ऑस्ट्रेलियन, विचारवंत लेखिका जर्मेन ग्रिअर हिच्या ‘द फिमेल यूनक’ (नपुंसक स्त्री) या सदतीस आवृत्त्या निघालेल्या पहिल्याच पुस्तकाने तिला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली आणि तिचं नाव स्त्रीमुक्ती चळवळीत महत्त्वाचं ठरलं. तिच्याविषयी..

‘‘द फिमेल यूनक’ या माझ्या पहिल्या पुस्तकाची ही एकविसावी आवृत्ती निघाली आहे. वीस वर्षांपूर्वी, १९६९ मध्ये जेव्हा हे पुस्तक मी लिहिलं, तेव्हा मला वाटलं होतं की हे पुस्तक लौकरच कालबाह्य़ ठरेल. विसाव्या शतकाच्या या शेवटच्या काळात विकसित देशात तरी अशा स्त्रिया पुढे येतील की ज्यांच्यासाठी, ‘स्त्रीवरील लैंगिक दडपशाही’ हा विषयच अप्रस्तुत ठरेल. पण उलट या पुस्तकाची सारखी पुनर्मुद्रणं होताहेत. असं पुस्तक छापण्याची आता काही गरज नाही, अशी जर परिस्थिती असती तर मला आनंद झाला असता. पण तसं झालं नाही.. गेल्या वीस वर्षांत साम्यवादाच्या पडझडीसारख्या, जगाला धक्के देणाऱ्या कितीतरी घडामोडी झाल्या. वीस वर्षांपूर्वी स्त्रीला व्यक्ती म्हणून जगता यावं, प्रतिष्ठेने, मानाने, आनंदाने, चांगल्या प्रकारे जगता यावं यासाठी स्वातंत्र्य हवं, असा आग्रह मी धरत होते. स्त्रीला शिकण्या-शिकवण्याचं, धावण्या-पळण्याचं, मोठमोठय़ाने मनापासून हसण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य हवं, असा आग्रह धरत होते. पण जगभरची स्त्री अजूनसुद्धा भीते आहे, भुकेली आहे, गप्प बसते आहे, सर्व प्रकारच्या धार्मिक बंधनांनी ती जखडलेलीच आहे. सधन स्त्रीचं वर्तन पाहून तिला स्वातंत्र्य मिळालं असं दरिद्री स्त्रीला वाटतं. पण वस्तुत: ती सधन स्त्री, पुरुषी दडपशाहीची बळी असते.’’

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

ऑस्ट्रेलियन, विचारवंत लेखिका जर्मेन ग्रिअर हिच्या पुस्तकाच्या सदतीस आवृत्त्यांपैकी एकविसाव्या आवृत्तीच्या मनोगताचा हा अंश –  ‘द फिमेल यूनक’ (नपुंसक स्त्री) या पहिल्याच पुस्तकाने तिला जगभर प्रसिद्धी मिळाली आणि तिचं नाव दुसऱ्या टप्प्यातील स्त्रीमुक्ती चळवळीत महत्त्वाचं ठरलं. तिचे जेवढे चाहते आहेत, त्याहून अधिक तिचे शत्रू आहेत. लखलखीत बुद्धिवैभव उपजतच लाभलेली ही लेखिका मनापासून, तळमळीने, प्रामाणिकपणे, साधार आणि परखडपणे लिहिते आणि तशीच बोलतेही. तिचा फटकळपणा सगळ्यांना आवडतो असं नाही. भले तिची अफाट आणि बिनधास्त शैली आपल्याला दचकवत असेल, तिची मते कधी कधी आपल्याला पटतही नसतील, किंवा तिच्या लिहिण्या-वागण्यात कधी अंतर्विरोध जाणवत असेल. पण तिच्या बहुतेक लेखनात तथ्यांश असतो, तो मान्य करावा लागतो.

मेलबर्न- ऑस्ट्रेलिया येथे २९ जानेवारी १९३९ रोजी जन्मलेल्या जर्मेनचं शिक्षण तिथल्या उपनगरातल्या शाळांमधून झालं. असामान्य बुद्धीच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवून शाळेची शेवटची चार र्वष तिनं एका ‘कॉन्व्हेन्ट’मध्ये काढली. ‘आईपेक्षाही तेथील शिक्षिकांनी, ‘सिस्टर्स’नी माझ्यावर खूप प्रेम केलं. माझ्या वाढत्या वयातील भावनांवर, लैंगिक समजुतींवरही त्यांचाच परिणाम झाला. मात्र मला घरेलू, गृहिणी व्हावंसं कधी वाटलं नाही,’ असं जर्मेन म्हणते. तरीही उत्तम गृहिणीचे समजले जाणारे गुण-उदाहरणार्थ चविष्ट स्वयंपाक करणं, कलात्मक घरसजावट, बागेची निगा इत्यादी तिच्यात आहेत.

लहानपणापासून वाचनाचा विलक्षण नाद असल्याने आईचा मार खाणारी जर्मेन मार खातानाही हातातलं पुस्तक सोडत नसे. आपल्या हातातलं वाचून झालं की शेजारच्या किंवा समोरच्या माणसाच्या हातातील पेपर-पुस्तक वाचण्याच्या हव्यासापायी ती वरून खाली आणि खालून वर सारख्याच सहजतेनं वाचे. ‘वाचन हा एकच दुर्गुण तेव्हा माझ्यात होता. पण त्यानेच पुढे अनेक दुर्गुणांना जन्म दिला.’ असं म्हणणाऱ्या जर्मेनची बहुश्रुतता आणि तल्लख स्मरणशक्ती यामुळे तिला शाळेत ‘सर्वज्ञ’ म्हणत.

वयाच्या अठराव्या वर्षी घर सोडून बाहेर पडलेल्या जर्मेनने संपूर्ण आयुष्य एकटीनं, स्वत:च्या कमाईवर, स्वत:च्या अटींवर व हिमतीवर काढलं. मेलबर्न, सिडनी विद्यापीठांतून बी.ए., एम. ए. या पदव्या प्रथम श्रेणीत मिळवून ती केंब्रिज विद्यापीठात पीएच.डी.साठी गेली. तिथूनच इंग्रजी आणि फ्रेंच वाङ्मय व भाषा यांचा अभ्यास करीत ‘शेक्सपिअरच्या सुखांतिकांमधील नैतिकता’ असा विषय घेत तिने डॉक्टरेट मिळवली (१९६८). त्याच वेळी इंग्लंडमधील वॉरिक विद्यापीठात तिला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. पुढे आपले लेखन व अध्यापन यांची सांगड ती सतत घालत होती. स्त्रीवाद, इंग्रजी व फ्रेंच वाङ्मय आणि पर्यावरण हे विषय तिच्या लेखनाची केंद्रे आहेत. शेक्सपियर वाचणं व तत्संबंधित लेखन करणं हा तिचा विसावा आहे, असं म्हटलं तरी चालेल. तो आपल्याला सारखा विचार करायला लावतो असं ती म्हणते. सतत बौद्धिक काम करण्याची तिला ओढ आहे. तिच्या भाषणांवर बंदी आणण्याचा झालेला प्रयत्न, तिच्यावर होणारी टीका यांची ती पर्वा करीत नाही, आपलं मत विचारांतीच बनलेलं आहे, असा तिचा विश्वास असतो.

१९६०-१९८० हा काळ पाश्चात्त्य देशांत स्त्रीचळवळीतील दुसरा टप्पा मानला जातो. जर्मेनचा आग्रह नेहमीच स्त्रीला समान हक्क मिळावेत यापेक्षा, स्त्रीला स्वातंत्र्य, मुक्तता हवी असा होता. त्यामुळे स्त्रीवाद या शब्दापेक्षा स्त्रीमुक्ती हा शब्द तिला योग्य वाटतो. स्त्रिया या स्वत:च बहुतेक दु:खं ओढवून घेतात, कारण त्यांच्या मनावर वर्तणुकीची अनेक बंधनं घातली जातात. तिला वेगवेगळ्या रीतीने भीती दाखवली जाते आणि ती सगळी तिच्या अब्रूशी जोडली जाते. स्त्री म्हणजे त्याग, समर्पण या परंपरागत समजुतीचं इतकं स्तोम माजवलं जातं की त्यापेक्षा थोडंसंही वेगळं वागणारी स्त्री ही कुटुंबाला, समाजाला लांच्छनच आहे असं ठरून जातं. पुन्हा हे सगळं केवळ पुरुषांच्याच सुखासाठी. त्यांच्या सुखाच्या कल्पनांप्रमाणे स्त्रीनं वागायचं, आपल्याला काय हवंय, सुखाच्या कल्पना यांचा विचार न करता तिनं केवळ पुरुषधार्जिणं जीवन जगायचं. स्त्रीदेहाच्या सौंदर्यकल्पनाही पुरुषी नजरेतून ठरवल्या जातात, आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी वैद्यकशास्त्राला हाती धरून पुरुष इथेही कसं राजकारण करतात आणि स्त्रिया त्याला सहज बळी पडतात, याचा खेद तिला वाटतो. ते सगळं जर्मेनला अमान्य आहे.

ती म्हणते, शतकानुशतकं, जगभर विविध संस्कृती, विविध राष्ट्रं ही अशा पुरुषसुखाच्या कल्पनाच ग्राह्य़ धरल्या जाव्यात असं स्त्रियांच्या गळी यशस्वीपणे उतरवत आली आहेत. स्त्रिया आपल्या मना-शरीराचा पुरेसा, योग्य असा विचारच करत नाहीत. त्या सारं जग जसं पुरुषांच्याच नजरेनं पाहू लागतात, तसं आपल्या शरीराचा विचारही त्यांच्याच नजरेतून करतात. यामुळे तिला स्त्रियांच्या या निष्क्रियतेचा, अति आज्ञाधारकपणाचा राग येतो. म्हणून ती त्यांना नपुंसक म्हणते. वस्तुत: एकूण स्त्रियांनी नैसर्गिकपणे हसावं, बागडावं, आपल्या तनामनावर आपलाच अधिकार असावा असं तिला वाटतं. स्त्रीदेहाच्या सौंदर्यकल्पनाही पुरुषी राजकारणातून जन्मतात हे लक्षात येताच ती संतापते.

खरं पाहता, जर्मेनच्या आधी ३०-४० र्वष आपल्या ‘सेकंड सेक्स’ या पुस्तकातून सिमॉन द बोव्हूआ हिने हे सांगितलंच आहे. मग जर्मेनचं लेखन सातत्यानं का वाचलं जातं? कारण हे सारं जर्मेन ज्या पद्धतीनं सांगते ती शैली विलक्षण आहे. आपला मुद्दा पटवून देण्याचं कसब आगळं आहे आणि त्या विचाराला भिडण्याचा रोख वेगळा आहे. जर्मेन टी.व्ही., रेडिओ याही माध्यमांचा उपयोग करत आपलं म्हणणं मांडते. सहा फूट उंच आणि वयाच्या ७८व्या वर्षीही देखणी अशी जर्मेन आवेगाने बोलते तेव्हा तिचं भाषेवरचं प्रभुत्व, मांडणी ऐकण्यासारखी असते.

ती आपल्या लेखनात ज्या प्रकारे भाषा वापरते ते पाहून आपण थक्क होतो. कधी तिला संकोच, लाज, भीड या भावनांची जाणीव आहे की नाही असाही प्रश्न पडतो. साधारणपणे आपण सार्वजनिक ठिकाणी तर सोडाच, पण मनातही जे शब्द उच्चारायला कचरतो, ते शब्द ती बिनधास्तपणे वापरते, बोलताना आणि लिहितानाही. आपण भारतीय तर अवाक् होतोच, पण इतरदेशीयही जरासे गडबडतात. मात्र तिचा त्यामागचा प्रामाणिक विचार, हेतू आणि विषयानुसार चपखल शब्दयोजना व उपहास, उपरोध यांचा नेमका वापर यामुळे तिचं लेखन अश्लील वाटत नाही. तिची पुस्तकं पूर्ण वाचल्याशिवाय हातातून ठेववत नाहीत.

जर्मेन सर्व स्त्रीसमस्या केवळ मांडते असं नाही तर, त्यामागची सामाजिक कारणं सांगते. स्त्रियांच्या लैंगिक गरजा आणि पुरुषांच्या तिच्याविषयीच्या अपेक्षा, वस्तुस्थिती लिहिताना तिने पौर्वात्त्य आणि पाश्चात्त्य देशांमधील एकत्र व विभक्त कुटुंबव्यवस्था, त्यांचे फायदेतोटे यांचाही विचार केला आहे. त्यासाठी आशियाई देशांमधे जाऊन तेथील दवाखाने, कुटुंबकल्याण केंद्रांसारख्या सरकारी योजना यांची माहिती घेतली आहे. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हे सूत्र ती पाळते. भारतातही तिच्या तीन-चार खेपा झाल्या. आपला मुद्दा ठासून सांगताना वेळप्रसंगी आपलेच उदाहरण देताना, आपल्या चुका सांगताना तिला संकोच नसतो. मग जनमानसातील आपल्या प्रतिमेचं काय असा विचार ती करत नाही.

गेल्या वर्षी समाजावर प्रभाव पाडणाऱ्या सात स्त्रियांची यादी बीबीसी रेडिओनं प्रसिद्ध केली. त्यात मार्गारेट थॅचर, बियॉन्से ही गायिका यांच्या जोडीने जर्मेन आहे. वयाची सत्तरी जवळ आल्यावर पर्यावरणप्रेमी जर्मेननं ऑस्ट्रेलियात जाऊन चक्क ६० हेक्टर वर्षांवन (रेन फॉरेस्ट) विकत घेतलं. वनस्पतिशास्त्रज्ञ असणाऱ्या आपल्या बहिणीला बरोबर घेत तेथील झाडांची माहिती मिळवली. प्लास्टिक व इतर कचऱ्याने तेथील पर्यावरणाची होत असलेली नासाडी रोखली, ते जंगल पुनश्च हिरवंगार व्हावं यासाठी रात्रंदिवस कष्ट केले आणि आता ते जंगल एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात देऊन ती परतली. या साऱ्या अनुभवावरचं तिचं ‘व्हाइट बीच’ हे पुस्तक वाचताना तिच्या लेखनाचा एक वेगळाच पैलू दिसतो आणि तिची मनस्वी वृत्ती तीव्रपणे जाणवते. जणू काही आयुष्यभर निसर्गानं जे दिलं ते त्याला परत देत ती ऋणमुक्त होऊ  पाहात होती.

तिचा मनस्वीपणा तिच्या ‘डॅडी, वी हार्डली न्यू यू’ या पुस्तकातून आणखी वेगळ्या प्रकारे प्रकटलाय. आपल्या आईवडिलांचं नातं बिघडलेलं आहे याची जाणीव तिला होती. त्यांचं प्रेम तिला फारसं मिळालं नाही. वडील कधीतरी युद्धावर गेलेले होते. पण आपल्या भूतकाळाबद्दलचं, कुटुंबाबद्दलचं त्यांचं मौन तिचं कुतूहल वाढवत होतं. कुटुंबाची माहिती नव्हती. वडिलांच्या मृत्यूनंतर तिनं तोच ध्यास घेतला. जगभर जिथे कुठे त्यांचा शोध घेणं शक्य होतं तिथे ती गेली. भारतात, नाशिकला, देवळालीला गेली. त्या वेळी चक्क वणीच्या सप्तशृंगीला गेली. शाळेपासून अश्रद्ध बनलेली जर्मेन बरोबरीच्या लोकांच्या सांगण्यावरून त्या महाकाय पाषाणमूर्तीसमोर नतमस्तक झाली. त्या वेळी मनात उठलेला कल्लोळ तिनं फार समर्थपणे व्यक्त केला आहे. भूतकाळ शोधत असलेली जर्मेन आणि समोर दुष्टसंहारक दुर्गादेवी. आपण तिच्याकडून शक्ती मिळवायला आलोय, भूतकाळाला गाडून टाकण्याची शक्ती. वडील, पती, मुलगा यांच्याशिवायही जगण्याचा स्त्रीधर्म आहे, तो आपण स्वीकारतोय असं तिला वाटलं. वडिलांनी आपल्याला आयुष्यभर फसवलं याचं तिला अतोनात वाईट वाटलं. आपण कोणाचीच सेन्सॉरशिप मानत नाही, केलेल्या कोणत्याही गोष्टीचा मला पश्चात्ताप होत नाही, असं ठामपणे सांगणारी जर्मेन! या टप्प्यावर आपण आपली नियती मान्य करण्याची शक्ती मिळवली अशी स्वत:चीच समजूत घालत कणखर होत असावी का?

जर्मेन ग्रिअर (१९३९)

‘द फिमेल यूनक’, ‘सेक्स अ‍ॅण्ड डेस्टिनी – द पॉलिटिक्स ऑफ फर्टिलिटी’, ‘द होल वूमन,

द चेन्ज – वूमन एजिंग अ‍ॅण्ड द मेनोपॉज’, ‘शेक्सपियरीएल्स वाइफ’, ‘द ब्युटीफुल बॉय’, ‘व्हाईट बीच,’ ‘डॅडी वी हार्डली नो यू’ आदी १० वैचारिक पुस्तके, १७व्या व १८व्या शतकातील लेखिका, चित्रकार कवयित्री यांच्या साहित्याचे संकलन व संपादन, शेक्सपियरचे चरित्र इत्यादी पुस्तके.

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com

Story img Loader