|| वैशाली ढम-खराडे
जन्मापासून जगण्यासाठी सुरू झालेली साईची लढाई अजूनही सुरूच आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या साईची ही लढाई त्याच्या आई, वैशाली यांनी प्रत्यक्ष अनुभवली. साईला वाढवता वाढवता त्याही घडत गेल्या. त्यातूनच कणखर, संयमी, खंबीर वैशालीचा जन्म झाला. त्यांच्या या संघर्षांची कहाणी..
१७ सप्टेंबर २००५ला पुण्याच्या के.ई.एम. रुग्णालयात माझ्या जुळ्या मुलांचा जन्म झाला नि मला आणि अमोलला आई-बाबा नावाची जगातील सर्वोच्च पदवी मिळाली. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. सातव्या महिन्यातच आणि १४ मिनिटांच्या अंतराने जन्माला आलेले हे माझे वल्लभ आणि साई, माझ्यातल्या वैशालीला खऱ्या अर्थाने घडवणारे ठरले.
आमच्या या आनंदाला दृष्ट लागावी की काय म्हणून नीट डोळेही न उघडलेल्या माझ्या लेकाला साईला कावीळ, न्यूमोनियासारख्या आजारांचा विळखा पडला. २४ तास, ४८ तास, ७२ तासांसारख्या मुदतीच्या जीवघेण्या संघर्षांची सुरुवात झाली. साईला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न, थोरामोठय़ांचे आशीर्वाद, प्रार्थना आणि कदाचित देवाच्या आशीर्वादाचा वरदहस्त बहुमोल ठरला. साईकडे अफाट इच्छाशक्तीचे बळ आहे ज्यामुळे तो दवाखान्यात दीड-दोन महिने मृत्यूशी लढला आणि जगण्याची पहिली लढाई जिंकला. जन्माचा आनंद सुरू होत नाही तोच मृत्यूच्या उंबरठय़ावर इवल्याशा जिवाला झगडताना बघताना काळजाला घरे पडली, पण आशा सोडली नाही.
साई वल्लभच्या जन्मानंतरचा पहिला दसरा दिवाळी दवाखान्यातच पार पडला. ३ नोव्हेंबर २००५ला आम्ही म्हणजे मी, साई, वल्लभ आणि माझी आई के.ई.एम.मधील मुक्काम संपवून घरी परतलो. साई-वल्लभच्या तब्येतीसाठी डोळ्यांत तेल घालून त्यांना दूध पाजणं, औषधं काटेकोरपणे वेळेत देणं हे करण्यात दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस कधी व्हायचा कळले नाही. त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी कमालीची स्वच्छता आणि काळजी घ्यावी लागायची. माझी आई आणि सासू सोबतच इतर माहेर सासरची माणसं खंबीरपणे पाठीशी उभी होती. हे खरंच कौतुकास्पद होतं. दिवसामागून दिवस सरत होते. वेळेचं भान नव्हतं. साई-वल्लभच्या वाढीतील तफावत स्पष्ट दिसत होती. मनात चलबिचल असायची. साईची झोप अतिशय कमी होती. तास-तास मांडीवर किंवा हातावर घेऊन फेऱ्या मारून फक्त १५ ते २० मिनिटे साई शांत झोपायचा. रात्री थोडा एक-दीड तास शांत झोपायचा की पुन्हा हा जागाच, तसंच चक्र चालू. वाटी चमच्याने साईला दूध पाजताना खूप तारांबळ उडायची. त्याला कसं घ्यावं. कसं शांत करावं कळायचं नाही. काही सुचायचं नाही. त्याचं झालं की वल्लभचं आणि वल्लभचं झालं की साई. असा कार्यक्रम दिवस-रात्र चालू असायचा.
खरंच जुळ्या मुलांना सांभाळताना त्यांच्या मातांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं याची फक्त कल्पनाच केलेली बरी. पण आपल्या माणसांची साथ असेल तर हा प्रवास थोडा तरी सुखकर होतो. जन्मानंतर तीन महिन्यांनी रुटीन चेकअपसाठी गेल्यावर साईची वाढ सामान्य बाळासारखी नाही, तो ‘सेरेब्रल पाल्सी, अर्थात विशेष मूल आहे हे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. त्याच्या हातापायांच्या हालचालींवर मर्यादा असणार होती. आम्ही दोघं नवरा-बायको सुन्न होऊन फक्त ऐकत होतो. डोळ्यांसमोर उभ्या राहिलेल्या हजारो प्रश्नांना, डोळ्यांत जमा झालेल्या पाण्याला तिथेच थिजवून फक्त डॉक्टरांचं बोलणं ऐकत राहिलो. डॉक्टरांनी थेरपी चालू करायला आणि विशेष मुलांसाठीच्या दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला. घरी परत येताना, मांडीवरच्या निष्पाप जीवाचा काय दोष, हा एकच प्रश्न मला सतावत होता. मन सैरभैर झालं होतं. देवाजवळ प्रार्थना करत राहिले. घरात सर्वाना लगेच काही सांगण्याची हिम्मत नव्हती, पण हळूहळू वास्तव सांगितलं. काळीज पोखरून टाकणाऱ्या या सत्य परिस्थितीचा सामना करताना खूप अवघड गेले.
पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की, हे सत्य जितक्या लवकर स्वीकारलं जाईल तेवढे साईसाठी आवश्यक प्रयत्न ताबडतोब सुरू करता येतील. प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी, कमालीचे धैर्य, संयम यांची कसोटी लागणार होती. एका बाजूला वल्लभची नियमित वाढ त्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला साईची काळजी. विचित्र घुसमट व्हायची. ना आनंद व्यक्त करता यायचा ना दु:ख करायला वेळ होता. फक्त न थांबता, खचून न जाता प्रयत्न करत पुढे जायचं होतं. एका खडतर प्रवासाची वाटचाल चालू झाली होती. आजूबाजूच्या सहानुभूतीच्या नजरांना काय उत्तर द्यावं कळायचं नाही. साईला थेरपी आणि इतर कारणांसाठी बाहेर नेताना लोकांच्या चित्रविचित्र नजरा एखाद्या बाणासारख्या घायाळ करून जायच्या. घरच्यांचा आधार होता. नवऱ्याची मोलाची साथ होती. त्यामुळे अनेक बऱ्या-वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायची ताकद मिळायची. प्रेमापोटी, काळजीपोटी ओलावले डोळेही सुखावून जायचे. या काळातच माणसं वाचायला शिकले.
साईच्या चेहऱ्यावर ‘सोशल स्माइल’ खूप उशिरा आलं, पण त्याचं एक-दोन सेकंदांसाठी चेहऱ्यावर विसावलेलं पहिलं स्मित आजही डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं आहे. ही साईची पहिली प्रगती. हळूहळू साई आवाज ओळखू लागला. आवाजाच्या दिशेने बघू लागला. अस्थिर असणारी नजर स्थिर झाली. समज वाढली. तो प्रतिसाद देऊ लागला. डोळ्यांनी बोलू लागला. त्याच्या हुंकारमध्ये बदल करून आनंद, लटका राग, कुतूहल व्यक्त करू लागला. हा त्याचा व्यक्त होण्याचा, संवाद साधण्याचा अनोखा प्रयत्न होता. जो यशस्वी झाला होता. घरातील सर्वाना साईने शब्दांचा वापर न करता बोलायला शिकवलं. या सर्व गोष्टी खूप संथपणे, कासवाच्या गतीने झाल्या. पण परमेश्वरानेच त्यासाठी बळ दिलं. हे टप्पे गाठताना एक प्रकारचा साप-शिडीचा खेळ चालू असायचा. मधूनमधून प्रगती दिसायची, हळूहळू शिडीने वरती जायचं आणि अचानक आजारांच्या तोंडी सापडून सरकत खाली यायचं. असं वारंवार असायचं. पण जिद्द, सोडायची नव्हती, प्रयत्न चालूच ठेवायचे होते. चिकाटी, थेरपीमधील सातत्य राखणं गरजेचं होतं. ते आजही सुरू आहे.
साईला कारमधून फिरायला आवडू लागले. गप्पा ऐकताना तो भूक विसरून जायचा. नाहीतर एरवी कल्ला करून जेवणाच्या वेळा काटेकोरपणे आमच्याकरवी पाळायचा. घरातले सगळे जण त्याच्याशी खूप गप्पा मारतो. त्याला आजीच्या मोबाइलचा आवाज, आमच्या दुचाकीचा आवाज समजायला लागला होता. वल्लभचा पण साईवर खूप जीव. वल्लभला वाटायचं थोडय़ा वर्षांनी त्याच्यासोबत साई शाळेमध्ये जाईल. काही काळाने म्हणजे दुसरीत असताना हळुवारपणे त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. तेव्हा कोवळ्या मनाच्या वेदना डोळ्यांतून घळाघळा वाहू लागल्या. वल्लभ मुळात हळव्या स्वभावाचा. लहान वयातील त्याचा समजूतदारपणा सुद्धा टोचणी लावायचा.
साईला ‘इंटरविडा अवेकनिंग जागृती’ या विशेष शाळेत प्रवेश घेतल्यावर तेथील शिक्षकांचा आणि इतर स्टाफचा प्रत्येक मुलाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा होता. साईच्या प्रकृतीमुळे पुढे पाच-सहा वर्षांत शाळेचा निरोप घ्यावा लागला.
साईला जपताना वल्लभकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी खूप सजग राहिले, काळजी घेतली. मला समाधान आहे की मी दोघांना न्याय देऊ शकते. बारा वर्षांच्या या प्रवासात नको त्या गोष्टींना खतपाणी घालण्याचं कटाक्षानं टाळलं. बुवाबाजी, अवास्तव कल्पनांना बळी पडलो नाही. एकदा सत्य परिस्थितीचा स्वीकार केला की सहसा वाट चुकत नसावी.
शेवटी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. विशेष मूल अनेक गोष्टींची कमतरता घेऊन रोज लढत असते. निरागस आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. तो बघता यायला हवा. रोजच्या ज्या गोष्टी आपण सहज करतो अशा लहान लहान गोष्टींसाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. कधी काही गोष्टी जमतात तर अनेकदा जमत नाहीत, पण तरी कशाची तक्रार न करता हे निष्पाप जीव लढत राहतात. मग आपल्याकडे हातपाय धड असताना, चालता-बोलता येत असताना, सर्व गोष्टी असताना आपण का खचून जातो? का हार मानतो? नशिबाला दूषणे देत का रडत राहतो? मी साईच्या शाळेत आणि इतर अनेक क्लिनिक्समध्ये सुद्धा बरेच आई-वडील बघितले ज्यांचं हातावरचं पोट असताना आनंदाने त्या आपल्या विशेष मुलांसाठी प्रयत्न करतात. जेव्हा निराश व्हायला होतं, तेव्हा ही अशी उदाहरणे डोळ्यांसमोर येतात. आर्थिक सुबत्ता, भक्कम कौटुंबिक पाठबळ असताना मी का निराश व्हावं असं वाटतं. नैराश्याचे मळभ आपोआप दूर सारून माझ्या दोन्ही पिलांसाठी पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी सज्ज होते.
माझ्या दोन्ही मुलांमुळे माझ्यात खूप सकारात्मक बदल झाले. एक कणखर, संयमी, खंबीर वैशालीचा जन्म झाला म्हटले तरी चालेल. मला एक प्रकारे त्यांनी घडवलं म्हणा ना. मी खूप नवनवीन गोष्टी शिकले. मी आणि अमोल आमच्या दोन्ही मुलांचे ऋ णी आहोत.
vasaiva@rediffmail.com
chaturang@expressindia.com