केतकीला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे मुलांना फुलासारखं जपलं म्हणतोय, पण मुलं ही फुलं नाहीत तर माणसं आहेत. त्यांना फुलांसारखं जपून कसं चालेल? एवढय़ा मोठय़ा आयुष्यात येणारे टक्केटोणपे खाण्यासाठी तयार करायला पाहिजे. शाळेत फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून लैंगिक शिक्षण मिळते. आपण त्या वेळी असणाऱ्या भावभावनांविषयी बोललं पाहिजे. दहावीचा अभ्यास आठवीत करत नाही. त्याचप्रमाणे ज्या वयात ज्या गोष्टी करायला हव्यात त्याच गोष्टी करायला हव्यात. हे सांगितलं तरच मुलं भावनांच्या पलीकडे बघायला शिकतील..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अस्मिताचं प्रेम प्रकरण, ती झोपेच्या गोळ्या घ्यायला गेली होती हे घरात कळून दोन दिवस झाले होते. खबरदारी म्हणून मकरंद आणि केतकी दोघांनीही दोन दिवसांची सुट्टी टाकली होती. अस्मिताला कॉलेजला परीक्षेच्या अभ्यासासाठी सुट्टीच होती. तिला क्लासला सोडायला आणि आणायला मकरंद जात असे. मकरंद आणि केतकीने ठरवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला यावर काहीही बोलायचं नाही, असं म्हणून अस्मिता तिथून निघून गेली. इतक्या वेळ समजुतीने घेणाऱ्या केतकीचा पारा चढला. तिने तोंडाचा पट्टा सुरू केला. ‘‘कितीही हिच्या कलानं घ्या, हिला तिची किंमत नाही. आगाऊ झाली आहे. त्या मुलाबरोबर फिरून आमच्या तोंडाला काळं फासलं आहेस. परीक्षेतही नापास झाली आहेस. लोकांना काय तोंड दाखवणार? आमची मुलगी म्हणायलापण लाज वाटते.’’ केतकी बराच वेळ असं बोलत राहिली. मकरंदने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती बोलायची थांबत नाही हे बघून तो तेथून हॉलमध्ये निघून गेला. टेबलावर त्याला ‘मुंबई पुणे मुंबई’ची सीडी दिसली.
मकरंदला त्यातला एक प्रसंग आठवला. त्यात नायिकेचे वडील नायकाला सांगतात की, ‘‘माझी मुलगी चुकली आहे, तिच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. आता ती चुकलेली असताना मला तिच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. आता तिला सर्वात जास्त माझी गरज आहे..’’ मकरंदच्या मनात आलं, ‘‘तशीच आमची गरज आज अस्मितालाही आहे. दोनच महिने झाले अस्मिता असं वागतेय, उद्धटपणे किंवा उडवाउडवीची उत्तरं देते आहे. प्रेमात पडली. परीक्षेत नापास झाली. ठीक आहे, पण ही तिची वयामुळे येणारी एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. तसे टोचणारे बोल आपल्याकडूनही जातातच आहेत की. आत्ताच केतकी म्हणाली, ‘‘आमची मुलगी म्हणायला लाज वाटते म्हणून.’’ ती सदासर्वदा बरोबरच, आदर्श कशी वागणार? आणि आपण तरी नेहमी बरोबर आणि आदर्श वागतो का? केतकीने जेव्हा माझ्या कानावर या गोष्टी घातल्या तेव्हा मीही कामाचं निमित्त दिलं आणि ‘‘तू आई आहेस म्हणून तू बघून घे’’ असं म्हणून टाळलं होतं की. मी वडील म्हणून चुकलोच. तेव्हाच तिच्याशी बोलायला पाहिजे होतं. आतासुद्धा केतकी चिडून बोलली. तिलाही समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरोबर, चूक कशीही वागली तरी ही दोन्ही मुलं आम्हा दोघांची आहेत. अस्मितानं काहीही तोंडाला काळं वगैरे फासलेलं नाही. लोकांचा कशाला विचार करायचा? आपण आपल्या मुलांचा विचार करू. तिला साथ द्यायला हवी.’’ तो केतकीशी बोलायला जाणार तेवढय़ात केतकीच त्याच्याकडे आली आणि रडत म्हणाली. ‘‘उगाच बोलले तिला. मला खरं तर तसं बोलायचं नव्हतं, पण रागाच्या भरात तोंडातून निघून गेलं. काळजी वाटते रे तिची.’’ मकरंद तिला समजावत म्हणाला, ‘‘अगं, आपल्या दोघांनाही काळजी वाटणं, राग येणं, भीती वाटणं अगदी साहजिक आहे; पण मला तिची लाज मात्र नक्कीच वाटत नाही आहे. जसं रागाच्या भरात तुझ्या तोंडातून वाक्य निघून गेलं तसंच तिचंही भावनेच्या भरात असं वागणं होतंय. तिचं वागणं चूक, बरोबर कसंही असू देत, पण तिला वाटणारं दु:ख, निराशा शंभर टक्के खरी आहे. त्याचा तिला त्रास होतो आहे हे आपल्याला कळतंय हे आपण तिच्यापर्यंत पोहोचवायला हवं. आपण तिच्या चुकीचं समर्थनही करायचं नाही किंवा अमान्यही करायचं नाही. आताच्या या काळात अस्मिताच्या मागे आपण दोघांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपल्या वागण्या-बोलण्यातून तिला धीर मिळायला पाहिजे. परत परत या गोष्टींचा उल्लेख टाळला पाहिजे. आपण नकळतपणे तिला आहे त्याच परिस्थितीत लोटतो आहोत. आपण तिला यातून बाहेर काढायला हवं, तिच्याशी बोलायला हवं. आता तिची बोलायची तयारी नाही ना? हरकत नाही. तयारी असेल, मूड असेल तेव्हा बोलू. तिचा असहकार, उत्तरे याची तयारी ठेवावी लागेल. तिच्या वयामुळे येणाऱ्या स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत हे आपल्याला स्वत:ला वारंवार समजवावे लागेल. तिला सावरायला थोडा वेळ तर द्यायला हवा. चूक, बरोबर, योग्य-अयोग्य म्हणजे नेमकंकाय हे समजावयाला पाहिजे. मोघम बोलणं नको. उपदेशाचे डोस नको पाजायला. तिला चर्चेत सहभागी करून घेऊन तिचं मत काय हे विचारूया. आपली कळकळ तिच्यापर्यंत पोहोचायला हवी की आपला राग; पण हे ठामपणे मांडायला हवं. तुला काय वाटतंय?’’ केतकीने मान डोलावली आणि उद्या-परवा परत बोलायचा प्रयत्न करू म्हणाली.
केतकीला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे मुलांना फुलासारखं जपलं म्हणतोय, पण मुलं ही फुलं नाहीत तर माणसं आहेत. त्यांना फुलांसारखं जपून कसं चालेल? एवढय़ा मोठय़ा आयुष्यात येणारे टक्केटोणपे खाण्यासाठी तयार करायला पाहिजे. मी नोकरी करते, त्यामुळे वेळ कमी देते याचा गिल्ट ठेवायचं काहीच कारण नव्हतं. आपल्या घरासाठी मी काम करते आणि मला हे काम करायला आवडतं म्हणूनही मी हा जॉब करते हे त्यांना सांगायला पाहिजे होतं. त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट द्यायचा आटापिटा नको होता करायला. नाही ऐकायचीपण सवय लावायला हवी होती. जेव्हा कधी मुलं आपल्याकडे बोलायला येतात तेव्हा शंभर टक्के त्यांच्याकडे लक्ष देऊन, ऐकून, बोलून, सहभागी झालं पाहिजे.
जी चूक अस्मिताच्या बाबतीत झाली ती आदित्यच्या बाबतीत होऊ द्यायची नाही. पालक म्हणून आपणच माहिती दिली पाहिजे. शाळेत फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून लैंगिक शिक्षण मिळतं. आपण त्या वेळी असणाऱ्या भावभावनांविषयी माहिती द्यायला हवी. मुलींचं आकर्षण वाटणं चुकीचं नाही, पण प्रेमात पडून सिनेमात दाखवतात तशी काही तरी हिरोगिरी करणं नक्कीच चुकीचं आहे हे त्याच्यापर्यंत पोहोचवायला हवं. खरं तर हे त्याच्याकडूनच येईल अशा पद्धतीने त्याच्याशी बोललं पाहिजे. दहावीचा अभ्यास आठवीत करत नाही. त्याचप्रमाणे ज्या वयात ज्या गोष्टी करायला हव्यात त्याच गोष्टी करायला हव्यात. या वयात भरपूर खेळलं पाहिजे. अभ्यास, दंगामस्ती करायला पाहिजे. अजून काय काय करायला पाहिजे हे आदित्य सांगेलच.
मकरंद आणि केतकी दोघंही ठरल्याप्रमाणे दोन्ही मुलांशी वागत होते. हळूहळू अस्मिताची गाडी रुळावर येऊ लागली. तिला जाणीव झाली की, रोहन आपल्यावर दादागिरी करत होता. मला स्वत:ला काही मतं आहेत हे मी लक्षात न घेता तो म्हणेल तसं आंधळेपणाने करत होते; पण याचा त्रास अजूनही होतो. त्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं. आता मात्र अभ्यासावर फोकस करायला हवा.
एकदा चौघेही जण गप्पा मारत बसले होते. आदित्य त्यांच्या वर्गातला एक मुलगा सिगारेट कसा ओढतो ते सांगत होता. यावर मकरंद मुलांना म्हणाला, ‘‘जगात चांगलं, वाईट सगळं असतं; पण काय निवडायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. रस्त्यात घाण दिसली तर त्या घाणीतून जायचं का बाजूने जायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. एखादा ती घाण साफ करायचा निर्णयही घेऊ शकतो. योग्य काय अयोग्य काय हे प्रत्येकाला कळतं. तुमच्या मनात याबाबतीत कोणताही संभ्रम निर्माण झाला, अडचण आली किंवा कितीही मोठी चूक तुमच्या हातून झाली तर पहिल्यांदा आमच्याकडे, आपल्या आई-बाबांकडे नि:संकोचपणे या.’’
‘‘आम्हीही माणसंच आहोत, त्यामुळे किंवा याहीपेक्षा तुम्ही आमची लाडकी मुलं आहात म्हणून तुमच्यावरच्या प्रेमापोटी आम्ही रागावू, चिडू, पण तुमचा तिरस्कार मात्र नक्की करणार नाही. आमचं दोघांचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यावरचं आमचं प्रेम हे तुमच्या चुका, यश, अपयश यावर अवलंबून नाही. ते काहीही झालं तरी अबाधित राहील.’’
अस्मिता मन लावून ऐकते आहे बघून केतकी तिला म्हणाली, ‘‘अस्मिता, तुला होणारा त्रास आम्हाला कळतो आहे, पण यातून बाहेर पडण्यासाठी काय करशील?’’
अस्मिता लागलीच म्हणाली, ‘‘अगं. काय करणार, अभ्यासाला जोरदार सुरुवात करायला हवी. परीक्षा तोंडावर आली आहे. अभ्यासाचं वेळापत्रक बनवते. करून झालं की दाखवते तुम्हाला. मुख्य म्हणजे माझं फुटबॉल खेळणं बंद झालंय. उद्यापासूनच खेळायला जाईन.’’
अस्मितापण बरीचशी मोकळी झाली होती. आता ती योग्य तो विचार करू शकत होती. तिच्या मनात आलं, ‘‘मी किती लकी आहे. मला असे समजून घेणारे आईबाबा आहेत.’’
madhavigokhale66@gmail.com