आतापर्यंत मनवा वेगवेगळ्या पद्धतीनं आरामशीरपणे बाळाला दूध पाजायला शिकली होती. आई-बाळाचं नातं जन्मापासूनच कसं घट्ट व्हायला लागतं हे तिला कळलं होतं. दूध पाजताना तिला बरं वाटायला लागलं. तिच्या मनात आलं, ‘‘इथे दूध पाजता पाजता माझी उदासी दूर पळाली. खरंच काय निसर्गाचा चमत्कार आहे! आपल्याला नैसर्गिकपणे इतक्या गोष्टी मिळतात, पण आपण त्याचा उपयोग करत नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतकीच्या मावस बहिणीचे, मनवाचे बाळ महिन्याचे झाले होते. बाळाच्या जन्माच्या वेळी केतकीनेही बऱ्याच रजा शिल्लक असल्याने चांगली आठ दिवसांची सुट्टी घेतली होती. बाळाला दुभंगलेल्या ओठाव्यतिरिक्त काहीही त्रास नव्हता. बाळ सुदृढ होतं त्यामुळे घरात सर्वजण खूश होते. बाळाचा ओठ दुभंगलेला आहे हे आधीपासूनच माहीत होते त्यामुळे तज्ज्ञांनी शिकवल्याप्रमाणे प्रसूतीच्या काही दिवस आधीपासून सििरजने मनवाचे दूध काढून फ्रिझमध्ये त्याचा साठा करून ठेवला होता. पण यासाठी मनवाला मावशी आणि केतकीची मदत झाली. कारण हे सगळे करताना खूप स्वच्छता आणि कौशल्याची गरज भासत असे.

मानवाच्या मोठय़ा लेकीला, मानसीला वरचं दूध द्यायला लागलं होतं. याचं शल्य मनवाला होतं. म्हणून मनवा, मावशी आणि केतकी हॉस्पिटलमध्ये स्तनपानावरच्या चर्चासत्राला गेल्या होत्या. तिकडच्या स्तनपानविषयक  (lactation consultant) तज्ज्ञांना भेटल्या, पुस्तके वाचली. स्तनपानासंबंधित सर्व माहिती करून घेतली. आता सर्वजण बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होते. बाळ जन्माला आल्या आल्या बाळाला पुसून मनवाला दाखवलं तसा तिचा ऊर प्रेमानं भरून आला. तिने बाळाला कुरवाळलं, पापी घेतली. डॉक्टरांनी बाळाला तिच्या पोटावर ठेवलं. मनवा दोन्ही हाताने बाळाला पकडून बाळाचा मऊ  स्पर्श अनुभवत होती. थोडय़ा वेळाने बाळ हळू हळू छातीच्या दिशेने आईच्या पोटाला रेटा देत जाऊ  लागलं. अध्र्या तासात ते दूध पिण्याचा प्रयत्न करू लागलं. तेव्हा मानवाला खूप समाधान, आनंद वाटला. डॉक्टरांनी बाळाच्या ओठाला त्या वेळी आधार दिला. परंतु बाळ कमी वेळ दूध पिऊ  शकलं. ते रडू लागलं. तशी मनवा घाबरली. तिला वाटलं की इतकं अ‍ॅक्टिव्ह आणि उत्सुक असलेलं बाळ आता दूध पिऊ  शकत नाही आहे. आता हिचं पुढे कसं होणार? तिला वरचं दूध देणार आणि सलाइनपण लावणार. इवलासा हा जीव कसं सहन करणार? या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर तिला धीर देत म्हणाले, ‘‘तुमची काळजी कळते आहे, पण काळजीचे कारण नाही. तुम्ही जो दुधाचा साठा केला होता त्यातलं थोडं सिस्टरला केतकीने आणून दिलं होतं. ते आपण बाळाला देऊ. वाटी चमच्यानं देऊ यात आणि बाळाला अगदीच जमलं नाही तर त्यासाठी खास फिडर येतात ते वापरूयात.’’ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, सिस्टर, तज्ज्ञांच्या मदतीने तिने बाळाला दूध पाजलं. ती निश्चिंत झाली. या दरम्यान जर काही समस्या आली त्या वेळी काय काय करायचं हे त्यांनी सांगितलं. घरी आली त्या वेळी तिच्याकडे पूर्ण माहिती होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता.

बाळाला बघायला मानवाच्या सासूबाई लगबगीने आल्या, पण ओठ दुभंगलेल्या बाळाला प्रत्यक्षात बघितल्यावर मनवाच्या सासूबाई थोडय़ा नाराज झाल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या बाळासाठी मावशी, केतकी आणि घरच्यांनी घेतलेली अपार मेहनत पाहिली. सर्व जण हे सर्व अत्यंत प्रेमाने करत होते. हे पाहून स्वत:च्या विचारांची त्यांना लाज वाटली. त्यांच्या मनात आले, ‘‘आपण घरचेच नाराज झालो तर कसं चालेल? शस्त्रक्रिया करून होईल ना ओठ नीट. कदाचित ती लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नसेलही सुंदर. पण लोकांचा विचार कशाला करायचा? जसं आहे तसं हे बाळ आम्हा सगळ्यांचं आहे. हिच्या मनात मोठेपणी कोणताही न्यूनगंड निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी घरातल्या सर्वाची आहे. आयुष्य सुंदर कसे करायचे आणि ते कसं मस्त जगायचं हे आपल्या हातात आहे. हे तिच्या मनावर बिंबवायला हवं. शरीर, मनाची तंदरुस्ती महत्त्वाची. हे तिला सगळे मिळून शिकवू. या सगळ्याची सुरुवात आईच्या दुधापासून होते. या वेळी मनवा मागे लागल्यामुळे स्तनपानावरील पुस्तकं वाचली होती. त्यात स्तनपानामुळे बाळाला आणि आईला तात्काळ आणि पुढेही खूप फायदे होतात असे लिहिले आहे. स्तनपानामुळे बऱ्याचशा रोगांपासून संरक्षण मिळतं. खरंच बाळासाठी आईचं दूध अमृत आहे. आजकालच्या फायद्याच्या भाषेत बोलायचे झाले तर हा एक फुकट मिळणारा विमा आहे ज्याचा प्रीमियम आहे आईचं दूध..घरात त्यासाठी योग्य ते वातावरण ठेवलं पाहिजे.’’ त्यांचं त्यांनाच जाणवलं त्यांच्या सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या आहेत. दृष्टिकोनातही खूप फरक पडला आहे.

नंतर परत चार दिवस बाळाचे बाबा, मानसी राहून गेले. त्यांना खाली सोडून आल्यावर मनवाला प्रचंड उदास वाटू लागलं. तिचे डोळे भरून आले. इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसं तिने बाळाला दूध पाजायला घेतलं. आतापर्यंत ती वेगवेगळ्या पद्धतीनं आरामशीरपणे बाळाला दूध पाजायला शिकली होती. दूध पाजताना तिला बरं वाटायला लागलं. तिच्या मनात आलं, ‘‘इथे दूध पाजता पाजता माझी उदासी दूर पळाली. खरंच काय निसर्गाचा चमत्कार आहे! आपल्याला नैसर्गिकपणे इतक्या गोष्टी मिळतात, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. मानसीच्या वेळी ही माहिती आधीच मिळाली असती तर तिला वरचं दूध द्यावंच लागलं नसतं. कितीतरी गैरसमजुती होत्या. थोडा धीर पाहिजे. संपूर्ण परिवाराची शारीरिक, मानसिक साथ पाहिजे. त्यांनाही शास्त्रीय माहिती नसल्याने भीती वाटणे, चिडचिड होणे या गोष्टी होत राहिल्या. केतकी तर खूप मदत करतेच आहे. पण आईचाही मानसीच्या वेळचा आग्रही, हुकमी स्वर कमी झाला आहे. आम्ही काय मुलांना जन्म दिला नाही का, मुलं वाढवली नाहीत? ही वाक्यं थांबली आहेत. कारण बाळाच्या ओठाच्या प्रश्नामुळे ती हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सर्व चर्चासत्रे, प्रसूती, स्तनपान, बाळाची काळजी कशी घ्यावी या संबंधित सर्व व्याख्यानांना आली. खुल्या मनानं ती शिकली. मानसीच्या वेळी मला झोप मिळावी म्हणून तिला स्वत:च्या कुशीत घेऊन झोपायची. पण बाळाला दूध मिळण्यासाठी बाळ आईच्या कुशीत असायला हवं, आई आणि बाळाचा स्पर्श किती महत्त्वाचा आहे हे समजलं. पहिल्या काही दिवस औषधांचा अंमल असायचा म्हणून या वेळी मी बाळाला कुशीत घेऊन झोपलेले असताना ती माझ्या जवळ बसून राहायची. याही वयात किती करते माझ्यासाठी.’’

एकदा बाळाचा ओठ दाखवण्यासाठी डॉक्टरांकडे जायचं होतं. केतकीला सुट्टी नव्हती. मावशी आणि मनवाला रस्ता माहीत नव्हता. म्हणून आदित्य वेळ काढून त्यांच्या बरोबर गेला. त्यानेच टॅक्सी बुक केली. टॅक्सीत बाळ अचानक जोरजोरात रडू लागलं, काही केल्या थांबेना. तेव्हा आदित्यने टॅक्सी थांबवायला सांगितली. तो मनवाला म्हणाला, ‘‘मावशी आम्ही दोघे बाहेर थांबतो. मागे ऐसपैस बसून बाळाला दूध पाज. कदाचित ती शांत होईल.’’ टॅक्सी चालकही म्हणाला, ‘‘तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. टॅक्सी किती वेळ थांबली याचा विचार करू नका.’’ मनवाला आदित्यचं खूप कौतुक वाटलं. पण टॅक्सी चालकाचंही कौतुक वाटलं. अगदी केतकीची कामवाली बाईपण जास्तीचं काम न कुरकुरता करत असे. या वेळी मानवाला घरात, बाहेर सगळीकडेच आधार मिळत होता.

एकदा सगळेजण गप्पा मारत बसले होते. तेव्हा मनवाने केतकीचे आणि तिच्या घरच्यांचे आभार मानले. तेव्हा आदित्य आणि अस्मिताचं म्हणणं होतं की त्या दोघांनीच खरं तर मनवाचे आभार मानायला पाहिजेत. बाळ घरात आहे ही गोष्ट त्यांना सणासुदीची वाटत होती आणि मुख्य म्हणजे हा सण त्याच्याच घरात साजरा होत होता, बाकीच्यांच्या घरी कोणताही सण नव्हता. बाळाच्या रोजच्या नवनवीन बाळलीला त्यांना खूप आवडायच्या. घरात येणारा बाळाचा वास हा उदबत्ती, धूप, रूमफ्रेशनरपेक्षा भारी होता.

त्या वेळी मनवाच्या डोक्यात वेगळेच विचारचक्र चालू होते, ‘‘नवीन बाळाच्या आगमनाने फक्त आईचेच नाही तर घरातील सगळ्यांचेच काम नकळतपणे वाढते. या घरात आपले, बाळाचे उबदार स्वागत झालेच, पण सर्वानी कामाचा वाटा उचलला, मानसिक आधार दिला. अगदी कामवाली, टॅक्सीवाला अशा बाहेरील लोकांनीपण मदत केली. बाळाला दूध पाजण्यासाठी आई, केतकी, डॉक्टर, नर्स यांची मदत झाली. फादर्स डे, मदर्स डे साजरा करतात. तसा डे नाही तर पूर्ण १ ते ७ ऑगस्ट स्तनपान सप्ताह असतो. हा कोणाला माहितीही नाही. पण हरकत नाही आपणच सर्वाना स्तनपान सप्ताहाच्या शुभेच्छा देऊ यात.’’ लागलीच मनवाने सर्वाना मेसेज केला, ‘जागतिक स्तनपान सप्ताहाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!’

माधवी गोखले

madhavigokhale66″gmail.com