विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युद्ध, दहशतवादी हल्ले अशा ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून वार्ताकन करणारी, प्रख्यात, निडर कॅथरीन ऊर्फ केट एडी. आरंभी एक साधी वार्ताहर म्हणून नोकरी करणारी केट लौकरच बी.बी.सी. या आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता असणाऱ्या, रेडिओ व दूरचित्रवाणी या प्रसारमाध्यमांतील आघाडीची निवेदक, कार्यक्रम निर्माती म्हणून प्रसिद्धीस आली. आजवरच्या तिच्या कारकीर्दीत तिच्यावर अनेक कठीण प्रसंग आले, जिवावर बेतले, पण या सर्व प्रसंगांमध्ये ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘३० एप्रिल १९८०. सकाळचे साडेअकरा वाजलेले. लंडनमधील इराणचा दूतावास अरब दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली. एकच धावपळ उडाली. त्या वेळी तिथे असलेले सर्व कर्मचारी आणि व्हिसासारख्या कामांसाठी आलेले बाहेरचे लोक, असे २८ जण ओलीस म्हणून दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले. गोळीबार सुरू झाला. पोलिसांनी बाहेरून वेढा घातला. प्रवेश बंद झाला. इराणमधील दहशतवाद्यांनी आपल्या मागण्यांसाठी हल्ला केला होता. एकूण सहा दिवस चाललेल्या या हल्ल्यात सहापैकी पाच दहशतवादी इंग्लंडच्या ‘एसएएस’ विशेष सुरक्षा पथकाने मोठी कामगिरी करत मारले, एक पकडला. सुरक्षा पथकाच्या या कामगिरीच्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आँखों देखा हाल सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली.
मिनिटा-मिनिटाला घडणारे नाटय़ व पथकाची प्रगती यांचे सत्य समालोचन करणे आवश्यक होते. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडलेली. धुराने वातावरण भरलेले, श्वास कोंडलेला. मी एका गाडीत अंगाचं मुटकुळं करून बसलेली. कुठून गोळी येईल याचा भरवसा नाही. तरी त्या अध्र्या तासाचे थेट प्रक्षेपण मी यशस्वीपणे केलं. थेट प्रक्षेपण करताना बहुधा माझं निवेदन प्रभावी झालं असावं, कारण बी.बी.सी.ने स्नुकर चॅम्पियनशिपचे लोकप्रिय प्रक्षेपण थांबवून तो प्रत्यक्षदर्शी वृत्तांत सादर केला. या एका प्रसंगाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तेव्हापासून दहशतवादी हल्ले असोत, आखाती युद्ध असो, की चीनमधील तिआनान्मेन चौकात घडलेली हजारोंच्या नरसंहारासारखी क्रूर घटना असो, लोकांना सत्य व प्रत्यक्ष घटना दाखवणं, त्यातील तथ्यं सांगणं ही जोखीम बीबीसीनं माझ्यावर सोपवली.’’
हे सारे वर्णन केलं आहे ब्रिटनची प्रसिद्ध युद्ध-वार्ताहर, पत्रकार केट एडी हिनं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून, वार्ताकन करणारी, प्रख्यात, निडर कॅथरीन उर्फ केट एडी. आरंभी एक साधी वार्ताहर म्हणून नोकरी करणारी केट लवकरच बी.बी.सी. या आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता असणाऱ्या, रेडिओ व दूरचित्रवाणी या प्रसारमाध्यमातील आघाडीची निवेदक, कार्यक्रम निर्माती म्हणून प्रसिद्धीस आली. आजवरच्या तिच्या कारकीर्दीत तिने अनेक महत्त्वाच्या कामगिऱ्या पार पाडल्या. त्यातील प्रत्येक वेळेस तिच्यावर कठीण प्रसंग आले, जिवावर बेतले, पण या सर्व प्रसंगांमध्ये ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिली. खरी व शक्य तेवढी संपूर्ण बातमी देता यावी, इतिहास जसाच्या जसा राखला जावा, तो कुणाला बदलता येऊ नये यासाठी ती जिवाचे रान करीत असे.
वरील प्रसंगानंतर तिला मागे वळून पाहावेच लागले नाही. १९८८ मध्ये पॅन अम १०३ या विमानात दहशतवाद्यांनी केलेला बॉम्बस्फोट, त्यात २७० जणांचा झालेला मृत्यू, त्याआधी लिबियात त्रिपोली येथे अमेरिकेने केलेले बॉम्बहल्ले, त्यासंबंधी कर्नल मुअम्मर गडाफी यांच्याबरोबर झालेल्या चर्चा, ९०-९१ मध्ये झालेले आखाती युद्ध, ९२-९५ या काळात युगोस्लाव्हियात चिघळलेली परिस्थिती, दीर्घकाळ चाललेले युद्ध, रवान्डात झालेले वांशिक युद्ध अशी किती युद्धे व दहशतवादी हल्ल्यांच्या घटना सांगाव्यात? या सर्व प्रसंगी तिने आँखों देखा हाल लोकांपर्यंत पोचवण्यासाठी किती तरी धैर्य दाखवलं. लिबियातील हल्ल्यावेळी तिच्या पायाला गोळी लागली, पाय जायबंदी झाला, पण वार्तापत्राने आपली वेळ चुकवली नाही. तिची वार्तापत्रं इतकी प्रसिद्ध झाली होती की, कोफी अन्नान (संयुक्त राष्ट्रांचे सचिव), तारिक अझीझ (इराकचे परराष्ट्रमंत्री) यासारखे नेतेही त्या वार्तापत्रांसाठी खास वेळ ठेवत. एखाद्या युद्धप्रसंगी किंवा हल्ल्याचं वार्ताकन करण्यासाठी केट गेली की तेथील संबंधितांना धडकी भरे. तिच्या प्रश्नांच्या सरबत्तीतून, तीक्ष्ण नजरेतून सुटका नाही, असे त्यांना वाटे आणि ती सत्य तेच सांगणार व दाखवणार असा लोकांना विश्वास असे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्याप्रसंगीही न्यूयॉर्कला तिला पाठवलं गेलं, पण अंतर्गत राजकारणामुळे तिला परत यावं लागलं.
जून १९८९ ला तिआनान्मेन चौकात तिच्यावर झालेला हल्ला, लागलेल्या गोळ्या, चित्रण केलेली टेप चिनी सैनिकांच्या हाती लागू नये यासाठी तिला सैनिकांशी करावी लागणारी मारामारी, तिच्या दिशेने येणाऱ्या गोळ्या आपल्या अंगावर घेणारा कोणी अनाम तरुण या साऱ्या गोष्टी मुळातून वाचण्यासारख्या आहेत. केवळ थरारक प्रसंग म्हणून नव्हे तर मानवी नृशंस वर्तन, सत्तेचा मद, नीच पातळीवर जाऊन वागणारे सैनिक आणि केटसारखी या साऱ्यांना जिवाच्या कराराने तोंड देऊ पाहणारी कर्तव्यनिष्ठ माणसं यांचं एक प्रत्ययकारी चित्र यात दिसतं म्हणून!
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित देशातील स्त्रिया घराबाहेर पडून अनेक प्रकारची कामे करीत होत्या, नवनवीन विषय घेत विविध क्षेत्रे पादाक्रांत करत होत्या, पण युद्ध-वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया कमीच दिसतात. अमेरिकन युद्ध-वार्ताहर मार्था गेलहॉर्ननंतर या क्षेत्रात केटचंच नाव घेतलं जातं. केटने आधी रेडिओ व नंतर दूरचित्रवाणी या इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही आपले कर्तृत्व सिद्ध केले. आजही ती बी.बी.सी. रेडिओ-४ यावर ‘आमच्या विशेष वार्ताहराकडून’ हा कार्यक्रम सादर करते.
१९ सप्टेंबर १९४५ रोजी सेंट मेरी बेटाजवळील नॉर्थम्बरलॅन्ड या गावी जन्मलेल्या केटला जॉन व मॉड एडी या दाम्पत्याने ती तान्ही असतानाच दत्तक घेतली होती. औषधनिर्माणशास्त्रज्ञ असणाऱ्या या पालकांच्या घरी ती लाडात वाढली. शालेय शिक्षण पूर्ण करून तिने स्कॅन्डेनेव्हियन देशांच्या संस्कृतीचा अभ्यास करून पदवी मिळवली. लहानपणापासून फारशी महत्त्वाकांक्षा नसली तरी मिळालेल्या संधीचा योग्य व चांगला उपयोग करून घेण्याचे कौशल्य तिच्याजवळ होते.
पदवी मिळाल्यानंतर नोकरीसाठी खटपट चालू असताना, या नोकरीसाठी तिची निवड झाली ती योगायोगानेच. मुलाखतीवेळी ‘वार्ताहर म्हणून काय काय करण्याची तुमची तयारी आहे?’ असं विचारल्यावर ‘काहीही करेन,’ असं उत्तर तिनं दिलं. यामुळे आपल्याला ही नोकरी मिळाली, असं तिचं म्हणणं आहे. केटने आपलं आत्मचरित्र –
‘द काइन्डनेस ऑफ स्ट्रेन्जर्स’ लिहिलंय व त्याशिवाय इतरही चार पुस्तकं लिहिली आहेत. तिची शैली अत्यंत मिश्कील तरी परखड आहे. ‘नोबडीज चाइल्ड’ या पुस्तकात अनाथ व दत्तक म्हणून मोठय़ा झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्याबद्दलची निरीक्षणं तिनं मांडली आहेत. जन्मत:च मुलांना टाकून का दिलं जातं याचीही कारणं तिनं शोधली आहेत. त्यातील आकडेवारी व सत्यस्थिती पाहून अस्वस्थता येते. या अभ्यासाला आत्मानुभूतीची प्रेरणा असावी असे वाटते.
‘फायटिंग ऑन द होमफ्रंट – द लीगसी ऑफ विमेन इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर’ या पुस्तकात सामाजिक इतिहासाच्या अंगाने जाणारा तिचा अभ्यास लक्षणीय आहे. पुरुष युद्धावर गेल्याने स्त्रियांना घराबाहेर पडून अनेक जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या, त्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. त्या वेळच्या गरजेतून स्त्रियांच्या जगण्याचा पोतच बदलला. सरकारनेही यासाठी प्रोत्साहन दिलं. मात्र युद्ध संपल्यावर स्त्रियांनी पुन्हा स्वयंपाकघरातच रमावं, ही इतरांची अपेक्षा स्त्रियांनी धुडकावून लावली, असं सांगत त्याविषयी ती मोठा आनंद व्यक्त करते. आपली लग्नगाठ धोका, संकटं यांच्याशीच बांधलीय, असं म्हणणाऱ्या केटने आपल्या ‘इन्टू डेन्जर’ या पुस्तकात विविध प्रकारच्या क्षेत्रांत जीवन व्यतीत करणाऱ्यांना जगताना रोजच कोणते धोके पत्करावे लागतात याचे वर्णन केले आहे. सकाळी उठून संकटालाच तोंड द्यायला जावे लागणारे खाणीतील कामगार, विषारी सर्पाना पकडणाऱ्या तज्ज्ञांपासून तर वेश्यांपर्यंत, अनेक व्यवसायांतील भयानक धोक्यांची वाचकांना जाणीव करून दिली आहे. स्त्रियांच्या पेहरावात-गणवेशात गरजेनुसार झालेल्या बदलांची नोंद घेणारे ‘कॉर्सेट्स टू कॅमॉफ्लॉज’ हे पुस्तकही वाचनीय आहे.
महिला युद्ध-पत्रकार म्हणून तुम्हाला काय फायदे मिळाले, असं कोणी विचारलं की ती म्हणते, कामाच्या बाबतीत मला स्त्री-पुरुष हा भेद जाणवतच नाही. क्वचित कधी काही छोटासा फायदा झाला असेलही, पण एक समस्या मात्र कायम असते. कुठल्याही अवघड कामगिरीवर गेलं की तिथे नैसर्गिक विधींसाठी जावं अशी जागाच नसते. क्षुल्लक वाटणारी ही समस्या महत्त्वाची. सौदी अरेबियासारख्या सपाट वाळवंटात ना झाडाझुडुपाचा आडोसा ना वाळूच्या ढिगाचा. करायचं काय?
पत्रकार म्हणून तिनं आधी कोणतंही विशेष शिक्षण घेतलं नव्हतं. पत्रकाराने/वार्ताहराने, २४ तास ७ दिवस तयारीत असले पाहिजे, आपली माहिती अद्ययावत ठेवण्याबरोबरच भरपूर वाचन, तेही ग्रंथांचे, पुस्तकांचे वाचन केलं पाहिजे, असं ती आवर्जून सांगते. वर्तमानकाळातील पत्रकारितेचे बदलते स्वरूप, तिला लागलेली दुष्ट ग्रहणे, त्यातील तंत्रकौशल्याचा अतिरेक, ग्राहकाभिमुख झाल्याने आपले मूळ कर्तव्य विसरणारी पत्रकारिता यांसारख्या बाबींची चर्चा तिने आपल्या लेखनातून, मुलाखतींमधून वारंवार केली आहे.
सामान्य माणसांप्रमाणेच आपण चुका करत-करत अनुभवातून शिकलो, असं ती म्हणते. अनेक गोष्टी माहीतच नसायच्या. त्यामुळे फजिती होई, पण त्याचीही गंमत वाटे, असं ती प्रांजळपणे म्हणते. ‘‘एकदा आफ्रिकेतील एका मंत्र्याची मुलाखत विमानतळावर जाऊन घेऊन आल्यावरही त्या मंत्र्याचं नावच मला माहीत नव्हतं. जादा हुशारी दाखवून मी एकदा मार्गारेट थॅचरना प्रश्न विचारत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो डाव माझ्यावरच उलटवला.’’ यांसारखे अनेक गमतीदार किस्से तिच्या आठवणींमध्ये आहेत. इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स भारतभेटीवर आले होते, त्या वेळी ती बी.बी.सी.तर्फे त्यांच्याबरोबर आली होती. तेव्हा बॉलीवूडला दिलेली भेट, पद्मिनी कोल्हापुरेची व चार्ल्सची भेट हे तिच्या उपरोधिक भाषाशैलीचा नमुना म्हणता येतील.
धाडसी व निर्भय केट आत्मचरित्रात आपल्या कारकीर्दीचे सारे पैलू सांगते. बीबीसीच्या कार्यपद्धतीतील विचार, जुन्याला चिकटून राहण्याची वृत्ती यांसारख्या त्रुटी मोकळेपणाने सांगते, पण वार्ताकन करताना संयम, शब्दांची अचूक निवड, योग्य सूर यासाठी भरपूर काळजी घेणारी केट
खासगी आयुष्य तितक्याच काळजीपूर्वक लोकांपासून दूर ठेवते. कॅमेऱ्यासमोरची केट खूप परिचित भासली तरी कॅमेऱ्यामागची केट अगदीच अनोळखी राहते.
आपल्या जन्मदात्या आईचा शोध लागल्यावर स्वाभाविक आनंद झालेली केट आपल्या त्या जन्मदात्रीला पहिले पुस्तक अर्पण करते. पण ज्यांनी तिला नाव दिलं त्या आईवडिलांविषयी अवाक्षरही काढत नाही. केटला अनेक मानसन्मान मिळाले. ओ बी ई हा ब्रिटनचा मोठा सन्मान तिला मिळाला. तरी तिच्याबरोबरच्या सहकाऱ्यांना तिच्याबद्दल आदर, दरारा यासह दूरत्वच वाटे. सतत युद्धं पाहून, त्यामुळे होणारा विध्वंस, जीवितहानी, कायम असुरक्षिततेच्या छायेत आयुष्य काढणारी माणसं हे सारं मोठय़ा प्रमाणावर अनुभवूनदेखील ती मनाच्या तळापासून हादरलीय असं तिच्या लेखनातून जाणवत नाही. केवळ बातमीपुरतीच ती त्यात गुंतत होती? केवळ साक्षीभावानेच ती त्या साऱ्याकडे पाहात होती? वार्ताकनासाठी तटस्थता राखता-राखता ती तिच्या स्वभावाचाच भाग झाली? बातमी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारी केट युद्धग्रस्तांसाठी काही करताना का दिसत नाही? आता ती काही समाजसेवी संस्थांची सदिच्छादूत म्हणून काम करते. तिचं मनोमन कौतुक करताना, तिच्या व्यक्तित्वातील या विसंगतींनी मन मात्र अस्वस्थ होतं.
डॉ. मीना वैशंपायन
meenaulhas@gmail.com