परीक्षा झाली. निकाल आला. आदित्यची शिष्यवृत्ती चार गुणांनी हुकली. त्याच्या मनात आलं, ‘‘मला निकालाने अजिबात वाईट वाटलेले नाही, पण मला ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।’ वचनाचा नेमका अर्थ आत्ता कळतोय. शिष्यवृत्तीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं, पण माझं ज्ञान नक्कीच वाढलंय. अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या आणि आम्ही कुटुंबीय सारच खूप एन्जॉय करत होतो.’’ आदित्यला स्वत:शीच झालेला हा संवाद खूश करून गेला.
आदित्यचा सहावीचा निकाल लागला. ज्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसायचे आहे त्यांनी नावे द्यावीत असे शाळेतर्फे सांगण्यात आले. केतकीला आदित्यने स्कॉलरशिपला बसावं, असं वाटत होतं. आदित्यला मात्र परीक्षेला बसायचं नव्हतं. त्याच्या मनात आलं, ‘चौथीत आईने एवढा अभ्यास करून घेतला होता, पण शिष्यवृत्ती काही मिळाली नव्हती. मी काही हुशार नाही. हुशार मुलांनी बसावं अशा परीक्षांना. त्यातही अभ्यास करायचा म्हटलं की बोअर होतं. शाळेचा अभ्यास काय कमी आहे? आणि मग आईची अभ्यास करण्यासाठी कटकट, भुणभुण अजून वाढेल.’
त्याने आईला सांगून टाकलं, ‘‘मी काही हुशार नाही, मला काही शिष्यवृत्ती मिळणार नाही. मी या परीक्षेला बसणार नाही. मला जास्तीची पुस्तकं वाचायची नाहीत. जास्तीची गणितं सोडवायची नाहीत की पेपर सोडवायचे नाहीत.’’
केतकी त्याला म्हणाली, ‘‘अरे, अभ्यास करताना मजापण येते.’’ आदित्य तिला लागलीच म्हणाला, ‘‘आई, अभ्यास करताना कशी काय मजा येईल? तू न काहीही सांगतेस मी परीक्षेला बसावं म्हणून.’’ केतकी त्याला समजावत म्हणाली, ‘‘मी काय म्हणते आहे ते नीट ऐकून घे आणि तूच निर्णय घे परीक्षेला बसायचं की नाही ते. अरे, अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचणं, पेपर सोडवणं एवढंच धरून चालला आहेस तू. त्यामुळे हे सर्व तुला रूक्ष, कंटाळवाणं वाटतंय. नवीन गोष्टी शिकणं, सराव करणं म्हणजे अभ्यास. सगळे नामवंत गायक सांगतात की ते रोज रियाज करतात म्हणून. आता त्यांचा आवाज चांगलाच असतो, पण त्याची पोत अशीच चांगली राहावी, आवाजात विविधता यावी म्हणून ही गायक मंडळी रोज कित्येक तास रियाज करतात. हा त्यांचा अभ्यासच आहे. आता तुझा लाडका खेळ क्रिकेट घे. अत्यंत कुशल खेळाडूपण रोज सराव करतात. स्नायू मजबुतीसाठी व्यायाम करतात. मनाच्या उभारीसाठी, सकारात्मक राहाण्यासाठी वेगवेगळी कौशल्यं शिकतात. हा त्या खेळाडूंचा अभ्यास आहे आणि तू पण रोज क्रिकेट खेळतोच की. तुम्हाला पण त्या खेळाला आवश्यक त्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात ना? सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी काही ते जिंकत नाहीत. म्हणून ते खेळायचे थांबत नाहीत. मॅच जिंकणं हे त्यांचं उद्दिष्ट नक्कीच असतं, त्यासाठी खूप प्रयत्नपण करतात. पण आपण हरणार हे त्यांना डोळ्यासमोर दिसत असलं तरी कोणीही सामना अर्धवट सोडत नाही. हरण्यातूनही शिकतात आणि पुढचा सामना खेळतात. तुमची टीम प्रत्येक वेळेला जिंकते का? यावर आदित्य म्हणाला, ‘‘अगं, खेळताना कित्ती मज्जा येते.’’ केतकी म्हणाली, ‘‘अरे! तेच तर मी सांगते आहे. जिंकण्याची आस असतेच प्रत्येकाला. त्या दृष्टीनं तुमचे मैदानात खेळायला येण्या आधीपासून, दररोज प्रयत्न
चालू असतात. पण खेळताना मी प्रत्येक क्षणी उत्तम कसा खेळेन हाच विचार ठेवून खेळता की नाही? तसंच आपण या परीक्षेसाठी शंभर टक्के प्रयत्न करू. मला मान्य आहे की पुस्तकी अभ्यास करायला कंटाळा येतो. या वेळी तू प्रात्यक्षिकांवर भर दे. बघण्यावर भर दे. असं करताना तुलाच वेगवेगळ्या अभ्यास करण्याच्या पद्धती सुचतील. ज्यातून तुला आनंद मिळेल आणि शिष्यवृत्ती नाही मिळाली तर असं काय आभाळ कोसळणार आहे? तू हे सगळं करशील त्याचा किती तरी फायदा होईल आणि परीक्षेला बसायचं की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. थोडे दिवस अभ्यास करून बघ नाही जमलं तर तू मध्ये सोडू शकतोस. हे मी रागावून नाही सांगत आहे तर तुला तुझा निर्णय घेता आला पाहिजे म्हणून सांगते आहे.’’ हे ऐकून आदित्यला हायसं वाटलं. त्यानं विचार केला, ‘हो म्हणायला काय जातंय? मध्ये सोडून द्यायचा पर्याय आईनंच दिला आहे. ती प्रात्यक्षिक करण्यावर भर देते आहे ना, मग आपण तिला वाळवंट दाखवायला सांगू. वाळवंटातील वाळू दिसते कशी हेही आपल्याला माहीत नाही आणि परीक्षेला याच्यावर बराच अभ्यास आहे.’ आदित्यनं मांडलेल्या प्रस्तावानुसार चौघेही जण राजस्थानला जाऊन आले. जायच्या आधी आदित्यने राजस्थानचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती, राहणीमान यांचं आपणहून वाचन केलं. गुगलवर नकाशा बघून घेतला. त्यामुळे तिथे फिरताना हे मला माहिती आहे हे जाणवत होतं. तिथल्या वाळूत खूप खेळला. त्याला जाणवलं की मुंबईच्या समुद्रावरची वाळू आणि इथली वाळू यात खूप फरक आहे. हाताला त्याचा खूप वेगळाच स्पर्श जाणवत होता. तिथे गेल्यावर कोरडी हवा म्हणजे काय ते कळलं. तिकडची थंडी, मुंबईत कधी तरीच अनुभवायला मिळणारी थंडी, काश्मीरला तो जाऊन आला होता, त्यामुळे तिथली थंडी यातील फरकही जाणवला. पाऊस कमी त्यामुळे भाजीपाला कमी, त्यामुळे जेवण कसं आणि का असतं हे त्याला नुसतं समजलं नाही तर खायलापण मिळालं. राजवाडे, त्यांचं स्थापत्य बघून त्याचे डोळे दिपले. जयपूरचं ‘जंतरमंतर’ पाहिल्यावर तीनशे वर्षांपूर्वी आपल्याकडील लोक खगोलशास्त्र आणि गणितात किती प्रगल्भ होती हे लक्षात आलं. तिथले लोकसंगीत, नृत्य, त्यांचा पेहराव, त्याच्यावरची कलाकुसर हे सर्व त्याला खूप आवडलं. सर्वानीच राजस्थानची ट्रिप खूप एन्जॉय केली. आदित्यने घरी आल्यावर त्याला जे जे वाटलं, कळलं, आवडलं ते सर्व लिहून काढलं आणि त्याच्या लक्षात आलं की वाळवंटासंबंधित अभ्यासक्रमात असलेला सर्व अभ्यास झाला आहे. त्याच्या मनात विचार आला, ‘आपण रट्टा मारला नाही. पण अभ्यास कसा झाला हे कळलंसुद्धा नाही, कंटाळा आला नाही, उलट लिहिताना मज्जाच आली. विषय कसा कायमचा डोक्यात फिट बसला. पण प्रत्येक वेळी इतक्या ठिकाणी जाणं कसं शक्य आहे? पण हरकत नाही आपण यासाठी इंटरनेटचा उपयोग करू. याला आई, बाबा नक्की हो म्हणतील. तिथून व्हिडीओ बघू. टीव्हीवरून पण माहिती मिळेल.’
मकरंदने गणिताच्या अभ्यासात आदित्यला वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायला शिकवलं. एकदा मकरंदने त्याला अकरा अधिक चार म्हणजे तीन हे सिद्ध करायला सांगितलं. आदित्य पंधरा हेच उत्तर बरोबर म्हणत होता. मग त्यानं समजून सांगितलं की आता जर अकरा वाजले असतील तर चार तासाने तीन वाजतील. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतींमुळे आदित्यची गणितातील रुची वाढू लागली. आदित्य आणि अस्मिता दोघांनी विज्ञानासंबंधित खेळणी कशी बनवायची याची साईट शोधली आणि फावल्या वेळात दोघं खेळणी बनवू लागले. कधी तरी केतकी महाभारत, रामायणातल्या गोष्टींचा मथितार्थ सांगे. घरातील सगळी जण या ना त्या प्रकाराने आदित्यबरोबर अभ्यास करत होते.
शेवटी एकदाची परीक्षा झाली. निकाल आला. आदित्यची शिष्यवृत्ती चार गुणांनी हुकली. आदित्यच्या मनात आलं, ‘‘मला निकालाने अजिबात वाईट वाटलेले नाही, पण आज मात्र मला पहिल्यांदा कोणत्या तरी वचनाचा नीट अर्थ कळतोय. ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।’
शिष्यवृत्तीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं, पण मी किंवा घरातले कोणीच ती मिळालीच पाहिजे असं म्हणत नव्हते. वेगवेगळ्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या. खरं तर अशा प्रकारचा अभ्यास करताना आम्ही सगळेच जण खूप एन्जॉय करत होतो. शिष्यवृत्ती नाही मिळाली, पण माझं ज्ञान नक्कीच वाढलंय. म्हणून तर या वचनाचा अर्थ कळतोय. उद्दिष्ट समोर ठेवायला पाहिजे. ते मिळवण्यासाठी कर्म म्हणजे खूप मनापासून प्रयत्न करायला हवेत. म्हणजे उद्दिष्टापर्यंत पोहचताना आनंद उपभोगता येतो, पण म्हणून ते उद्दिष्ट साध्य झालंच पाहिजे, असा अट्टहास करणं चुकीचं आहे. नाही तर आपण दु:खाला आमंत्रण देऊ. म्हणचेच फळाची अपेक्षा करू नका. कर्मातील आनंद घ्या.’ हे कळल्यामुळे तो खूश होऊन आईकडे धावत गेला. आपल्याला जे कळलं ते तिला एका श्वासात सांगून टाकलं. पुढे असंही म्हणाला. ‘‘मुख्य म्हणजे मला शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून काही मी ‘ढ’ नाही. हो की नाही?’’ केतकी हे ऐकून त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत बसली. ‘हो’सुद्धा तिच्या तोंडातून बाहेर पडले नाही.
– माधवी गोखले
madhavigokhale66@gmail.com