‘वय वाढणं हे तर थांबवता येणार नाही पण ‘एजिंग ग्रेसफुली’ म्हणतात तसं तर मी नक्कीच करू शकते. दिवसानंतर रात्र येणार तसेच रात्रीनंतर दिवस येणार. मला कधीही कोणता रोग होणारच नाही, असं समजणं किती वेडेपणाचं आहे. मुख्य म्हणजे न आलेल्या रिपोर्टचा मी विचार करते आहे. मी ‘राईचा पर्वत’ करते आहे.. म्हणजे मी या सगळ्यावर अभ्यास करूनही खूप चुकीच्या पद्धतीने विचार केला.’ हे केतकीच्या लक्षात आलं आणि तिने मनाला शांत केलं.
सकाळचे सात वाजले होते. केतकीला ऑफिसला नऊ वाजता पोहोचायचं होतं. तिने नुकतीच जिमला जायला सुरुवात केली होती. पण आज जाणं शक्य होईल असं वाटत नव्हतं. तिनं पटापटा स्वयंपाकघरातलं काम आटोपलं आणि स्वत:च्या तयारीला लागली. आरशासमोर उभं राहून केस विंचरताना तिला काही केस पांढरे झालेले दिसले. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यापण वाढल्यासारख्या वाटल्या. शरीरावर वय वाढल्याच्या खुणा बघून तिला कससंच झालं. चाळिशी उलटून गेली होती. वजन वाढत होतं म्हणून ती जिमला जायला लागली होती. ती स्वत:च्या प्रकृती आणि दिसण्याबद्दल खूप दक्ष असे. त्यात तिला आज जिमला जायला जमलं नाही. डोक्यावर पांढरे केस दिसले. त्यानं ती एकदम उदास झाली. चाळिशीनंतर सगळ्या तपासण्या वर्षांतून एकदा कराव्यात, असं त्यांचे डॉक्टर सांगत. पण काही होत नाही तर उगाच कशाला त्या तपासण्या करायच्या, असं तिचं म्हणणं असे. आता मात्र काहीही झालं तरी सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या असं ठरवलं पण दिवसभराच्या कामाच्या व्यापात विसरूनही गेली.
दुसऱ्या दिवशी जिमला गेली. वजन काटा दोन किलोनं वजन वाढल्याचं दाखवत होता. तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं, ‘मी बाकीच्यांपेक्षा खूप कमी खाते. तरी कसं माझं वजन वाढलं? काल रात्री जेवलेसुद्धा नाही फक्त आइस्क्रीम खाल्लं. तर डाएटिशिअन म्हणाली की, आइस्क्रीममुळे एका जेवणापेक्षा जास्त कॅलरीज तुमच्या पोटात गेल्या. पण एका आइस्क्रीमने काही वजन वाढत नाही. मात्र कमी खाल्लं तरी वजन वाढतं हे लक्षात ठेवा आणि कदाचित या वयात हार्मोनल चेंजेसमुळेही वजन वाढू शकतं. ‘माझा आरसा, ही तज्ज्ञ मंडळी माझं वय होतंय असं सांगताहेत. मकरंदचंही माझ्याकडे आजकाल लक्ष नसतं. म्हणजे मी म्हातारी होते आहे? नाही, मी वजन कमी करेन, पूर्वीसारखं दिसण्याचा प्रयत्न करेन.’ जिममधून बाहेर पडताना तिला सोनालीचा फोन आला. तिने सांगितलं की, ‘‘मेधाला, त्यांच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला, तपासणीत गर्भाशयाचा कर्करोग असल्याचं कळलं. लागलीच शत्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’’ दोघींनी तिला भेटायचं ठरवलं. एवढी धिराची, विचारपूर्वक वागणारी, सगळ्यांना भावना, विचारांच्या विषयी सांगणारी केतकी, आजकाल काय झालं होतं माहीत नाही पण असं काही ऐकलं की तिचे हातपाय गळून जात, शिवाय तिच्या मनातही निराशावादी विचार येत. केतकीला असं का होतंय हे कळत नव्हतं. मेधाचं ऐकल्यापासून आपल्याही तपासण्या लवकरात लवकर करून घ्यायच्या असं तिनं ठरवलं. पण काही कारणानं ते लांबत गेलं.
मेधाचा कर्करोग पोटात वाढला होता त्यामुळे तिला केमो थेरपी घ्यावी लागली. तिचा तो त्रास केतकी बघत होती. त्यामुळे आता ती डॉक्टरांच्याकडे जायचं टाळत होती. मनात म्हणे, ‘काही होत नाही तोपर्यंत नकोच डॉक्टरकडे जायला. उगाच कशाला हात दाखवून अवलक्षण! मी फक्त त्रेचाळीस वर्षांची आहे. काही होणार नाही मला.’ कधी कधी स्वत:च्याच अशा विचारांच्यामुळे तिची घुसमट होत असे. अचानक रडूपण येई. घरातल्या कोणाबरोबरही ती हे शेअर करत नव्हती. पण तिच्यातला हा बदल मकरंदच्या लक्षात आला होता. त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर ती जराशी चिडलीच आणि म्हणाली, ‘‘तुलाही मी म्हातारी झाली आहे असं वाटतंय का? म्हणूनच तुझं माझ्याकडे लक्ष नाही.’’ तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. केतकीला ही स्थिती कशी हाताळावी हे कळत नव्हतं. ती तेथून निघून गेली.
मकरंद विचारात पडला की ‘झालं काय हिला? अचानक ही अशी कशी वागायला लागली?’ तो डॉक्टरांशी बोलला तेव्हा डॉक्टरांनी, ‘या वयात, मेनोपॉजमुळे असं होऊ शकतं’ असं सांगितलं आणि एक महत्त्वाची गोष्ट डॉक्टरांनी सांगितली की, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजारपण या वयात स्त्री किंवा पुरुष दोघांच्यातही निघू शकतात. कधीकधी कोणतीही लक्षणं शरीरात दिसत नाहीत. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असतं. त्यामुळे त्यांनी चाळिशीनंतर कराव्या लागणाऱ्या सगळ्या चाचण्या दोघांनाही करून घ्यायला सांगितल्या. केतकी काही तरी निघेल या भीतीने टेस्ट करायला तयारच होत नव्हती. मकरंदने कसंबसं तिला तयार केलं. केतकीच्या स्त्री-रोगतज्ज्ञाकडे काही तपासण्या केल्या. त्यातली एक गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगची होती हे केतकीला कळलं. त्याचा रिपोर्ट लागलीच मिळणार नव्हता. बाकीचे रिपोर्ट्स मात्र दुसऱ्या दिवशी लागलीच मिळणार होते. केतकीला संशय आला, ‘डॉक्टरांना कसली तरी शंका आली असणार. म्हणूनच त्यांनी माझी ही टेस्ट केली असणार. त्याचा रिपोर्टपण लागलीच मिळणार नाही. मला कर्करोग निघणार बहुतेक. मेधाचं झालं तसं माझं होणार कीकाय?’
तिला रात्री नीट झोप लागली नाही. सकाळी जिमला जायला निघाली. जाताना तिने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने मेधा आणि तिचा नवरा सकाळच्या ताज्या हवेत फिरताना दिसले. तिच्या मनात परत विचारांचं काहूर माजलं, ‘मला कर्करोग झाला असेल तर? किंवा त्यात माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर मुलांचं कसं होईल? आदित्य तर अजून शाळेत जातो आहे. अस्मिताचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. तिच्या लग्नाचं कसं होणार? या सगळ्यात आईची किती गरज असते आणि मला केमो घ्यावी लागली तर डोक्यावरचे केस जातील. मी विद्रूप दिसू लागेन. मकरंदला मी आवडेनाशी झाले तर?’ ती सुन्न झाली होती.
आज तिनं ऑफिसला न जाण्याचा निर्णय घेतला. सर्व कामं झाल्यावर खोली बंद करून तानपुरा घेऊन रियाजाला बसली. बऱ्यांच दिवसांत तिने रियाझ केला नव्हता, पण तिचा सूर लागला होता. किती वेळ गेला तिला कळलं नाही पण ती खूप शांत झाली होती. तिच्या मनात परत विचार घोळू लागले. पण या वेळी मात्र ती शांत असल्यामुळे विचार नकारात्मक नव्हते. ‘सगळ्या गोष्टींचा स्वीकार करावा असं मी मुलांना सांगते. मग माझं आता असं का व्हावं? वय वाढणं थांबवणं ही अशक्य गोष्ट आहे. मग रुपेरी केसांना आणि सुरकुत्यांना नाही म्हणून कसं चालेल? काहीही झालं तरी हे होणारच.. निसर्गनियम आहे हा. मी दिसणं, वजन, तब्येत याबाबतीत जागरूक असते हे खरं आहे. पण, मकरंदला मी आवडत नाही, हे सगळे खूपच बालिश विचार आहेत, असं या घटकेला जाणवतंय. याच्यात काहीच तथ्य नाही, पण असे विचार माझ्या मनात कसे आले कळत नाही. कदाचित डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे मेनोपॉजचा तर परिणाम नसेल? पण हे तर होणारच.. वय वाढणं हे तर थांबवता येणार नाही पण ‘एजिंग ग्रेसफुली’ म्हणतात तसं तर मी नक्कीच करू शकते. दिवसानंतर रात्र येणार तसेच रात्रीनंतर दिवस येणार. जगण्यातील अनिश्चितता मान्य करायला पाहिजे. मला कधीही कोणता रोग होणारच नाही, असं समजणं किती वेडेपणाचं आहे. मुख्य म्हणजे न आलेल्या रिपोर्टचा मी विचार करते आहे. मी ‘राईचा पर्वत’ करते आहे.. म्हणजे मी या सगळ्यावर अभ्यास करूनही खूप चुकीच्या पद्धतीने विचार केला. अर्थात माझ्या हातून चूक घडणारच नाही असं नाही. कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीनं विचार करू, हेही मान्य करायला हवं. परत अशा प्रकारच्या विचारांच्या ट्रॅकवर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी जसं शरीरासाठी रोज व्यायाम करायला हवा, रोज जेवायला हवं तसंच योग्य विचार कळून विचारांची गाडी योग्य त्या ट्रॅकवर, विवेकाच्या ट्रकवर राहण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास, मनन, चिंतन रोज करायला हवं. छंद जोपासायला हवेत. बाकीचेही मार्ग हाताळायला हवेत.’
केतकी खोलीच्या बाहेर आली. समोर मकरंद उभा दिसला तशी ती त्याला हसून म्हणाली, ‘आपण दोघेच कुठे तरी दोन दिवस जाऊ यात. थोडा बदल होईल.’ केतकीला पूर्वीसारखं बघून मकरंदने सुस्कारा सोडला आणि तिला लागलीच ‘हो’ म्हणून मोकळा झाला.
madhavigokhale66@gmail.com
माधवी गोखले