कौतुक ही माणसाची अत्यंत मूलभूत गरज आहे. आपल्या आजूबाजूला काही जण भरभरून कौतुक करणारे असतात, तर काहींमध्ये कौतुकाचा शुकशुकाटच आढळतो. खरं तर आताच्या काळात चार-दोन कौतुकाचे शब्द मनावर प्राजक्ताची पखरण करत असतात…

‘‘काय मग, सध्या काय सुरू आहे?’’
‘‘एक सदर लिहिते आहे, वर्तमानपत्रात.’’
‘‘तू सदर लिहिते आहेस? तू?’’
‘‘हो.’’
‘‘कसं शक्य आहे? दैनंदिन मालिकांमध्ये वर्षानुवर्षं दळण लावणारी तू. ठरावीक शब्दांचं सदर लिहिते आहेस म्हणजे कमालच झाली.’’
‘‘हां, एक अनुभव. बघू जमतंय का.’’
‘‘जमेल की, न जमायला काय झालं. तुला नाही जमणार तर कुणाला जमणार? एवढी शेकड्याने माणसं सदर लिहितात आणि तसंही हल्ली वाचतं कोण? तू एवढं लिहिलं आहेस. आता हेही लिहिशील, नि:शंक मनाने लिही.’’
‘‘तुम्ही वाचाल ना काकू?’’
‘‘बघते बाई, मला हल्ली कंटाळाच येतो वाचायचा. तेच तेच सगळं. तू तरी काय वेगळं लिहिणार? त्यामुळे मालिका बऱ्या. एकीकडे काम करत ऐकता येतात. ते बरं लिहितेस तू. सदर लिही. जमेल तुला.’’

या संपूर्ण संवादात काकूंनी माझं कौतुक केलं, की मला वास्तवाची प्रखर जाणीव की काय ती करून दिली, की टोमणे मारले, हे मला अजूनही कळलेलं नाहीये. एवढं नक्की कळलं की, काकूंना ‘अरे वा! छान’, एवढंच पण मनापासून म्हणावंसं वाटलं नाही. किंवा वाटलंही असेल, पण त्यांच्या जिभेला, आवाजाला, चेहऱ्याला, इतकी सहजता नव्हती. कदाचित कित्येक वर्षांत त्यांना आता कुणाचंही मनमोकळं कौतुक करण्याची सवयच राहिलेली नसावी. खरं तर या संवादात मला काही मोठ्या ‘कौतुकाची’ अपेक्षाच नव्हती. ‘मी एक सदर लिहिते आहे,’ यावर ‘हो का? नक्की वाचेन हं’एवढं मला पुरेसं होतं. पण त्यांना ते तेवढं बोलणं जड गेलं. ही अशी ओझी बाळगत आयुष्य काढतात मंडळी.

माझ्या आजूबाजूला, माणसांचे या बाबतीतले दोन प्रकार आहेत… एक तर अतिरेकी, अंगावर येणारं कौतुक करणारे, किंवा शक्यतो, म्हणजे अगदी उर्ध्व लागून नाकाला दोरा लावायची वेळ येईपर्यंत कुणाचंही, कधीही, कुठल्याही कारणाने कौतुक न करणारे. पहिल्या प्रकारचे लोक, ‘भरभरून दाद द्या’, हे वाक्य भलतंच मनावर घेतात. अलीकडेच मी एका कवितांच्या कार्यक्रमाला गेले होते. तसंही दोन-अडीच तास कवितांच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे समोरचे कलाकार जीव ओतून अतिशय श्रवणीय कार्यक्रम सादर करत होते. रात्रीची वेळ होती, दिवसभरातली सगळी दगदग, धावपळ संपवून शांतपणे उत्तम साहित्याचा आस्वाद घ्यायला मी गेले होते. आता काही वेळ समोर जे काही सादर होईल ते मनसोक्त ‘ऐकायचं’, मनात साठवायचं, अशा कल्पनेत मी होते. पण मध्यंतरानंतर अचानक माझ्या शेजारच्या रिकाम्या खुर्च्यांवर कानठळ्या बसण्याइतकी दाद देणारी काही मंडळी येऊन बसली. पहिल्या दादेला तर मी दचकलेच. आणि मग जणू काही आपापसांत स्पर्धा लागल्यासारखी ही मंडळी, शब्दाशब्दाला प्रशंसोद्गार, एकेका कडव्याला टाळ्या, शेर संपण्याचा अवकाश कौतुकाचा प्रचंड कोलाहल, गदारोळ, दंगा करू लागली. ही ‘दाद’ आहे की हे कार्यक्रम पाडतायत अशी शंका यावी इतका कलकलाट होऊ लागला. एवढा हर्षोल्हास पाहून कवी गडीसुद्धा अधिक जोशात आता. थोड्याच वेळात तो एक सार्वजनिक ‘वा दादा वा…’ इव्हेंट झाला, सगळ्या कार्यक्रमाचा नूरच पालटला. ही अशी अंगावर आदळणारी दाद दिल्याशिवाय आपली कलेची जाण, आपल्याला कलाकाराबद्दल असलेलं प्रेम, जवळीक आणि मुख्य म्हणजे आपण आलोय, आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेतोय, हे लोकांना कळणारच नाही असं बहुदा या लोकांना वाटत असावं.

मुळात प्रत्येक कलाकाराची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना आवडेलच असं नसतं. ते काही खूप थोडे विजेसारखे लख्ख क्षण असतात जेव्हा आपसूक तोंडून ‘वाह’ येते. कलाकार त्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि कधी कधी ही अशी आक्रस्ताळी दाद त्याच्या एकाग्रतेचा भंग करत असते. इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो.

कधी कधी असंही होतं की, एखादा जाहीर कार्यक्रम नाट्यगृहात प्रचंड रंगतो, पण नंतर टीव्हीच्या पडद्यावर बघताना तो अजिबात मनोरंजक वाटत नाही. नंतर असे कार्यक्रम बघणाऱ्यांना वाटतं ‘एवढे का हे प्रेक्षक हसतायत किंवा भावनिक होतायत.’ होतं असं की, नाट्यगृहात जिवंत अनुभव घेताना तो एक ऊर्जेचा खेळ निर्माण झालेला असतो. थोडा माहौलचाही परिणाम असतो. जो नाट्यगृहात जाणवतो, पण पडद्यापलीकडे पोहोचत नसतो. त्यामुळे तेव्हा ती दाद खोटी वाटली तरी प्रत्यक्षात अनेकदा ती उत्स्फूर्तही असते. याच्या बरोब्बर उलट काहींना कशाचंही आणि कुणाचंही कौतुक म्हणून वाटत नाही. हे तिकीट काढून विनोदी नाटकांना जातात, पण यांना हसवायला अस्वल नाट्यगृहात सोडलं तरी ते हसत नाहीत. भावनिक नाटकात यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत नाहीत. कारण तेवढं काहीच त्यांना भिडत नाही, रुचत नाही. दाद ही हसण्यातून किंवा टाळ्यांमधूनच दिली जाते असं नाही… कधी कधी अत्यंत शांत सभागृह हीसुद्धा दाद असते. अशा वेळी ते शेजारच्याशी बोलतात कारण त्यांना काहीच ऐकण्या किंवा बघण्यासारखं वाटलेलं नसतं. बहुदा यांना याहून उच्च दर्जाचं काही तरी बघण्याची किंवा ऐकण्याची सवय असते. यांची अभिरुची फार ‘हटके’ असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसारखं ऊठसूट कशाचीही स्तुती करणं यांच्या बुद्धीला पटत नाही. हे नाटक बघून अर्धा तास फोन करतात, पण नाटक सोडून सगळ्याबद्दल बोलतात. तुमच्या मुलांची प्रगती, तुमच्या जोडीदाराला मिळालेलं प्रमोशन, सगळं त्यांना माहीत असतं पण ते त्याबद्दल कधीच बोलत नाहीत, कारण ‘हे काय सगळेच करतात’. यांना कौतुक असतं फार फार वेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींचं. ८५ टक्के जनता मध्यम प्रतीचंच काम करत असते, त्यातल्या तुमचं काय कौतुक करायचं, असं त्यांना वाटतं. पण ते कसं उगाचच करायचं म्हणून कुणाचं कौतुक करत नाहीत, या त्यांच्या बाणेदारपणाबद्दल त्यांचं सगळ्यांनी कौतुक करावं असं त्यांना नक्की वाटतं.

‘दाद’ उत्स्फूर्त असते, प्रशंसा अभ्यासातून किंवा विचारातून आलेली असते, स्तुतीमध्ये समर्पणभाव आहे, शाबासकीमध्ये प्रोत्साहन आहे आणि ‘कौतुक’ प्रेमातून, आपुलकीतून आपोआप येतं. या सगळ्यात समोरच्या माणसाच्या प्रतिभेबद्दल, कौशल्याबद्दल आदर असतो. त्याच्या कष्टांची, सातत्याची, शिस्तीची जाणीव असते. तो जे सादर करतो आहे त्याबद्दल कुतूहल आणि मग ते शमल्यानंतरचं समाधान असतं. हा माणूस पुढेही काही तरी चांगलं करेल अशी आशा असते. आणि समजा, यातलं काहीही समोर नाही दिसलं, तरीही तो एक हाडामांसाचा माणूस असतो ज्याला कौतुकाची थाप हवी असते.

एक खूप ज्येष्ठ अभिनेत्री, नाटक संपल्यावर आत येऊन कलाकारांना भेटून नाटकातले ‘कॉस्च्युम्स’ कसे छान होते, एवढंच म्हणायच्या. अभिनयाबद्दल काहीही बोलायच्या नाहीत, याची रसभरित वर्णनं मी ऐकली आहेत. मला मात्र शुद्ध शब्दात हा कोतेपणा वाटतो. काय बिघडेल कार्टूनमध्ये दाखवतात तसं ‘डोळ्यात चांदण्या चमचमत असलेल्या’ उत्साही कलाकाराला दोन प्रोत्साहनाचे आणि कौतुकाचे शब्द दिले तर? त्यानं तो हुरळूनच जाईल, की त्याचा विचार करण्याचं तारतम्य त्याच्याकडे असेल, हा त्याचा प्रश्न झाला, तुमचा नाही.

आपल्याकडे कित्येक पिढ्या, ‘पालकांनी मुलांचं कौतुक केलं तर ती शेफारतात’ या समजुतीत जगल्या. आमच्या सुदैवाने आता हा समज बदलला आहे. उलट योग्य वयात मुलाचं योग्य रीतीनं केलेल्या कौतुकामुळे त्याची वाढ उत्तम होते हे आता सिद्ध झालंय. सतत टीका करून मुलं शिकत नाहीत, उलट ती आईवडिलांना कंटाळतात. ‘वडिलांनी आयुष्यात कधी कौतुक केलं नाही, एकदा फक्त पाठीवर हात ठेवला,’ असं काही ऐकलं की माझ्या तर डोळ्यात पाणीच येतं. किती सुंदर क्षणांना मुकलं ते मूल त्याच्या वाढीच्या वयात. सतत लोकांसमोर स्वत:च्या मुलाचं कौतुक करणंही योग्य नाही, पण पालक मुलांच्या जगातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतात. आणि आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग आपलं कधी कौतुकच करत नाही, प्रोत्साहन देतो, पण निर्मळ, निर्व्याज आणि मोकळं कौतुक करत नाही, हे मनात येणं काही फार बरं नाही. कधी तरी मुद्दाम चारचौघांत आपल्या मुलांचं, नवऱ्याचं, बायकोचं कौतुक करायला काय हरकत आहे? थेट पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात ‘हिनं माझ्यासाठी आयुष्य वेचलं’ म्हणण्यापेक्षा अध्येमध्ये केलं जाहीर कौतुक तर काही ‘ही’ चिडणार नाहीये, उलट आवडेलच तिला. रांधणाऱ्या माणसाला त्याने केलेला पदार्थ चांगला झालाय हे सांगणं महत्त्वाचं आहे. रोज तेच तेच काम करून कंटाळणाऱ्या सगळ्यांना कौतुकाचे चार शब्द कानावर आले तरी काम करण्याचा हुरूप येतो.

कौतुक ही माणसाची अत्यंत मूलभूत गरज आहे. सध्याच्या भाषेत एकूणच ‘स्ट्रेस’ एवढा वाढला आहे, की एखाद्याच्या नजरेत, कृतीत, शब्दांत आपल्याबद्दल कौतुक दिसणं खूप खूप महत्त्वाचं झालंय. कळणाऱ्याला त्यातलं खरं कौतुक आणि खोटी प्रशंसा कळते. शेवटी, ‘जो शेर समझे मुझे दाद देता है, गले लगाये जिसे गम समझ मे आ जाये’, हा बालमोहन पांडेंचा शेर आठवतो. काही तरी मनापासून आवडायला हवं, त्याबद्दल बोलायला हवं, पोहोचवायला हवं. झोपलेल्या मुलाकडे आई ज्या मायेनं आणि कौतुकानं बघते, ते ना त्या मुलाला दिसत असतं, ना जगात कुणाला. पण ही जी तरल सुंदर आशा आहे… त्यावर सगळं जग चाललं आहे.