शीतल माळी sudammail1710@gmail.com
ऋषिकेश आता दहावीला आहे, स्वत:च्या पायांवर उभा आहे. त्याला, त्याच्या पायांना खंबीर बनवले ते त्याचा आईने शीतल माळी यांनी. चार वर्षे एकही शब्द न बोलणाऱ्या, न चालणाऱ्या, अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या मुलाला त्यांनी खूप कष्टाने, प्रयत्नाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने चालते-फिरते तर केलेच शिवाय ‘चांगला माणूस’ बनवण्याचाही प्रयत्न करत आहेत. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर अटळ असणाऱ्या ऋषिकेशच्या संघर्षांत त्याही लढायला सज्ज आहेत.
आम्ही ऋ षिकेशला शून्यातून बाहेर काढले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण जन्मानंतर तो जवळपास चार वर्षे बोलला तर नव्हताच पण मला आई म्हणूनही ओळखत नव्हता. मी खूप रडायचे की त्याने मला किमान आई म्हणून ओळखावे. हाक मारावी. पण तसं होत नव्हतं. अर्थात मी जिद्द सोडली नाही. आज तो जिथे आहे तेथून त्याला अजूनही खूप पुढे न्यायचे आहे. त्याला ‘जग’ शिकवायचे आहे. ‘माणसे’ शिकवायची आहे. त्याला एक ‘चांगला माणूस’ बनवायचा आहे. शिक्षणाने, अनुभवाने आणि कृतीने ते मला साध्य करायचे आहे, हेच माझ्या जीवनाचे सध्याचे ध्येय आहे. आम्ही याकरिता सर्व पातळीवर ‘लढायला’ तयार आहोत. कारण आम्हाला माहीत आहे की जीवनाच्या प्रत्येक पायरीवर त्याच्यासाठी ‘संघर्ष’ आहेच.
ऑक्टोबर २००३ ला रायगड जिल्ह्य़ात म्हसळा तालुक्यात ऋ षिकेशचा जन्म झाला. माझे सात महिनेदेखील पूर्ण झाले नव्हते. आठ दिवस शिल्लक असतानाच डॉक्टरांनी प्रसूती केली. जन्म झाला पण बाळ रडले नाही. जन्मत: न रडल्याने आम्ही धास्तावलो. बाळाला बालतज्ज्ञाकडे घेऊन जाण्यासाठी महाडकडे निघालो. तोपर्यंत लागलेले ते जीवघेणे दोन तास आम्ही कसे काढले ते आम्हालाच माहीत. शिवाय बाळाला ऑक्सिजनचा पुरवठादेखील नीट होत नव्हता याची काळजी मनात शंकेचे वादळ निर्माण करत होती. डॉक्टरांनी तिथे गेल्यावर बाळाला तपासून ‘काचेच्या पेटीत’ ठेवले. जवळजवळ तीन तासांनी सांगितले की, बाळ मरण पावले आहे. आम्ही सर्व रडायलाच लागलो. रात्रीची गाडी नव्हती म्हणून सकाळी दवाखाना सोडणार, असे सांगून तिथेच थांबलो. मात्र चार तासांनी बाळाने बोटे हलवली. डॉक्टरांना फोन केला. लगेच ऑक्सिजन आणि सलाइन लावले गेले. डॉक्टरांनासुद्धा आश्चर्य वाटले. ‘ऋ षी’चा पुनर्जन्म झाला होता जणू.
ऋषिकेशला दहा दिवसांनी घरी आणले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करत गेलो. तेल लावू नका, मॉलिश करू नका. पण त्याची हालचालच होत नव्हती. तो आवाजाकडे लक्षसुद्धा देत नव्हता. असेच चार महिने गेले. घरातले म्हणत की काही मुले उशिरा हालचाल करतात. माहेरी (वाडे भडगाव, जिल्हा जळगाव) गेल्यावर माझी आई रागावली. चार महिन्यांच्या मुलाच्या हालचाली, त्याची लक्षणे वेगळी असतात हे लक्षात आल्यावर त्याला आम्ही चाळीसगाव येथे डॉक्टरांकडे घेऊन गेलो असता बाळाच्या मेंदूची वाढ अपूर्ण असल्याचे सांगितले गेले. ते ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. डॉक्टरांनी पुण्याच्या के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. पुण्याच्या डॉक्टरांनी बाळाला सेरब्रल पाल्सी आहे, असे सांगून आपले मूल हे ‘विशेष’ असल्याचे सांगितले. आम्ही दोघे सुन्न होऊन फक्त ऐकत होतो.
डॉक्टरांनी ‘थेरेपी’ सुरू करायला सांगितली. महिन्यातून दोन वेळा बोलवायचे. आम्ही व्यायामाचे विविध प्रकार समजावून घेऊन घरी आल्यावर जसा वेळ मिळेल तसा व्यायाम करायचो. खेडेगावात राहत असल्यामुळे पाण्यापासून तर वाण्यापर्यंत सर्वच बाबींची वानवा होती. पाणी बाहेरून आणावे लागे, कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागे आणि इतरही कामांमुळे जास्त वेळ ऋ षीकरिता देता येत नव्हता. ऋ षिकेश दोन वर्षांचा होत आला होता. सुधारणा काहीच दिसत नव्हती. आई म्हणून मला तो ओळखत होता की नाही याबद्दलदेखील मला शंका होती. पायात पीळ होता. पायाच्या शिरा अतिशय कडक होत्या. पायाची आढी पुन:पुन्हा काढावी लागत होती. मान न धरणे, लाळ गाळणे आणि डोळे वर करणे या लक्षणांचे दु:ख त्याच्या हसण्याने दूर होत नव्हते. ‘हसणे’देखील मनातून रडवतच होते. ‘के.ई.एम’कडून दुसऱ्या हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. तेथे गेल्यावर दोन्ही पायांची शस्त्रक्रिया सांगितली. त्यांनी, आम्ही फक्त पायाच्या नसा मोकळ्या करू मात्र पायाची आढी (पीळ) निघेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे आमचा धीर खचला. काय करावे सुचेनासे झाले. मात्र एकदिवस अचानक ‘दूरदर्शन’वरील ‘हॅलो डॉक्टर’ या कार्यक्रमात रशियन शस्त्रक्रियेविषयी ऐकलं. डॉक्टर अशाच केसेसच्या शस्त्रक्रियेविषयी बोलत होते. आशेचा किरण सापडला आणि आम्ही साडेतीन वर्षांच्या ‘ऋ षिकेश’ला घेऊन ‘माहीम’ला डॉ. सुहास शहा यांना गाठले. तिथेच ऋ षिकेशवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाची शस्त्रक्रिया होती, पण ती झाली आणि ऋ षि कंठ फुटल्यासारखा बोलू लागला, उच्चार करू लागला. आम्हाला खूप आनंद झाला.
त्यानंतर दोन महिने प्लॅस्टर होते. बेडवरच सर्व काही करावे लागे. तो खूप कंटाळायचा, पण त्रास सहन करायचा. प्लॅस्टर काढल्यानंतर कल्याणला फिजीओथेरेपी सुरू केली. त्याच्यामुळे भरपूर सुधारणा झाली. त्याच्यामधील सुधारणा आम्हाला जाणवत होती. तो पाच वर्षांचा झाल्यावर त्याला एका इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी घेऊन गेलो. पण शाळेने प्रवेश दिला नाही. अशा मुलांची शाळा वेगळी असते हे ऐकून मला तर रडूच कोसळले. पण मी गप्प बसले नाही. त्याला घरीच जसे जमेल तसे शिकवू लागले.
सुदैवाने पुढील वर्षी प्रयोग म्हणून जिल्हा परिषद शाळेत पहिलीपासून इंग्रजी माध्यम सुरू केले. तेथे त्याला प्रवेश घेतला. रोज शाळेत येऊन जाऊन आठ फेऱ्या व्हायच्या. तसेच नैसर्गिक विधी आणि इतर शारीरिक अडचणी होत्याच. मात्र या सर्वावर मात करत त्याने सामान्य मुलांच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पार केले. हे साध्य झाले त्याचे गुरुजन असलेल्या आर.डी. पाटील सरांमुळेच. पुढे पाचवीला माध्यमिक शाळेत घेऊन जायला रस्ता खराब होता. पण तशीच दोन वर्षे काढली. तो सहावीत असताना परत याच्या दोन्ही पायांची शस्त्रक्रिया केली, कारण तो परत पाय वाकवायला लागला होता. डावा हात जास्तच जड असल्याने त्याला ‘बोटोक्स’ इंजेक्शन देऊन सरळ आणि सैल करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या वेळी बराच त्रास सहन केला. त्यामुळे ऋ षीने थेरेपी, सायकल, चालवणे या गोष्टी जास्त काळजी घेऊन केल्या. थोडय़ा फार आधाराने तो सायकल चालवायला शिकला. अभ्यास-शाळा जसे जमेल तसे चालू होतेच. त्याची उंची, तब्येत माझ्याने पेलली जात नव्हती. तसेच शाळा दूरवर असल्यामुळे तसेच रस्ते खराब असल्याने नववीपर्यंत शाळा घरीच अभ्यास घेऊन पूर्ण केली. फक्त काही मोजक्या दिवशी तो त्याच्या बाबांबरोबर शाळेत जात होता आणि परीक्षेला. घरीच अभ्यासाचे वेळापत्रक आणि व्यायामाचे वेळापत्रक ठरलेले होतेच. तसेच सकाळी साडेपाचपासून सुरू झालेला दिवस सायकलिंगपासून सुरू होऊन वर्तमानपत्र वाचन, गाणी ऐकणे, म्हणणेपासून ते रात्री कथावाचनानंतर संपत होता.
दरम्यानच्या काळात शाळेत असताना ऋ षीने एमएस्सी-आयटी पूर्ण केले. त्याला ८९ गुण मिळाले. आता तो १० वी ला आहे. लिहिताना थोडा जास्त वेळ लागतो एवढी अडचण सोडली तर सामान्य मुलांच्या तुलनेत कुठेच कमी नसल्याचे समाधान वाटते. त्याला वर्तमानपत्र वाचणे, बातम्या वाचणे, ऐकणे, पाहणे खूप आवडते. भक्तिगीते आणि भावगीते म्हणायला आवडत असल्यामुळे तो दर वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात आवर्जून सहभागी होतो. त्याच्यामुळे आम्हाला ओळख मिळते आहे, मिळाली आहे.
ऋ षीचे बाबा १७ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेवर मुख्याध्यापक आहेत. मला विशेष मुलांच्या पालकांना सांगायचे आहे की खचून जाऊ नका. संयमाने घ्या. अशा विशेष मुलांसाठी फिजिओथेरेपीची खूप गरज असते. त्याची ‘विशेष’ बाब शोधून काढा. त्याच्या मनाचा, बुद्धीचा आणि शरीराचा व्यायाम कधीही थांबवू नका. समाजाकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीकडे जास्त लक्ष देऊ नका.
chaturang@expressindia.com