दोन हातांनी आपण जे काही करू कदाचित त्यापेक्षा थोडं जास्तच लक्ष्मी तिच्या पायांनी करते. पायांनी लिहिते, जेवते, मोबाइल, संगणक हाताळते आणि खूप काही.. तिला दोन्ही हात नसताना इतकं सक्षम असणं तिच्या आईच्या,
कविता शिंदे यांच्या पाठबळाशिवाय शक्यच नव्हतं. आज लक्ष्मी बी.ए.च्या द्वितीय वर्षांचा अभ्यास करतेय. तिला ध्येयाकडे भरारी घेण्याची ताकदही आईनेच दिली आहे.
उमरग्यातून मी सोलापूरला लग्न होऊन टॅक्सीचालक असणाऱ्या संजय शिंदे यांची पत्नी म्हणून आले. साधारणत: २० वर्षांपूर्वीचा प्रसंग. लग्न होऊन दोन वर्ष होत आली होती आणि बाळाची चाहूल लागली. रुटीन चेकअप करतात तसं सोनाग्राफी करायला गेलो, ती झाल्यावर डॉक्टर म्हणाले, बाळाला हातच नाहीत. मी हादरून गेले. आम्ही काहीही न ठरवता घरी आलो. यांनी मला दुसऱ्या डॉक्टरकडे नेलं, त्यांनीही तेच निदान केलं. आणखी एकदा सोनाग्राफी केली. तीनदा केलेल्या सोनोग्राफीनंतर मात्र यांनी बाळाला हात नसल्याचं घरी सांगितलं.
घरी म्हणजे नातेवाईकांनी सल्ला दिला- कशाला ठेवायचं असं मूल. गर्भपात करून टाका. मी एकदम गप्प झाले होते. पहिलंच मूल. फक्त हात नाहीत म्हणून जन्माला घालायचं नाही? मला तर ते हवं होतं. माझ्या पतीने खूप समजूतदार भूमिका घेतली. ते म्हणाले, देवाच्या कृपेने आधीच समजलं की बाळाला हात नाहीत, जन्मानंतर समजलं असतं तर काय केलं असतं? आता त्याला जगात येऊ न देणं म्हणजे मला अपराध केल्यासारखं वाटतंय. येऊ दे त्याला जन्माला. मुलगी झाली तर ‘लक्ष्मी’ म्हणून आणि मुलगा झाला तर ‘महादेव’ म्हणून वाढवू. त्यांचं हे बोलणं ऐकलं आणि माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. जवळपास दोन ते तीन महिन्यांनंतर मी मोकळेपणानं हसले.
दिवस पूर्ण झाल्यावर ३ फेब्रुवारी १९९९ ला गोंडस मुलगी झाली. ठरल्याप्रमाणे तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. तिला हात नव्हते ही एक कमतरता सोडली तर तिच्यात काही कमी नव्हतं. दिसायलाही गोड आहे लक्ष्मी. हो, कदाचित हाताचं बळ नसल्यामुळे असेल पहिले दोन-तीन वर्ष तिच्या पायातही बळ कमीच होतं. लहान बाळाचं तर आपणच सगळं करतो. मात्र लक्ष्मीच्या जन्मानंतर मी मनाशी खूणगाठ बांधली होती की, हिचं सगळं मलाच करायचं आहे. तशी मी मनाची तयारी ती पोटात असतानाच केली होती. तिच्या जन्मानंतरही काहींनी सल्ला दिला होता, की तिचं दूध तोडा म्हणजे.. पण मी आणि तिचे वडील ठाम होतो. आमच्या जिवात जीव असेपर्यंत आम्ही तिला सांभाळणार होतो.
लक्ष्मी साधारणत: तीन वर्षांची झाल्यावर इतर मुलांचं पाहून असेल, ती सरकत सरकत गावातल्या शाळेत जाऊन बसायची. शाळा सुरू होण्यापूर्वीच ही शाळेत पोहोचलेली असायची. तिला कसली ओढ होती की बाळाचे पाय पाळण्यात म्हणायचं काही कळायचं नाही. तिचे बाबा तिला उचलून घरी घेऊन यायचे, की दुसऱ्या दिवशी ही पुन्हा शाळेत. वाटायचं हात असते तरी शिकलीच असती ना, मग नुसतं शाळेत जाऊन बसली तर काय हरकत आहे. माझं शिक्षण सहावीपर्यंतच, तिचे वडील तर तेवढंही शिकलेले नव्हते. तिच्या वडिलांशी बोलले. त्यांनाही तिनं शिकावं असंच वाटत होतं. ते जाऊन शाळेतल्या शिक्षकांशी बोलले, त्यांनी लक्ष्मीला नुसतं शाळेत बसू देण्याची विनंती केली. आधी शिक्षक तयारच होईनात. त्यांचं म्हणणं, एक तर तिला हात नाहीत. त्यात ही पडली किंवा मुलांनी ढकललं तर कोण जबाबदारी घेणार? मात्र तिच्या बाबांनीच जबाबदारी घेत तिचा शाळेचा मार्ग खुला केला.
शाळेत गेल्यावर लक्ष्मीला प्रकर्षांने जाणवलं की, हात नाहीत म्हणजे काय; पण तिच्यात उपजतच समजूतदारपणा होता. तिनं कधी मला त्यावरून प्रश्न नाही विचारला, उलट इतर मुलांचं पाहून हात नाहीत तर मग स्वत:च पायात पेन्सिल धरून लिहिण्याचा प्रयत्न करू लागली. ती सामान्य मुलांच्या शाळेतच शिकली. त्या काळात जगताप नावाच्या शिक्षकांनी खूप सहकार्य केलं. तिच्या पायांना रोज तेलाने मालिश केल्यामुळे तिच्या पायांत ताकद आली होती. तिचं घसरत जाणं बंद होऊन ती चालायला लागली होती. ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट. दरम्यानच्या काळात तिच्या पाठीवर दोन बहिणी झाल्या होत्या. तिच्या बाबांच्या सहकार्यामुळे सगळ्या मुलांकडे लक्ष देणं, त्यांना सांभाळणं सोप्पं जायचं. मात्र कुठल्याही नातेवाईकांचा पाठिंबा त्या वेळी मिळाला नव्हता. कारण ग्रामीण भागात आजही अपंगांना जगण्याचाच अधिकार नाकारला जातो, मग ही तर मुलगी होती.
लक्ष्मीला वाढवताना तिच्यात काही कमतरता आहे, असं समजून न वाढवता होता होईल तेवढं सामान्यपणे ती कशी वाढेल आणि ते करताना ती स्वावलंबी कशी होईल याचाच विचार आम्ही केला. ती घरात तिच्या चार भावंडांची ताई आहे. तिच्या तीन बहिणी आणि एका भावाची ती पहिली गुरू आहे. त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवणं हे तीच करते. ती शाळेत जायची तेव्हा तिला वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायला शिकवलं. उदाहरणासह कित्येकदा पटवून दिलं की, लोक चांगल्यातही दोष शोधतात, लोकांना दोन्ही बाजूंनी बोलण्याची सवय असते, त्यामुळे तिनेही ते चांगलंच आत्मसात केलंय. लोकांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्षच करते ती. घरी सगळ्यांना सकारात्मकतेने वाढवण्याचा प्रयत्न केला. आहे त्या परिस्थितीतही ती आणि तिची भावंडं आनंदी कशी राहतील हा प्रयत्न केला. अर्थात घरातल्या पुरुषाच्या साथीशिवाय हे शक्यच नाही. तिच्या वडिलांची साथ होती म्हणूनच लक्ष्मी आणि तिच्या भावंडांना वाढवणं सोप्पं झालं.
लक्ष्मी दोन किलोमीटर चालत जाऊन शाळेत ये-जा करायची. शारीरिक स्वच्छतेसाठी काही प्रमाणात ती आमच्यावर अवलंबून आहे, अन्यथा जेवण करण्यासह इतर सगळी कामं तिची तीच कशी करेल हे मी पाहिलं. तिला घरातली छोटीमोठी कामंही शिकवली. तिच्या तिन्ही बहिणी तिला सर्वतोपरी मदत करत असतात, लक्ष्मी त्यांचा आदर्श आहे. भावंडांमुळेही असेल, ती नेहमीच जिद्दीने वागत राहिली. दहावी-बारावी ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. तिच्या शिक्षकांनी तिला खूप आग्रह केला होता की, तिने या दोन्ही परीक्षांसाठी रायटर घेऊन पेपर लिहावेत, मात्र तिची जिद्द एवढी की, तिने त्याला नकार दिला आणि तिच्या पायानेच तिने पेपर लिहिले. अगदी आजही ती रायटरच्या मदतीशिवायच सगळे लिखाण करते. तिचे अक्षरही खूप चांगले आहे. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी रिक्षाचालक म्हणून व्यवसाय सुरू केला आणि ते तिला रिक्षातून कॉलेजला पोहोचवायचे आणि आणायचे. आज कविता हात नाहीत म्हणून थांबून राहिलेली नाही, तर पायांनी लिहिते, जेवते, मोबाइल, संगणक हाताळते आणि खूप काही.. आज लक्ष्मी बी.ए.च्या द्वितीय वर्षांचा अभ्यास करतेय. आमच्यापासून दूर जळगावला यजुर्वेद्र महाजन या सरांच्या ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’मध्ये राहून पुढचे शिक्षण घेत आहे. तिला लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन मोठं अधिकारी व्हायचं आहे. तिथं ती तिचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल याची मला खात्री आहे. लक्ष्मी आता तिथे राहून चांगली चित्रं काढायला शिकली आहे. गाणंही शिकते आहे, याचं मला कौतुक वाटतं.
मूल जसं आहे तसं स्वीकारलं की त्याला वाढवताना कुठलीच अडचण येत नाही, मग ते मूल विशेष असो की सामान्य. आपण मागे बघण्याऐवजी पुढे बघून जर वागलो, जगलो तरच मुलंही पुढे बघायला शिकतील. मुलं आनंदी असणं याशिवाय आईवडिलांचा आनंद आणखी कशात असतो?
laxmishinde1999@gmail.com
chaturang@expressindia.com
शब्दांकन – रेश्मा भुजबळ