स्वयंप्रतिमा अर्थात सेल्फीचे फॅड अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अगदी पंतप्रधानांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकालाच ‘सेल्फी’चे खास आकर्षण असते. मग तो एखाद्या डोंगराच्या कडय़ावर घेतलेला सेल्फी असो, एखाद्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या पाश्र्वभूमीवर घेतलेला सेल्फी असो, कुटुंबासमवेत हॉटेलमध्ये जेवण करताना घेतलेला सेल्फी असो की एखाद्या ‘सेलेब्रिटी’सोबत काढलेला सेल्फी असो,
व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारखी कोणतीही समाजमाध्यमे उघडून पाहिली तर आपल्याला अशा अनेक ‘सेल्फी’ पाहायला मिळतील. खरं तर सेल्फी म्हणजे काय, तर आरशात आपण जसे दिसतो, तशी प्रतिमा स्मार्टफोनवरून टिपणे. पण त्यातही चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आणून किंवा चित्रविचित्र मुद्रा करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्या कमी नाही. एका हातात स्मार्टफोनचा कॅमेरा धरून चेहऱ्यावर अपेक्षित भाव करून आणि शरीराची ‘पोझ’ देऊन सेल्फी काढणं म्हणजे कसरतीचंच काम. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण काढलेला सेल्फी व्यवस्थित येतो असे नाही. कधी तो अंधूक येतो तर कधी त्यातील आपला चेहरा पूर्णपणे उजळत नाही. अशा वेळी नव्याने पुन्हा सेल्फी काढण्याखेरीज पर्याय नसतो. मात्र, अॅप स्टोअर आणि गुगल प्लेवर असेही काही अॅप्स आहेत, जे अगदी ‘रिअल टाइम’मध्ये म्हणजे प्रत्यक्ष सेल्फी काढतानाच त्या प्रतिमेचे ‘एडिटिंग’ किंवा ‘मॉडिफिकेशन’ करून देतात. अशाच अॅपपैकी एक अॅप म्हणजे ‘बेस्ट मी सेल्फी कॅमेरा’ (Best Me Selfie Camera).
स्मार्टफोनवर फोटो एडिटिंगचे अॅप अनेक आहेत. परंतु, ‘बेस्ट मी सेल्फी कॅमेरा’ हे खास सेल्फीसाठी बनवण्यात आले आहे. या अॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्यक्ष सेल्फी काढतानाच ते छायाचित्रावर आवश्यक ते बदल करण्याची सुविधा देते. यासाठी या अॅपमध्ये तब्बल १२५ ‘रिअल टाइम फिल्टर’ पुरवण्यात आले आहेत. त्यामध्ये मिरर, स्टायलिश, फन, टाइमसेव्हिंग असे वेगवेगळे प्रकार आहेत. शिवाय या अॅपच्या कॅमेऱ्याला टायमर असल्याने सेल्फीसाठी व्यवस्थित पोझ घेता येते. सेल्फी काढल्यानंतर तो शेअर करण्यापूर्वी तुम्ही त्या छायाचित्रावर आपल्याला आवडणारे ‘इमोजी’ही डकवू शकता. उत्तम सेल्फी काढण्याचे साधन असलेल्या ‘सेल्फी स्टिक’सोबतदेखील हे अॅप व्यवस्थित काम करते.
छायाचित्रांचा कोलाज
छायाचित्रांचीच चर्चा सुरू आहे तर, ‘फोटो एडिटिंग’च्या अॅप्सबद्दल सांगितलेच पाहिजे. प्रत्येक स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये छायाचित्र काढण्यासोबत ते ‘एडिट’ करण्याची अर्थात त्यातील रंगसंगती, भडक-फिकटपणा यासारखे बदल करण्याची सुविधा असते. स्मार्टफोननुसार या सुविधा कमी अधिक होत असतात. बहुतांश स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांमध्ये रंगसंगती बदलण्याशी संबंधितच सुविधा असतात. अशा वेळी छायाचित्रांवर व्यवस्थित करतील, अशा ‘फोटो एडिटिंग’ अॅपची गरज भासते. अशी गरज भागवणारे अनेक अॅप सध्या प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र, ‘फोटो ग्रिड’ हे अॅप त्या सर्वात आघाडीवर असलेले अॅप आहे. या अॅपमध्ये फोटो ‘एडिटिंग’ करण्याची सुविधा आहेच; परंतु त्याचबरोबर छायाचित्रांचे कोलाज करण्याची अप्रतिम सुविधा या अॅपद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे आपण काढलेल्या छायाचित्रांचा कोलाज करून त्या घटनेच्या स्मृती एकत्रितपणे आणि आकर्षकपणे जतन करता येतात. असा कोलाज करण्यासाठी ‘फोटो ग्रिड’ अॅपमध्ये विविध आकारांच्या फ्रेम्स पुरवण्यात आल्या आहेत. या फ्रेम्समधून आपल्याला हव्या त्या चौकटींद्वारे आपल्याला कोलाज साधता येतो. विशेष म्हणजे, तुम्ही फोटोंची साखळी तयार करून त्याद्वारे ‘व्हिडीओ’देखील तयार करू शकता. याशिवाय छायाचित्रांच्या कोलाजवर तसेच व्हिडीओमध्ये मजकूर टाकण्याची सुविधाही या अॅपमध्ये आहे.
– असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com