद्यापीठाला नियम बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे ती मात्र परीक्षा देऊ शकली. ‘बॉम्बे’ विद्यापीठातून मॅट्रिक झालेली ती पहिली मुलगी! तेव्हापासून तिला अनेक गोष्टींत पहिलेपणाचा मान मिळाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये तिनं प्रवेश घेतला तेव्हा ती एकटी मुलगी होती. तिला वर्गात बसू न देण्याच्या इतर मुलांच्या प्रयत्नांना तिने धिटाईने, यशस्वीपणे तोंड दिलं. १८८७ मध्ये तिनं बी.ए.ची पदवी मिळवली. त्या वर्षी प्रथम वर्ग मिळवणाऱ्या केवळ चार विद्यार्थ्यांपकी ती एक होती. तिला विद्यापीठाचा हॅवलॉक पुरस्कार व हिग्लग शिष्यवृत्तीही मिळाली. त्या वेळी इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकारतर्फे शिष्यवृत्ती दिली जाई. मात्र कॉन्रेलियाची क्षमता व हक्क असूनही ती शिष्यवृत्ती तिला ‘स्त्री’ म्हणून दिली गेली नाही.

आपण कायद्याचे शिक्षण घेऊन, भारतातील स्त्रियांना मदत करायची ही तिची दुर्दम्य इच्छा पाहून भारतातील व इंग्लंडमधील काही धनिकांनी – त्यात उमरावांच्या स्त्रिया व फ्लॉरेन्स नाइटिंगेलसारख्या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या – एकत्र येऊन निधी गोळा केला. ती ऑक्स्फर्डला कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेली. तेव्हापासून इंग्लंड हे तिचं दुसरं घर झालं. आपल्या आठवणींमध्ये या दोन्ही घरांबद्दल लिहिताना ती म्हणते, ‘ही माझीच दोन घरं आहेत, त्यातलं कोणतं घर आवडतं हे कसं ठरवायचं? पण मला नेहमी साद कोण घालतं असं विचारलं तर नि:संशय उत्तर आहे, भारत.’ ऑक्स्फर्डला जाऊन, अनेक अडथळे पार करत ती कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाली (१८९२). ब्रिटिश विद्यापीठातून कायद्याची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ती पहिली महिला व पहिली भारतीय व्यक्ती होती. मात्र तिथेही स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता. त्यामुळे उत्तम रीतीने परीक्षा उत्तीर्ण करूनही तिला १९२४ मध्ये बॅरिस्टरची सनद मिळाली. (मिठा टाटा-लाम हिला १९२३ मध्ये सनद मिळाली व ती पहिली महिला बॅरिस्टर ठरली.) इंग्लंडमध्ये नामांकित कायदेतज्ज्ञांकडे थोडासा अनुभव घेऊन ती भारतात परतली. तिला सनद न मिळाल्याने कोर्टात उभं राहून खटले लढवणं शक्य नव्हतं. तिने मग आपलं ध्येय गाठण्यासाठी वेगळा मार्ग काढला. त्या वेळी भारतात ब्रिटिश राज होतं. वेगवेगळ्या संस्थानांमधील संस्थानिकांचा कारभार गोऱ्या साहेबाच्या आदेशानुसार चाले. त्यात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. स्त्रियांना पडदा पाळावा लागत असे. त्या अशिक्षित असल्याने त्यांना बहुतेक वेळा फसवलं जाई. शिवाय कटकारस्थानं मोठय़ा प्रमाणावर चालत. या साऱ्यात कॉन्रेलियाने कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय घेतला. ब्रिटिश सरकारने अज्ञान वारस व विधवा यांच्या इस्टेटीची जबाबदारी स्वीकारून ‘कोर्ट ऑफ वॉर्डस्’ ही योजना सुरू केली होती. त्यात कोर्टापुढे दावे दाखल करणे, कागदपत्रे तयार करणे व मुख्य म्हणजे या स्त्रियांना भेटून, वस्तुस्थिती माहीत करून घेऊन, त्यांना त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी मिळवून देणे हे काम ती करत राहिली. १९२४ नंतर कोर्टात खटले लढवणेही तिला शक्य झाले. शेवटपर्यंत ती या स्त्रियांसाठी व मुलांसाठीच संघर्ष करत राहिली.

एका बाजूने कायदेशीर मार्ग शोधत असतानाच कॉन्रेलियाने या स्त्रियांच्या समस्या मांडण्यासाठी लेखनाचा मार्गही अवलंबला होता. ‘लव्ह अ‍ॅड लाइफ बिहाइंड द परदा’ हे तिचं पहिलं पुस्तक १९०१ मध्ये इंग्लंडमध्ये प्रकाशित झालं. त्याला प्रसिद्धी व चांगला प्रतिसादही मिळाला. यात तिने पडदा पाळणाऱ्या स्त्रियांच्या व्यथा मांडल्या आहेत. तिची शैली अतिशय गोष्टीवेल्हाळ आहे. उत्तम भाषा, सूक्ष्म निरीक्षण यांच्या मदतीने ती अतिशय प्रभावी वर्णने करते. वसाहतकालीन भारतातील जीवनाशी संबंधित या कथा असल्या तरी त्यातून मुख्यत: तिने पडदानशीन स्त्रियांचे कष्ट, त्यांच्या भावभावना दर्शवल्या आहेत. पुन्हा त्या कथा वास्तव आहेत. मात्र तिने त्यांची नावे बदललेली आहेत. ‘ग्रेटर लव्ह’ या गोष्टीतील राणी वांझ आहे, पण आपल्या पतीप्रेमाने ती स्वसुखाचा त्याग करून निघून जाते. आणखी एका कथेमध्ये सवती असणाऱ्या बहिणी, पतीबरोबर सती जाणारी एक बहीण व तिचा त्याग, अशी वर्णने आहेत.

मध्य प्रदेश, काठियावाड, राजस्थान, इंदूर येथील भागातील स्त्रियांशी तिचा विशेष संबंध आला. स्त्रिया पडद्याबाहेर येतच नसल्याने पुरुषांना त्यांच्याशी बोलणे शक्य नव्हते. कॉन्रेलियाने ही जबाबदारी आनंदाने उचलली. एकदा तर घरातल्या नातेवाईकांनी एका विधवा राणीला कैद करून ठेवली, उपासमार केली व तिची इस्टेट गिळंकृत करण्याचा डाव रचला. त्या राणीच्या आईने कॉन्रेलियाला ही माहिती दिली. तिने अक्षरश: जिवावर बेतले तरी त्या राणीची सुटका करून तिची इस्टेट तिला मिळवून दिली. तिच्या सुटकेची चित्तथरारक कथा कॉन्रेलियाच्या शब्दात वाचताना आपल्याला रहस्यमय चित्रपट पाहिल्यासारखे वाटते, आणि दुसरीकडे तिची अवस्था पाहून अस्वस्थता येते. पालखी, धमणी, घोडा इत्यादी वाहनांचा उपयोग करताना केलेल्या प्रवासातल्या अडचणी, तिचे प्रसंगावधान, अनेक प्रकारे केलेल्या  तडजोडी पाहून थक्क व्हायला होते.

अविवाहित कॉन्रेलियाला मुलांविषयी लळा असे, त्यांच्या व स्त्रियांच्या प्रकृतीची होणारी हेळसांड यामुळे तिचे मन व्यथित होई. या मुलांच्या कथा तिने ‘सन बेबीज’मध्ये एकत्र केल्या आहेत. येथील जनजीवनाशी ती अतिशय एकरूप झालेली असल्याने, हिंदूंमधील विविध जाती-जमातींचे रीतीरिवाज, प्रथा यांबद्दल तिला खूप माहिती होती. उपनिषदे, पुराणे यांचे वाचन तिने केले होते आणि धार्मिक विधींमध्ये ती या स्त्रियांबरोबर हजर राही. त्याही तिला आपली भरवशाची मत्रीण, मार्गदर्शक, असं मानत आणि विश्वासाने बोलत, जीव लावत. त्यामुळेच निवृत्तीनंतर जरी ती इंग्लंडला राहायला गेली तरी तिचा जीव इथेच होता. ती म्हणते, ‘माझं इथलं आयुष्य किती आनंदी, सुखी होतं, ते शब्दात कसं सांगावं याचा मी विचार करते तेव्हा शब्द आठवण्याआधी मला इथले गंध आठवतात. पहाटे रानात गेलं, की येणारा आंब्याच्या मोहराचा सुगंध घेऊ का चाफा, मोगरा अशा फुलांच्या दरवळाने सुगंधित झालेलं कोवळं उन्ह हुंगत, त्या उन्हात न्हायलेला रानाचा रस्ता आठवू असं मला होऊन जातं. त्या साऱ्यात मिसळलेला असतो वडिलांच्या मोकळ्या हसण्याचा आवाज आणि छोटय़ांसाठी स्वरचित गाणी म्हणणारा आईचा आनंदी आवाज.’

आठवणींचे दोन खंड, मोकळेपणी लिहिलेल्या सविस्तर डायऱ्या एलेना या आपल्या प्रिय सखीला, भारत व इंग्लंडमधील उच्चभ्रू वर्तुळातील व्यक्तींना, लेखक, कवींना  लिहिलेली अगणित पत्रं, पडदानशीन स्त्रियांच्या कथा सांगणारी पुस्तकं, आपल्या आई-वडिलांचं चरित्र, बहिणीचं चरित्र असा तिचा मोठा ग्रंथसंभार आहे. हे सारं लेखन म्हणजे केवळ कथा किंवा कोर्टाच्या खटल्यांची माहिती नव्हे. त्यातून तिने नकळतणे केवढा तरी मोठा भारतीय सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज निर्माण केला आहे.  एकोणिसाव्या शतकातील सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, इतिहासाचा विचार करताना कॉन्रेलियाने निर्माण केलेली ही ऐतिहासिक साधनं फार महत्त्वाची ठरतात. सर्वसामान्यांच्या घरातील फर्निचरपासून, पूजाविधींच्या तयारीपर्यंतची वर्णनं वाचताना या इतिहासलेखिकेच्या बारकाव्यांचं कौतुक वाटतं. एकीकडे कायद्याचा ऊहापोह करताना दुसरीकडे आपल्या सणांचा, सरस्वतीपूजनासारख्या विधींचा ती जो वेगळा अर्थ सांगते, तो आपल्याला चकित करून सोडतो.

स्त्रियांसाठी विद्यापीठाची, कोर्टाची, शिक्षणाची, बंद दारं स्वत:च्या उदाहरणाद्वारा उघडणारी कॉन्रेलिया परदेशातही यासाठी कुतूहलाचा विषय ठरली. व्हिक्टोरिया राणीने तिची खास भेट मागितल्यावर पारशी पद्धतीची, पिवळसर साडी नेसून जाणारी, ‘कैसर-इ-हिंद’ हा खास किताब मिळवणारी, दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय स्त्रीविकासाच्या मुद्दय़ावर थेट महात्माजींशी संघर्ष करणारी कॉन्रेलिया सोराबजी! तिची नाळ खरोखरीची व  लाक्षणिक अर्थाने येथील मातीशीच जुळली होती हेच खरं!

कॉर्नेलिया सोराबजी (१८६६-१९५४)

आत्मचरित्र – (२ भाग) India calling, India recalled

कथासंग्रह – ३, चरित्रे – २

संशोधनात्मक लेखन – ३ पुस्तके, शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील अनेक लेख व अहवाल

कॉर्नेलियाचे तिच्या भाच्याने लिहिलेले चरित्र- The untold story of Cornelia Sorabji

सुपर्णा गुप्तू या संशोधिकेने तिच्यावर पीएच.डी. केली आहे व तिच्या संशोधनावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Cornelia Sorabji : India’s Pioneering woman lawyer

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com