सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अशा नियमित आजारांसाठी क्वचितच तातडीने डॉक्टरकडे धाव घेतली जाते. अशा आजारांवर उपाय ठरणारी सर्वसाधारण औषधे प्रत्येक घरात असतात. त्यामुळे डोकेदुखी झाली की त्याची एक गोळी घेऊन वेळ भागवली जाते किंवा खोकला झाला की एखाद्या सिरपचा डोस घेतला जातो. या नेहमीच्या औषधांनी फरक पडतो. मात्र, कधी कधी ही औषधे संपली आणि मेडिकल दुकानातही ती उपलब्ध नसली की, अडचण उभी राहते. अनेकांच्या घरातील औषधांच्या पेटीत एकाच प्रकारच्या आजारावर उपयुक्त असलेली अनेक गोळ्यांची पाकिटे असतात. पण त्यातलं नेमकं कुठलं अधिक परिणामकारक आहे, हे आपल्याला कळत नाही. प्रत्येक औषधाचं नाव वेगळं असलं तरी त्यांच्यातील घटक एकच असतो. ज्याला ‘जनेरिक’ असं म्हणतात. या जनेरिक नावानुसार औषधांचे वर्गीकरण केले जाते. याबद्दल वैद्यकीय अभ्यास असलेल्यांपलीकडे फारच कमी जणांना माहिती असते. पण ही माहिती करून घेण्याचा एक चांगला पर्याय ‘ड्रग्ज डिक्शनरी ऑफलाइन’ (Drugs Dictionary Offline) हे अॅप आहे. अँड्रॉइडवर उपलब्ध असलेल्या या अॅपवर ‘जनेरिक’ औषधांची माहिती, त्यांची उपयुक्तता, त्यातील घटकांचा तपशील, त्या औषधाचे विविध ब्रॅण्ड, त्यांचे साइड इफेक्ट अशी विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरातील एखादे औषध कोणत्या आजारावर उपयुक्त आहे, याची माहिती करून घ्यायची असल्यास या अॅपचा चांगला उपयोग होतो. या अॅपवर विविध आजारांवर उपयुक्त औषधांची नावेही देण्यात आली आहेत. मात्र, अशी औषधे घेण्यापूर्वी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन नक्की घ्या.
औषधांची माहिती
अशी औषधे घेण्यापूर्वी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन नक्की घ्या.
Written by आसिफ बागवान
आणखी वाचा
First published on: 13-02-2016 at 01:39 IST
मराठीतील सर्व अॅपचं विश्व बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile applications for medicines