व्हर्जिनिया वूल्फच्या लेखनाचा, व्यक्तित्वाचा एक अनोखा पण महत्त्वाचा भाग म्हणजे तिचं सामाजिक परिस्थितीचं भान. तिच्या असंख्य निबंधांचे विषय हे साहित्यसंबंधित होतेच, पण स्त्रीजीवनाशीही निगडित होते. ‘चूल आणि मूल’ याच्या पलीकडे जाऊन स्त्रिया किती तरी गोष्टी करू  शकतात याची जाणीव समाजाला स्पष्टपणे आणि उच्चरवात करून देण्यात व्हर्जिनियाने मोठाच वाटा उचलला.

व्हर्जिनिया वूल्फ (१८८२-१९४१). इंग्रजी साहित्यदरबारातील पहिल्या रांगेतली ही मानकरीण! तिच्याशी शब्दभेट होऊन पंचवीस-तीस र्वष झाली पण तिच्याबद्दलचं, तिच्या साहित्याबद्दलचं कुतूहल अजून आहेच. तिच्याबद्दल विचार करताना कायम माझ्या डोळ्यांसमोर, निळ्या नभात आपल्या डौलदार गतीनं, स्वच्छंद विहरणारी, एखादी ऐटबाज पक्षिणी असावी अशी प्रतिमा येते. आपला स्वतंत्र ठसा इंग्रजी साहित्यजगतावर उमटवणारी! अतिशय बुद्धिमान तशीच तीव्र संवेदनशील आणि चिंतनशील तशीच सहज, मनोज्ञ लेखन करणारी लक्षणीय ब्रिटिश लेखिका!

साहित्यप्रेमी, सुसंस्कृत, संपन्न पण परंपरावादी घरात जन्मलेली, अभिजात देखणेपण लाभलेली व्हर्जिनिया लहानपणापासून आपल्या बुद्धिवैभवानं व मनस्वी स्वभावानं, साऱ्यांच्या कौतुकाची होती. घरात साहित्यिकांची, इतर मोठमोठय़ा लोकांची ये-जा असे, चर्चा चालत. त्यामुळे साहित्याची आवड-नव्हे ते वेडच, तिला लागले, आणि आयुष्यभर लेखन, वाचन, हा एकच ध्यास तिनं घेतला. आपल्या मनस्वी स्वभावानुसार स्वत:ला झोकून देत ती सतत लिहीत राहिली.

तिचे वडील ‘सर’ लेस्ली स्टीफन यांचा मुलींना औपचारिक शिक्षण देण्यास विरोध होता. त्यामुळे व्हर्जिनियाचे भाऊ  जरी केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले तरी ती व तिची बहीण यांचं शिक्षण घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून झालं. लहानपणापासून आपल्यावर हा अन्याय झालाय याची जाणीव तिला होती. पुढच्या काळात स्त्रियांच्या शैक्षणिक हक्काबद्दल तिने जो सार्वजनिक आग्रह धरला त्याची मुळं तिच्या या अनुभवात असतील का? तिची संवेदनक्षमता व स्मरणशक्तीही तीव्र होती. आपला स्मृतिकोश उघडल्यावर, वर्षांची असताना प्रवासात, आईच्या मांडीवर बसल्यावर, आपल्या आईच्या ड्रेसवरील फुलांचे डिझाइन, त्यांचे रंगही तिला आठवतात.

वयाच्या ९व्या वर्षी, ‘२२ हाइडपार्क गेट’ (घराचा पत्ता) या नावाने, भावाच्या मदतीने तिने कौटुंबिक साप्ताहिक काढलं आणि लेखनाचा श्रीगणेशा केला. यात कौटुंबिक बातम्यांना मिस्कीलतेची फोडणी असे. पुढे या मिस्कीलतेची जागा उपरोधानं घेतली. १८-१९व्या वर्षांपासून तिने टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहिण्यास आरंभ केला.

शब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, प्रयोगशीलता याबरोबरच वैपुल्य हेही तिच्या लेखनाचे वैशिष्टय़ होते. ‘आकाशात ढगांची गर्दी असावी तशी माझ्या अवतीभवती शब्दांची गर्दी असते. धुराच्या वलयांप्रमाणे ते शब्द मला वेटाळून बसतात. त्यांच्याशिवाय मी कुणीच नाही, ते नसतील तर सगळा अंधार!’ असे म्हणणाऱ्या, शब्दस्वामिनी असणाऱ्या व्हर्जिनियाला वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत शब्दही उच्चारता येत नव्हता हे खरंही वाटणार नाही.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत होता. त्यामुळे कलाजगतातही अनेक बदल होत होते. कलाकार, प्रतिभावंत साहित्यिक, परंपरेच्या जोखडातून सुटका करून घेत, आविष्काराच्या नवनवीन शक्यता शोधत होते. लेखक नवीन आकृतिबंध, आधुनिक रचना, नवीन भाषाशैली यांचे प्रयोग करत होते. आधुनिक जाणिवांनुसार कादंबरी, कथालेखन यामध्ये अंतर्बाह्य़ परिवर्तन होऊ  लागलं होतं. स्त्रिया धिटाईने लेखनाद्वारे अभिव्यक्त होऊ  लागल्या होत्या. तत्कालीन इंग्लंडमधील साहित्य-परिवर्तनात व्हर्जिनिया वूल्फ हिचा सिंहाचा वाटा होता.

ती लेखिका तर होतीच, पण स्वत: प्रकाशन, संपादन करीत होती. तिने आपल्या पतीबरोबर-लिओनार्ड वूल्फबरोबर, होगार्थ प्रेसद्वारे नवीन लेखकांची महत्त्वपूर्ण पुस्तकं प्रकाशित करण्यास प्राधान्य दिलं होतं. समकालीन लेखकांच्या, चित्रकारादी प्रतिभावंताच्या भेटीगाठी व्हाव्यात, निर्मितीच्या प्रक्रियेबाबत, प्रत्यक्ष निर्मितीबाबत चर्चा व्हाव्यात, आधुनिक साहित्याचे नवनवे उन्मेष दिसावेत, या उद्देशाने ही काही तरुण मंडळी एकत्र आली होती. साहित्यशास्त्रविनोदात रमलेला हा ‘ब्लूम्सबेरी ग्रूप’ त्या काळात फारच गाजला होता. त्यात चरित्रलेखनाचा वेगळा बाज रूढ करणारा लिटन स्ट्रॅची, टी. एस. इलियटसारखा, संवेदनशील कवी, कॅथरिन मॅन्सफील्डसारखी दर्जेदार कथाकार, दृक्प्रत्ययवादी चित्रकारांनंतरचा महत्त्वाचा चित्रकार रॉजर फ्रॉय, लिओनार्ड वूल्फसारखा संपादक, इतिहासकार आणि स्वत: व्हर्जिनिया असे साहित्यिक, कलावंत होते.

व्हर्जिनियाने आपल्याबरोबरच इतरांचं लेखनही महत्त्वाचं मानलं. भवतीच्या साहित्यव्यवहारावर तिची बारकाईची नजर असे. नवीन लेखकांना उत्तेजन देणं, त्यांच्यासाठी व्याख्यानं देणं, चर्चा घडवणं, निबंध लिहिणं या गोष्टी ती करत असे. ‘वाचकांचा भरपूर आदर करणारं लेखन आपण केलं पाहिजे, वाचक आपल्या लेखनाचं पोषण, संवर्धन करतात,’ अशी तिची धारणा होती. आपले बालगंधर्व रसिक प्रेक्षकांना ‘मायबाप’ मानत. व्हर्जिनियाने तीच भावना अनेकदा व्यक्त केलेली दिसते.

तिच्या प्रत्येक कादंबरीत तिने रचनेचे प्रयोग केले. तिची भाषा नेमकी, चित्रमय होतीच, पण त्यात विलक्षण, अंगभूत लय होती. तिचे शब्द येताना एक नाद बरोबर घेऊन येत जणू! ‘द व्हॉयेज आउट’ या तिच्या पहिल्या कादंबरीपासून ‘बिटवीन द अ‍ॅक्ट’ या शेवटच्या कादंबरीपर्यंत असं दिसतं, की तिच्या कादंबरीतील पात्रं ही तिच्या आजूबाजूच्या वातावरणाशी मिसळून गेलेली असतात आणि ती एकापेक्षा अधिक कादंबऱ्यांमध्ये आपल्याला भेटत राहतात. त्या पात्रांचं चित्रण करताना त्यांच्या अनुभवांचं, अनुभव स्वीकाराच्या मानसिक क्रियेचं वर्णन करणं तिला आवडतं. माणसाच्या अंतर्मनात होणाऱ्या खळबळीचा, मनात येणाऱ्या विचारांचा शोध घेणं तिला आवडतं. त्याद्वारे ती जणू आत्मशोध घेत असते. आजूबाजूचा निसर्ग किंवा इतर तपशील ती इतक्या बारकाईनं व चपखल शब्दांच्या मदतीनं सांगत जाते की, आपल्या परिचयातील दृश्यांकडे किंवा परिसराकडे बघण्याची एक नवीच दृष्टी आपल्याला प्राप्त होते. आपण आंधळे होतो का? आजवर आपल्या हे कसं लक्षात आलं नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो. तेव्हा ती कोणी त्रयस्थ निवेदक नसते तर आपल्याबरोबर येत, संवाद साधत सांगते. तिच्या कादंबऱ्या म्हणजे अनेक पात्रांमधून उभी राहिलेली केवळ एक कथा नसते. आपल्या संवेदनक्षमतेला व आपल्या बुद्धीलाही चालना देणारा हा आपला वेगळा अनुभव असतो. म्हणूनच संज्ञाप्रवाही कथन आणि दृक्प्रत्ययवादी शैली यांच्या माध्यमाद्वारे, दर्जेदार व संवेदनशील लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये तिचे नाव अग्रगण्य आहे.

व्हर्जिनियाच्या लेखनाचा, व्यक्तित्त्वाचा एक अनोखा पण महत्त्वाचा भाग म्हणजे तिचं सामाजिक परिस्थितीचं भान. तिच्या असंख्य निबंधांचे विषय हे साहित्यसंबंधित होतेच, पण स्त्रीजीवनाशीही निगडित होते. तिचे सर्वात गाजलेले निबंध म्हणजे, ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ आणि ‘थ्री गिनीज’( three guineas). १९२८ मध्ये स्त्रियांना इंग्लंडमध्ये मतदानाचा अधिकार मिळाला. पण त्याआधी, ‘चूल आणि मूल’ याच्या पलीकडे जाऊन स्त्रिया किती तरी गोष्टी करू शकतात याची जाणीव समाजाला स्पष्टपणे आणि उच्चरवात करून देण्यात व्हर्जिनियाने मोठाच वाटा उचलला. वूलस्टोनक्राफ्ट या स्त्रीचळवळीतील कार्यकर्तीनंतर, इंग्लंडमधील स्त्रीचळवळ सुस्थिर करण्याचं श्रेय व्हर्जिनियाकडे जातं.

आजवर स्त्रियांना कस्पटासमान लेखणाऱ्या पुरुषांवर, समाजावर हल्ला करताना ती जराही मागेपुढे पाहत नाही. स्त्रियांना पुरुषांच्या यशाची प्रतीकं मानलं जातं, त्यांना बुद्धिहीन समजलं जातं, त्यांना काही करून दाखवण्याची संधी नाकारली जाते, सुरक्षिततेच्या नावाखाली घरात डांबलं जातं आणि त्यांना चांगलं काही करता येणार नाही, लिहिता येणार नाही, असं पसरवलं जातं. अनेक स्त्रियांची उदाहरणं देत, ती म्हणते, ‘तुम्ही त्यांना थोडासा अवकाश द्या. मग त्या काय करतील पाहा. कोणत्याही क्षेत्रात त्या मागे राहणार नाहीत. समाजाला केवळ पुरुष किंवा केवळ स्त्रिया नकोतच. त्या दोघांचं जग हवंय.’ स्त्रीस्वातंत्र्याचा उद्देश नेमकेपणाने सांगत व त्याचा अर्थ व्यापक करीत ती स्त्रीसाठी केवळ तिचा असा ‘थोडासा अवकाश’ मागतेय, कारण स्त्रीशक्तीवर, तिच्या बुद्धीवर तिचा ठाम विश्वास आहे.

तिच्या लेखनाने, बुद्धिवैभवाने व तळमळीने तिला सुशिक्षित, स्वतंत्र स्त्रीचं अभिमानास्पद प्रतीक मानलं गेलं. ती एक आख्यायिकाच बनली. डोरिस लेसिंगसारख्या नोबेलविजेत्या लेखिकेला आपल्या नायिकेला ‘अना वूल्फ’ असं नाव द्यावंसं वाटलं आणि ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’सारख्या नाटकात, समाजातील उच्चभ्रू स्त्रीचा संदर्भ त्या नावाशी जोडला गेला.

स्त्रीजीवनासंबंधित परखड मतांप्रमाणेच ती युद्धांचा निषेध हिरिरीने करते. पहिल्या महायुद्धाचे चटके इंग्लंडने खूप सोसले. जीवनाच्या सर्व अंगांना त्याच्या झळा बसल्या. त्या विदारक अनुभवातून गेलेल्या व्हर्जिनियाचं मन धास्तावलं होतं. युद्धांची आवश्यकताच काय? असं ती ‘थ्री गिनीज’ या पुस्तकवजा प्रदीर्घ निबंधातून विचारते. काल्पनिक पत्रकाराशी पत्राद्वारा चर्चा करतोय असा आकृतिबंध स्वीकारत ती आपली बाजू मांडत जाते. माणसाचं सारं काही हिरावून घेणारी ही युद्धं कुणासाठी खेळली जातात, तो खरंच कुणाचा खेळ होतो, आणि कुणाचे जीव जातात, असे प्रश्न उभे करणारी व्हर्जिनिया आज असती तर? हस्तिदंती मनोऱ्यात राहून केवळ आपल्या लेखनाचा विचार न करता वास्तवातील समस्यांचा विचार करणाऱ्या या लेखिकेचं लेखन म्हणूनच वेगळं ठरतं.

आपल्या आईच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्याच्या आघातानंतर व्हर्जिनियाला नैराश्याचा मानसिक आजारच जडला होता. एरवी अतिशय समतोल असणारी, एकाग्रपणे आपल्या लेखनावर लक्ष केंद्रित करणारी ती असा झटका आला की सैरभैर होत असे. स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या तिला वैयक्तिक आयुष्यात पूर्ण स्वातंत्र्य होतं. तिला समजून घेणारा नवरा, भावंडं, मित्रमंडळी होती. तिला हवा तसा बौद्धिक अवकाश व व्यावसायिक यशही तिला मिळालं. पण सतत मनाची उलाघाल व अस्वस्थता हा सर्जनशील मनाचा विशेष तिच्या भाळीही कोरलेला होता.

दुसऱ्या महायुद्धाचे ढग युरोपवर घोंगावू लागले आणि तिचा धीर सुटला. लिओनार्ड ज्यू होता. आपल्याला काय सहन करावं लागेल याची कल्पना तिला सहन होईना. ‘मला आता वेड लागेल. त्यातून मी बाहेर येऊ  शकेन असा विश्वास मला नाही. माझ्या लेखनावर मी लक्ष एकाग्र करू शकणार नाही. माझ्या आयुष्याचं प्रयोजन म्हणजे फक्त लेखन. तेच करता येत नसेल तर जगायचं कशाला?’ लिओनार्डला असं पत्र लिहून ठेवून, व्हर्जिनिया फिरायला गेली, ती आलीच नाही. आपल्या कोटाच्या खिशात भरपूर दगड भरून, घरामागच्या तलावात तिनं परत न येण्यासाठी पाऊल ठेवलं. आयुष्यातल्या सुखद क्षणांची शिदोरी कमी वाटली की कणखरपणा कमी पडला असेल? ‘चांगल्या लेखकाला प्रत्येक अनुभव सांगता, लिहिता आलाच पाहिजे,’ असा आग्रह धरणारी व्हर्जिनिया आपला हा शेवटचा अनुभव कसा वर्णन करणार होती?  ‘तुम्ही ग्रंथालयांना कुलपं ठोकाल, पण माझ्या मनाच्या स्वातंत्र्याला कुणी कडीकुलूप घालू शकणार नाही,’ असं म्हणणारी ती शेवटी मनस्वीपणानेच त्या अज्ञातातले अनुभव घ्यायला गेली.

 

व्हर्जिनिया वूल्फ – साहित्यसंपदा

  • नऊ  कादंबऱ्या-त्यातल्या मिसेस डलोवे, टू द लाइटहाऊस, द वेव्हज, या उत्तम मानल्या जातात.
  • सहा कथासंग्रह
  • चरित्रे-अ)फ्लश- एका कुत्र्याच्या आत्मचरित्राच्या दृष्टिकोनातून वर्तमानावर   केलेलं भाष्य  ब)रॉजर फ्राय या चित्रकाराचे चरित्र
  • वैचारिक निबंध
    अ) अ रूम ऑफ वन्स ओन
    ब) थ्री गिनीज
  • परीक्षणे, प्रासंगिक व इतर लेखांचे सहा खंड
  • अ रायटर्स डायरी – लेखनविषयक निवडक नोंदींचा संग्रह
  • व्हर्जिनियाच्या दैनंदिनींचे पाच खंड

डॉ. मीना वैशंपायन  meenaulhas@gmail.com

Story img Loader