‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ या विख्यात कादंबरीची लेखिका हार्पर ली. १९६० मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली आणि तिला कल्पनातीत लोकप्रियता मिळाली. १९६१ चा पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. आज ६० वर्षे होत आली तरी तिची लोकप्रियता ओसरत नाहीये. कादंबरी प्रकाशित झाल्यापासून शेवटपर्यंत (२०१६) हार्पर ना कधी कोणत्या समारंभाला गेली, ना तिने मुलाखती दिल्या, ना कोणाला ती भेटली.
लहान मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस किती उत्कंठेचा आणि कुतूहलाचा असतो नाही? एका नवीन विश्वात त्यांचा प्रवेश होत असतो. खरं पाहता नवीन विश्व वगैरे समजण्याचं ते काही वय नसतं. पण त्या पहिल्या दिवसाच्या आठवणी कायम मनात ठसतात हे खरं. ‘स्काऊट’ ऊर्फ जीन लुई फिन्च हिचा शाळेचा पहिला दिवसही आपल्या वेगळेपणानं तिच्या मनात ठसला. अमेरिकन लेखिका हार्पर ली (१९२६-२०१६) या लेखिकेच्या ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ या विख्यात कादंबरीची नायिका म्हणजे ही दहा वर्षांची मुलगी स्काऊट फिन्च. तिच्या आठवणीतला हा दिवस –
‘मीही त्या दिवशी प्रथमच शाळेत पाऊल ठेवणार होते. साधारण पहिल्या दिवशी मुलांच्या आईवडिलांपैकी कुणीतरी त्यांना शाळेत घेऊन जातं. पण माझ्याबरोबर मात्र माझा मोठा भाऊ जेम येणार होता. तोही त्या शाळेत होता ना! मी पहिलीत तर तो पाचवीत. मी अटिकसला, माझ्या बाबांना येण्याबद्दल सुचवलंदेखील! पण ते म्हणाले, ‘‘जेम तुझी नीट काळजी घेईल.’’ जाताना जेमनं मला असंख्य सूचना दिल्या. मुख्य म्हणजे शाळेत असेतो मी त्याच्याकडे जायचं नाही. म्हणजे काय? आता जेम आणि मी खेळू शकणार नाही? पण तो म्हणाला, ‘‘आता बरोबर खेळणं वगैरे घरी! शाळेत वेगळं असतं.’’ त्याचं म्हणणं मला दिवसअखेर पटलंच, कारण पहिला दिवस संपायच्या आधीच शाळेत नवीन आलेल्या कॅरोलिन फिशर या आमच्या बाई माझ्यावर रागावल्या होत्या, त्यांनी माझ्या हातावर चार पट्टय़ाही मारल्या होत्या आणि मला उरलेला दिवस कोपऱ्यात उभं करून ठेवलं होतं. कारण एवढंच की त्या जे काही फळ्यावर लिहीत होत्या ते मला येत होतं आणि मला ते घडाघड वाचताही येत होतं. माझं त्यात काय चुकलं ते मला कळलंच नाही. पण जेम मला नंतर म्हणाला की, तो माझा आगाऊपणा होता. म्हणजे काय?
ही एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली कादंबरी आहे. त्यात १९३० च्या आसपासचा काळ रंगवला आहे. लहानपणीच्या आठवणी, अनुभव यांच्यावर आधारित अशी ही कादंबरी आत्मचरित्रात्मक म्हणता येईल. आपण खरं म्हणजे बखरकार आहोत, आपलं गाव, तेथील मध्यमवर्गीय लोक, त्यांची वैशिष्टय़े, तेथील संस्कृती हे सारं काळाच्या ओघात फार झपाटय़ाने नष्ट होतंय आणि ते आपण जतन करून ठेवावं, अशी तीव्र इच्छा असल्याने आपण हे लिहिलं अशी सामान्यपणे लीची भूमिका आहे. कादंबरीत प्रत्यक्ष तिच्या जीवनाशी साम्य दाखवणारे अनेक प्रसंग, घटना रंगवल्या आहेत. व्यक्तिरेखा किंवा स्थळांची फक्त नावं बदलली आहेत.
अमेरिकेच्या आग्नेय भागातील अलाबामा या परगण्यातील मन्रोव्हिले हे छोटंसं गाव. हार्पर ली ही तेथे राहणारी. चार भावंडांमधील सर्वात लहान. त्या छोटय़ाशा गावात सगळे एकमेकांना ओळखणारे आणि काही तर पिढय़ान्पिढय़ा तिथेच राहिलेले, परस्पर-संबंधित. फिन्च कुटुंब मूळ तेथीलच. तिचे वडील अमास कोलमन हे वकील होते. आई फ्रान्सेस ही मनोरुण होती. ली आणि तिची भावंडं यांचं एकमेकांशी जास्त सख्य असे. पण त्याहीपेक्षा तिचं वडिलांशी अधिक गूळपीठ होतं. तिच्या शेजारी राहणारा ट्रूमन कपोटे हा तिचा अगदी जवळचा मित्र होता. हार्पर ही दांडगोबा म्हणावी अशी, मस्तीखोर होती. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांची मैत्री होती. शाळेत, बाहेरही ती नेहमी त्याला सांभाळून घेत, त्याचं समर्थन करत असे. तिच्या कादंबरीत हेच सारं ‘डिल’ या व्यक्तिरेखेत आलं आहे असं दिसतं. पुढे हा ट्रूमन लेखक, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झाला.
शालेय शिक्षण संपवून १९४४ मध्ये ती मुलींच्या कॉलेजात गेली. तिथे असताना आपल्या वेगळेपणाने ती उठून दिसे. कारण इतर बहुतेक मुली फॅशन्स, कपडे, मित्रांबरोबरची प्रेमप्रकरणे या सगळ्या गोष्टींमध्ये दंग असताना हार्पर ली अभ्यास व वाचन यातच रमलेली असे. त्यामुळे तिला फारशा मैत्रिणीही नव्हत्या. एकटं राहावं, स्वत:तच गुंतून राहावं अशी आवड होती. वाचनाबरोबर संपादन, लेखनाचा प्रयत्न चालू होता. तेथील नियतकालिकाचं संपादन ती करी. लहान लहान नोकऱ्या करत उपजीविका करताना तिच्या मनात लेखनाचेच विचार होते. शेवटी कशीबशी काही काळासाठी आर्थिक तरतूद करत तिने लेखनाचा श्रीगणेशा तर केला. दोन वर्षे मेहनत घेऊन तिने ही कादंबरी लिहिली.
१९६० मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली आणि तिला कल्पनातीत लोकप्रियता मिळाली. १९६१ चा पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. आज ६० वर्षे होत आली तरी तिची लोकप्रियता ओसरत नाहीये. दरवर्षी तिच्या हजारो प्रतींची विक्री होत असते. एवढंच नाही तर जगभरच्या अनेक भाषांमध्ये तिचे अनुवाद झाले (मराठीत अनुवाद झाला की नाही माहीत नाही, पाहण्यात नाही.) मन्रोविले हे तिचं गाव आता अलाबामाची वाङ्मयीन राजधानी म्हणून ओळखले जाते.
अमेरिकेच्या या दक्षिण भागाला अतिशय संपन्न अशी वाङ्मयीन, सांस्कृतिक पाश्र्वभूमी आहे. त्याचबरोबर वंशभेद, वर्णभेद व त्यातून होणारे हिंसक प्रकार यांची गडद छायाही येथेच जास्त आहे. विल्यम फॉकनर, टेनेसी विल्यम्स हे नामवंत लेखक किंवा कार्सन मॅक्युलर्ससारखी लेखिका अमेरिकेच्या याच दक्षिण भागातून आलेले आहेत. त्यांचा वारसा इथल्या लेखकांना लाभला आहे. हार्पर ली देखील तेथेच वाढली. या लेखकांनी तेथील संस्कृती, समाजमन जाणून घेत आपल्या साहित्यातून रंगवले, तेथील समाजावर होणारा अन्याय व त्यातून उद्भवणारी हिंसा यांचे चित्रण आपल्या साहित्यात करून त्याचे वेगवेगळे पैलू जगासमोर आणले. हार्पर लीने हाच वारसा पुढे चालवला.
‘मॉकिंग बर्ड’ हा अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात आढळणारा छोटासा कबऱ्या रंगाचा पक्षी आहे. हा पक्षी मारणं हे पाप आहे असं तिथे मानलं जातं. हे पक्षी लोकांना कसलाही उपद्रव करत नाहीत. ते फक्त गातात. खरं म्हणजे ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची अजाणता नक्कल करतात. त्यांच्या गाण्याने, किलबिलाटाने लोकांना आनंदच होतो. लहान मुलंही अशीच असतात, आपल्या वागण्या-बोलण्याने इतरांना आनंद देणारी. पण घरातली मोठी, प्रौढ माणसं जे बोलतील त्याची ते नक्कल करतात.. अनेकदा शब्दांचा अर्थ कळत नसला तरी. आपल्या निरागस स्वभावानुसार ती मुलं वेगवेगळे प्रश्न विचारत राहतात. त्यांची उत्तरं कशी दिली जातात, यावर मुलांच्या व्यक्तित्वाचं पोषण होतं. वंशभेद, वर्णभेद यांनाही तोंड देण्याचा प्रसंग त्याच्यावर येतो. जगात चांगलं व वाईट अशा दोन्हींचा सामना करण्यासाठी त्यांना सज्ज करणं हे आवश्यक असतं. बरेचदा अनुभव असा येतो की, याची जाणीवच कुणाला नसते आणि त्यामुळे हे निरागस मॉकिंग बर्डस् भावनिकदृष्टय़ा मारले जातात. नाहीतर या मॉकिंग बर्डस्चा निरागस सूरच हरवण्याची भीती असते. स्काऊटचे वडील अटिकस मात्र याबाबतीत फार सावध असतात. आपल्या विधुरावस्थेमुळे तर ते अधिक काळजीपूर्वक मुलांना वाढवत असतात. वकिली करताना एका कृष्णवर्णीयाची केस ते हाती घेतात. त्याच्यावर एका गोऱ्या स्त्रीवर बलात्कार केल्याचा गुन्हा असतो. तो निरपराध असूनही त्याला फाशीची शिक्षा होते. त्यांना याबाबतीत आपण अपयशी झाल्याची खंत वाटते, पण गोऱ्यांच्या समाजात तसे बोलून दाखवण्याची त्यांना चोरी होते. स्काऊटला हे नीटसं कळत नाही, कधी कळलं तरी वळत नाही. बाप-लेकीतला ताण, मुलीचा वडिलांवरचा असीम विश्वास, अभिमान, वडिलांची हतबलता व समाजाचा रेटा असे अनेक ताण-तणाव यात दिसतात.
ही कादंबरी इतकी लोकप्रिय होण्याची कारणं अनेक. आई-वडील व मुलं यांच्यातील संबंध, ताण, संस्कारक्षमता हे सारे प्रश्न कायमच समकालीन ठरतात. तपशिलांचा फरक सोडला तर त्यातील आशयाचे आवाहन सार्वकालिक, सार्वत्रिक आहे. त्यातील विषयाप्रमाणेच आकृतिबंध व रचना यांची वीण घट्ट आहे. शिवाय तिच्या लेखिकेने याव्यतिरिक्त काहीही का लिहिले नाही, हा मोठा गूढ प्रश्न साऱ्यांना पडतो व त्याचा शोध घेतला जातो. हार्पर लीचा मृत्यू होण्यापूर्वी काही महिने हार्पर कॉलीन्स या प्रतिष्ठित प्रकाशनाने मोठा गाजावाजा करीत तिच्या दुसऱ्या कादंबरीचे हस्तलिखित सापडले आहे व प्रकाशित करतो आहोत, असे म्हणत ‘गो सेट अ वॉचमन’ ही कादंबरी प्रकाशित केली. ती खरोखरी तिने लिहिलेली दुसरी कादंबरी आहे की पहिल्याच कादंबरीचा पहिला खर्डा आहे यावर वाद आहेत. दुसरी कादंबरी पहिलीच्या पासंगाला पुरत नाही या म्हणण्यात काहीसं तथ्य आहे हे आपण वाचलं की कळतं. त्यात बहुतेक आधीच्याच पात्रांचे पुढील आयुष्य दाखवले आहे असे जाणवते. म्हणजे हा पुढचा भाग?
हार्पर ली लेखिका म्हणूनही अगदी वेगळी ठरते. १९६०मध्ये कादंबरी प्रकाशित झाल्यापासून शेवटपर्यंत (२०१६) हार्पर ना कधी कोणत्या समारंभाला गेली, ना तिने मुलाखती दिल्या, ना कोणाला ती भेटली. अनेकदा अनेक ठिकाणी पत्रकारांनी तिला गाठण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांना छोटय़ा चिठ्ठय़ा पाठवून आपल्याशी संपर्क करू नये असे सांगत असे. लोकांमध्ये मिसळणे संपूर्णपणे टाळणाऱ्या हार्परला अमेरिकन अध्यक्षांतर्फे या एकमेव कादंबरीसाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी तो स्वीकारल्याचे भाषण करण्यासाठीही ती पुढे आली नाही. तिला या पुस्तकाच्या विक्रीतून अमाप पैसा मिळाला. त्यातला खूपसा भाग तिने सेवाभावी संस्था, वा इतर धर्मादाय कार्यासाठी दान केला पण आपले नाव कुठेही येऊ नये अशी अट घालत!
हार्पर ली हिला एकांत एवढा प्रिय का असावा? आपल्या आयुष्याचं खासगीपण जपण्यासाठी तिने कुणाला-अगदी आपल्या चरित्रलेखनाची इच्छा असणाऱ्यांनाही जवळ केले नाही. ऑप्रा विन्फ्रेशी तिची खूप मैत्री होती. तरीही आपल्या शोमध्ये तिला बोलावायचं धाडस ऑप्राने केलं नाही. मात्र तिचं एक पत्र ऑप्राने जाहीर केलं. त्यात हार्पर म्हणते, ‘‘मॉकिंग बर्डला एवढं यश मिळेल याची मला कल्पना नव्हती. आजच्या काळाशी मी जुळवून घेऊ शकत नाही, कारण लॅपटॉप, मोबाइल यांनी माणसांना गराडा घातलाय, पण त्यांची मनं मात्र रिकामी आहेत.’’
या पुस्तकावर आधारित चित्रपटात ग्रेगरी पेकने भूमिका केली व ऑस्कर मिळवलं. हार्परने त्यावेळी त्याला खूप मदत केली व दोघांची आयुष्यभर चांगली मैत्री झाली. पण पहिल्याच पुस्तकाला मिळालेले यश व त्यातील अनपेक्षितता तिला झेपली नाही? आपण इतकं चांगलं पुन्हा लिहू शकू याची खात्री वाटली नाही म्हणून तिने नंतर काही लिहिलं नाही? का एकदा कळसावर पोचल्यावर खालीच यावं लागेल अशी भीती वाटली? लेखकाची प्रतिभाशक्ती अशी, एवढी गोठली जाऊ शकते का? मनात राहतात केवळ प्रश्न आणि तिचं अविस्मरणीय पुस्तक. मनात राहतात केवळ प्रश्न आणि तिचं अविस्मरणीय पुस्तक.
एमिली ब्रॉन्टे या ब्रिटिश लेखिकेनंतरच्या शतकातली आणि तिच्यानंतर एकशे आठ वर्षांनी जन्मलेली हार्पर. दोघींचा काळ आणि (भौगोलिक) खंड दोन्ही भिन्न. या दोघींमध्ये एक महत्त्वाचं साम्य असं की दोघींनी आयुष्यात फक्त एकेकच कादंबरी लिहिली, त्या कादंबरी लेखनाने त्यांना इंग्रजी वाङ्मयात व विश्व साहित्यात अढळ पद दिलं. एमिलीला पुरस्कार मिळाले नाहीत वा यशाचा आनंद उपभोगता आला नाही, कारण तिला तेवढं आयुष्यच मिळालं नाही. हार्पर ली हिला सर्व प्रकारचे सन्मान, पुरस्कार मिळाले, दीर्घायुष्य लाभलं पण तिनं स्वत:ला असं एकटं, लोकांपासून दूर का ठेवलं असावं? मानवी मन गूढ हेच खरं.
डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com