संगीत- मग ते कोणत्याही प्रकारचं असो- चित्तलहरींना सुखावतं आणि प्रफुल्लितही करतं. मानवी जीवनात संगीताचं महत्त्व नव्याने सांगायला नको. प्रवासातील एकटेपणा घालवण्यासाठी हेडफोनवर ‘सोलफुल’ गाणी ऐकणं असो, की सायंकाळी घरातल्या म्युझिक सिस्टमवर मंद आवाजात वाजणारं वाद्यसंगीत असो, संगीताची साथ असेल तर प्रत्येक कृती अधिक एकाग्रपणे आणि ‘रिलॅक्स’ होऊन करता येते. अलीकडच्या काळात व्यायाम करतानाही संगीत ऐकण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. वर्कआऊट, मॉर्निग वॉक, जॉगिंग, योग अशा विविध प्रकारांना सुसंगत ठरणारं आणि व्यायामाला लयबद्ध करणारं संगीत हल्ली मोठय़ा प्रमाणात येऊ लागलं आहे. अशाच पद्धतीचं एक अॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. मेडिटेशन म्युझिक- रिलॅक्स, योगा (Meditation Music – Relax, Yoga) असं या अॅपचं नाव असून ध्यानसाधनेसाठी मन एकाग्र करणारं संगीताचा आनंद त्यातून घेता येतो. हे अॅप सुरू करून कानात हेडफोन लावलं की, संगीताचे सूर आपल्या ध्यानसाधनेला किंवा योगासनांना लय आणि तालबद्धता मिळवून देतात. ध्यानसाधनेखेरीज निवांतपणात किंवा झोपताना गाणी किंवा संगीत ऐकण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे. ऐकता ऐकताच आपली झोप लागल्यास म्युझिक आपोआप बंद होण्यासाठी यात ‘टायमर’ची व्यवस्थाही पुरवण्यात आली आहे. यामध्ये ‘सॉफ्ट पियानो’, ‘पीसफुल लेक’, ‘सनराइज’, ‘सीसाइड रिलॅक्सेशन’ अशा वेगवेगळय़ा प्रकारांत संगीताचं वर्गीकरण करण्यात आलं आहे.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com