काही वेळेला काही गोष्टी आपल्याला हव्या तशा होणं किंवा हवी ती गोष्ट मिळणं अशक्य असतं. त्या वेळी आपण जर त्याच्या मागे धावलो तर दु:खाला, चिंतेला आणि तणावाला आमंत्रण देतो. ती परिस्थिती मान्य केली, सत्याचा सामना केला तर बऱ्याचशा गोष्टी सुसह्य़ होतील. वाईट परिस्थितीत सर्वच वाईट होतं असं नाही. त्यांच्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला हवं. त्यानेही आनंद मिळेल. ताण कमी होईल.
केतकीचे बाबा पक्षाघाताने अंथरुणाला खिळून होते. या गोष्टीला चार महिने झाले. पक्षाघाताचा झटका आला त्या दिवसापर्यंत ते काम करीत होते. त्यांचा उत्साह, कामाचा झपाटा तरुणाला लाजवेल असा होता. त्यांना पलंगावर असं सतत झोपलेलं बघणं सगळ्यांना खूप कठीण जात होतं. केतकी शेंडेफळ, बाबांची खूप लाडकी आणि बाबा म्हणजे तिचा जीव की प्राण. केतकी त्यांच्या आजाराने कोलमडून गेली होती. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.
‘डॉक्टर म्हणताहेत यांच्यात थोडी फार सुधारणा होईल. त्याचं वय आणि बाकीच्या गोष्टी बघता यातून पूर्ण बरे होणार नाहीत. त्यांची तब्येत अशीच वरखाली होत राहणार. यात ते चार महिने काढतील किंवा चार र्वष काढतील. माझे बाबा आरोग्याच्या बाबतीत एवढे काटेकोर. रोज तीन किलोमीटर तरी फिरणार. चौरस आहार. कुठलंही व्यसन नाही. स्वत:ची सर्व कामं स्वत: करणार. मनमोकळा, आनंदी स्वभाव. त्यांनाच का हा आजार व्हावा? कधीही कोणाचं वाईट चिंतलं नाही की कोणाला दुखावलं नाही. साधाभोळा माणूस आहे बिचारा. देवसुद्धा अंत बघतो. नशीबच वाईट आहे बिचाऱ्यांचं. पण मी आहे न त्यांची मुलगी आणि आई, दादा, ताई आम्ही सर्व जण प्रयत्नांची शिकस्त करू आणि त्यांना यातून बाहेर काढू. दोन महिन्यांपूर्वी नाही का त्यांची तब्येत बरीच सुधारली होती. बऱ्यापैकी बोलत होते. दादा त्यांना व्हिलचेअरवर बसवून बाहेर फिरवून आणत होता. त्यांना अजून मोठय़ा डॉक्टरकडे घेऊन जाऊ. जगातले उत्तम उपचार देऊ. ते नक्की बरे होतील. या डॉक्टरांना तेवढं कळत नसेल.’
बाबांची सगळे जण व्यवस्थित काळजी घेत होते. सगळ्यांची रोजची कामं सांभाळून त्यांना सांभाळताना, त्यांची देखभाल करताना खूप ओढताण होत होती. पण सगळे मनापासून त्यांची सेवा करीत होते. पैसाही पाण्यासारखा खर्च करीत होते. कोणाचीही कुरकुर नव्हती. पण तरीही रोज नवीन काही तरी समस्या निर्माण होत होत्या. त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली. शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं.
केतकी हॉस्पिटलमध्ये बाबांच्या शेजारी बसली होती. डोळ्यात अश्रू होते. ‘काय ही बाबांची अवस्था. मी त्यांना या स्थितीत बघूच शकत नाही. एवढय़ा मोठय़ा हॉस्पिटलमध्ये आणूनही काही फरक नाही. उपचारांमध्येही तसा काही फरक नाही. काही गोळ्यांच्याऐवजी त्याच औषधांची इंजेक्शन देत आहेत. त्यांने शरीराची चाळण झाली आहे. तिथं काळंनिळं झालं आहे. दुखत आहे. कण्हत असतात सारखे. अजून काही करता येईल का बघायला हवं.’
त्यांची तब्येत ढासळतच गेली. डॉक्टर विचारायचे ‘या काही तपासण्या करून बघू यात का?’ सगळ्यांचं उत्तर एकच असायचं, ‘हो! काय करायच्या त्या सगळ्या चाचण्या करा. उत्तमोत्तम उपचार करा. कुठेही काहीही कमी पडू देऊ नका.’ रिपोर्टमधून काही ठिकाणी ब्लॉक असल्याचं कळलं. छोटीशी शस्त्रक्रिया करून तीन ठिकाणी स्टेन्ट्स टाकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या शस्त्रक्रियेने बाबा बरे होतील या विचाराने सर्वाना खूप बरं वाटलं. पण डॉक्टरांनी स्पष्ट कल्पना दिली की या शस्त्रक्रियेने त्याचं आयुष्य वाढेल, पण हा आजार काही बरा होणार नाही, ते उठून चालू वगैरे शकणार नाहीत.
हे ऐकून केतकी हवालदिल झाली. विचार करू लागली, ‘आई म्हणते ते खरं आहे, बाबा खूप स्वाभिमानी आहेत. ते बोलू शकत नाहीत, पण त्यांना हे अंथरुणात खितपत पडलेलं आवडत नाही आहे. आपण परावलंबी झालो आहोत याने त्यांना किती दु:ख होत असणार? काहीही करून बाबांना वाचवायचंच हा आपला अट्टहास आहे. कारण आपल्या सर्वाना ते हवे आहेत. शस्त्रक्रियेने त्याचं आयुष्य वाढेल पण रोग जाणार नसेल तर त्यांना पुढची काही र्वष दुखण्यात खितपत पडू द्यायचं? त्यांना यातना भोगायला लावायच्या? पण मग करायचं काय? काय निर्णय घ्यायचा? शस्त्रक्रिया नाही केली तर डॉक्टर म्हणताहेत ते काही दिवसच काढतील. मग बाबांना असंच या जगातून जाऊ द्यायचं? लोक काय म्हणतील?’ तिचं डोकं काम करेनासं झालं. इतक्यात आई आली. केतकीच्या डोळ्यात पाणी बघून तिला म्हणाली, ‘‘या गोष्टी आपल्या हातात नाहीत गं. खूप करताय तुम्ही सगळे. आम्ही आता पिकली पानं कधीतरी गळणारच ना? बाहेर जरा फिरून ये. बरं वाटेल तुला.’’
आई म्हणाली त्याप्रमाणे केतकी फिरायला बाहेर पडली. खरंच तिला थोडं बरं वाटलं. तिच्या मनात आलं, ‘कसा काय आई इतका शांतपणे विचार करू शकते? अगदी विवेकी विचार असतात तिचे. का आपण देवाला, नशिबाला दोष देतो आहोत. पण अगदी परिपूर्ण आयुष्य जगले बाबा. तसं एकंदरीत बाबांचं आयुष्य छानच गेलं म्हणायला पाहिजे. ते नेहमी म्हणायचे की हातीपायी धड असताना देवाने उचलून न्यावं. कोणाला आपलं करायला लागू नये एवढीच इच्छा आहे. आपण सर्व जण त्याचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. विज्ञानानं हे शक्य झालं आहे. खरं तर आपण असं करून त्यांना जिवंतपणी मरण भोगायला लावणार. हे कितपत योग्य आहे? लोकांचा विचार आपण केव्हापासून करायला लागलो? मला बाबा महत्त्वाचे की लोकांचं बोलणं महत्त्वाचं? या जगात कोणीही अमर नाही. आलेला प्रत्येक माणूस जाणारच. हा निसर्गनियम आहे. त्यामुळे माझे बाबा आमच्या सर्वाबरोबर कायम असणं अशक्य आहे. हे आपण मान्य केलं तर हा काळ सुसह्य़ होऊ शकेल.
खरं तर आम्ही सर्व जण एकमेकांच्या जवळ होतोच, पण या काळात आमच्यात अजून जवळीक निर्माण झाली आहे. एकमेकांना भावनिक आधार देतो आहोत. आदित्यला सुद्धा आता सारखी आई लागत नाही. स्वत:ची कामं स्वत: करायला लागला आहे. मकरंदही घरातील सगळी कामं करायला लागला आहे. हे खूप समाधान देऊन जातंय. नाही तर आपल्या शेजारच्या नीलच्या आईच्या आजारपणात पाहिलं ना, तीन भावंडं, सगळ्यांची सांपत्तिक स्थिती चांगली, अगदी मनुष्यबळही होतं प्रत्येकाकडे, पण आईकडे कोणी बघायचं, कोणी खर्च करायचा यावरून प्रचंड वादविवाद. आजारी माणूस एकच असतं पण पूर्ण परिवार आजारी होऊन बसतो. अशा वेळी एकी असणं किती महत्त्वाचं हे कळतंय.
आता राहिला प्रश्न शस्त्रक्रियेचा. तर ती न करण्याचा आपला निर्णय आपण सर्वाना सांगून टाकू या, त्यांना पटेल. त्यांना सांगू जे काही बाबांचे दिवस राहिले असतील ते सुसह्य़ करायचा प्रयत्न करू यात. त्यांना घरी घेऊन जाऊ. त्यांच्या आवडीची गाणी त्यांना ऐकवू. ते बोलत नाही आहेत, पण आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारू. त्यांना जे जे आवडतं त्यातलं जे शक्य आहे ते सर्व करायचा प्रयत्न करू यात. आणि जे शक्य होणार नाही त्यासाठी कुढत बसायला नको. या सगळ्या परिस्थितीचा स्वीकार करायला हवा. हा विचार करून केतकीला खूप बरं वाटलं. तिने सर्वाना आपल्याला काय वाटतं ते सांगितलं. सर्वानुमते त्या पद्धतीने पावलं उचलली गेली. पुढे पंधरा दिवसांतच बाबा गेले. केतकीला दु:ख झालंच, पण ती निराशेच्या गर्तेत गेली नाही. तिच्या मते बाबांचा ती अंश होती, त्यांचे संस्कार तिच्यावर होते. त्यामुळे बाबा क्षणोक्षणी तिच्याबरोबर होतेच.
काही वेळेला काही गोष्टी आपल्याला हव्या तशा होणं किंवा हवी ती गोष्ट मिळणं अशक्य असतं. त्या वेळी आपण जर त्याच्या मागे धावलो तर अजून दु:खाला, चिंतेला आणि तणावाला आमंत्रण देतो. ती परिस्थिती मान्य केली तर बराचशा गोष्टी सुसह्य़ होतील. आपल्या प्रत्येकाकडे प्रतिकूल परिस्थितीशी सामना करायची खूप शक्ती असते. आठवून बघू या. आणि वाईट परिस्थितीत सर्वच वाईट होतं असं नाही. काही चांगल्या गोष्टीही होतात. आपण त्यांच्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला हवं. त्यानेही आनंद मिळेल. ताण कमी व्हायला मदत होईल.
समर्थानी म्हटलं आहेच की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे.’
– माधवी गोखले